Saturday, 1 March 2014

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले केंजळगड ।।


किल्ल्याची ऊंची :  ४२६९ मी.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
 डोंगररांग: महाबळेश्वर
जिल्हा : सातारा 
श्रेणी : मध्यम
 
केंजळगड हा तब्बल सव्वाचार हजार फूट उंचीवर असलेला हा रांगडा किल्ला वाई आणि रायरेश्वर दरम्यानच्या महादेव डोंगररांगांच्या एका उत्तुंग नाकाडावर उभारलेला आहे. रोहिड्याची डोंगररांग उतरतांना नैऋत्य दिशेला लांबवर एका भल्या मोठ्या पहाडाच्या डोक्यावर गांधी टोपीच्या आकाराचा केंजळगड अधून मधून दर्शन देत असतो. केळंजा व मोहनगड ही केंजळगडाचीच उपनावे आहेत.

इतिहास :
बाराव्या शतकात भोजराजाने केंजळगडाची निर्मिती केली. इ.सन १६४८ मध्ये हा किल्ला अदिलशहाच्या आधिपत्याखाली आला. सन १६७४ मध्ये शिवरायांचा मुक्काम चिपळूण शहरात पडला होता. वाई आणि आजुबाजूच्या परिसरातील सर्व किल्ले शिवरायांच्या ताब्यात आले होते. मात्र केंजळगड अजून त्यांच्या ताब्यात आला नव्हता म्हणून शिवाजी महाराजांनी केंजळगड घेण्यासाठी आपल्या मराठी फौजा पाठवल्या. गंगाजी विश्वसराव किरदत हा किल्ल्याचा किल्लेदार होता, त्याने मराठ्यांना चोख प्रत्युत्तर दिले. पण मराठ्यांकडून तो मारला गेला आणि २४ एप्रिल १६७४ मध्ये किल्ला मराठ्यांनी जिंकला. पुढे १७०१ मध्ये हा गड औरंगजेबाकडे गेला. मात्र लगेच एक वर्षाने म्हणजे १७०२ मध्ये परत केंजळगड मराठ्यांच्या ताब्यात आला. २६ मार्च १८१८ साली ब्रिटिश अधिकारी जनरल प्रिझलर याने दुर्गाचा ताबा घेतला.

पहाण्याची ठिकाणे :
कोर्लेमार्गे सुमारे दोन तासांच्या आल्हाददायी निसर्गभ्रमणानंतर आपण केंजळगडाच्या खांद्यावर जाऊन पोहचतो. माचीवर पूर्वेकडच्या अंगाला सपाटीवर पाच, सात खोपटांची वस्ती आहे, तिला ओव्हरी म्हणतात. मागे केंजळचा भला मोठा खडक उभा असतो. या काळ्या पहाडाच्या माथ्यावर मजबूत झाडी व गवताचे रान माजलेले दिसते. येथे मार्गदर्शक नसेल तर झाडीत उगाच भटकत बसावे लागते, म्हणून मार्गदर्शकाच्या सहाय्याने झाडीतून जाणार्‍या वाटेने वर चढू लागले की आपण गडावर पोहचतो. माथ्यालगतच या गडाचे वैशिष्ट्य आपल्या निदर्शनास येते, ते म्हणजे एवढ्या उंचीवर उभ्या कातळात कोरून काढलेल्या पायर्‍या होत. ज्या किल्ल्याच्या पायर्‍या फार श्रम करून अवघड जागी खडकात कोरून काढल्या आहेत, अशा मोजक्या किल्ल्यांमध्ये केंजळगड अग्रभागी आहे. डोंगर शिखरावरील कातळात पूर्ण लांबीच्या ५५ उंचच उंच पायर्‍या आहेत.

रायरेश्वरहून येतांना काळ्या कातळभिंतीपाशी येऊन पोहोचलो की, उजव्या हातास वळसा घालून पंधरा वीस मिनिटांत आपण त्या कातळ पायर्‍यांपाशी येऊन पोहचतो. पायर्‍यांच्या खाली थोडे पुढे एक गुहा लागते. या गुहेत काळ्या रंगाचे कोळी मोठ्या संख्येने आढळतात. या गुहेच्या जरा पुढे पाण्याचे एक छोटे टाके लागते. यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. पायर्‍यांच्या सुरवातीला दोन्ही बाजूला देवडयांचे अवशेष आहेत. पायर्‍या संपता संपता येथे पूर्वी दरवाजा होता हे सांगणारं जोते फक्त दिसते. माथा गाठल्यावर तटाजवळ एक प्रशस्त खोदलेले तळे आहे. या तळ्याचे पाणी मोठे मधुर आहे.
गडाचा घेर हा लंबवर्तुळाकार आणि छोटाच आहे. चारही बाजूंनी उभे ताशीव कातळ कडे आहेत. काही ठिकाणी मजबूत अशी तटबंदी आहे. गडाच्या एका अंगास वाई प्रांताच्या दिशेस थोडी फार तटबंदी आढळते. एक पडझड झालेला बुरूजही आहे. एक सुकलेले टाके तसेच काही इमारतींचे भग्नावशेषही आढळतात. येथेच वरच्या अंगास एक चुन्याचा घाणा आहे. पुढे एक चांगली मजबूत अशी इमारत आढळते साधारण कोठारासारखी तिची रचना आहे. काही कागदपत्रांच्या उल्लेखानुसार हे दारूचे कोठार असावे. येथून पुढे रायरेश्वराच्या दिशेने ओसाड माळ आहे. कोठारापासून दुसर्‍या दिशेने चालत गेले असता आणखी एक चुन्याचा घाणा आढळतो. दोन चुन्याचे घाणे असणे म्हणजे गडावर मोठ्या प्रमाणावर बांधकाम झालेले असले पाहिजे. पण गडमाथ्यावर सर्व बाजूला असलेल्या छातीपर्यंत वाढलेल्या गवतामुळे ही बांधकामे शोधणे कठीण होऊन बसते. या दुसर्‍या चुन्याच्या घाण्यापुढे काही अंतरावर एका जुन्या मंदिराचे अवशेष आहेत. छप्पर नसलेल्या या देवळात केंजाई देवीची मूर्ती आहे. इथल्या रांगड्या निसर्गाला साजेश्या रांगड्या देवतांच्या इतरही काही मूर्ती आसपास आहेत. केंजळगडाची ही डोंगररांग माथ्याकडे हिरवाईने नटलेली दिसते. पावसाळ्या नंतर नजीकच्या काळात आल्यास सारी धरणी हिरव्या गवताने आच्छादलेली असते. अशा अमोघ सौंदर्याने नटलेला केंजळगड हा ट्रेकिंगसाठी आकर्षक ठिकाण ठरतो.

पोहोचण्याच्या वाटा :
१ कोर्लेमार्गे :-
भोरहून सकाळी साडेसात वाजता कोर्ले या गावी जाण्यासाठी एस्‌टी बस येते. तासाभरात बस कोर्ल्याला पोहोचते. तेथून पश्चिमेला केंजळचा मार्ग जातो. तर उत्तरेला रायरेश्वराचे पठार दिसते. भोरहून आंबवड्याला दिवसातून दहा बसेस येतात. आंबवड्याला उतरूनही कोर्ल्याला पायी ( साधारण ६ कि.मी ) जाता येते. चिखलवडे, टिटेघरकडे येणार्‍या एसटी नेही कोर्ले गाठता येते. कोर्ल्याहून गडावर दोन तासात पोहचता येते.

२ वाईमार्गे :-
वाईमार्गे गडावर येण्यासाठी एक मार्ग आहे. वाईहून खावली गावी यावे. खावली गावी जेथे एसटी थांबते तेथून थोडे पुढे ५ ते १० मिनिटे चालल्यावर उजवीकडे गडावर जाणारा रस्ता दिसतो. अर्धा गड चढून गेल्यावर थोडी वस्ती लागते. येथपर्यंतचा रस्ता ही एक कच्ची सडक आहे. येथून पुढे पायवाटेने अर्धा - एक तासात आपण गडावर येतो. गडाच्या कातळाजवळ आल्यावर आपण डोंगरसोंडेवरुन येणार्‍या वाटेवर येतो.

३ रायरेश्वरमार्गे
रायरेश्वरच्या देवळाकडे पाठ करून उजवीकडील शेताच्या बांधावरून टेकडीखाली उतरले की समोर केंजळगडाचा घेरा, बालेकिल्ला आणि रायरेश्वरला जोडणारी डोंगररांग स्पष्ट दिसते. आणखी दहा मिनिटे चालल्यावर पठार संपते. तेथून खाली उतरायला एक लोखंडी शिडी आहे. शिडीने खालच्या धारेवर उतरावे, उजवीकडे खाली खावली गाव दिसते. समोर केंजळगडाच्या पाठीमागे असलेल धोम धरणातील पाणी आणि त्याच्याच पलीकडे असलेला कमळगडाचा माथा आपल्याला खुणावत असतो. त्याच वाटेने दीडएक तास चालत राहिले की केंजळगडाच्या उभ्या कातळभिंतीशी येऊन पोहचतो.

राहाण्याची सोय :
गडावर राहण्याची सोय नाही. तंबू ठोकून राहता येऊ शकते, पण वारा प्रचंड असतो. दुसरी सोय म्हणजे ओव्हरीची वस्ती, जेमतेम पाचसात घरांची ही आदिवासी वस्ती असली तरी तेथील केंजळाई देवळात दहाबारा जणांची रहाण्याची सोय होऊ शकते.


जेवणाची सोय : जेवणाची सोय आपणच करावी.


पाण्याची सोय : गडावरील तळ्याचे पाणी पिण्यासाठी वापरता येऊ शकते. कातळ पायर्‍यांच्या खाली थोडे पुढे एक गुहा लागते, या गुहेच्या जरा पुढे पाण्याचे एक छोटे टाके लागते यातील पाणी पिण्यासाठी उपयुक्त आहे.


जाण्यासाठी लागणारा वेळ : रायरेश्वर रस्ता ते केंजळगड ३ तास लागतात.


|| छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा ||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥