Monday, 30 April 2012

|| १ मे महाराष्ट्र दिन ||

!! गर्जा महाराष्ट्र माझा ... जय जय महाराष्ट्र माझा !!


शहाजीराज्यांनी मनी संकल्पिलेला गगनचुंबी महाराष्ट्र ... 
जिजाऊमांसाहेबांनी स्वप्नी पाहिलेला तेजोमय महराष्ट्र ...
शिवाजीराज्यांनी महत कष्टानी उभा केलेला बुलंद व अखंड महराष्ट्र.....
शंभूराज्यांनी प्राण देऊन राखलेला अभेद्य महराष्ट्र....
लाखो मावळ्यांच्या रक्ताने सिंचून फुलेला गौरवशाली महराष्ट्र....
कृष्णा-गोदेच्या स्पर्शाने पवित्र झालेला पावन महाराष्ट्र....
सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यात वसलेला कणखर महाराष्ट्र....
१०५ हुतात्म्यांच्या काळजातून उगवलेला हिंदुस्तानचा आत्मा संयुक्त महराष्ट्र ....
सर्व जागा समोर आदर्श ठरलेल्या आपल्या ह्या गगनचुंबी,तेजोमय,बुलंद, अभेद्य,अखंड , गौरवशाली,कणखर,पावन व संयुक्त महाराष्ट्रा....
 महाराष्ट्राच्या भूमी तुझा आम्हा आहे अभिमान.. कुशीत घेऊन जन्म तुझ्या झाले सार्थक जीवनमान... !!!!



महाराष्ट्राचा स्वाभिमान .. मराठ्यांचा अभिमान ...आमची आन ,बाण आणि शान
फक्त छत्रपती शिवराय...!!!!!!


!! गर्जा महाराष्ट्र माझा .... जय जय महाराष्ट्र माझा !!



||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||





॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

Thursday, 26 April 2012

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले आजोबागड ।।


आजोबागड किल्ला

बालाघाटाच्या रांगेत रतनगड आणि हरिश्चंद्रगड यांच्या मधोमध अगदी कडेला असलेला आजोबाचा डोंगर एखाद्या पुराण पुरुषासारखा दिसतो. या गडाची ३,००० फुट उभी भिंत ही प्रस्तरारोहकांसाठी एक आव्हान व आगळे-वेगळे लक्ष्य आहे.

इतिहास:
पुराणकथेनुसार, याच गडावर बसुन वाल्मिकींनी रामायण लिहिले. याच गडावर सीतामाईने लव आणि कुश यांना जन्म दिला. लव आणि कुश वाल्मिकींना 'आजोबा' म्हणत असत, म्हणूनच या गडाचे नाव आजोबागड असे पडले. गडावर वाल्मिकींचा आश्रम व समाधी आहे.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे:

पहिली वाट पकडून वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापाशी साधारणतः अर्ध्या तासात पोहचावे. वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाजवळून गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी वाट नसल्याने आपल्याला मुक्काम आश्रमातच करावा लागतो. येथे गडावर रहाण्यासाठी एक कुटी आहे.जवळच पाण्याचा झरा आहे. जर मुक्कामाचा कार्यक्रम असेल तर जेवणाची सोय आपल्याला घरूनच करून आणावी लागते. आश्रमाजवळून पुढे धबधब्याच्या वाटेने चढत गेल्यास सुमारे एक ते दीड तासानंतर वर एक गुहा लागते. येथे लवकुशाच्या पादुका खडकात कोरलेल्या आहेत. येथे डावीकडे एक पाण्याचे टाके सुद्धा आहे. या गुहेपर्यंत जाण्यासाठी लोखंडी शिडा देखील लावल्या आहेत. याच मार्गाने आश्रमात परतावे. अशा प्रकारे मुंबईहून येणार्‍यांसाठी आजोबाचा गड एक निसर्गरम्य अशी दुर्गयात्राच ठरते. गडाच्या माथ्यावर दोन ते तीन पाण्याची टाकी सोडल्यास पहाण्याजोगे विशेष असे काहीच नाही. अनेक दुर्गवीर रतनगड - आजोबाचा गड - हरिश्चंद्रगड असा ४ ते ५ दिवसांचा ट्रेक करतात.

गडावर जाण्याच्या वाटा:

1. मुंबईहून आसनगाव रेल्वे स्थानकावरून:
गडावर जाण्याचा सरळ आणि सोपा मार्ग म्हणजे मुंबईहून आसनगाव रेल्वे स्थानकावर यावे.येथून शहापूर या गावी रिक्षेने अथवा एस.टी. ने यावे.येथून पहाटेच एस.टी ने अथवा जीपने डोळखांब-साकुर्ली मार्गे'डेणे' या गावी यावे. 'डेणे' गावातून जाताना मध्ये एक पठार लागते. पठारावर तीन वाटा एकत्र येतात. यातील एक बैलगाडीची वाट सरळ वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापाशी घेऊन जाते. दुसरी वाट कात्राबाईच्या डोंगरात जाते आणि पुढे 'कुमशेत' या गावास जाऊन मिळते. तिसरी वाट मात्र जंगलात जाते. या वाटेने न जाणेच श्रेयस्कर.

2. कल्याण - मुरबाड - माळशेज - डोळखांब या मार्गाने :

कल्याण - मुरबाड - माळशेज - डोळखांब या मार्गाने सुद्धा डेणे गावी पोहचता येते.

3. कसारा - घोटी - राजूर - कुमशेत मार्ग :

गडावरचा माथा पहाण्यासाठी कसारा - घोटी - राजूर - कुमशेत मार्गेजाता येते.

गडावर राहण्याची सोय : गडावरती राहण्यासाठी आश्रम आहे. यात २० जणांना रहाता येते.

जेवणाची सोय : येथे जेवणाची सोय नसल्याने जेवणाचे साहित्य आपण स्वतःच घेऊन यावे.
गडावर पाण्याची सोय : येथे बारामाही पाण्याचा झरा सतत वाहत असतो.

जाण्यासाठी लागणारा वेळ : एक तास.

सूचना : गडावर सापांचे वास्तव्य असल्याने, योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.



नोट : वरील सर्व माहिती "गडवाट"  "महाराष्ट्रातील किल्ले" या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

Wednesday, 25 April 2012

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले जीवधन ।।

जीवधन किल्ला


घाटघरच्या परिसरात असलेला हा पुर्वमुखी किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता. नाणेघाटापासून जीवधन किल्ला अगदी हाकेच्या अंतरावर आहे. जीवधनच्या पायथ्याचे गांव म्हणजे घाटघर. बांबूची बने हे या गावचे वैशिष्टय!

इतिहास:
शिवजन्माच्या वेळी अस्ताला जाणाऱ्या निजामशाहीच्या देणारा किल्ला म्हणजे जीवधन होय. १७ जुन १६६३ रोजी निजामशाही बुडाली.शहाजीराजांनी निजामशाहीचा शेवटचा वंशज मुर्तिजा निजाम याला जीवधनच्या कैदेतून सोडवुन संगमनेरजवळील पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणुन घोषित केले व स्वतः वजीर बनले.

गडाचा दरवाजा हा कातळकड्यामध्ये कोरलेला आहे.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
पश्चिम दरवाजाने गडावर पोहोचल्यानंतर समोरच गजलक्ष्मीचे शिल्प आहे. स्थानिक लोक याला "कोठी" म्हणतात. दक्षिण दिशेस जीवाई देवीचे पडझड झालेले मंदिर आहे. आसपास पाण्याची टाकी आहेत. गडाच्या अंतर्भागात एकात-एक अशी पाच धान्य कोठारे आहेत. कोठारामधील कमलपुष्पांचे कोरीव नक्षीकाम आहे. १८१८ च्या शेवटच्या मराठे-इंग्रज युद्धाता या कोठारांना आग लागली होती, त्यांची राख आजही या कोठारांमध्ये पहायला मिळते.

आयताकार असणार्‍या या गडाच्या टोकाला सुमारे २००० फुट उंचीचा "वानरलिंगी" नावाचा एक सुळका लक्षवेधी आहे. समोरच नानाचा अंगठा, हरिश्चंद्रगड, हडसर, चावंड आणि कुकडेश्वराचे प्राचीन मंदिर आहे.

गडावर जाण्याच्या वाटा:

१. कल्याण-अहमदनगर मार्गे नाणेघाट चढुन गेल्यानंतर एक पठार लागते. या पठाराच्या उजव्या बाजुला जाणारी वाट व वानरलिंगी नजरेसमोर ठेऊन चालत रहावे. वाटेत दोन ओढे लागतात व त्यानंतर उभी कातळभिंत. या भिंतीला चिटकुन उजव्या हाताला असणारी वाट गडाच्या पश्चिम दरवाजाकडे जाते. इ.स. १८१८च्या युद्धात इंग्रजांनी ही वाट चिणुन काढली व पश्चिम दरवाजाची वाट बंद केली. वानरलिंगीची ही वाट नावाप्रमाणे वानरयुक्त्या करुनच पार करावी लागेते. ही वाट अवघड आहे, त्यामुळे जरा जपुनच चढावे.

२. जुन्नर - घाटघर मार्गे असणारी ही वाट म्हणजे राजमार्ग आहे. सोपी व सोयिस्कर वाट असली तरी, एक-दोन ठिकाणी उभ्या खोदलेल्या पायऱ्या पार कराव्या लागतात, त्यामुळे सोबत एखादा दोर जरुर ठेवावा.

गडावर राहण्याची सोयः नाही.
गडावर जेवणाची - पाण्याची सोयः जेवणाची स्वतःच करावी, पाण्याची बारमाही टाकी आहेत.

गडावर चढण्यासाठी लागणारा वेळः जुन्नर - घाटघर मार्गे - अंदाजे २ तास.



नोट : वरील सर्व माहिती "गडवाट"  "महाराष्ट्रातील किल्ले" या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

Friday, 20 April 2012

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले सिंहगड ।।


सिंहगड किल्ला

पुण्याच्या नैऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फुट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पायर्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठुनही तो ध्यानी येतो. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापुर, तुंग असा प्रचंड मुलुख या गडावरुन दिसतो.

इतिहास :

पूर्वी हा किल्ला आदिलशाहीत होता. दादोजी कोंडदेव हे आदिलशहाकडून सुभेदार म्हणून नेमले होते. पुढे इ.स. १६४७ मध्ये दादोजी कोंडदेवांच्या निधनानंतर कोंडाण्यावरील किल्लेदार सिद्दी अंबर याला लाच देऊन शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला आणि गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. पुढे इ.स. १६४९ मध्ये शहाजी राजांच्या यांच्या सुटकेसाठी शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंढाणापण होता. मोगलांतर्फे उदेभान राठोड हा कोंढाण्याचा अधिकारी होता. हा मुळचा राजपूत पण नंतर मुसलमान झाला.सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होते आणि शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळच्या सैन्याने हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला. या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि जीवनाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी "गड आला पण सिंह गेला" हे वाक्य उच्चारले. पुढे त्यांनी गडाचे नाव सिंहगड असे बदलले. सिंहगड हा मुख्यतः प्रसिध्द आहे तो तानाजी मालूसरे यांच्या बलिदानामुळे.या युध्दाबाबत सभासद बखरीत खालील उल्लेख आढळतो.
तानाजी मालुसरा म्हणून हजारी मवळियांचा होता. त्याने कबूल केले की, 'कोंडाणा आपण घेतो', असे कबूल करुन वस्त्रे, विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला. आणि दोघे मावळे बरे, मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले. गडावर उदेभान रजपूत होता. त्यास कळले की, गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल रजपूत कंबरकस्ता होऊन, हाती तोहा बार घेऊन, हिलाल (मशाल), चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफाची व तिरंदाज, बरचीवाले, चालोन आले. तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर रजपुतांचे चालून घेतले. मोठे युद्ध एक प्रहर झाले. पाचशे रजपूत ठार जाले. उदेभान किल्लेदार खाशा त्याशी व तानाजी मालुसरा यांशी गाठ पडली. दोघे मोठे योध्दे, महशूर, एक एकावर पडले. तानाजीचे डाव्या हाताची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास आली नाही. मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करुन त्याजवर वोढ घेऊन, दोघे महरागास पेटले. दोघे ठार झाले. मग सुर्याजी मालूसरा (तानाजीचा भाऊ), याने हिंमत धरून, कुल लोक सावरुन उरले राजपूत मारिले. किल्ला काबीज केला. शिवाजी महाराजांना गड जिंकल्याची पण तानाजी पडल्याची बातमी मिळाली तेव्हा ते म्हणाले, 'एक गड घेतला, परंतु एक गड गेला'.माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ च्या रात्री हे युद्ध झाले.


गडावरील
पहाण्यासारखी ठिकाणे :

दारूचे कोठार :दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे दिसणार्या कोठारावर दि. सप्टेंबर ११ इ.स. १७५१ मध्ये वीज पडली. ह्या अपघातात गडावरील त्यावेळच्या फडणीसाचे घर उध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली.

टिळक बंगला :रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या बंगल्यात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक राहण्यासाठी येत. इ.स. १९१५ साली लोकमान्यांची आणि महात्मा गांधींची भेट याच बंगल्यात झाली.

कोंढाणेश्वर :हे शंकराचे मंदिर असून ते यादवांचे कुलदैवत होते. आत एक पिंडी आणि सांब असून हे मंदिर यादवकालीन आहे.

देवटाके :तानाजी मालूसरे यांच्या स्मारकाच्या मागे डाव्या हाताला हे प्रसिद्ध पाण्याचे टाके आहे. याचा उपयोग आजही पिण्याचे पाण्यासाठी म्हणून होत आहे. म. गांधी जेव्हा पुण्यास येत तेव्हा मुद्दाम या टाक्याचे पाणी मागवत असत.

कल्याण दरवाजा :गडाच्या पश्चिमेस असणारा ह्या दरवाजावर खालील शिलालेख आढळतो.


गडावर जाण्याच्या वाटा : 
सिंहगड हा किल्ला पुण्यापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. स्वारगेट बसस्थानकापासून सारसबाग किंवा नेहरु मैदानाकडून जाणारा हा रस्ता अंदाजे ३५ कि.मी. आहे.

मार्ग :
स्वारगेट - आनंदनगर - वडगांव - खडकवासला - सिंहगड पायथा.
स्वारगेट पासून ५० ते ५६ क्रमांकाच्या बस या मार्गावर धावतात. शिवाय, सहा आसनी किंवा खासगी वाहनाने सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. ज्यांना गडावर चालत जायचे नसेल त्यांच्यासाठी पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी खासगी वाहने साधारण दर ३०-६० मिनिटांनी उपलब्ध असतात.
राहण्याची सोय: आपण स्वतः करावी.
जेवणाची सोय: आपण स्वतः करावी.
पाण्याची सोय:  बारामही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ:
-३ तास

नोट : वरील सर्व माहिती "गडवाट"  "महाराष्ट्रातील किल्ले" या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले राजगड ।।


राजगड किल्ला


हिंदवी स्वराज्याची राजधानी, गडांचा राजा, राजियांचा गड ! शिवतिर्थ रायगड ! हिंदवी स्वराज्याची राजधानी गडांचा राजा, राजियांचा गड राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र. बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदुस्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. पुण्याच्या नैऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर अन् भोरच्या बायव्येला २४ कि.मी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी नांच्या खो-यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. मावळभागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा जरी अभेद्य असला तरी बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला तोरणा किल्ल्यापेक्षा मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते एवढी सुरक्षितता होती,म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली.राजगडाला तीन माच्या व बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला सर्वात उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे.शिवतीर्थ रायगड श्री शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो तर दुर्गराज राजगड त्यांच्या महत्वाकांक्षेची उंची दाखवतो.

इतिहास : 
इतिहासातून अस्पष्ट येणा-या उल्लेखांवरुन सातवाहनपूर्व म्हणजे साधारण २००० वर्षा पूर्वी पासूनचा हा डोंगर आहे. ब्रम्हर्षी ऋषींचेयेथे असणारे वास्तव्य व याच ब्रम्हर्षी ऋषींच्या नावावरुन येथे स्थापन झालेले श्री ब्रम्हर्षी देवस्थान यावरुन डोंगर फार पुरातन असावा.राजगडाचे पूर्वीचे नाव होते मुरंबदेव हा किल्ला बहमनी राजवटी मध्ये याच नावाने ओळखला जात असे अर्थात त्यावेळी गडाचे स्वरूप फार काही भव्य दिव्य असे नव्हते. इसवी सन १४९० च्या सुमारास अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक अहमद बहिरी याने वालेघाट आणि तळकोकणातील अनेक किल्ले जिंकून पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव निर्माण केला आणि याच वेळी त्याने मुरूंबदेव हा किल्ला हस्तगत केला. मुरुमदेवाचे गडकरी बिनाशर्त शरण आल्यामुळे अहमद बहिरीला किल्ला जिंकण्यास विशेष प्रयास करावे लागले नाही. पुढे किल्ल्यावर निजामशाहीची सत्ता प्रस्थापित झाल्यावर १२५ वर्षे किल्ल्यावर कोणाचाही हल्ला झाला नाही. इसवी सन १६२५ च्या सुमारास मुरूमदेव किल्ला निजामशाही कडून आदिलशही कडे आला. निजामशहाच्या वतीने बाजी हैबतराव शिलीमकर व त्याचे वडीलरुद्राजी नाईक या किल्ल्याची व्यवस्था पाहत होते.
मलिक अंबरच्या आदेशानुसार बाजी हैबरावाने मुरुमदेवाचा ताबा आदिलशाही सरदार हैबतखामाकडे दिला. १६३० च्या सुमारास हा किल्ला आदिलशहाकडून परत निजामशाहीत दाखल झाला. शहाजीराजांचा अधिकारी सोनाजी या किल्ल्याचा कारभार पाहू लागला. विजापूर आदिलशाही सैन्याच्या एका तुकडीने किल्ल्यावर हल्ला केला. त्यात सोनाजी जखमी झाला. म्हणून बालाजी नाईक शिळीमकर आपल्या तुकडीसह मुरुमदेवाच्या रक्षणार्थ धावून गेला. तेव्हा बालाजी नाईक जखमी झाला. या कामगिरी बद्दल शहाजीराजांनी बाळाजी नाईक शिलीमकरांचा नंतर सन्मानही केला. शिवरायांनी मुरुमदेवाचा किल्ला कधी घेतला याचा लिखीत पुरावा आज मात्र उपलब्ध नाही त्यामुळे किल्ला ताब्यात कधी आला हे सांगणे अनिश्चितच आहे.

शिवचरित्र साहित्य खंडाच्या दहाव्या खंडात प्रसिद्ध झालले एक वृत्त सांगते की, 'शिवाजीने शहामृग नावाचा पर्वत ताब्यात घेऊन त्यावर इमारत बांधली.' सभासद बखर म्हणतो की, 'मुराबाद म्हणोन डोंगर होता त्यास वसविले त्याचे नाव राजगड म्हणोन ठेविले. त्या गडाच्या चार माच्या वसविल्या सभासदाने बालेकिल्ल्याला सुद्धा एक माची म्हणून गणली आहे.' मात्र सन १६४६ ते १६४७ च्या सुमारास शिवरायांनी तोरणा किल्ल्यासोबत हा किल्ला जिंकून घेतला. हा किल्ला बांधण्याचे काम महाराजांनी मोठा झपाटाने सुरु केले. त्या डोंगरास तीन सोंडा किंवा माच्या होत्या त्यासही तटबंदी केली. मुख्य किल्ल्यास राजगड नाव ठेवून एक इमारत उभी केली. तीन माच्यांना सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती ही नावे दिली. शिरवळ नजीक खेडबारे नावाचा गाव होता तेथे रान फार होते त्या ठिकाणी फर्माशी आंब्याची झाडे लावून पेठ वसविली व तिचे नाव शिवापूर असे ठेवले.इसवीसन १६६० मध्ये औरंगजेबाच्या आज्ञेनुसार शाहिस्तेखानाने शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी केली. फारसी साधनांमधून अशी माहिती मिळते की शाहिस्तेखानाने राजगडाकडे फौज पाठविलेली होती ह्या फौजेने राजगडाच्या जवळपासची काही खेडी जाळून उध्वस्त केली परंतु प्रत्यक्ष राजगड किल्ला जिकंण्याचा प्रयत्न मात्र केला नाही ६ एप्रिल १६६३ रोजी शाहीस्तेखानावर छापा घालून शिवाजी महाराज राजगडावर परतले.

सन १६६५ मध्ये मिर्झाराजा जयसिंग याने शिवरायांच्या प्रदेशावर स्वारी केली. दाऊदखान आणि रायसिंग या दोन सरदारांना त्याने या परिसरातील किल्ले जिंकण्यासाठी पाठविले. ३० एप्रिल १६६५ रोजी मुगल सैन्याने राजगडावर चाल केली. परंतु मराठांनी किल्ल्यावरुन विलक्षण मारा केल्या मुळे मुगलांना माघार घ्यावी लागली. शिवाजी महाराजांनी जयसिंग बरोबर तह करताना २३ किल्ले देण्याचे मान्य केले व स्वतःकडे १२ किल्ले ठेवले. या १२ किल्ल्यांमध्ये राजगड, तोरणा, लिंगाणा, रायगड यांचा समावेश होतो. सभासद बखरीतील उल्लेख खालील प्रमाणे आहे'सत्तावीस किल्ले तांब्रास दिले. निशाणे चढविली वरकड राजगड व कोट मोरोपंत पेशवे व निलोपंत मुजुमदार व नेताजी पालकर सरनोबत असे मातुश्रींच्या हवाली केले व आपणही दिल्लीस जावे, बादशाहाची भेट घ्यावी असा करार केला.' शिवाजी महाराज आग्र्याहून निसटून निवडक लोकांनिशी १२ सप्टेंबर १६६६ ला राजगडाला सुखरुप पोचले. २४ फेब्रुवारी १६७० रोजी राजगडावर राजारामचा जन्म झाला. सिंहगड किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसुरे यास राजगडावरुनच १६७० मध्ये पाठविले.

सन १६७१-१६७२ मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड स्थान राजधानी साठी निश्चित केले आणि राजधानी रायगडावरुन राजगडाकडे हलविली. ३ एप्रिल १६८० रोजी शिवरायांचे निधन झाल्यावर स्वराज्यावर औरंगजेबाच्या स्वारीचे संकट कोसळले. ११ मार्च १६८९ रोजी संभाजी महाराजांना पकडून ठार मारले यानंतर मुगलानी मराठांचे अनेक गड जिंकून घेण्याचा प्रयत्न केला. किशोरसिंह हाडा या मुगल सरदाराने जून १६८९ मध्ये राजगड जिंकून घेतला. औरंगजेबाने अबुलखैरखान याला राजगडाचा अधिकारी म्हणून नेमले. मात्र आप संभाजी महाराजांना पकडल्याची वार्ता पसरली नव्हती त्यामुळे मराठांची फौज राजगडाभोवती गोळा झाली आणि आपल्या बळावर राजगड पुन्हा जिंकून घेतला. जानेवारी १६९४ मधील एका पत्रात शंकराजी नारायण सचिव याने 'कानद खो-यातील देशमुखांनी राजगडाच्या परिसरातील प्रदेशाचे मुगलांच्या हल्ल्यापासून संरक्षण केल्या बद्दल त्यांची इनामे त्यांचकडे चालवावीत ' असा आदेश दिला होता.

पुढे ११नोहेंबर १७०३ मध्ये स्वतः औरंगजेब जातीनिशी हा किल्ला जिंकण्यासाठी पुण्याहून निघाला. औरंगजेबाचा हा प्रवास मात्र सुखकर झाला नाही. राजगडाच्या अलीकडे चार कोस घाटातला रस्ता आहे. रस्ता केवळ दुर्गम होता औरंगजेबाने एक महिना आधी काही हजार गवंडी, बेलदार आणि कामदार यांना रस्ता नीट करण्याच्या कामावर पाठविले. पण रस्ता काही नीट झाला नव्हता त्यामुळे बरेचशे सामान आहे तिथे टाकून ावे लागले. २ डिसेंबर १७०३ रोजी औरंगजेब राजगडा जवळ पोहचला. किल्ल्यास मोर्चे लावले. किल्ल्याचा बुरुज तीस गज उंच त्याच उंचीचे दमदमे तयार करुन त्यावर तोफा चढविल्या व बुरुजावर तोफांचा भडीमार करु लागले. तरबियतखान आणि हमीबुद्दीनखान याने पद्मावतीच्या बाजूने मोर्चे लावले. पुढे दोन महिने झाले तरी किल्ला काही हातात येत नव्हता. शेवटी ४ फेब्रुवारी १७०३ रोजी राजगड औरंगजेबाच्या हातात पडला. इरादतखान याला औरंगजेबाने किल्लेदार नेमले आणि किल्ल्याचे नाव 'नाबिशहागड'असे ठेवले.

२९ मे १७०७ रोजी गुणाजी सावंत याने पंताजी शिवदेवा बरोबर राजगडावर स्वारी करुन तो किल्ला जिंकून घेतला आणि पुन्हा किल्ला मराठयांच्या स्वाधीन झाला. पुढे शाहुच्या ताब्यात किल्ला आल्यावर १७०९ मध्ये शाहुने सुवेळा माचीस ३०० रुपये व संजीवनी माचीस १०० रुपये अशी व्यवस्था लावून दिली.पेशवेकाळात राजगड हा सचिवांच्या ताब्यात होता. पेशवाई मध्ये आर्थिक परिस्थिती वांरवार बिघडत असल्याने किल्ल्यावर शिबंदीचे पगारही वेळेवर होत नसत. अशाच परिस्थिती मध्ये राजगडावरील सेवकांचे पगार एक वर्षभर थकले होते - राजवाडे खंड १२. यानंतर राजगड भोर संस्थानाच्या ताब्यात गेला. त्याची व्यवस्था पाहण्यासाठी सहा अधिकारी नेमले. सुवेळा माचीसाठी सरनोबत शिलीमकर, पद्मावती माचीसाठी सरनोबत-पवार घराण्यातील, संजीवनी माचीसाठी सरनोबत- खोपडे घराण्यातील या शिवाय नाईक व सरनाईक हे अधिकारी सुद्धा असत.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : 
सुवेळा माची :पद्मावती तळ्याच्या बाजूने वर गेलं की रामेश्वर मंदिर आणि पद्मावती मंदिर आहे. इथून थोडं वर आलं की एक तिठा आहे. त्यातील एक रस्ता सरळ बालेकिल्ल्याकडे, एक डावीकडून सुवेळा माचीकडे आणि तिसरा उजवीकडे संजीवनी माचीला जातो. चिलखती बुरुज, तशीच चिलखती तटबंदी ही गडाच्या दोन्ही माच्यांची वैशिष्ट्ये आहेत. थोडा उजवीकडे पाली दरवाजा आहे. गडावर यायला तुलनेने ही सोपी वाट आहे. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी बालेकिल्ल्यालाच वळसा घालून एका ठिकाणी थोडीशी अवघड आणि उभी चढण चढावी लागते. बालेकिल्ल्याचा महादरवाजा अजूनही दणकट आहे. वर चंद्रतळे आहे , एक ब्रम्हर्षी मंदिर आहे.

पद्मावती तलाव :गुप्तदरवाजा कडून पद्मावती माचीवर आल्यावर समोरच सुबक बांधणीचा विस्तीर्ण असा तलाव आढळतो. तलावाच्या भिंती आजही शाबूत आहेत. तलावात जाण्यासाठी त्याच्या भिंतीतच एक कमान तयार केलेली आहे. तलावात सध्या गाळ मोठा प्रमाणात साचला आहे. रामेश्र्वराचे मंदिरःपद्मावती देवीच्या मंदिरा समोरच पूर्वभिमुख असे रामेश्र्वर मंदिर आहे. मंदिरातील शिवलिंग शिवकालीन आहे. मंदिरात असणारी मारूतिरायांची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे.

राजवाडा :रामेश्र्वर मंदिरापासून पाय-यांनी वर जातांना उजवीकडे राजवाडाचे काही अवशेष दिसतात.या राजवाडामध्ये एक तलाव आहे.या शिवाय राजवाडापासून थोडे पुढे गेल्यावर अंबारखाना लागतो.याच्या थोडे पुढे सदर आहे. सदरेच्या समोर दारुकोठार आहे. सदरःही गडावरची सर्वात महत्वाची अशी वास्तू. रामेश्र्वर मंदिरापासून पाय-यांनी वर गेल्यावर उजव्या हातास राजवाडाचे अवशेष आहेत. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे सदर आहे. पूर्वी या सदरेत ओटीच्या कडेस मधल्या खणात एक जुना गालिचा व त्यावर लोड ठेवलेला असे.अनेक इतिहास तज्ज्ञांचे असे मत आहे की ही सदर नसून तटसरनौबताचे घर आहे. पाली दरवाजाःपाली दरवाजाचा मार्ग पाली गावातून येतो. हा मार्ग फार प्रशस्त असून चढण्यासाठी पाय-या खोदल्या आहेत. पाली दरवाजाचे पहिले प्रवेश द्वार भरपूर उंचीचे आणि रुंदीचे आहे, यातून हत्ती सुद्धा अंबारीसह आत येऊ शकतो. हे प्रवेशद्वार ओलांडून २०० मी. पुढे गेल्यावर भरभक्कम बांधणीचे दुसरे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराचे संरक्षण चांगल्या बुलंद अशा बुरुजांनी केलेले आहे. या दरवाजाचे वैशिष्ट म्हणजे दरवाजाच्या वर आणि बुरुजावर परकोट बांधलेले आहेत. या परकोंटाना गोल आकाराचे झरोके ठेवलेले आढळतात. अशा झरोक्यांना 'फलिका' असे म्हणतात. या फलिकांचा उपयोग तोफा डागण्यासाठी होत असे. दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूस पहारेक-यांच्या देवडा आहेत. या दरवाजाने गडावर आल्यावर आपण पद्मावती माचीवर पोहचतो.

संजीवनी माची :सुवेळा माचीच्या बांधणीनंतर शिवाजीमहाराजांनी या माचीचे बांधकाम करण्यास सुरवात केली. माचीची एकूण लांबी अडीच कि.मी. आहे. ही माची सुद्धा ३ टप्प्यांमध्ये बांधलेली आहे. संजीवनी माचीवरील घरांचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत. माचीच्या प्रत्येक टप्प्यास चिलखती बुरुज आहेत. पहिला टप्पा खाली उतरुन उत्तरेकडे वळून तटालागत थोडे मागे चालत गेल्यावर तीन तिहेरी बांधणीचे बुरुंज लागतात. या तिन्ही बुरुजावर शिवकालात प्रचंड मोठ्या तोफा असाव्यात या माचीवर अनेक पाण्याची टाकी आहेत. या माचीला एकूण १९ बुरुज आहेत. माचीला भुयारी परकोटाची योजना केलेली आहे. या भुयारातून बाहेरील तटबंदी कडे येण्यासाठी दिंडांची व्यवस्था केलेली आहे. संजीवनी माचीवर आळु दरवाजाने सुद्धा येते. आळु दरवाजा पासून राजगडाची वैशिष्टय असलेली चिलखती तटबंदी दुतर्फा चालू होते. दोन्ही तटांमधील अंतर अर्धा-पाऊण मीटर असून खोली सुमारे ६ ते ७ मीटर आहे. या भागात बुरुजांच्या चिलखतात उतरण्यासाठी पाय-यांच्या दिंडा आहेत. तसेच नाळेतून वर येण्यासाठी दगडी सोपान आहेत. माचीवर तटबंदी मध्ये काही जागी प्रातर्विधीची ठिकाणे आढळतात.
जागातील आठवे आश्चर्य  किल्ले राजगडाची हीच ती संजीवनी माची 
आजही भल्या भल्या इंजिनियर लोकांचे डोके बंड करणारे ठिकाण .

दुहेरी तटबंदीच्या शेवटी बलाढ्य बुरुज आहेच यांचा उपयोग दूरवर नजर ठेवण्यासाठी होत असे. आळु दरवाजा संजीवनी माचीवर येण्यासाठी या दरवाजाचा उपयोग होत असे. तोरणा वरुन राजगडावर येण्याचा एकमेव मार्ग या दरवाजातून जात असे. आळु दरवाजा सस्थितीला ब-यापैकी ढासाळलेल्या अवस्थतेत आहे. या दरवाजावर एक शिल्प आहे. वाघाने एक सांबार उताणे पाडले आहे असे चित्र या शिल्पात दाखवले आहे. सुवेळा माचीःमुरुंबदेवाचा किल्ला ताब्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या पूर्वेकडील डोंगररांगेला भरभक्कम तटबंदी बांधली, आणि माचीला सुवेळा माची असे नाव ठेवले. पूर्वेकडे ही माची असल्यामुळे या माचीचे नाव सुवेळा असे ठेवले. सुवेळा माची ही संजीवनी एवढी लांब नाही मात्र या माचीचे सुद्धा ३ टप्पे आहेत. पूर्वेकडे ही माची चिंचोळी होत गेलेली आहे. माचीच्या प्रारंभी टेकडी सारखा भाग आहे याला डुबा असे म्हणतात. या डुब्याच्या डावीकडून रानातून जाणा-या वाटेने गेल्यावर शिबंदी घरटे दिसतात. तेथे डाव्या हातास एक दक्षिणमुखी वीर मारुती व त्याच्या जवळ पाण्याचे टाक आहे.

येथे असणारे चौथरे येसाजी कंक, तानाजी मालसुरे व शिलींबकर या सरदारांची होती. येथून सरळ जाणारी वाट सुवेळा माचीच्या दुस-या टप्पयावर जाते तर डावीकडे जाणारी वाट काळेश्र्वरी बुरुजाच्या परिसरात घेऊन जाते. आपण माचीच्या दिशेने थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक सदर लागते. येथून पुढे तटबंदीच्या खरा भाग सुरु होतो. येथील तटबंदी दोन टप्प्यांत विभागली असून प्रत्येक टप्प्याच्या शेवटी चिलखती बुरुज आहे. दुस-या टप्प्यात गेल्यावर तटबंदीच्या दोन्ही बाजूस आतील अंगास भुयारी चिलखती परकोटाची रचना केली आहे. दुस-या टप्पयाकडे जातांना एक उंच खडक लागतो आणि या खडकात ३ मीटर व्यासाचे एक छिद्र आढळते या खडकालाच नेट किंवा 'हत्तीप्रस्तर' असे म्हणतात. या हत्तीप्रस्तराच्या अलीकडे तटातील गणपती आढळतो व तेथूनच पुढे तटातून खाली जाण्यासाठी गुप्त दरवाजा आहे. या दरवाजाला मढे दरवाजा असे म्हणतात.हत्ती प्रस्तराच्या पुढील भागात सुद्धा एक असाच गुप्त दरवाजा सुवेळामाचीच्या सर्वात शेवटच्या टप्प्यात खालच्या भागात वाघजाईचे शिल्प आहे.

बालेकिल्ला :राजगडाच्या सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला होय. या बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे. चढण संपल्यानंतर बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो. यालाच महादरवाजा असे ही म्हणतात. आजही दरवाजा चांगल्या स्थितीत आहे. प्रवेशद्वाराची उंची ६ मीटर असून प्रवेशद्वारावर कमळ, स्वस्तिक ही शुभचिन्ह कोरलेली आहेत. बालेकिल्ल्याला साधारण १.५ मीटर उंचीची तटबंदी बांधलेली असून विशिष्ट अंतरावर बुरुजही ठेवलेले आहेत. दरवाजातून आत गेल्यावर समोरच जननीमंदिर आहे. येथून पुढे गेल्यावर चंद्रतळे लागते. तळ्याच्या समोरच उत्तरबुरुच आहे. येथून पद्मावती माची आणि इतर सर्व परिसर दिसतो. बुरुजाच्या खालून एक पायवाट बालेकिल्ल्यावर येते आता मात्र ही वाट एक मोठा शिलाखंड टाकून बंद केलेली आहे.ही वाट ज्या बुरुजावरून वर येते त्या बुरुजाला उत्तर बुरुज असे म्हणतात.येथून संपूर्ण राजगडाचा घेरा आपल्या लक्षात येतो.या उत्तर बुरुजाच्या बाजुला ब्रम्हर्षी ऋषींचे मंदिर आहे.या शिवाय बालेकिल्ल्यावर काही भग्र अवस्थेतील इमारती चौथरे, वाडांचे अवशेष आढळतात. राजगड किल्ला संपूर्ण पाहण्यासाठी साधारण २ दिवस लागतात.

गडावरुन तोरणा, प्रतापगड, रायगड, लिगांणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, रोहीडा, रायरेश्र्वर आणि लोहगड, विसापूर हे किल्ले दिसतात.

गडावर जाण्यासाठी मार्ग :
गडावर जाण्यासाठी मार्ग अनेक आहेत.

१.गुप्तदरवाज्याने राजगड : पुणे - राजगड अशी एस.टी पकडून आपल्याला वाजेघर या गावी उतरता येते.बाबुदा झापा पासून एक तासाच्या अंतरावर रेलिंग आहेत.यांच्या साह्याने अत्यंत कमी वेळात राजगडावर जाता येते.यावाटेने गडावर जाण्यास ३ तास लागतात.

२.पाली दरवाज्याने राजगडः पुणे-वेल्हे एस.टी.ने वेल्हे मार्गे पाबे या गावी उतरुन कानद नदी पार करुन पाली दरवाजा गाठावा.ही वाट पाय-याची असून सर्वात सोपी आहे.यावाटेने गडावर जाण्यास ३ तास लागतात.

३.गुंजवणे दरवाज्याने राजगङ : पुणे वेल्हे या हमरस्त्यावरील मार्गासनी या गावी उतरावे आणि तिथून साखरमार्गे गुंजवणे या गावात जाता येते.ही वाट अवघड आहे.या वाटेवरून गड गाठण्यास अडीच तास लागतात.माहितगारा शिवाय या वाटेचा उपयोग करू नये.

४.अळु दरवाज्याने राजगडः भुतोंडे मार्गे आळु दरवाज्याने राजगड गाठता येतो.शिवथर घळीतून ही अळू दरवाज्याने राजगड गाठता येतो.

५.गुप्तदरवाजामार्गे सुवेळामाची: गुंजवणे गावातून एक वाट जंगलातून गुप्तदरवाजेमार्गे सुवेळा माचीवर येते.

राहण्याची सोय:
१. गडावरील पद्मावती मंदिरात २० ते २५ जणांची रहाण्याची सोय होते.
२. पद्मावती माचीवर रहाण्यासाठी पर्यटक निवासाच्या खोल्या आहेत.

जेवणाची सोय: आपण स्वतः करावी.
पाण्याची सोय: पद्मावती मंदिराच्या समोरच बारामही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ: ३ तास


नोट :- वरील सर्व माहिती "गडवाट" व "महाराष्ट्रातील किल्ले" या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल.वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले अर्नाळा ।।


अर्नाळा किल्ला
किल्ल्याचा प्रकार : सागर किना-यावरील किल्ले
डोंगररांगः उत्तर कोकण
जिल्हा : ठाणे
श्रेणी : जास्त सोपी

ठाणे जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबीसागर पसरलेला आहे. या सागराला येऊन मिळणार्याव नद्यामधील वैतरणा ही एक प्रमुख नदी आहे. सह्याद्रीमधे उगम पावलेली वैतरणा जेथे सागराला मिळते तेथे खाडीच्या मुखाजवळ अर्नाळ्याचा बुलंद जलदुर्ग उभारलेला आहे. अर्नाळा नावाच्या लहानशा बेटाच्या वायव्य दिशेस हा जलदुर्ग किल्ला बांधला आहे.उत्तर कोकणातील वैतरणा नदी या किल्ल्याजवळ समुद्राला मिळत असल्यामुळे खाडीच्या स र्वच प्रदेशावर या पाणकोटावरून नजर ठेवता येत असे.

इतिहास :
चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला अर्नाळा हा जलदुर्ग १५१६ मध्ये गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याने बांधला. पोर्तुंगीजांनी १५३० साली हा किल्ला जिंकला व नंतर यावर अनेक नवीन बांधकामे केली. सुमारे २०० वर्षांच्या पोर्तुंगीज सत्तेनंतर हा किल्ला १७३७ मध्ये मराठांच्या ताब्यात आला. पोर्तुंगीजांप्रमाणेच पहिल्या बाजीरावानेही या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. शेवटी १८१७ मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणेच हा किल्ला देखील इंग्रजांच्या ताब्यात गेला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
सागरात विस्तृत पसरलेले आणि झाडीने नटलेले अर्नाळ्याचे बेट आपल्याला उत्साहित करते. अर्नाळा किल्ला चौकोनी असून दहा मीटर उंचीची अखंड व मजबूत तटबंदी याचे संरक्षण करते. तटबंदीमध्ये असलेले बुरुज आजही ताठपणे उभे आहेत. किल्ल्याला एकूण तीन दरवाजे
आहेत
. याचा मुख्यदरवाजा उतराभिमुख आहे. या महादरवाजा शिवाय गडाला अजून दोन प्रवेशद्वारेही आहेत. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन बुलंद बुरुज उभे आहेत. या दरवाजाच्या कमानीवर अत्यंत सुंदर नक्षीकाम असून दोन्ही बाजूला हत्ती व वाघाची प्रतिमा कोरलेली आहे. दरवाजावरच एक शिलालेख कोरलेला आहे.

बाजीराव अमात्य मुख्य सुमती आज्ञापिले शंकर!
पाश्चात्यासि वधूनि सिंधु उदरी बांधा त्वरे जंजिरा!!

हा देवनागरी लिपीतील शिलालेख वाचता येतो. बाजीराव पेशवे यांनी हा किल्ला बांधून पुर्ण केल्याचा उल्लेख यात आहे. 


प्रवेशव्दाराच्या आत पहारेकर्यांतच्या देवडय़ा आहेत. वरचा घुमट भव्य असून देखणा आहे. या दरवाजाच्या आत दुसरा दरवाजा असून तेथून तटबंदीवर जाणार्याद पायर्यांकचा मार्ग आहे. तटबंदीवरुन गडाला फेरी मारता येते. पस्तिस-चाळीस फुट उंचीची भक्कम तटबंदी असून जागोजाग बुरुजांची गुंफण केलेली आहे. या बुरुजांमधे खोल्याही केलेल्या आहेत. त्यात जाण्यासाठी पायर्यांदचा मार्गही केलेला आहे. तटबंदीवरुन दूरपर्यंतचा प्रदेश पाहायला मिळतो. मजबूत आणि उंच तटबंदी असल्यामुळेच बहुदा किल्ल्याभोवती खंदक केलेला नसावा. तटबंदीमधे जागोजाग मारगिरीसाठी बग्या केलेल्या आहेत.

अर्नाळ्याच्या तटबंदीच्या आत पाणी मुबलक आहे. त्यामुळे अर्नाळ्याच्या बेटावर किल्ल्याव्यतिरीक्त इतर भूभागावर कोळीबांधवांची वस्ती असून काही भागात शेतीही केल्या जाते.
हे पाहून आश्चर्य वाटते. या कोळीबांधवांनी किनार्यािवर कालीका मातेचे मंदीर उभे केलेले आहे.  किल्ल्याच्या आत त्रंबकेश्वराचे मंदिर आणि हाजीअली आणि शहाअली यांची थडगी आहेत.

किल्ल्यापासून कि.मी अंतरावर टेहाळणीसाठी ३६ फूट उंचीचा बुरुज बांधलेला आह. या एकांडय़ा बुरुजावरुन बेटाच्या परिसरावर तसेच सागरावर लक्ष ठेवणे सोयीचे होते. 
किल्ल्याच्या मजबूत तटबंदीवरुन किल्ल्याचे समोवार दर्शन घेत गोल फेरी मारता येते. मुख्य प्रवेशद्वाराच्या वर असणार्‍या उंचवटावर बसले असता पूर्ण किल्ल्याचा आवाका नजरेस पडतो.

संपूर्ण किल्ला तसेच  पश्चिमेकडील दरवाजा, चोर दरवाजा, भवानी मंदिर पाण्याची विहीर इत्यादी पहाण्यासाठी आणि गडफेरी साठी साधारण तास सव्वातासाचा अवधी पुरेसा होतो.

अर्नाळा किल्ल्याचा भक्कमपणा आणि निसर्गसानिध्या बरोबरच सुखावणारे सागर दर्शन याचा मोह आवरीतच आपण पुन्हा जलप्रवासासाठी परतीच्या मार्गावर निघतो.

गडावर जाण्याच्या वाटा :
वसई-नालासोपारा-निर्मळमार्गे आगाशी-अर्नाळा असे गाडीमार्गाने जाता येते. मुंबई-अहमदाबाद मार्गावरील शिरसाड फाटय़ावरुन विरार-अर्नाळा असेही येता येते. मुंबई-सूरत या पश्चिम रेल्वे मार्गावर विरार स्टेशन आहे. विरारला रेल्वेने पोहोचून तेथून आगाशी अर्नाळा गाठता येईल.
पश्चिम रेल्वेवरच्या विरार पासून अर्नाळा अंदाजे १० कि.मी. वर असून तेथे जायला एस्‌. टी. बस व रिक्षा यांची सुविधा आहे. अर्नाळा गावातून समुद्रकिनार्‍यापर्यंत गेल्यावर बोटीनेच किल्ल्यावर जाता येते. ही बोट सकाळी ६.०० ते दुपारी १२.३० व संध्याकाळी ४.०० ते ७.०० या वेळेतच आपल्याला किल्ल्यावर घेऊन जाते. समुद्रकिनार्‍यावरुन समोरच दिसणार्‍या अर्नाळा किल्ल्यावर बोटी जायला ५-१० मिनीटे लागतात.

राहण्याची सोय : गडावर राहण्याची सोय नसली तरी संपूर्ण गड अर्धा-पाऊण तासात बघून बोटीने किनार्‍यावर परतता येत असल्याने राहण्याची गरज नाही.
जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही,
आपण स्वतः करावी
पाण्याची सोय : गडावर गोडापाण्याच्या विहिरी आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ : १ तास विरार पासून.


नोट : वरील सर्व माहिती "गडवाट"  "महाराष्ट्रातील किल्ले" या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले रायगड ।।


रायगड  किल्ला

 किल्ल्याची उंची : २९०० फूट
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांगः पुणे
जिल्हा : रायगड
श्रेणी : सोपी
महाडच्या उत्तरेस २५ कि. मी. वर हा किल्ला असून याची समुद्रसपाटी पासूनची उंची २८५१ फूट आहे. रायगड हा चहुबाजूंनी डोंगररांगांनी वेढलेला आहे. याच्या उत्तरेला आणि पूर्वेला काळ नदीचे खोरे पसरलेले आहे, तर पश्चिमेला गांधारी नदी वाहते. याच्या पूर्वेला लिंगाणा, आग्रेयाला आकाश स्वच्छ असेल तर राजगड, तोरणा दक्षिणेकडे मकरंदगड, प्रतापगड, वासोटा, उत्तरेला कोकणदिवा असा मुलूख दिसतो.
रायगडपासून मुंबई, पुणे, सातारा ही शहरे सारख्याच अंतरावर आहेत. सह्याद्रीतील किल्ल्यांच्या रांगांतील हा एक दुवा आहे. रायगड हा निसर्गतःच डोंगरांनी वेढलेला असल्यामुळे (तसेच) शत्रूच्या हल्ल्यापासून बचाव व्हावा यासाठी पुणे सोडून पश्चिम डोंगरात रायगड ही राजधानी महाराजानी निवडली.


इतिहास:
रायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य, दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी जेव्हा त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास ‘रासिवटा’ व ‘तणस’ अशी दोन नावे होती. त्याचा आकार उंची व सभोवतालच्या दर्‍या यावरून त्यास ‘नंदादीप’ असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोर्‍यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापूरास पळाला. महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला. कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूर कडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणार्‍या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून
महारांजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. सभासद बखर म्हणते, ‘राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा’.
याच दुर्गदुर्गेश्र्वराला १५ विविध नावांनी संबोधिले गेले आहे.

१.रायगड २.रायरी ३.इस्लामगड ४.नंदादीप ५.जंबुद्विप ६.तणस ७.राशिवटा ८.बदेनूर ९.रायगिरी १०.राजगिरी ११.भिवगड १२.रेड्डी १३.शिवलंका १४.राहीर १५.पूर्वेकडील जिब्राल्टर
शिवराज्याभिषेक शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना. ता. १९ मे १६७४ रोजी राज्याभिषेकादि विधीपूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानीचे दर्शन घेतले. तीन मण सोन्याचे म्हणजेच ५६ हजार किंमतीचे छत्र देवीला अर्पण केले. गडावरील राजसभेत ता. ६ जून १६७४, ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६, शनिवार या दिवशी राज्याभिषेक संपन्न झाला. ता. २४ सप्टेंबर १६७४, ललिता पंचमी अश्र्िवन शु. ५ आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वतःला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. या मागचा खरा हेतू हा जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावे हा होता. हा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी याच्या हस्ते पार पडला. कवी भूषण रायगडाचे वर्णन करतो की, ‘शिवाजीने सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्ल्यास आपले वसतीस्थान केले. हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की, त्यात तीनही लोकीचे वैभव साठवले आहे. गडावर विहिरी, सरोवरे, कूप विराजत आहेत. सर्व यवनांना जिंकून रायगडावर राजा शिवाजीने राजधानी केली आणि लोकांचे इच्छित पुरवून जगतात श्रेष्ठ यश संपादन केले.’ इ. स. १६७५ फेब्रुवारी ४, शके १५९६ आनंद संवत्सर माघ व. ५ गुरुवार या दिवशी संभाजी राजांची मुंज रायगडावर झाली. शके १६०१ सिद्धार्थी संवत्सर फाल्गुन व. २, १६८० मार्च ७ या दिवशी राजाराम महाराजांची मुंज रायगडावर झाली. लगेच आठ दिवसांनी राजाराम महाराजांचे लग्र प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी झाले. रायगडाने अनुभवलेला अत्यंत दुःखद प्रसंग म्हणजे महाराजांचे निधन. शके १६०२ रुद्रनाम संवत्सरे चैत्र शुद्ध पौर्णिमा, हनुमान जयंती, दि. ३ एप्रिल १६८० या दिवशी महाराजांचे निधन झाले. सभासद बखर म्हणते, ‘ते दिवशी पृथ्वीकंप जाहला. अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या. श्रीशंभुमहादेवी तळ्याचे उदक रक्तांबर जाले.’ पुढे शके १६०२ रौद्र संवत्सर माघ शु. ७, इ. स. १६८१ १६ फेब्रुवारी या दिवशी रायगडावर संभाजी महारांजाचे विधिपूर्वक राज्यारोहण झाले. इ. स. १६८४ च्या सप्टेंबरमध्ये औरंगजेबाने रायगडच्या मोहिमेस सुरुवात केली. ता. २१ रोजी शहाबुद्दीन खान यास चाळीस हजार सैन्यासह बादशाहने रायगडाच्या पायथ्याशी धाडले.१५ जानेवारी १६८५ च्या सुमारास शहाबुद्दीने गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका गावाला आग लावली व लुटालूट चालू केली. पण प्रत्यक्ष रायगडावर हल्ला न करता तो १६८५ च्या मार्चमध्ये परतला. औरंगजेबाने आपला वजीर आसदखान याचा मुलगा इतिकादखान उर्फ झुल्फिकारखान यास सैन्य देऊन रायगड घेण्यास पाठवले. शके १६१० विभव संवत्सर फाल्गुन शु. ३, १२
फेब्रुवारी १६८९ रोजी राजाराम महाराजांची कारकीर्द सुरू झाली आणि २५ मार्च १६८९ रोजी खानाने गडास वेढा घातला. दि. ५ एप्रिल १६८९ रोजी राजाराम महाराज रायगडावरून निसटून प्रतापगडावर गेले. पुढे जवळजवळ आठ महिने वेढा चालू होता. पण दि. ३ नोव्हेंबर १६८९ रोजी सुर्याजी पिसाळ या किल्लेदाराच्या फितुरीमुळे किल्ला मोगलांना मिळाला. वाईची देशमुखी देण्याचे आमिष दाखवून खानाने त्यास फितुर केले. झुल्फिकारखान हा बादशाहने इतिकादखानला दिलेला किताब आहे. पुढे रायगडचे नामांतर ‘इस्लामगड’ असे झाले. ५ जून १७३३ या दिवशी शाहूमहाराजांच्या कारकिर्दीत रायगड पुन्हा मराठांनी घेतला.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

१.पाचाडचा जिजाबाईंचा वाडा : उतारवयात जिजाबाईंना गडावरची थंड हवा, वारा मानवत नसे, म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाडाची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायर्‍यांची एक उत्तम विहीर, तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास ‘तक्क्याची विहीर’ असेही म्हणतात.

२.खुबलढा बुरूज : गड चढू लागले म्हणजे एक बुरुजाचे ठिकाण दिसते, तोच हा सुप्रसिद्ध खुबलढा बुरूज. बुरुजाशेजारी एक दरवाजा होता, त्यास ‘चित्‌ दरवाजा’ म्हणत पण हा दरवाजा आता पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.

३.नाना दरवाजा : या दरवाजास ‘नाणे दरवाजा’ असेही म्हणत. या दरवाजाचा संबंध नाना फडणिसांशी लावला जातो ही पूर्णपणे गैरसमजूत आहे. नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा. इ. स. १६७४ च्या मे महिन्यात राज्याभिषेकाच्या निमित्ताने इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झेंडन याच दरवाजाने आला होता. या दरवाज्यास दोन कमानी आहेत. दरवाज्याच्या आतील बाजूस पहारेकर्‍यांसाठी दोन लहान खोल्या आहेत. त्यांस ‘देवडा’ म्हणतात. दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी दिसतात.

४.मदारमोर्चा किंवा मशीदमोर्चा : चित्‌ दरवाज्याने गेल्यावर नागमोडी वळणे घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी लागते. या मोकळ्या जागेत टोकाशी दोन पडक्या इमारती दिसतात. त्यापैकी एक पहारेकर्‍यांची जागा असून दुसरे धान्याचे कोठार आहे. येथे मदनशहा नावाच्या साधूचे थडगे आहे. तेथे एक प्रचंड तोफही दिसते. येथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा दिसतात.

५.महादरवाजा : महादरवाज्याच्या बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत. दरवाज्यावर असणार्‍या या दोन कमळांचा अर्थ म्हणजे किल्ल्याच्या आत ‘श्री आणि सरस्वती’ नांदत आहे. ‘श्री आणि सरस्वती’ म्हणजेच ‘विा व लक्ष्मी’ होय. महादरवाज्याला दोन भव्य बुरूज असून एक ७५ फूट तर दुसरा ६५ फूट उंच आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवलेली असतात त्यास ‘जंग्या’ म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. बुरुजांमधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाज्यातून आत आल्यावर पहारेकर्‍यांच्या देवडा दिसतात तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याच्या खोल्या दिसतात. महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे.

६.चोरदिंडी : महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते, त्यावरून चालत गेल्यास जिथे ही तटबंदी संपते, त्याच्या थोडे अलीकडे बुरुजात ही चोरदिंडी बांधलेली आहे. बुरुजाच्या आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायर्‍या आहेत.

७.हत्ती तलाव : महादरवाज्यातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव. गजशाळेतून येणार्‍या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता.

८.गंगासागर तलाव : हत्तीतलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेच्या इमारती दिसतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे ५० -६० पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव. महाराज्यांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानांची आणलेली तीर्थेयाच तलावात टाकली गेली. म्हणूनच याचे गंगीसागर असे नाव पडले. शिवकाळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येई.

९.स्तंभ :गंगासागराच्या दक्षिणेस दोन उंच मनोरे दिसतात. त्यासच स्तंभ म्हणतात. जगदीश्र्वराच्या शिलालेखामध्ये ज्या स्तंभांचा उल्लेख केला आहे, ते हेच असावेत. ते पूर्वी पाच मजले होते असे म्हणतात. ते द्वादश कोनी असून बांधकामात नक्षीकाम आढळते.

१०.पालखी दरवाजा : स्तंभांच्या पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून ३१ पायर्‍या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाज्यातून आपल्याला बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो.

११.मेणा दरवाजा : पालखी दरवाज्याने वर प्रवेश केला की, चढ – उतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास जे सात अवशेष दिसतात ते आहेत राण्यांचे महाल. मेणा दरवाज्यातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो.

१२.राजभवन : राणीवशाच्या समोर डाव्या हातास दासदासींच्या मकानांचे अवशेष दिसतात. या अवशेषांच्या मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंतीच्या मध्यभागी जो दरवाजा आहे तेथून बालेकिल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच हे महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौथारा ८६ फूट लांब व ३३ फूट रुंद आहे.

१३. रत्नशाळा : राजप्रासादाजवळील स्तंभांच्या पूर्वेकडे असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे, तीच ही रत्नशाळा. हा खलबनखाना म्हणजेच गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात.

१४.राजसभा : महाराजांचा राज्याभिषेक जेथे झाला, तीच ही राजसभा. राजसभा २२० फूट लांब व १२४ फूट रुंद आहे. येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे. येथे बत्तीस मणांचे सोन्याचे सिंहासन होते. सभासद बखर म्हणते, ‘तख्त सुवर्णाचे बत्तीस मणांचे सिद्ध करवले. नवरत्ने अमोलिक जितकी कोशात होती, त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने जडाव केली.’

१५.नगारखाना : सिंहासनाच्या समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगारखाना. हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून पायर्‍या चढून वर गेले की आपण किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो.

१६.बाजारपेठ : नगारखान्याकडून आपण डावीकडे उतरून आलो की, समोर जी मोकळी जागा दिसते तो ‘होळीचा माळ’. तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवकाळातील बाजारपेठ. पेठेच्या दोन रांगात प्रत्येकी २२ दुकाने आहेत. मधून जवळजवळ चाळीस फूट रुंद रस्ता आहे.

१७.शिर्काई देऊळ : महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस जे छोटे देऊळ दिसते ते शिर्काईचे देऊळ. शिर्काई ही गडावरील मुख्य देवता.

१८.जगदीश्र्वर मंदिर : बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मणवस्ती, ब्राह्मणतळे वगैरे अवशेष दिसतात. तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्र्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे. पण सध्या ही मूर्ती भग्रावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभार्‍याच्या भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायर्‍यांच्या खाली एक लहानसा शिलालेख दिसतो. तो पुढीलप्रमाणे, ‘सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इटळकर’ या दरवाजाच्या उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख दिसतो तो पुढीलप्रमाणेः-

श्री गणपतये नमः।

प्रासादो जगदीश्र्वरस्य जगतामानंददोनुज्ञया श्रीमच्छत्रपतेः शिवस्यनृपतेः सिंहासने तिष्ठतः।

शाके षण्णवबाणभूमिगणनादानन्दसंवत्सरे ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लेशसापै तिथौ॥१॥

वापीकूपडागराजिरुचिरं रम्यं वनं वीतिकौ स्तभेः कुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रंलिहे मीहिते।

श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजिना निर्मितो यावधन्द्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते॥२॥

याचा थोडक्यात अर्थ पुढीलप्रमाणे -’सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्र्वराचा प्रासाद श्रीमद् छत्रपती शिवाजी राजा यांच्या आज्ञेने शके १५९६ मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहुर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे आशांची उभारणी केली आहे. ती चंद्रसूर्य असेतोवर खुशाल नांदो.’

१९.महाराजांची समाधी : मंदिराच्या पूर्वदरवाजापासून थोडा अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची समाधी. सभासद बखर म्हणते, ‘क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराजाधिराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शके १६०२ चैत्र शुद्ध १५ या दिवशी रायगड येथे झाला. देहाचे सार्थक त्याणी बांधिलेला जगदीश्र्वराचा जो प्रासाद त्याच्या महाद्वाराच्या बाहेर दक्षणभागी केले. तेथे काळ्या दगडाच्या चिर्‍याचे जोते अष्टकोनी सुमारे छातीभर उंचीचे बांधिले असून वरून फरसबंदी केलेली आहे. फरसबंदीच्या खाली पोकळी आहे, तीत महाराजांचा अवशिष्टांश रक्षामिश्र मृत्तिकारुपाने सापडतो.’ दहनभूमी पलीकडे भग्र इमारतींच्या अवशेषांची एक रांग आहे, ते शिबंदीचे निवासस्थान असावे. त्याच्या पलीकडे सदर वस्तीपासून विलग असा एक घराचा चौथरा दिसतो. हे घर इ. स. १६७४ मध्ये इंग्रज वकील हेन्री ऑक्झेंडन यास राहावयास दिले होते. महाराजांच्या समाधीच्या पूर्वेकडे भवानी टोक आहे तर उजवीकडे दारूची कोठारे, बारा टाकी दिसतात.

२०.कुशावर्त तलाव : होळीचा माळ डाव्या हातास सोडून उजवीकडील वाट कुशावर्त तलावाकडे जाते. तलावाजवळ महादेवाचे छोटेसे देऊळ दिसते. देवळासमोर फुटलेल्या अवस्थेत नंदी दिसतो.

२१.वाघदरवाजा : कुशावर्त तलावाजवळून घळीने उतरत वाघ दरवाजाकडे जाता येते. आज्ञापत्रात लिहिले आहे की, ‘किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब आहे, यांकरीता गड पाहून एक दोन – तीन दरवाजे, तशाच चोरदिंडा करून ठेवाव्या. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंडा चिणून टाकाव्या.’ हे दूरदर्शीपणाचे धोरण ठेऊनच महाराजांनी महादरवाजाशिवाय हा दरवाजा बांधून घेतला. या दरवाज्याने वर येणे जवळजवळ अशक्यच असले तरी दोर लावून खाली उतरू शकतो. पुढे राजाराम महाराज व त्यांची मंडळी झुल्फिरखानाचा वेढा फोडून याच दरवाज्याने निसटली होती.

२२.टकमक टोक : बाजारपेठेच्या समोरील टेपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. तेथेच एका दारूच्या कोठाराचे अवशेष दिसतात. जसजसे आपण टोकाकडे जातो तसतसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला २६०० फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगावी

२३.हिरकणी टोक : गंगासागराच्या उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोळी वाट जाते ती हिरकणी टोकाकडे जाते. हिरकणी टोकाशी संबंधित हिरकणी गवळणीची एक कथा सांगितली जाते. या बुरुजावर काही तोफाही ठेवलेल्या दिसतात. बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे दिसते. तसेच इथून पाचाड, खुबलढा बुरूज, मशीद मोर्चा ही ठिकाणे तोफेच्या मार्‍यात आहेत. त्यामुळे युद्धशास्त्राच्या तसेच लढाऊ दृष्टीने ही खूप महत्त्वाची आणि मोक्याची जागा आहे.


गडावर जाण्याच्या वाटा :
मुंबई – गोवा मार्गावरील महाड या बस स्थानकामधून : मुंबई – गोवा मार्गावरील महाड या बस स्थानकामधून रायगडासाठी बसेस सुटतात. तसेच बस स्थानका बाहेरून जीपगाडाही जातात. बसने आल्यावर चित्‌ दरवाज्यापाशी, (जो आता अस्तित्वात नाही) जिथे पायर्‍या सुरू होतात तेथे उतरून पायर्‍यांनी गडावर जाता येते. जवळजवळ १५०० पायर्‍या चढून गेल्यावर महादरवाजातून आपला गडात प्रवेश होतो.

नाना दरवाजाकडूनही : नाना दरवाजाकडूनही आपण गड चढू शकतो. पायर्‍यांकडून जो डांबरी रस्ता पुढे जातो त्या रस्त्याने थोडे पुढे जाऊन उजवीकडे एक पायवाट जाते. त्या वाटेने गेल्यास नानादरवाजाने आपण गड चढू शकतो.

रोप-वे : आता गडावर जाण्यासाठी रोप-वेची व्यवस्था झाल्याने पायथ्यापासून १० ते १५ मिनिटांत आपण गडावर पोहचू शकतो.

राहण्याची सोय : रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेमध्ये राहण्यासाठी खोल्या उपलब्ध आहेत. तसेच एम.टी.डी.सी. च्या बंगल्यांमध्ये किंवा डॉरमिटरी हॉलमध्ये राह्ण्याची सोय होऊ शकते. रायगड जिल्हा परिषद, तालुका महाड, जिल्हा रायगड अथवा महाराष्ट्र राज्य पर्यटन केंद्र,संपर्क केल्यास राहण्याची सोय होऊ शकेल.

पाण्याची सोय : बारामही पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ : २ तास


नोट : वरील सर्व माहिती "गडवाट" "महाराष्ट्रातील किल्ले" या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

Thursday, 19 April 2012

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले प्रतापगड ।।

प्रतापगड  किल्ला
किल्ल्याची उंची : समुद्रसपाटीपासून 300 मीटर
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग : सह्याद्री 
श्रेणी : मध्यम 
तालुका : महाबळेश्वर
जिल्हा : सातारा
किल्ले प्रतापगड म्हणजे मराठ्यांच्या देदिप्यमान इतिहासातील एक सुवर्णपानच !
उत्तर सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यात महाबळेश्वराच्या पश्चिमेस ८ मैलावर प्रतापगडाचा डोंगर आहे. पार आणि किनेश्वर या दोन गावांमधल्या डोप-या नावाच्या एका टेंभावर या किल्ल्याची बांधणी झाली आहे.
 विमानातून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार फूलपाखरासारखा दिसतो. १४०० फूट लांबी आणि ४०० फूट लांबी एवढा त्याचा विस्तार आह इतर गडापेक्षा या गडाला विशेष तटबंदी आहे. पश्चिमोत्तर कडे ८०० फूटाहून अधिक उंच आहे. बालेकिल्ल्याच्या उत्तरपूर्व किल्याला दोन तळी लागतात. तेथून कोयनेचे खोरे सुंदर दिसते

छत्रपती शिवाजी महाराजांनीहिंदवी स्वराज्य साकार करण्यासाठी आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने केलेले न भूतो न भविष्यते असेअचाट पराक्रम आजच्या या विज्ञान युगातही आपल्यास अचंबित करतात.शिवरायांच्या कारकिर्दितील सर्वात रोमहर्षक प्रसंग कोणता? असा प्रश्न विचारला गेला तर त्याचे बेलाशक उत्तर असेल प्रतापगडाच्या पायथ्याशी केलेला बलाढ्य आणि क्रूरकर्मा अशा अफझल खानाचा वध. शिवराय-अफजलखान भेटीत अफजलखानाने दगाफटका केला. त्याचा परिणाम म्हणून महाराजांनी अफजलखानचा कोथळा बाहेर काढला. सय्यद बंडा यांने तलवार उगारली परंतु जिवा महाल हा सावध असल्याने त्याने सय्यद बंडाला मारले. होता जिवा म्हणून वाचला शिवा या म्हणीच्या रुपाने या गडाचा इतिहास अजरामर झाला. जावळीत दडून बसलेल्या शिवप्रभुच्या सैन्याने खानाच्या १५०० लोकांची ससेहोलपट केली. असा हा शिवरायांचा प्रताप आजही महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत उभा आहे. आजही अफजलखानाची कबर तिथे दिसते. सपाट जागी माचीच्या तीन उतरण्या सभोवताली वृक्ष मध्य चौकोनात ही कबर आहे.

इतिहास :
नीरा आणि कोयनेच्या काठावर शिवाजी महाराजांनी जी सत्ता मिळविली होती, ती सत्ता अबाधित ठेवण्यासाठी एक मजबूत किल्ला निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आणि हा किल्ला म्हणजे प्रतापगड होय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम सुरू झाले.निरा आणि कोयना नद्यांचे संरक्षण हा यामागचामुख्य उद्देश होता. इ.स.१६५६ प्रतापगडाचे बांधकाम पूर्ण झाले. दि.१० नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्यात प्रतापगडाचे युध्द झाले. अफझलखान वधाने राजांचे नाव हिंदुस्थानभर झाले आणि खर्‍या अर्थाने स्वराज्याचा पाया मजबूत झाला. इ.स.१६५९ ते इ.स.१८१८ या प्रदीर्घ कालावधीत, इ.स.१६८९ मधील काही महिन्यांचा अपवाद वगळता प्रतापगड शत्रूला कधीच मिळाला नाही. 

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे :
वाहनतळावरून गडाच्या दक्षिणेच्या टेहळणी बुरूजाखालून सरळ जाणार्‍या पायवाटेने आपण थोड्या वेळातचतटबंदीत लपविलेल्या पश्चिमाभिमुख महादरवाज्यात येवून पोहोचतो वैशिष्ट म्हणजे शिवकालीन रितीप्रमाणे आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो.महादरवाज्यातून आत गेल कि उजव्या हातालाच चिलखती बांधणीचा बुरूज दिसतो,हा बुरूज पाहून परत पायर्‍यांच्या मार्गाने भवानी मंदिराकडे कूच करायचं.मंदिरात प्रवेश करताचआपणास भवानीमातेची सालंक्रुत प्रसन्न मूर्ती दिसते. ही मूर्ती महराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळीग्राम शिळा आणून त्यातूनघडवून घेतली.या मूर्ती शेजारीच महराजांच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग वसरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे.
हा मंदिर परिसरपाहून बालेकिल्ल्याकडे चालू लागायचं,मंदिरासमोरून बालेकिल्ल्याकडे जात असताना उजव्या हातालाच आपणास समर्थस्थापित हनुमानाची मूर्ती दिसते,पुढे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वारओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ येवून पोहोचतो,मंदिरात भव्य शिवलिंग आहे.या मंदिराशेजारीच प्रशस्त सदर असून कित्येक महत्वाचे निर्णय ,न्यायनिवाडे,मसलती यासदरेतच झाल्या.
केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस राजमाता जिजाऊंच्या वाड्याचे अवशेष आहेत.येथे उजवीकडेच बगीचाच्या मधोमध छ.शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे.या पुतळ्याच्या जागीच पूर्वी राजांचा राहता वाडा होता.या पुतळ्याशेजारीच शासकीय विश्रामधाम असून येथील बागेतून उजव्या बाजूच्या वाटेने तटावर जायचं.या तट्बम्दीवरून फेरफटका मारताना जावळी खोर्‍याचे विहंगम द्रुष्य दिसते.पहिल्यांदा लागतो घोरपडीचे चित्र असणारा राजपहार्‍याचा दिंदी दरवाजा नंतर लागतो रेडका बुरूज पुढे यशवंत बुरूज तर त्याच्यापुढेसूर्य बुरूज.
त्या गडाच्या खाली डाव्या हाताला एक पायवाट दिसते. दर्गा शरीफकडे जाण्याची वाट अशी पाटी दिसते. दर्गा शरीफ म्हणजे अफजलखानाची कबर. या गडाला एकच महाद्वार आहे. त्याच्या खालच्या बाजुला वरुन आलेले पाणी खाली लोटणारा पावसाळी ओढा आहे. थोड्या पाय-या चढून गेल्यावर दरवाज्यात उभे राहता येते. दरवाज्याच्या आतल्या बाजूला द्वार रक्षकांची ठिकाणे दिसतात. हा बुरुज सोमसुत्री प्रदक्षिणा करुन पाहता येतो.
अशा तर्‍हेने आपली संपूर्ण गडफेरी पूर्ण होते.

गडावर जाण्याच्या वाटा:
 महाबळेश्वरहून महाडला जाणारी गाडी कुमरोशी गावाजवळ आली की तेथून अर्ध्या तासाच्या प्रवासात प्रतापगडला जाता येते. गड चढताना थोडा त्रास होतो.
महाड,पोलादपूरकडून किव्वा वाई ,महाबळेश्वरकडून आलं कि ,कुंभरेशी किंवा वाद नावाचे छोटुकल गाव लागतं .गडाच्या आग्नेयेस पारं नावच खेडं आहे .दोन्ही गावांमधून प्रतापगडावर जाता येतं.

प्रतापगडावर जाण्याच्या वाटा

राहण्याची सोय: भवानीमाते च्या मंदिरात राहण्याची सोय होऊ शकते.

जेवणाची सोय व पाण्याची सोय : आपण स्वतःच करावी.

नोट :- वरील सर्व माहिती "गडवाट" व "महाराष्ट्रातील किल्ले" या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट ( posted by - Jitendra Shinde ) चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल.वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

माझे राजे शिवछत्रपती.....


||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||

माझे राजे शिवछत्रपती मराठ्यांचा श्वास....
शिवछत्रपती मराठ्यांचा प्राण....
शिवछत्रपती मराठ्यांचा अभिमान...
शिवछत्रपती आपुले आयुष्य....
शिवछत्रपती मराठ्यांच्या नसानसामध्ये वाहणारे नाव...
 शिवछत्रपती उत्तुंग उभ्या सह्याद्रीचे वाघ...
शिवछत्रपती समस्त विश्वाचे महानायक.....
शिवछत्रपती रांगड्या मराठ्यांची शान.....
शिवछत्रपती स्वराज्याच्यादुश्मनांचे कर्दनकाळ...
शिवछत्रपती जिजाऊच्या पोटी जन्मलेला ढाण्या वाघ....
शिवछत्रपती माणसाला माणसाप्रमाणे जगायला शिकवणारे....
शिवछत्रपती गडकोटांचे धनी...
माझे शिवछत्रपती वाघाच्या डरकाळीत, तलवारीच्या धारित...
शिवछत्रपती माझ्या ध्यानी, मनी फक्त आणि फक्त राजा
शिवछत्रपती.....!!!!!

 महाराष्ट्राचा स्वाभिमान ....
मराठ्यांचा अभिमान .....
आमची आन ...बाण....आणि .....शान
फक्त छत्रपती शिवराय...!!!!!!
 

॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

!! छत्रपती शिवाजी महाराज आणि रायरेश्र्वर गड !!


वयाच्या केवळ १६ व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले. मूठभर मावळ्यांमध्ये धर्मप्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले आणि स्वराज्याची संकल्पना दिली. हिंदवी स्वराज्यासाठी मूठभर मावळ्यांनी जिवाची पर्वा न करता स्वतःला झोकून दिले. पाच मुसलमानी पातशाहींच्या विरोधात लढत एक एक प्रदेश जिंकला. केवळ ५० वर्षांच्या कालावधीत विजापूर आणि दिल्ली या राजसत्तांना पाणी पाजले. खिस्ताब्द १६७४ मध्ये त्यांचे गुरु समर्थ रामदास स्वामी यांच्या मार्गदर्शनानुसार महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची घोषणा करून स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला आणि हिंदु धर्माला राजसिंहासन प्राप्त करून दिले.
छत्रपती शिवाजी महाराजांना आपले भाग्यविधाते म्हणून स्वराज्याची जनता त्यांना पाहू लागली. काही जण, तर त्यांना हिंदूपती पातशहा म्हणू लागले. शिवरायांनी वेदांचे, पुराणांचे, देवळांचे... रक्षण केले आणि जीभेवर रामनाम राखून धरले. सवंगड्यांसह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली.








रायरेश्वर शिवमंदिर

हिंदवी स्वराज्याचा साक्षीदार रायरेश्वरसह्याद्रीच्या कडेकपारी, शिवमंदिर एक ।
तिथे रायरेश्वर स्वयंभू शिवलिंग सुरेख ।।
आणाभाका झाल्या आमुच्या, त्याच्या साक्षीने ।
एकजुटीने राहून कोणा अंतर न देणे ।।
देशासाठी, धर्मासाठी झोकून देऊ उडी ।
मावळे आम्ही शिवबाचे सवंगडी ।।


सृष्टीच्या नानाविध रूपांचे प्रत्यंतर देणारा निसर्गरम्य रायरेश्वरगड पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आहे. तो समुद्रसपाटीपासून ४६९४ फूट उंचावर वसला आहे. येथून वैराटागड, केंजळगड, पांडवगड, कमळगड, पाचगणी, महाबळेश्वर, कोळेश्वर, रायगड, लिंगाणा, तिकोणा, राजगड, तोरणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, प्रतापगड, चंद्रगड इ. गड दिसतात. रायरेश्वर पठाराची लांबी ११.०४ कि.मी. असून, रुंदी १.०२ कि.मी. आहे. गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतलेले शिवमंदिर आणि जननी देवीचे मंदिर आहे. छ. शिवाजी महाराजांनी शिवा जंगम नावाचा पुजारी तेथे पूजेसाठी नेमला होता. सध्या येथे जंगम लोकांची ४० कुटुंबे रहातात.
सह्याद्रीच्या शिखरावर विराजमान असलेल्या भोर येथील श्री स्वयंभू रायरेश्वराच्या शिवालयात छ. शिवाजी महाराजांनी २६ एप्रिल १६४५ या दिवशी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली. बारा मावळातील कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर ही मंडळी भोरच्या वातावरणात वावरणारी होती. सिंहाची छाती असणार्‍या या मावळ्यांना साथीला घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वयंभू रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्याची आण घेतली.


||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||

॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥



नोट : वरील सर्व माहिती "गडवाट" या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल.वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

Friday, 6 April 2012

प्रवास एका शिवभक्ताचा :-।। किल्ले तुगं ।।

  तुगं  किल्ला

 किल्ल्याची उंची :- ........
किल्ल्याचा प्रकार :- गिरीदुर्ग
डोंगररांग :- पुणे
जिल्हा :- पुणे
श्रेणी :- मध्यम


इतिहास : या किल्ल्याला तशी वैभवशाली इतिहासाची परंपरा लाभलेली नाही.मात्र १६५७ मध्ये मावळ प्रांतातील इतर किल्ल्यांसमवेत हा किल्ला देखील स्वराज्यात सामील झाला. सन १६६० मध्येया भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. जयसिंगाने आणि दिलेरखानाने आपल्या स्वारीच्या वेळी ६ मे १६६५ रोजी तुंग आणि तिकोना या भागातील अनेक गावे जाळली पण, हे किल्ले मात्र जिंकू शकले नाही.
१२ जून १६६५ पुरंदर तहानुसार १८जूनला कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला.


किल्ल्याच्या नावावरून आपल्या सर्वांना असेच वाटेल की, किल्ला चढायला खरोखरच कठीण आहे मात्र किल्ला चढण्यास फारच सोपा  आहे. पवन मावळ प्रांतातील तुंग किल्ला हा एक... घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो.
पूर्वी बोरघाटामार्गेचालणा-या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोगहोत असे. या किल्ल्यावरून लोहगड ,विसापूर ,पवन मावळ हा सर्व परिसरनजरेत येतो.



गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे:  गडमाथा फारच आटोपता असल्यामुळे एक तासात सर्व गड पाहून होतो. तुंगवाडीतून गडावर जाणारी वाट मारुतीच्या मंदिरा जवळून जाते. या मंदिरात ५ ते ६ जणांची राहण्याची सोय होते. या मंदिरापासून थोडाच अंतरावर गडावर जाण्यासाठी पाय-या लागतात. पाय- यांच्या वाटेत थोडाच अंतरावर हनुमान मंदिर लागते.पुढे गोमुखी रचनेचा दरवाजा आहे. येथून आत शिरल्यावर आपण गड माथ्यावर पोहोचतो. उजवीकडे गणेशाचे मंदिर आहे. मंदिराच्या मागील बाजूस पाण्याचा खंदक आढळतो. येथूनच
बालेकिल्ल्यावर जाणारी वाट आहे.बालेकिल्ल्यावर तुंगीदेवीचे मंदिर आहे. मंदिरा समोरच जमिनीत खोदलेली गुहा आहे. यात पावसाळ्या शिवाय इतर ऋतूत २ ते ३ जणांची राहण्याची सोय होऊ शकते.
अशा प्रकारे एक दिवसात किल्ला पाहून लोणावळ्याला परतता येते.

गडावर जाण्याच्या वाटा : या गडावर जाणा-या सर्व वाटा पायथ्याच्या तुंगवाडीतूनच जातात. या वाडीतून गडावर जाण्याससाधारणतः ४५ मिनिटे लागतात. गडमाथा तसा लहान असल्यामुळे एक तासात सर्व गड पाहून होतो.

घुसळखांब फाटामार्गेः गडावर जाण्यासाठी लोणावळा स्टेशनवर पोहचावे. येथून भांबूर्डेअथवा आंबवणे कडेजाणारी एस.टी पकडून २६ कि.मी अंतरावरील घुसळखांब फाटापाशी उतरावे. या फाटापासून दीड तासांची पायपीट केल्यावर आपण ८ कि.मी अंतरावरील तुंगवाडीत पोहोचतो. येथून गडावर पोहचण्यास ४५ मिनिटे लागतात.
ब्राम्हणोली-केवरे : अनेकजण तिकोना ते तुंग असा ट्रेक देखील करतात. यासाठी तिकोना किल्ला पाहून तिकोनापेठेत उतरावे आणि काळे कॉलनी चा रस्ता धरावा. वाटेतच ब्राम्हणोली गावं लागते. या गावातून लाँच पकडून पवनेच्या जलाशयात जलविहाराची मौज लुटत पलीकडच्या तीरावरील केवरे या गावी यावे. केवरे गावा पासून २० मिनिटातच आपण तुंगवाडीत पोहोचतो.
तुंगवाडीच्या फाटा मार्गेः जर लाँच ची सोय उपलब्ध नसेल तर तिकोनापेठेतून दुपारी ११.०० वाजताची एस.टी महामंडाळाची कामशेत- मोरवे गाडी पकडून मोरवे गावाच्या अलीकडच्या तुंगवाडीच्या फाटावर उतरावे. येथून पाऊण तासांची पायपीट केल्यावर आपणं तुंगवाडीत पोहचतो.

राहण्याची सोय : तुंगवाडीतील मारुतीच्या मंदिरात ६ ते ७ जणांची राहण्याची सोय होते. तुंगवाडीत
भैरोबाचे देखील मंदिर आहे यात २० जणांना राहता येते.


जेवणाची सोय : आपण स्वतः करावी.


पाण्याची सोय : मंदिरा जवळच गावात पाणी उपलब्ध आहे.


जाण्यासाठी लागणारा वेळ : पायथ्यापसून ४५ मिनिटे.




नोट : वरील सर्व माहिती "गडवाट" या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .