Thursday, 21 February 2013

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले भास्करगड ।।


भास्करगड (बसगड) किल्ला
किल्ल्याची उंची : समुद्रसपाटीपासून ३५०० मीटर
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
श्रेणी : मध्यम
जिल्हा :
नाशिक

नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडे आणि इगतपूरीच्या उत्तरेस एक डोंगररांग पसरलेली आहे, त्यास "त्र्यंबक रांग" असेही म्हणतात. ही रांग दोन भागात विभागली गेली आहे. पहिल्या टप्प्यात बसगड, हरिहर हे गड वसलेले आहेत, तर दुसर्या टप्प्यात ब्रम्हगिरी, अजनेरी हे किल्ले येतात.प्राचिनकाळी नालासोपारा, डहाणू, वसई इ बंदरात उतरणारा माल वेगवेगळ्या घाटमार्गांनी नाशिक या शहराकडे जात असे. यापैकी गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी ‘भास्करगड’ किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती.

इतिहास :
त्र्यंबक डोंगररांगेच्या दक्षिण टोकावर असलेल्या या किल्ल्याचा इतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही. पण काताळात खोदलेल्या किल्ल्यावर जाण्याचा सर्पिलाकार मार्ग व पाण्याची सातवहान कालीन टाकी किल्ल्याच प्राचिनत्व सिध्द करतात.
इ.स १२७१ ते १३०८ पर्यंत हा किल्ला देवगिरीच्या अधिपत्याखाली होता. नंतर बहामनी पुढे निजामशाही यांच्याकडे किल्ला होता. निजामशाहीच्या अंतकाळात इ.स १६२९ मध्ये शहाजी राजांनी बंड केले, तेव्हा भास्करगड त्यांच्या ताब्यात गेला. १६३३ मध्ये शहाजी राजांकडून हा किल्ला मोगलांकडे गेला १६७० मध्ये शिवरायांचा पेशवा मोरोपंत पिंगळे याने हा किल्ला जिंकून घेतला.१६८८ मध्ये मोगलांनी भास्करगड जिंकून घेतला. इ.स १७३० मध्ये कोळ्यांनी बंड करुन तो घेतला पूढे १८१८ पर्यंत हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता.

गडावरीलपहाण्याची ठिकाणे :
भास्करगडचा माथा बेसॉल्ट खडकाचा बनलेला आहे. किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे काताळात खोदून काढलेला सर्पिलाकार जिना. असमान उंचीच्या पायर्या असलेल्या या जिन्याच्या दोन्ही बाजूला १० फूट उंचीच्या कातळभिंती आहेत. जिन्याचा मार्ग आपल्याला पश्चिमाभिमुख प्रवेशद्वारासमोर घेऊन जातो. प्रवेशद्वार कमानीच्या महिरपीपर्यंत मातीत गाडल गेलेल आहे. प्रवेशद्वारातून रांगत जाऊन किल्ल्यात प्रवेश करावा लागतो. प्रवेशद्वाराच्या आतील रचनेवरुन तेथे पहारेकर्यांसाठी देवड्या असाव्यात. पण आज हा सर्व भाग मातीखाली गाडला गेलेला आहे.

प्रवेशद्वारातून किल्ल्यात शिरल्यावर समोर व उजव्या बाजूला अशा दोन वाटा फूटतात. या दोनही वाटा किल्ल्याच्या पठारावर जातात. पण उजव्याबाजूच्या पायवाटेने १० मिनीटे चढल्यावर आपण किल्ल्याच्या विस्तिर्ण पठारावर पोहचतो. किल्ल्याच्या पठारावर पडक्या वास्तूंचे, मंदीराचे अवशेष, बुजलेली टाक, साचपाण्याचा तलाव त्याच्या कठी असलेला व दगडात कोरलेला हनुमान असे अवशेष पाहायला मिळतात.

गडावर जाण्याच्या वाटा:
खोडाळ्यातून त्र्यंबकेश्वरला जाताना "निरगुडपाडा" या गावाच्या अलिकडे एक कच्चा रस्ता फणीच्या डोंगराला उजव्या बाजूला ठेवत बसगडच्या पायथ्याशी पोहचतो. बसगडच्या पायथ्याशी पोहचण्यापूर्वी एक नाला ओलांडावा लागतो. नाला ओलांडल्यावर भास्करगडच्या चढाइला सुरुवात होते. दिड तास मळलेल्या पायवाटेवरुन केलेल्या चढाइ नंतर आपण कातळकड्याच्या पायथ्याशी येतो. येथून उजव्याबाजूने जाणारी पायवाट कातळकड्याला वळसा घालून कातळात खोदलेल्या पायर्यांपाशी येते. पायर्या चढून गेल्यावर प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश करतो.

"निरगुडपाडा" हे गाव खोडाळा - त्र्यंबकेश्वर मार्गावर आहे. त्र्यंबकेश्वर पासून २० किमी वर निरगुडपाडा गाव आहे. येथे जाण्यासाठी मुंबईहून २ मार्ग आहेत.

१) मुंबई - कल्याण - कसारा - खोडाळा - निरगुडपाडा ( १९४ किमी),

२) मुंबई - कल्याण - भिवंडी - वाडा - खोडाळा - निरगुडपाडा (१९० किमी)

३) कसारा किंवा नाशिक मार्गे :- कसारा किंवा नाशिक मार्गे इगतपूरी गाठावे. इगतपूरीहून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी बस पकडावी. वाटेत असणारे निरगुडपाडा हे भास्करगडाच्या पायथ्याचे गाव आहे. गावातून किल्ल्यावर जाण्यास दोन तास पुरतात. भास्करगडाच्या कातळभिंती जवळ पोहोचल्यावर पुढे किल्ल्यावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायर्या आहेत.
तसेच इगतपूरी व नाशिकहून त्र्यंबकेश्वरमार्गे निरगुडपाड्याला जाता येते. हरीहर गड व भास्करगड या दोनही गडांच्या पायथ्याचे गाव निरगुडपाडा आहे.

रहाण्याची सोय : गडावर रहाण्याची सोय नाही, निरगुडपाड्यात होऊ शकते.

जेवणाची सोय व पाण्याची सोय :  गडावर किंवा गावात जेवणाची व पाण्याची सोय नाही. आपण स्वतःच करावी.


नोट :- वरील सर्व माहिती "गडवाट" व " ||विरराजे युवा प्रतिष्ठान|| " या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट ( posted by - गणेश रामचंद्र कारंडे ) चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल.वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

No comments:

Post a Comment