Sunday, 2 December 2012

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले लोहगड ।।

लोहगड किल्ला
  किल्ल्याची ऊंची : ----
किल्ल्याचा प्रकार :
गिरिदुर्ग
डोंगररांग :
सह्याद्री डोंगररांगा
जिल्हा : पुणे
श्रेणी : मध्यम

शिवछत्रपतींनी निर्मिलेल्या स्वराज्याचा एक पोलादी आधारस्तंभ; ऐन मावळात असला तरी पुणे मुंबई हम रस्त्यावर आणि लोहमार्गाचे जवळ. परंतु पर्यटकांचे दृष्टीने कठीणच. फारतर कार्ला, भाजे किंवा अतीच झाले तर बेडसा यांना भेट देणारे प्रवासी मोठ्या अचंब्याने लोहगड - विसापूरच्या बुलंद अशा जोडगोळीकडे निरखून पाहतात आणि तिथेच तांच्य गीरीदुर्गाची कवतिक संपते. पुण्याकडून मुंबईकडे जाताना मळवलीच्या बाजूस डाव्या हाताशी लोहगड विसापूर हे आवळेजावळे दुर्ग वसलेले आहे. पैकी लोहगडाचा माथा आहे सुमारे ४ कि.मी. चालीवर. फार फार प्राचीन काळापासून सिंधुसागराच्या तटावर वसलेली अन वाढलेली कल्याण सोपारा आदी बंदरे, पण त्यांचा व्यापार टिकवून धरला होता, तो देशावरील संपन्न बाजारपेठांनी. त्यांना साधणारे दुवे होते नाणेघाट व बोरघाट. जीवधन व भैरवगड हे नाणेघाटाची राखण करीत होते. अन राजमाची आणि लोहगड हे बुलंद पहारेकरी हीच कामगिरी इमानेइतबारे पार पाडीत होते बोरघाटात.

इतिहास :
इ.स. १६६४ साली मोगल बादशहाची शान असणारी सुरात लुटून मिळवलेली संपत्ती नेताजीच्या नेतृत्वाखाली लोहागाद्वार पाठविली आन राजे स्वत: राजगडावर अगदी घाईघाईने निघून गेले. त्याला कारणही तसच होत: शहाजी महाराजांचा मृत्यू झाला होता आणि शिवरायांच्या परम प्रिय व पूज्य अशा मासाहेब यांचा कुंकुमतिलक पुसला गेला होता. आता त्या सती जाऊ इच्छित होत्या आणि ते थांबवणे अगत्याचे होते. ऐतिहासिक साधनांच्या अभावी ह्या प्राचीन दुर्गाचा सलग इतिहास ज्ञात नाही. परंतु हे बलदंड स्थान सातवाहन कालात अस्तित्वात होते या बद्दल शंका नाही. पुढे बहामनी राजांचा अंमल या प्रदेशावर होता. बहमनी राज्याचे तुकडे झाल्यावर इ.स. १४९१ मध्ये निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमद याने याचा ताबा घेतला.निजामशाहीचा डोलारा कोसळल्यावर लोहागाडाचा ताबा इ.स.१६३७ मध्ये आदिलशाहीकडे गेला. इ.स. १६४८ च्या आसपास शिवाजी महाराजांनी कळ्यांची लूट केली आणि त्या धामधुमीतच तुंग उर्फ कठीणगड, तिकोना उर्फ वितंडगड, राजमाची आणि लोहगड या दुर्गम दुर्गांचाही ताबा घेतला. पुढे सुरतेची लुट सुरक्षित ठेवायला ह्याच बुलंद आणि बलदंड लोहगडाची निवड केली. पुढे केवळ राजकीय तडजोड म्हणून मिर्झाराजे जयसिंगाशी केलेल्या तहात जे २३ किल्ले शिवाजी महाराजांनी मोगलांच्या हवाली केले त्यात हा एक किल्ला होता. परंतु अवघ्या पाच वर्षात म्हणजे इ.स. १६७० मध्ये महाराजांनी पुन्हा जिंकून घेतला. शिवरायांच्या मृत्यू नंतरच्या आलमगिरी वावटळीत हा परत मोगलांकडे गेला.इ.स. १७१३ च्या सुमारास सरखेल कान्होजी आंग्रे यांनी पुन्हा तो स्वराज्यात आणला.
थोरले माधवराव निजामावर स्वारी करण्यास गेले असताना निजामाने पुण्यावर हल्ला चढविला. त्यावेळी पुण्याहून प्रचंड संपत्ती लोहगडावर ठेवली होती. परंतु घर फिरले कि वसे पण फिरतात या न्यायाने येथील संपत्ती (अंदाजे २० लक्ष रुपये) निजामाने लुटून फस्त केली. पुढे जावजी बोंबले याच्या मदतीने नाना फडणविसांनी आपली पकड या किल्ल्यावर बसविली. त्यांनी निजसुरे यांची नियुक्ती येथे केली. नानांच्या मृत्युनंतर त्यांची नववी पत्नी जिऊबाई हि इथेच होती. दुसरा बाजीराव व निजसुरे यांच्या भांडणात जनरल वेलस्लीने हस्तक्षेप केला. त्यातच जिऊबी मेणवली येथे जाऊन राहिली.१८१८ च्या अखेरच्या इंग्रज आणि मराठे युद्धात ४ मार्च रोजी विसापूर जिंकून घेतला आणि एकही गोळी न झाडता लगेचच लोहगड हि कर्नल प्रोथर याच्या ताब्यात आला.

गडावर पहाण्याची ठिकाणे : 
मौजे लोहगडवाडी हे केंबळी घरांचे छोटेखानी गाव गडाच्या ऐन पायथ्याशी आहे. या गावातून गडावर प्रवेश करावा लागतो, पाठोपाठच्या चार दरवाज्यातून आणि तोही सर्पाकार मार्गावर उभारून अधिक मजबूत केलेल्या. पहिल्या दरवाजाचे नाव आहे गणेश दरवाजा.याच्याच डाव्या आणि उजव्या बुरुजाखाली सावळे नावाच्या जोडप्याचा नरबळी दिला आहे. या गणेश दरवाज्यातील गणपती जरी तुम्हाला विघ्नहर्ता वाटत असला तरी या जोडप्याला तो विघ्नकर्ताच वाटला असेल. अर्थात तय्च्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटीलकी दिली. त्यानंतर आहेत नारायण आणि हनुमान दरवाजे. पैकी हनुमान दरवाजा हा मुळचा सर्वात प्राचीन. बाकीचे नाना फडणविसांनी बांधलेले. या दोन दरवाज्यामध्ये भुयारे आहेत. एकात भात आणि दुसऱ्यात नाचणी साठवून ठेवीत. भाताचे कोठार आहे ५ मीटर लांब ४ मीटर रुंद आणि ३ मीटर उंच. तर नाचणीचे आहे १० मीटर लांब १० मीटर रुंद आणि ४ मीटर उंच. शेवटचा दरवाजा महादरवाजा या नावाने ओळखला जातो. महादरवाज्यातून आत येताच एक माशिदवजा ईमारत आहे आणि त्यातील थडगे हे औरंगजेबाच्या मुलीचे आहे असे सांगण्यात येते. मात्र तिचे नाव, गाव,जन्म, माता इ. बद्दलची माहिती मिळत नाही. याच इमारतीशेजारी सदर व लोहारखाण्याचे भग्नावशेष आढळतात.
या मशिदी शेजारीच एक टेकडीवजा उंचवट्याचा भाग आहे. तेथे मोठी सादर आहे व एक खाली आणि एक वर अशा कोठ्या आहे.एकीला खजिनदाराची कोठी म्हणून ओळखतात. ती आहे एकवीस मीटर लांब, अन पंधरा मीटर रुंद, दुसरी ओळंबलेल्या खडकाखाली असून तिला लक्ष्मी कोठी म्हणतात. लोमेश ऋषींचा निवास येथेच होता.या टेकडीवर एक मोठी तळे आहे त्यात लाल रंगाचे खेकडे मिळतात. पूर्वी या तळ्याच्या काठावर एक शिलालेख होता. त्यात लिहिल्याप्रमाणे हे तळे इ.स.१७८९ मध्ये नाना फडणविसांनी बंडले आहे असा उल्लेख होता. आज मितीस हा शिलालेख दृष्टीस पडत नाही.इंग्रजांच्या ताब्यात हा किल्ला आला तेंव्हा नानांचा खजिना त्यांनी या तळ्यात ठेवला असावा अशी शंका येऊन काद्याखाळून त्यातील पाण्याला मोकळी वाट करून दिली व हे तळे रिते झाले. आजही त्यात फारसे पाणी साचून राहत नाही. तो खजिना त्यांना मिळाला कि नाही कोण जाने पण हा तलाव मात्र रिकामाच राहिला. जवळच त्र्यंबकेश्वर महादेवाचे मंदिर आहे. याच्या पश्चिमेस आहे विंचू काटा. पंधराशे मीटर लांब अन तीस मीटर रुंद अशी हि डोंगराची सोंड निसर्गाच्या लहरीने निर्माण झालेली एक दगडी भिंतच आहे. अर्थात मुळ डोंगरापेक्षा किंचित खालच्या पातळीवर, तेंव्हा तिथे जायचे म्हणजे एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते. गडावरून पहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो म्हणून विंचू काटा. गडाच्या या भागावर देखील चवदार पाण्याची उत्तम सोय केलेली आढळतेच. गडाच्या घेऱ्यावर लक्ष ठेवण्यास आणि आणीबाणीच्या प्रसंगी हि नांगीच उपयोगी पडावयाची .
लोहागाद्च्या डोंगर परिसरात आहेत बाजे व बेडसे लेणी. हीनयान बौद्ध यांची भाजे येथील लेणी मोठी देखणी आहेत. थेट इसवी सन पूर्व दुसर्या शतकातील सातवाहन राजांच्या काळातील. या बौद्ध लेन्यांशेजारीच एका जलप्रपाताजवळ एक सूर्य गुंफा आहे. ऐरावतावर आरूढ झालेला इंद्र आणि सातवाहनांना विशेष पूज्य असणारा भगवान सुर्यनारायण आपल्या संज्ञा व छाया या दोन पत्नीबरोबर चार घोड्यांच्या दोनचाकी रथात आरूढ झालेला. या मूर्ती सुर्यागुंफेचे वैशिष्ट्य.

गडावर पोहोचण्याच्या वाटा : पुण्याहून लोणावळा लोकलने मळवलीस उतरावे व भाजे गावातून जाणाऱ्या रस्त्याने भाजे लेणी जवळ करावीत. लोहगडवाडी या गावातून गडावर प्रवेश करावा लागतो. तेथून लोहागडाचे सुरम्य दर्शन घडते. गायमुख खिंडीची दिशा पकडून चालत राहावे किंवा विसापूरच्या पायथ्यापायथ्याने टेकड्यामागून टेकड्या ओलांडीत गायमुख खिंडीकडे यावे. 

 जेवणाची सोय व  पाण्याची सोय :  आपण स्वत: करावी.

 राहाण्याची सोय : गडावर राहण्याची सोयनाही .

 ||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

  नोट : वरील सर्व माहिती || महाराष्ट्रातील किल्ले !! या facebook वरील ग्रौप मधील  एका पोस्टचा  (-by Dilip Ringane) संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

No comments:

Post a Comment