Thursday, 25 April 2013

शिवरायांचे शिलेदार - दर्यावीर आणि आरमार प्रमुख .

शिवरायांना कोकणात अनेक नररत्ने मिळाली.लायजी पाटील कोळी हे त्यापैकीच एक होत. अनेक कोळी बांधव शिवरायांच्या सैन्यात होते.  आगरी, भंडारी, गावित, कोळी आदि कोकणातील मंडळी गलबते बांधण्यात पटाईत होती.संगमिरी हा गलबतातील नवीन युध्दप्रकार याच मावळ्यांनी आणला.

 दर्यावीर

१. दर्यावीर लायजी पाटील ::
  • जंजिरा किल्ला हा कोकणातील सिध्दीचा गड,अनेक प्रयत्न करूनसुध्दा हा किल्ला मराठ्यांच्या हातात लागत नव्हता.छत्रपतींनी मोरोपंत पिंगळे वर या मोहिमेची जबाबदारी सोपविली.मोरोपंत घाटातील हशम (मावळे) घेऊन मुरूडला दाखल झाले.जंजिरावर हल्ला कसा करावयाचा याचा आराखडा आखत असताना लायजी पाटीलने जंजिरा किल्ल्याच्या तटाला समुद्रातून शिड्या लावण्याचा विचार सांगितला व स्वत:ही जबाबदारी अंगावर घेतली.मध्यरात्री छोट्या होड्यातून मावळ्यांना गडाच्या तटापर्यंत पोहोचवावे आणि मग शिड्यांच्या साह्याने गडावर चढून आतील हबश्यांचा बंदोबस्त करावा असे ठरले. किल्ल्यावरील हबशांना थोडी जरी चाहूल लागली तरी सर्व मराठी मावळे मारले जाणार होते.लायजीने मोरोपंतास सांगितले आम्ही शिड्या लावतो,तुम्ही पाठोपाठ येणे.मध्यरात्री अंधारात वल्ह्यांचा आवाज न करता लायजीच्या होड्या जंजिराच्या तटाकडे निघाल्या. तटाजवळ पोहचल्यानंतर लायजीने व साथीदारांनी शिड्या तटावर लावल्या व ते मोरोपंताची वाट पाहू लागले. बराच वेळ निघून गेला प्रभात होण्याची वेळ आली तरी मोरोपंताच्या होड्या दिसेनात.शेवटी सिध्दीला आपला डाव कळेल म्हणून लायजीने हताश होऊन शिड्या काढण्याचा निर्णय घेतला व तो माघारी परतला. लायजी कोळ्याचा पराक्रम वाया गेला व जंजिरा जिंकण्याची एक सुवर्णसंधी मराठ्यांनी गमावली. पुढे संभाजीराजेंनी राजापुरीच्या खाडीत भराव टाकून किल्ल्यावर हल्ला केला.पण त्याच सुमारास औरंगजेबने दक्षिणेस आघाडी उघडल्याने हाती आलेला विजय संभाजीराजेंनी सोडून द्यावा लागला व किल्ला शेवटपर्यंत अजिंक्य राहिला. 
  • जंजिरा किल्ला हा दर्यावीर लायजी पाटील कोळीच्या पराक्रमाचा साक्षीदार आहे.

  २ . दर्यावीर मायनाक भंडारी ::
  • दर्यावीर मायनाक भंडारी हे मराठी आरमाराचे सुभेदार होते. इ.स.१६७९ च्या ऑगस्ट महिन्यात छत्रपतींनी मायनाक भंडारीला मुंबईच्या जवळ असलेल्या खांदेरी-उंदेरी बेटांवर धाडून किल्ला बांधण्याचे ठरविले.कारण या किल्ल्यामुळे इंग्रजांना कोकणात हालचाल करणे दुरापास्त होणार होते.त्याकाळी राजेंनी इंग्रजाचा धोका ओळखला होता.मायनाक भंडारी किल्ला बांधत असताना इंग्रजानी त्यास अटकाव करण्याचा प्रयत्न केला.कॅप्टन विल्यम मिन्चीन,रिचर्ड केग्वीन,जॉन ब्रान्डबरी आदी नामांकीत सागरी सेनानींना पाठवून खांदेरी-उंदेरीला हल्ला केला.मायनाक भंडारीनी व मावळ्यांनी दिवसा युध्द व रात्री गडाची बांधणी असे दिवसरात्र काम करून मोठ्या पराक्रमाने,चिवटपणे लढून इंग्रजांचा पराभव केला व गडाची उभारणी केली.
  • सिद्दी आणि मुंबईकर इंग्रज यांच्या बरोबर मध्ये उभारल्या गेलेल्या या जलदुर्गामुळे सिद्दी आणि इंग्रज या दोघांचीही कोंडी झाली.सिद्दीला मुंबईकर इंग्रजांच्या आश्रयाला जाण्यापासून रोखले गेले,तर मुंबईकर इंग्रजांवर मराठ्यांची टांगती तलवार राहिली.दर्यावीर मायनाक भंडारी यांचे नाव इतिहासात कायमचे अजरामर झाले.
  • उंदेरी किल्ला हा दर्यावीर मायनाक भंडारीच्या पराक्रमाचा साक्षीदार आहे. 
 
||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥


नोट : वरील सर्व माहिती काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल . 

No comments:

Post a Comment