Saturday, 27 October 2012

शिवरायांचे शिलेदार - सेनापती संताजी घोरपडे


संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्याचे (१६८९ ते १६९७) सरसेनापती होते. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याची धूरा वाहिली. संताजी घोरपडे हे नाव धनाजी जाधव यांच्यासोबत मराठेशाहीत घेतले जाते. या दोघांनी मिळून अत्यंत दीर्घ काळ (१७ वर्षे) औरंगजेबच्या बलाढ्य सेनेचा सामना केला,मुघल सैनिकां मध्ये संताजी आणि धनाजी यांची प्रंचड दहशत होती. सार्वत्रिकरीत्या मुघल छावण्यांवर हल्ले हे त्यांच्या युद्धनीतीचा भाग होते. अत्यंत नाजूक पडत्या काळात मराठ्यांचे स्वराज्य नष्ट होण्यापासून वाचवले व जसजसे औरंगजेचा प्रतिकार क्षीण होत गेला तसतसे नंतर धनाजींनी स्वराज्य पसरवण्याचे धोरण अवलंबले. १७०७ मध्ये औरंगजेबच्या मृत्यू समयी मराठ्यांनी मध्य भारतापर्यंतचा भूभाग स्वराज्यात आणला होता. शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या स्वराज्याला संताजी व धनाजी यांनी वाचवले व पसरवले. मराठ्यांनी १८ व्या शतकात जवळपास संपूर्ण भारतावर आपला दरारा निर्माण केला. त्यांच्या एका मोहिमेचा हा किस्सा ....... 

शंभूराजानंतर राजाराम महाराजांनाही आता औरंगजेब वाट मोकळी करत नव्हता त्यामुळे पन्हाळ्या वरूनच राजाराम महाराज राजकारभार पाहत होते. सर्व मराठा मावळ्यांमध्ये एक शल्य होते आणि ते म्हणजे संभाजी महाराजांसाठी काहीच करू शकलो नाही ,मनात ठासून राग भरला होता पण याला पर्याय काय ? कोण घेणार पुढाकार ? कोण राखणार स्वराज्य ? कोण राखणार शिवरायांची शान ? कोण मिळवून देणार मावळ्यांचा आत्मविश्वास ? आणि याचा उद्रेक शेवटी होणार तो झालाच.मराठा सरदारांच्या गुप्त बैठका सुरु झाल्या.. कसे उट्टे काढायचे ? कसा बदला घ्यायचा ? त्या औरंग्याची दात घशात कशी घालायची ? कसे दाखवायचे मराठ्यांचे सळसळते रक्त ? कोण येणार पुढे ? गुप्त सल्लामसलतीमध्ये आघाडीवर होते संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव, सोबतीला संताजींचे दोन बंधू बहिर्जी आणि मालोजी सोबत विठोजी चव्हाण तसेच आणखी काही शूर सेनानी..या गुप्त बैठकीत धाडसी बेत ठरला कि औरंग्याला त्याचाच छावणीत घुसून लज्जित करायचा..त्याचा पाडाव करायचा. त्यात सोन्याहून पिवळी एक गोष्ट म्हणजे शंभूराजांचा बदला तुळापुर येथेच करायचा कारण औरंग्या इथेच होता.. (तुळापुर जिथे संभाजीराजांना मारण्यात आले) चर्चा झाली.. निर्णय ठरला.. धनाजीरावांकडे पाहत संताजी घोरपडे म्हणाले “खानाचा माज तुम्ही जिरवा फलटणला आणि मी खुद्द २००० निवडक मावळ्यान्सोबत औरंग्याला मराठ्यांचा रुद्रावतार दाखवितो, दाखवितो मराठे आजही आहेत.. तुमास्नी आसमंत दाखवायास”या निर्णयावर शिक्कामोर्तब करणे इतके सोपे नव्हते परंतु संताजींनी सर्व मोहीम नियोजनबद्ध आखली, दस्तुरखुद्द संताजींनी एका एका मावळ्याला प्रत्यक्ष भेटून त्याचा जोश वाढविला आणि प्रसंगी संयम राखण्याचा सल्ला दिला.. हळूहळू संताजींची हि तुकडी तुळापुरकडे कूच करू लागली, औरंग्याला त्यावेळी विचारसुद्धा नव्हता कि अशी त्याची वाट मावळे लावतील,भयान अंधारातून पायवाट काढली जाऊ लागली, झाडाझुडपाचा, पालापाचोळ्याचा आणि रातकिड्याचा आवाज कानी घुमू लागला.. तुळापुर जसजस जवळ येत होत तसतस मुघलांची घुबड दिसू लागली.रात्रीची भयाण शांतता तुळापुरभोवती पसरलेली होती.. त्यावेळेस काही मराठी लोकांच्या फौजही औरंग्याकडे होत्याच त्यामुळे मुघल सैन्याला वाटले आपलीच माणसे असतील……. आणि नेमका याच गोष्टीचा आणि या अंधाराचा फायदा घेत मावळ्यांची तुकडी थेट औरंग्याच्या छावणीत घुसली,काही कळायच्या आतच मावळ्यांनी “हर हर महादेव” चा जयघोष करत आणि “जय भवानी, जय शिवाजी” या नावाने मोघलांची अक्षरशः कत्तलच सुरु केली शीर धडावेगळे होत होते, कुठे नुसती रक्ताची चिळकांडी दिसून येत होती.औरंग्यासोबत अख्खी त्याची लाखोंची सेना भांबावून गेली होती, या अवस्थेत ते स्वतःच्याच सैन्यासोबत युद्ध करू लागलेबरगडीत मराठ्यांच्या तळपत्या तलवारी घुसून बाहेर पडू लागल्याने तडफडत जीव सोडू लागले.एकच हल्लकल्लोळ सुरु झाला परंतु तरीही संताजींचा एक मनोदय फसला तो म्हणजे औरंग्याला भुईसपाट करायचा अंगरक्षकांनी अक्षरशः पळवूनच नेले त्याला. जेवढे प्रचंड नुकसान करता येईल तेवढे करत करत शेवटी औरंग्याचा तंबुच उखडून टाकला.. औरंग्याचा डेरा भुईसपाट करून त्याचा सुवर्ण कलश निशाणी म्हणून घेऊन संताजींनी मावळ्यांना माघारी फिरण्याचा आदेश दिला.याअगोदर कि औरंग्याची सेना तयार होईल छोट्या छोट्या तुकडीत विभागून संताजींनी मावळ्यांना शेवटी मोहीम सिंहगडाकडे कूच करण्याचा आदेश दिला…. मोहीम फत्ते झाली होती.

 रणझुंझार सेनापती संताजी घोरपडे  यांना मानाचा मुजरा .......!!! 

॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

Thursday, 25 October 2012

शिवरायांचे शिलेदार - कान्होजीराजे आंग्रे

कान्होजीराजे आंग्रे

स्वकर्तृत्वावर उत्तुंग झेप घेणारा, परकीय शत्रूंची दाणादाण करून त्यांची झोप उडविणारा मराठी सरदार, दर्याबहाद्दर कान्होजी ! पुणे जिल्ह्यातील खेडजवळील कालोसे गावी १६६९ मध्ये कान्होजी आंग्रे ह्यांचा जन्म झाला. कालोसे गावातील आंगरवाडी ह्या छोट्या भागावरून त्यांचे आंग्रे हे आडनाव रूढ झाले. कर्तृत्व, पराक्रम आणि निष्ठा याची परंपरा कान्होजीला पूर्वजांकडून लाभलेली होती. तरीही स्वपराक्रमाने, स्वत:चा एक स्वतंत्र ठसा त्यांनी इतिहासात उमटविला. इ.सन १६८८ च्या सुमारास सिद्दी कासम ह्या औरंगजेबाच्या सेनापतीस कान्होजींच्या अभ्यासपूर्ण योजनेपुढे आणि जिद्दीपुढे हार पत्करावी लागली. आमिष दाखवून कोकणातील किल्ले ताब्यात घेणार्या मोगलांचे स्वप्न कान्होजींनी धुळीस मिळविले. सुवर्णदुर्गचा लढा यशस्वी करून त्यांनी आपल्या पराक्रमास सुरुवात केली. तसेच ह्या विजयानंतर मोगलांनी ताब्यात घेतलेले किल्ले काबीज करण्यास त्यांनी सुरुवात केली. छत्रपती राजारामांच्या काळात मराठ्यांचे अस्तित्व टिकविण्याची जबाबदारी कान्होजींवर आली होती. अनुभवाने आणि मुत्सद्देगिरीने ते शत्रूला तोंड देत होते. त्यांची स्वतंत्र कामगिरी पाहूनच राजारामांनी त्यांना सरखेल हे सन्मानाचे पद दिले. कान्होजींनी अलिबागचा कुलाबा किल्ला जिंकून घेऊन आपली राजधानी तेथे थाटली. छत्रपती राजारामांनी आंग्रे यांना आरमाराचा प्रमुख केले आणि आंग्रे कोकण किनार्याचे राजे झाले. इ.स. १७०० मध्ये राणी ताराबाईंनीही ह्या पराक्रमी वीराला सन्मानित करून सावंतवाडी ते मुंबईपर्यंतची किनारपट्टी रक्षणासाठी ताब्यात दिली. ह्या नव्या आव्हानाबरोबर कान्होजींना एकाच वेळी परकीय आणि स्वकीयांबरोबर लढा द्यावा लागत होता. कोकणाबरोबरच कच्छ, सौराष्ट्रापासून त्रावणकोर, कोचीनपर्यंतची सागरी सत्ता कान्होजींच्या हाती होती.
सागरी भागात मुक्तपणे संचार करणार्या परकीयांवर निर्बंध आले होते. १६९८ पासून मराठी राज्याची सारी सागरी सत्ता कान्होजींकडे आली होती. त्यांच्या परवान्याशिवाय कोणीही सागरावर व्यापार करू शकत नव्हते. ह्याचा प्रतिकार करण्याचे परकीयांनी ठरविले. सर्व परकीयांनी एकत्रित येऊन कान्होजींना संपविण्याचे ठरविले, तरीही त्यांनी इंग्रज, पोर्तुगीजांनाही पराभूत केले. शत्रूच्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी कान्होजींनी दूरदृष्टीने अगोदरच अनेकांशी मैत्रीचे संबंध ठेवलेले होते. अशा संबंधांच्या मदतीने त्यांनी आपले आरमार अधिक शस्त्रसज्ज केले. पोर्तुगीजांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रनिर्मितीचा कारखाना आणि कुलाबा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग येथे सुधारीत पद्धतीचे जहाज बांधणीचे कारखाने त्यांनी उभारले. या सुसज्जतेसह कान्होजींनी समुद्र किनार्यावर एक दबदबा निर्माण केला होता. कान्होजींचा लढा धार्मिक आक्रमणाची धार कमी करण्यासाठीही होता. कान्होजी आंग्रे यांनी कोकणातील मंदिरांसह पंढरपूर , आळंदी , जेजुरी, तुळजापूर येथील देवस्थानांना इनाम व रोख देणग्याही दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही औरंगजेबाला मराठी मुलूख काबीज करता आला नाही. यामागे अनेक शूर सरदारांचे योगदान होते. कोकण किनार्यावरील राजसत्तेचा जागता पहारा असणारे कान्होजी त्यांतीलच एक !
 दिनांक ४ जुलै, १७२९ रोजी कान्होजींनी जगाचा निरोप घेतला.

    
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥


Saturday, 13 October 2012

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले वारुगड।।

वारुगड किल्ला

माणागंगा नदी जिथे उगम पावते त्या सीताबाईच्या डोंगरात डाव्या कुशीवर वारुगड किल्ला आहे. किल्ला माण तालुक्यात दहिवडीच्या ईशान्येस २० मैलांवर आहे.

इतिहास :
किल्ला शिवरायांनी बांधला असे सांगतात.या किल्ल्याचा किल्लेदार परभू जातीचा होता.२०० पहारेकरी व बरीच शिबंदी किल्ल्यावर होती.१८१८ मध्ये सातारच्या राजाच्या फडणीस विठ्ठलपंत याने २०० लोक पाठवून दुस-या बाजीरावाकडून घेतला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
किल्ला हा दोन भागात मोडतो.एक गडाची माची तर दुसरा बालेकिल्ला.
१. वारुगड माची
किल्ल्याच्या माचीवर गेल्यावर समजते की गडाचा घेरा केवढा मोठा आहे.किल्ल्याची माची ही संपूर्ण तटबंदीवेष्टीत आहे.आजही ती ब-याच मोठा प्रमाणावर शाबूत आहे. बालेकिल्ल्यावर जाणारा मार्ग हा या माचीतूनच पुढे जातो.या माचीत शिरण्यासाठी पूर्वी ५ दरवाजे होते.मात्र स स्थितिला दोनच शिल्लक आहे गिरवी जाधववाडी या मार्गेमाचीत प्रवेश करणारी वाट एका दरवाजातून वर येते.तर मोंगळ -घोडेवाडी माचीत प्रवेश करणारी वाट दुस-या दरवाजातून वर येते. माचीवर घरांचे ,वाडांचे अनेक अवशेष आहेत.दोन ते तीन पाण्याची टाकी,तळी सुध्दा आहेत.माचीवर भैरोबाचे जीर्णोध्दारीत मंदिर सुध्दा आहे.मंदिर प्रशस्त असल्याने येथे राहण्याची सोय होऊ शकते.संपूर्ण माची फिरण्यास दोन तास लागतात.

२. बालेकिल्ला
गिरवी जाधववाडीतून माचीवर येणारा रस्ता दरवाजातून पुढे गेल्यावर दोन भागात विभागला जातो.उजवीकडे आणि डावीकडे जाणरा रस्ता माचीवरील घोडेवाडीकडे जातो तर सरळ वर जाणारी वाट १५ मिनिटात बालेकिल्याच्या प्रवेशद्वारापाश ी येऊन धडकते.दरवाजाची तटबंदी आजही शाबूत आहे.बालेकिल्याव र पोहचल्यावर समोरच एक सदरेची इमारत आहे.आज ती पूर्णपणे नव्याने बांधून काढलेली आहे.समोरच पाण्याचे टाके व एक विहीर आहे.विहीर ब-याच प्रमाणात बुजलेली आहे. किल्ल्यावरून समोरचा परिसर पाहीला की आपल्याला जाणवते की किल्ला किती मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे.समोरच दिसणारा सीताबाईचा डोंगर , महादेव डोंगररांग हा परिसर दिसतो.संतोषगडवर ून सीताबाईच्या डोंगरातून एक वाट वारुगडावर येते.

गडावर जाण्याच्या वाटा :
वारुगडावर जायचे असल्यास फलटण गाठावे.फलटण पासून किल्ल्यावर जाण्यास अनेक मार्ग आहेत. वारुगड मुख्यतः दोन भागात विभागला आहे.एक गडाची माची यावर घोडेवाडी नावाची वस्ती आहे. तर दुसरा वारुगडाचा बालेकिल्ला. बालेकिल्ल्यात जाण्यासाठी माचीतूच जावे लागते.माचीत जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक गाडीरस्ता आहे जो थेट माचीत जातो तर दुसरा मार्ग म्हणजे पायवाट जी थेट किल्ल्यावर घेऊन जाते.

१. फलटण ते गिरवी
फलटण ते गिरवी अशी एस टी सेवा उपलब्ध आहे.गिरवीतून ५ किमी अंतरावर असणारा जाधववाडा गाठावा.जाधववाडा हे किल्ल्याच्या पाययाचे गाव आहे.येथून वारुगड माचीवर जाण्यास २ तास लागतात.माचीतून बालेकिल्ल्यावर जाण्यास २० मिनिटे पुरतात.

२. फलटण दहीवडी
फलटण दहीवडी रस्त्यावर फलटण सोडल्यानंर २० किमी अंतरावर मोंगळ नावचा फाटा लागतो.या फाटापासून एक कधा गाडीरस्ता थेट माचीवरील घोडेवाडी वस्तीत घेऊन जातो.मोंगळ ते घोडेवाडी अंतर १५ कि.मी चे आहे. फलटण दहीवडी रस्त्यावर फलटण सोडल्यानंर २६ किमी अंतरावर बीजवाडी नावचे गाव लागते.या गावातून एक कधा गाडीरस्ता थेट माचीवरील घोडेवाडीत जातो.पुढे हा रस्ता वर सांगतिलेल्या रस्त्याला येऊन मिळतो.

राहण्याची सोय : वारुगडाच्या माचीवर असणा-या भैरवगडाच्या मंदिरात १०० लोंकांची सोय होते.
जेवणाची सोय : जेवणाची सोय आपणच करावी.
पाण्याची सोय : माचीवर बारामही पिण्याचे पाण्याची टाकी आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ : जाधववाडीतून दोन तास लागतो.
जाण्यासाठी उत्तम कालावधी : सर्व ऋतुत जाता येते.

||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||


नोट :
वरील सर्व माहिती " मराठा रियासत (स्वराज्याचे शिलेदार) " या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट ( by - Amit Mhadeshwar) चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

Tuesday, 9 October 2012

पूर्ण पराभव करायचा डाव, संकल्प आणि क्रांतीसाठी चा सिद्धांत....

"" जिच्या कुशीतून स्वराज्याच देंखन स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ,
ज्या महापुरुषाने या स्वराज्याची संकल्पना मांडली ते राजा शहाजीराजे,
ज्या वारसदाराने हे देंखन स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती
आणि ह्या महापुरुषानां अभिवादन....!!!""


जिजाऊसाहेब आणि शिवाजीराजे शहाजीराजांना भेटण्यासाठी बंगळुरास गेले। शहाजीराजांचा मुक्काम तिथं होता। तेथूनच ते आपल्या कानडी मुलुखातील जहागिरीचा कारभार पाहात होते।

पुण्याहून ही मायलेकरे बंगळुरास आली। शहाजीराजांचे सर्वच कुटुंबीय एकत्र येण्याचा आणि सुमारे दोन वषेर् एकत्र राहण्याचा हा योग होता. हाच शेवटचा योग. या दोन वर्षातच हंपी विरुपाक्ष आणि विजयनगरच्या कर्नाटकी स्वराज्याची राजधानी विजयनगर पाहण्याचा योग शिवाजीराजांना आला. विरुपाक्ष हे तीर्थक्षेत्र होते. विजयनगर हे उद्ध्वस्त झालेले एका हिंदवी स्वराज्याचे राजधानीचे नगर होते. या प्रवासात शिवाजीराजांना खूपच पाहायला अन् शिकायला मिळाले. एवढे बलाढ्य साम्राज्य एका राक्षसतागडीच्या लढाईत धुळीला कसे काय मिळाले ? हा शेवटचा रामराजा कुठे चुकला ? त्याच्या राज्यकारभारात आणि लष्करात अशा कोणत्या जबर उणिवा झाल्या की अवघ्या एका मोठ्या पराभवाने त्याचे साम्राज्यच भुईसपाट व्हावे ?

या साऱ्या गोष्टींचा शोध आणि बोध शिवाजीराजांच्या मनात घुसळून निघत होता। त्यातून मिळालेले विवेकाचे नवनीत राजांना आपल्या भावी उद्योगात उपयोगी पडणार होते. पडले. हे वैचारिक समुदमंथन राजांच्या मनात या दोन वर्षात (इ.स १६४० ते ४२ ) घडले. राजे आणि जिजाऊसाहेब पुन्हा पुण्याकडे परतले , ( इ. स. १६४२ ) ते मराठी स्वराज्य सह्यादीच्या हृदयात निर्माण करण्याच्या निश्चयानेच! आणि शिवाजीराजांनी कानद खोऱ्यातील प्रचंड सह्यशिखरावरती बंडाचा झेंडाच उभारला. हा गड तोरणा. लगेच पुढे कोरीगड , सुभानमंगळ आणि कोंडाणा राजांनी कब्जात घेतला. आदिलशाही थक्कच झाली. एक मराठी कोवळा पोरगा सुलतानी विरुद्ध बंड करतो ? कुठून आलं हे बळ ? हे मोडलंच पाहिजे. या विचाराने महंमद आदिलशहाने एक अत्यंत धूर्त डाव सहज टाकला. या शिवाजी भोसल्याच्या बापालाच जर आपण अचानक छापा घालून कैद केलं तर हे बंड जागच्या जागी संपले. शिवाजी रुमालाने हात बांधून आपल्यापुढे शरण येईल. अन् मग पुन्हा कुणीही बंडाचा विचारही करणार नाही. याकरिता शिवाजीवर फौजही पाठवायची. जरूर तेवढा रक्तपात आणि बेचिराखी करायचीच. बस् ठरलंच.

पण याचवेळी शहाजीला कैद करायचं गरज पडली तर ठारही मारायचं। ठरलं आणि दिनांक २५ जुलै १६४८ या दिवशी शहाजीराजांवर वजीर मुस्तफाखानाचा विश्वासघातकी छापा पडला. आपल्यावर काही तरी घातकी संकट येणार आहे , आणि ते वजीराकडूनच येणार आहे हे आधी समजलेले असूनसुद्धा शहाजीराजे गाफील राहिले. झोपले. आणि वजीर मुस्तफाने त्यांना कैद केले. हातापायात बेड्या ठोकल्या. राजांची रवानगी कैदी म्हणून विजापुरास झाली. ही घटना तामिळनाडमध्ये मदुरेजवळ घडली.

शहाजीराजांना अपमानास्पदरीतीने विजापुरात आणण्याची कामगिरी अफझलखानाने केली. राजांना ‘ सत्मंजिल ‘ या हवेलीत आदिलशहाने कैदेत ठेवले.

या बातम्या पसरायच्या आतच आदिलशहाने पुण्याकडे मोठी फौज दिमतीला देऊन फत्तेखान या सरदारास रवानाही केले। शिवाजीराजा आणि त्याचं लहानसं नवं राज्य कब्जात घेण्याकरता.

राजगडावर शिवाजीराजांना ही भयंकर बातमी समजली की , तीर्थरूप साहेब शाही कैदेत पडले आणि आपल्यावर फत्तेखान चाल करुन येतोय। बादशहाचा आता उघड उघड सवाल होता की , बोल पोरा , स्वराज्य हवे की बाप हवा ? शहाजीला आम्ही कोणत्याही क्षणी ठार मारू शकतो। तरी मुकाट्याने शरण ये। जे बळकावलं आहे ते तुझं नखाएवढं स्वराज्य आमच्या स्वाधीन कर माफी माग. तर बाप सुटेल. नाहीतर अवघं भोसल्यांचं खानदान मुरगाळून टाकू. हा सवाल भयंकर होता वडलांचे प्राण की स्वराज्याचे रक्षण ? काय वाचवायचं ? आईच सौभाग्य की स्वराज्य ?

दोन्हीही तीर्थरुपच! मग दोन्हीही वाचवायचे। हा शिवाजी महाराजांच्या मनातला विचारही तेवढाच क्रांतीकारक होता. असा विचार करणारा विचारवंत योद्धा इतक्या लहान वयात ज्ञानेश्वरांच्या नंतर साडेतीनशे वर्षांनी प्रथमच मराठी मातीत उगवत होता. येणाऱ्या शाही फौजेशी झंुज द्यायची असा ठाम निश्चय राजांनी केला. राजांच लष्करी बळ चिमूटभर होतं. आक्रमण परातभरून येत होतं. नक्कीच श्ाी तुकारामांचे विचार युवा शिवाजी राजांच्या मनात दुमदुमत होते. ‘ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग! अंगी निश्चयाचे बळ , तुका म्हणे तेचि फळ! ‘

राजे अतिशय विचारपूर्वक आणि योजनाबद्ध आराखडा आपल्या आखाड्यात रेखित होते. शत्रूच्या जास्तीत जास्त फौजेचा आपल्या कमीत कमी फौजेनिशी पूर्ण पराभव करायचा हाच डाव , हाच संकल्प आणि हाच क्रांतीसाठी सिद्धांत.

॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥


Monday, 1 October 2012

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले रामगड ।।

रामगड किल्ला

किल्ल्याची  उंची  : १६५
 किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांगः मालवण, सिंधुदुर्ग
जिल्हा : सिंधुदुर्ग
श्रेणी : मध्यम

रांगणा गडाजवळ उगम पावणारी गड नदी ८० किमी अंतर कापून समुद्राला मिळते. या गडनदी मार्गे होणार्‍या व्यापारावर, जलवहातूकीवर लक्ष ठेवण्यासाठी ‘रामगड’ किल्ला बांधण्यात आला. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटावलेल्या एका डोंगरावर हा किल्ला बांधण्यात आला. आजही किल्ल्याचे प्रवेशद्वार, तटबंदी, बुरुज शाबूत आहेत. 

इतिहास :
रामगडची उभारणी शिवाजी महाराजांनी केली. गडाचा इतिहास ज्ञात नाही. १८ व्या शतकात पेशवे व तुळाजी आंग्रे यांच्यामध्ये लढाई चालू होती. त्यावेळी तुळाजीने रामगड जिंकून घेतला होता. तेव्हा पेशव्यांचे सरदार कृष्णाजी महादेव व सावंतवाडीकर यांचा जमाव खंडाजी मानकर यांनी एकत्र होउन फेब्रुवारी १७९६ मध्ये रामगड जिंकला.
६ एप्रिल १८१८ ला रामगड किल्ला ब्रिटीशांनी जिंकून घेतला. त्यावेळी गडावर २१ तोफा व १०६ तोफगोळे असल्याचा उल्लेख मिळतो.

गडावरील पहाण्याची ठिकाणे :
गडाच्या पश्चिमाभिमुख प्रवेशद्वारातून आपण गडावर प्रवेश करतो. गडाचे प्रवेशद्वार ८ फुट उंच आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला १८ फूट उंच बुरुज आहेत. प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला पहारेकर्‍यांसाठी देवड्यांची योजना केलेली आहे. या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस थोड्या अंतरावर अजून एक (चोर) दरवाजा आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या हाताला तटबंदी ठेऊन सरळ चालत गेल्यावर आपल्याला होळींच्या माळावर पोहोचतो. तेथे ७ तोफा रांगेत उलट्या पुरुन ठेवलेल्या दिसतात. त्यातील सर्वात मोठी तोफ ७ फूट लांबीची आहे. या तोफांसमोरच किल्ल्याचे दुसरे प्रवेशद्वार आहे. हे उत्तराभिमुख प्रवेशद्वार गोमुखी बांधणीचे आहे. प्रवेशद्वाराच्या आत देवड्या आहेत. परंतू प्रवेशद्वारा बाजूच्या बुरुजांचे चिरे ढासळल्यामुळे प्रवेशद्वारातून रामगड गावातील होळीवाडीत जाणारा मार्ग बंद झाला आहे. या प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताच्या तटबंदीवरुन गड नदीचा प्रवाह दिसतो.
गडाच्या मधोमध बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार ढासळलेले आहे. बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोरील तटावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. या तटावर काळ्या पाषाणातील गणपतीची अत्यंत सुबक मुर्ती आहे. बाजूलाच काही शाळूंका आहेत. या तटावरुन दुसर्‍या बाजूला पायर्‍यांनी उतरल्यावर आपण किल्ल्याच्या सध्याच्या प्रवेशद्वारापाशी येतो व आपली गडफेरी पूर्ण होते. गडाला १८ फूट उंचीचे १५ बुरुज आहेत. प्रत्येक बुरुजाला ३ दिशांना खिडक्या आहेत. बुरुजांच्यामध्ये १८ फूटी तटबंदी असून तीने पूर्ण किल्ल्याला वेढलेले आहे. तटबंदीची लांबी अंदाजे ६४० मीटर आहे. गडावर किल्लेदाराच्या वाड्याचा चौथरा आहे, पण पाण्याची विहीर अथवा तलाव आढळत नाही.

गडावर पोहोचण्याच्या वाटा :
रामगड गाव सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात आहे. कणकवली व मालवण दोन्ही कडून रामगडला जाण्यासाठी एसटी बसेस उपलब्ध आहेत.
१) रामगड कणकवलीहून १२ किमी वर आहे. कणकवलीहून मसूरे, आचरा मार्गे मालवण, देवगडला जाणार्‍या बसेसनी रामगडला जाता येते.
२) रामगड मालवणहून २९ किमी वर आहे. मालवणहून आचरामार्गे कणकवलीला जाणार्‍या बसेसनी रामगडला जाता येते. खाजगी गाडीने मालवण -चौके - बागायत - मसदे - बेळणा - रामगड यामार्गेही जाता येते.

राहाण्याची सोय : गडावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही, पण रामगड गावात आहे.
पाण्याची सोय : गडावर पाण्याची सोय नाही, पण रामगड गावात आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ : गडावर जाण्यासाठी लागणारा वेळ: रामगड बाजारपेठेतून १५ मिनीटे लागतात.
 
सूचना : मालवणहून सकाळी निघून (१२ किमी) मसूरे जवळील भरतगड व भगवंतगड पाहून (१७ किमी) रामगडला जाता येते. तसेच रामगडहून ओवळीये गावातील (१० किमी) सिध्दगड पाहून कसाल मार्गे (३६ किमी) मालवणला येता येते. या मार्गाने हे ४ किल्ले एका दिवसात पाहून होतात.
यातील मालवण ते मसूरे व मसूरे - रामगड बसेस आहेत. परंतू रामगड ते ओवळीये व ओवळीये ते कसाल जाण्यासाठी रामगडहून रिक्षा करावी लागते. कसाल - मालवण बसेस आहेत.


नोट : वरील सर्व माहिती "गडवाट" या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट ( by - Amit Mhadeshwar) चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

शिवरायांचे शिलेदार - सरसेनापती हंबीरराव मोहिते


 
आदिलशाही सरदार बहलोलखान याच्याबरोबरच्या लढाईत सेनापती प्रतापराव गुजर पडले.प्रतापराव पडल्याची वार्ता कळताच,प्रतापरावांच्या फौजेत असलेल्या हंबीरराव मोहिते यांनी सर्व सैनिकांत हिंमत निर्माण करून, बहलोलखान वर आक्रमण करून त्याच्या सैन्याची दाणादाण उडवून त्यांस विजापूरपर्यंत पिटाळले. बहलोलखानाविरूध्द पराक्रमाने महाराजांना हंबीररावामध्ये शहाणा,सबुरीचा सेनानी दिसला.चिपळून जवळच्या श्रीक्षेत्र परशूराम येथे या सेनानीस महाराजांनी आपला सेनापती म्हणून निवडले.सभासद म्हणतो,'प्रतापराव पडले ही खबर राजियांनी ऐकून बहूत कष्टी जाले,सरनोबत कोण करावा?अशी तजवीज करून,आपण स्वस्थ लष्करांत येऊन,लष्कर घेऊन कोकणांत चिपळून जागा परशूरामाचें क्षेत्र आहे,तेथें येऊन राहिले.मग लष्करची पाहाणी करून लहान थोर लष्करास व पायदळ लोकांस खजीना फोडून वाटणी केली,आणि सरनोबतीस माणूस पाहातां हंसाजी मोहिते म्हणून पागेमध्यें जुमला होता;बरा शहाणा,मर्दाना,सबुरीचा,चौकस,शिपाई मोठा धारकरी पाहून त्यास 'हंबीरराव' नाव किताबती देऊन सरनोबती सांगितली.कुल लष्कराचा गाहा करून हंबीरराव यांचे ताबीज दिधले.

बहादूरखान,दिलेरखानादींना नजरेत धरले नाही :

छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर हंबीररावांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या फौजांनी दोन वर्ष मोघल व आदिलशाही भागातून मोठी लुट मारून आणिली.या कालातील हंबीररावांची कामगिरी वर्णन करताना सभासद म्हणतो,'राजियांनी आपले लष्करास हुकूम करून हंबीरराव सरनौबत फौज घेऊन मोंघलाईत शिरले. खानदेश, बागलाण, गुजराथ, अमदाबाद,बुर्‍हाणपूर,वर्‍हाड,माहूर मारून खंडणी करून जप्त केला.मालमत्ता अगणित जमा करून चालिले.तो बहादूरखान यांनी कुल जमाव घेऊन हंबीररायाचे पाठीवर चालून आले.राजियाची फौज तोलदार गाठली.मोंघल बहुत धास्तीने घाबरा होऊन सात-आठ गावांचे अंतराने चालिला.दिलेरखान उतावळा होऊन फौजेशी गाठ घातली.हंबीरराव यांनी नजरेत धरला नाही.तोलदारीने मत्ता घेऊन आपले देशास आले.मालमत्ता राजियास दिली.

व्यंकोजीराजावर विजय :

कर्नाटक मोहिमेवर असताना महाराजांनी व्यंकोजीराजाकडे कर्नाटकातील शहाजीराजांच्या जहागीराचा अर्धा वाटा मागितला पण वाटा न देताच त्यांनी हंबीररावांच्या सैन्यावर आक्रमण केले.व्यंकोजीराजांकडे ४००० घोडदळ व १०००० पायदळ होते.तर हंबीररावांच्या कडे ६००० घोडदळ व ६००० पायदळ होते.दोन्ही सैन्यात जोरदार लढाई होऊन हंबीररावांच्या सेनेचा पराभव झाला.विजय मिळाल्यामुळे व्यंकोजीराजे व त्यांचे सैन्य आराम करू लागले.याप्रसंगी हंबीररावांनी व संताजी भोसले यांनी मराठी सैन्यास एकत्र करून मध्यरात्रीच व्यंकोजीराजांच्या तळावर हल्ला करून त्यांच्या फौजेची दाणादाण उडविली.प्रचंड असा खजिना,हत्ती,घोडे मराठ्यांच्या हाती लागले.व्यंकोजीराजे सुध्दा हाती लागले होते. पण महाराजांच्या बंधूस कैद कसे करावे असा विचार करून त्यांनी व्यंकोजीराजांस सोडून दिले.हे युध्द १६ नोव्हेंबर,१६७७ साली झाले.यानंतर हंबीररावांनी कर्नाटकातील असा वेलोरचा बुलंद कोट काबीज केला(२२ जुलै, १६७८).

प्रधानांची बंडखोरी मोडिली :

छत्रपती शिवरायांच्या मृत्युनंतर अष्टप्रधान मंडळीतील काही जणांनी राजारामास गादीवर बसविण्याचे ठरवून संभाजीराजेंचा गादीवरील हक्क नाकारला.या मंडळीतील मोरोपंत पिंगळे,आण्णाजी दत्तो,प्रल्हाद निराजी या मंडळीना वाटले की राजाराम हा हंबीररावांचा सख्खा भाचा असल्यामुळे,आपल्या कटात हंबीरराव सामील होतील.पण हंबीररावांनी या तिघांना कैद करून कोल्हापूरास पन्हाळा किल्ल्यावर संभाजीराजें पुढे उभे केले.कारण हंबीररावांना माहित होते की मोघलांच्या प्रचंड अशा सेनेशी संभाजीराजांसारखा छावाच लढू शकतो.
पुढे संभाजीराजेंच्या राज्याभिषेकानंतर हंबीररावांनी मोघलांचे संपन्न असे बुर्‍हाणपूर शहर लुटिले.मोघल इतिहासकार खाफीखान म्हणतो,'देशोदेशीचे जिन्नस, जडजवाहीर,सोने-नाणे,रत्ने असा लक्षावधी रूपयांचा माल बुर्‍हाणपूरातील दुकानांत साठविला होता.तो सर्व मराठ्यांनी लुटला.मराठे अगदी अनपेक्षीतपणे आले. शहराच्या तटबंदीच्या बाहेर बहादूरपुरा आणि इतर सात पुरे होते.त्यांना मराठ्यांनी घेरले.विशेषत: बहादूरपुर्‍यावर ते इतक्या अनपेक्षीतपणे तुटून पडले की त्या पुर्‍यांतून एक माणूस किंवा एक पैसा हलविता आला नाही.'

अनेक लढाया :

पुढे मोघल सरदार शहाबुद्दीनखान याच्याबरोबरच्या नाशिकजवळच्या रामसेजच्या लढाईत हंबीरराव जखमी झाले(जुलै १६८२).त्यांनतर मोघल सरदार कुलीच खानाबरोबर भीमा नदीच्या परिसरात लढाई(ऑक्टोंबर,१६८२),शहाजादा आज्जम बरोबर पन्हाळ्याजवळ लढाई(१५ डिसेंबर,१६८२ व जाने-फेब्रु १६८३),मोघल सरदार बहादुरखान बरोबर कल्याण-भिवंडीच्या जवळ लढाई(२७ फेब्रुवारी, १६८३),शहाबुद्दीनबरोबर रायगडच्या परिसरात लढाई(जानेवारी,१६८५),मोघली मुलखात चढाया(सन १६८६),अशा अनेक लढाया केल्या.या अशा पराक्रमी सेनानीची शेवटची लढाई वाईच्या परिसरात सर्जाखान या मोघल सरदाराशी झाली(डिसेंबर १६८७).उभयपक्षी निकराची लढाई होऊन सर्जाखानाच्या फौजेची दाणादाण होऊन ती पराभूत झाली.पण लढाईच्या कालात गर्दीमध्ये तोफेचा गोळा लागून हंबीरराव धारातीर्थी पडले.अत्यंत पराक्रमी व शूर असलेले हंबीरराव पडल्यामुळे स्वराज्याची फार मोठी हानी झाली.ऐन धामधुमीच्या कालात हंबीरराव पडल्यामुळे संभाजीराजांचा मोठा आधार नाहीसा झाला.
 
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना मानाचा मुजरा .......!!!