Friday, 10 May 2013

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले गाळणा ।।

किल्ले गाळणा
किल्ल्याची उंची : २०००  मी.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग.
 श्रेणी :
मध्यम .
जिल्हा :
नाशिक .

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
किल्ल्याचा परिसर हा किल्ल्याच्या पहिल्या दरवाज्या पासूनच सुरु होतो. या दरवाज्याच्या आजुबाजुला पडक्या तटबंदीचे अवशेष दिसतात. या दरवाज्याच्या बाजुला पहारेकर्‍याच्या देवड्या सुध्दा आहेत. येथून आत शिरल्यावर आपण गडाच्या दुसर्‍या दरवाज्यात पोहचतो. दरवाजा पाहूनच आपल्याला त्याच्या मजबूतीची पूर्ण कल्पना येते. दरवाज्याच्या वरच्या भागातील महिरीपी पाहून त्या काळातील कलाकुसरीची कल्पना करता येते. दरवाज्याच्या वरच्या भागात एक पर्शियन शिलालेख कोरलेला आहे. दरवाज्यातून आत गेल्यावर पहारेकर्‍यांच्या देवड्या लागतात. या दरवाज्याला लोखंडी दरवाजा असेही म्हणतात. दरवाज्याच्या आतल्या बाजूने कमानीवर जाता येते.
या दरवाज्यातून थोडे पूढे गेल्यावर दोन वाटा फुटतात, एक वाट उजवीकडे तिसर्‍या दरवाज्याकडे वळते, तर समोरची वाट दिंडी दरवाज्याकडे जाते. दिंडी दरवाज्यातून एक वाट खाली गावात उतरते, पण ही वाट बरीच गैरसोयीची आहे. तिसर्‍या दरवाज्यातून आत शिरल्यावर पुढची वाट काटकोनात वळते. या ठिकाणी एका बाजूला कातळभिंत तर दुसर्‍या बाजुला किल्ल्याची तटबंदी यामधील चिंचोळ्या भागातून आपण पुढे जातो. थोड्याच अंतरावर किल्ल्याचा चौथा दरवाजा लागतो. दरवाज्यातून आत शिरल्यावर तीन वाटा लागतात. समोर जाणारी वाट ही किल्ल्याच्या माथ्यावर जाते. आपण आधी डावीकडची वाट पकडायची. तटबंदीवरुन चालत असतांना गाळण्याची तटबंदी किती मजबूत आहे, याची कल्पना येते. बुरुजांवर तोफा ठेवण्यासाठी असणार्‍या खांबाची व्यवस्था केलेली दिसते. या भागाच्या सर्वात शेवटी एक गुप्त दरवाज्या आहे. पण तिथपर्यंत जाण्याची वाट ढासळलेली आहे. तटबंदी आणि किल्ल्याची कातळभिंत यामध्ये बरीच पाण्याची टाकी सुध्दा आहेत. हे सर्व पाहून चौथ्या दरवाज्यापाशी परतायचे.
आता उजवीकडची वाट धरायची, तटबंदीवर असणारी एक कमान ढासळलेली असल्याने तिथपर्यंत जाता येत नाही. थोडे पुढे गेल्यावर आपण सज्जापाशी येऊन पोहचतो. हाच तो सज्जा जो खालून आपले लक्ष वेधून घेत असतो. इथून किल्ल्याचे चारही दरवाजे व्यवस्थित दिसतात. इथून पुढे गेल्यावर डावीकडच्या कातळात काही गुहा कोरलेल्या दिसतात. यापैकी एका गुहेत महादेवाची पिंड आहे. तिचे दर्शन घेऊन पुढे निघायचे, डावीकडची तटबंदी अचानक खाली काटकोनात वळते. इथेच कोपर्‍यात एक गुप्त दरवाजा आहे. यातून खाली उतरण्याची वाट आपल्याला राजगडाच्या तिहेरी तटबंदीमधून काढलेल्या दरवाज्यातून खाली उतरणार्‍या पायर्‍यांची आठवण करुन देते. खाली उतरल्यावर समोरच एक पाण्याचे टाके दिसते. इथून थोडे अंतर पुढे गेल्यास एक वाट कातळातून खाली उतरत जाऊन किल्ल्याच्या दुसर्‍या दरवाज्याला येऊन मिळते. पण ही वाट बरीच कठीण आहे. हे सर्व पाहून दरवाज्यातून वर यायचे किल्ल्याची तटबंदी बरीच लांब पर्यंत पसरलेली दिसते. वेळ असल्यास या तटबंदीवरुन चालत जाऊन संपूर्ण किल्ल्याला वळसा सुध्दा मारता येतो. अन्यथा माघारी फिरुन चौथ्या दरवाज्यापाशी यायचे आणि माथ्याकडची वाट धरायची. वर पोहचल्यावर समोर एक दर्गा दिसतो. या दर्ग्याची इमारत दुमजली आहे. दर्ग्याच्या आतील खांबावर अरबी मधील कुराणाच्या आयत्या कोरलेल्या आहेत. मागचा जिना चढून दर्ग्याच्या गच्चीवर चढून जायचे. गच्चीवरुन कंक्राळ किल्ला, धुळ्याचा लळींग, भामेर याचे सुंदर दर्शन होते. दर्ग्याच्या मागच्या बाजूस एक बांधीव तळे आहे. हेच काय ते किल्ल्यावरील एकमेव पिण्याच्या पाण्याचे तळे. दर्ग्याच्या समोरुन एक वाट किल्ल्याच्या पूर्व टोकाला जाते. येथे काही वाड्यांचे अवशेष आहेत. दर्ग्या जवळून एक वाट किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्याकडे जाते. या वाटेने सर्वोच्च माथा गाठायचा. या माथ्यावर काही कबरी आहेत. एक दोन वाड्यांचे अवशेष सुध्दा आहेत. येथून किल्ल्याचा पूर्ण घेरा नजरेस पडतो. 
संपूर्ण गड फिरण्यास ७ ते ८ तास लागतात. गडफेरी करायची असल्यास ४ तास जास्तीचे हवेत.

गडावर जाण्याच्या वाटा :
गाळणा किल्ल्यावर जाण्यासाठी मालेगाव आणि धुळे या दोंन्ही बाजूंनी रस्ते आहेत. आपल्याला मालेगाव - डोंगराळे मार्गे गाळणा गावात पोहचता येते. मालेगावाहून डोंगराळे पर्यंत येण्यास एसटी बसेस आहेत. मालेगाव - डोंगराळे अंतर साधारणत: ३० किमी आहे. धुळ्याहूनही डोंगराळ्याला बसेस आहेत. हे अंतर साधारणपणे ३५ कि.मी आहे. डोंगराळेहून ४ किमी अंतरावर असलेल्या गाळणा गावात पोहचता येते. गाळणा हेच किल्ल्याच्या पायथ्याच्या गाव. गाळणा गावात गोरक्षनाथाचा एक मठ आहे. या मठाच्याच बाजूने किल्ल्यावर जाण्याची वाट आहे. या वाटेने आपण अवघ्या १० मिनीटांतच किल्ल्याच्या पहिल्या दरवाज्यात पोहोचतो.

गडावर राहायची सोय :
किल्ल्यावर एक दर्गा आहे. यात २० ते २५ लोकांची राहण्याची सोय होऊ शकते. जेवणाची सोय गाळणा गावात होऊ शकते. किल्ल्यावर राहायचे असल्यास स्वत:चा शिधा असणे उत्तम. दर्ग्याच्या मागील बाजूस पिण्याच्या पाण्याचे तळे आहे.

गडावर पाण्याची सोय : गडावर पिण्यास पाणी नाही ते सोबत न्यावे लागते.

गडावर जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वत:च करावी.


 नोट : वरील सर्व माहिती facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट (- by Amit Ashok Gupta ) चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

Wednesday, 8 May 2013

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले कुंजरगड।।

किल्ले  कुंजरगड
 
किल्ल्याची उंची : ४५००  मी.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग.
डोंगररांगः हरिश्चंद्राची रांग.
 श्रेणी : सोपी.
जिल्हा : अहमदनगर.

अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुका हा दुर्ग संपन्न तालुका आहे. कुंजरगड हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यातील एक गाव आहे. तेथे एक अपरिचित दुर्गरत्न म्हणजे कुंजरगड हे होय. कुंजरगडावर शिवाजी राजांनी मुक्काम केल्याची इ.स.१६७० मधील नोंद आहे.
माळशेज घाटापासून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. ही भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची असलेली ही डोंगररांग बालाघाट म्हणून ओळखली जाते. हरिश्चंद्रगडापासून सुरू होणारी ही रांग पूर्वेकडे बीड जिल्ह्यापर्यंत जाते. हीच रांग माळशेज घाट परिसरात पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांची सीमा विभागते. या रांगेमध्ये हरिश्चंद्रगडाच्या पूर्वेला कुंजरगड किल्ला दिमाखात उभा आहे.
कुंजरगड हा कोंबडा किल्ला या नावानेही ओळखला जातो. कुंजरगडाला जाण्यासाठी दोन तीन मार्ग आहेत. कुंजरगडाच्या जवळ फोफसंडी नावाचे लहानसे गाव आहे. हे गाव डोंगररांगेच्या माथ्यावर असलेल्या पठारी भागात वसलेले आहे.कुंजरगड समोर ठेवल्यास डावीकडे खिंड आहे. या खिंडीमधून विहीर गावाकडे जाणारी पायवाट आहे. कुंजरगडाच्या उजवीकडून गडावर जाणारा पायऱ्यांचा मार्ग आहे.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
 गडाची तटबंदी, वाड्याचे अवशेष, पाण्याची टाकी, घरांची जोती असे गडपणाचे अवशेष पहायला मिळतात. गडाच्या माथ्यावरून मुळा नदीचे खोरे विस्तृत दिसते. हरिश्चंद्रगड, कलाड, आजोबा, घनचक्कर, भैरवगड तसेच कळसूबाई रांगही दिसते.पायऱ्या उतरल्यावर तसेच थोडे पुढे गेल्यावर कातळात कोरलेली गुहा लागते. गुहेच्या आतल्या कोपऱ्यात एक सापट तयार झाली आहे. विजेऱ्यांच्या उजेडात सावधगिरीने या सापटीत शिरावे लागते. सुरवातीला काही अंतर रांगत जाऊन नंतर झोपून डावीकडे वळावे लागते. जमिनीलगत असलेल्या लहान भोकातून डोके आत घालून सर्व शरीर आत ओढून घ्यावे लागते. येथून आत शिरल्यावर पुढे हे भोक मोठे होत जाते. भोकाच्या टोकाला चार पाच जण उभे राहू शकतात. हे भोक कुंजरगडाच्या कड्यावर उघडत असल्याने येथून खालची दरी आणि निसर्ग उत्तम दिसतो.

गडावर जाण्याच्या वाटा :
गडावर जाण्यासाठी दोन प्रमुख वाटा आहे.
• फोफसंडी हे एक दुर्गम गाव आहे. तिथे पुणे-आळेफाटा-ओतूर मार्गे जाता येते. किंवा अकोले- कोतुळ मार्गे जाता येते. या गावापासून उत्तर दिशेला किल्ला आहे. पाऊलवाटेचा उपयोग करून किल्ल्यावर जाता येते.
• अकोले तालुक्यातील कोतुळमार्गे विहीर गावात पोहचून येथील पाऊलवाटेने जाता येते.

गडावर राहायची सोय : गडावर राहण्याची सोय नाही, परंतु तंबू किंवा तत्सम साहित्य नेल्यास मुक्काम करता येतो.

गडावर पाण्याची सोय : गडावर पाण्याची टाकी असून हिवाळ्याच्या शेवटपर्यंत पाणी उपलब्ध असते.

गडावर जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वत:च करावी.


 नोट : वरील सर्व माहिती "" वाघनखे "' या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले डुबेरा/देविगड ।।


किल्ल्याची उंची : -----  मी.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग.
डोंगररांगः कळसूबाई.
 श्रेणी : सोपी.
जिल्हा : नाशिक.

नाशकातल्या सिन्नर तालुक्यात ठाणगाव सिन्नर रस्त्यावर सिन्नरच्या थोडेसे अलीकडे, ४ किलोमीटर अंतरावर डूबेरा नावाचे छोटेसे गाव आहे. गावाच्या मागच्या बाजूस देवीच्या देवळाचा कळस घेऊन उभा असलेला डूबेरगड दिसतो. गावाला एक प्रवेशद्वार आणि थोडीफार तटबंदी आहे. डूबेर गडाला देविगड असेही संबोधले जाते.

इतिहास :
डूबेरा हे गाव पहिल्या बाजीरावाचे आजोळ आहे. येथील बर्वे घराण्यातील मुलगी बाळाजी विश्वनाथांची पत्नी झाली व इ.स १७०० मध्ये बाजीरावाचा जन्म इथेच बर्वेंच्या वाड्यात झाला. तिथे आजही त्यांचे वंशज राहतात. पूर्वभिमुख असलेल्या बर्वेंच्या वाड्याला दोन भव्य प्रवेशद्वारे आहेत व गावाला दोन भव्य वेशीही बांधलेल्या आहेत. शिवशाहीत मल्हार अंताजी बर्वे यांना हे गाव सोपवले गेले. त्यानंतर हे घराणे इथेच स्थायिक झाले. तटबुरुजाचा वाडा पाहयचा असल्यास जरूर यावे.

गडावर पाहण्यासारखे  ठिकाणे :

डूबेरगडावर जाण्यासाठी अंजनेरी किल्ल्याप्रमाणे सिमेंटच्या पाचशे पायऱ्या बनवलेल्या आहेत. किल्ल्यावर एक तलाव आहे, तलावाच्या बाजूलाच सप्तशृंगी देवीचे एक मंदिर आहे, या मंदिरातील मूर्ती वाणीच्या मूर्तीसारखी असून गडावर बंद पडलेल्या टॉवरची इमारत आणि पाण्याची दोन टाकी आहेत.
गडाच्या माथ्यावरून वायव्य दिशेला वणीचा सप्तश्रुंगगड, मार्कंडेय पर्वत, रावळ्या – जावळ्या हे जोड किल्ले इ. शिखरे दिसतात.
  
गडावर जाण्याचे वाटा : 
सिन्नरच्या पश्चिमेला घोटी गावच्या रस्त्यावर डूबेरा हे गाव आहे. सिन्नर वरून दर तासाला एक एस.टी या गावात जाते. या गावातून गडावर जाण्यासाठी साधारण अर्धा तास लागतो.

राहाण्याची सोय : गडावर राहाण्याची सोय नाही.

पाण्याची सोय : गडावर पिण्यास पाणी नाही ते सोबत न्यावे लागते.

जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वत:च करावी.

  
नोट : वरील सर्व माहिती facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट (- by धनंजयराव देविदासराव विसपुते) चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

Monday, 6 May 2013

शिवरायांचे शिलेदार - बाजी प्रभूदेशपांडे


घोडखिंडीतील (पावनखिंडी) लढाई ही मराठी इतिहासातील एक महत्वाची लढाई मानली जाते, विशेषतः बाजी प्रभूदेशपांडे यांच्या बलिदानामुळे . लढाईनंतर बाजीप्रभू व इतर मराठे सैनिकांचे बलिदानामुळे ही जागा पावन झाली म्हणून घोडखिंडीचे नाव पावनखिंड असे पडले असे म्हटले जाते.

ही लढाई जुलै १३, १६६० रोजी विशाळगडनजीक  घोडखिंड येथे झाली. पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटून शिवाजी महाराज विशाळगडाकडॆ कूच करत होते पर्ंतु आदिलशाही सेनेला त्याचा सुगावा लागला व शिवाजीच्या मागे आदिलशाही सेनेचा पाठलाग चालू ज़ाला. जेव्हा शिवाजी व त्यांचे साथिदार घोडखिंडीत पोहोचले त्यावेळेस बाजी प्रभूदेशपांडे या सरदाराने शिवाजींना विनंतीवजा आदेश् दिला की शिवाजी महाराजांनी पुढे गडावर जावे व जोवर शिवाजी महाराज गडावर पोचत नाहीत तोवर बाजी ही खिंड लढवतील व शत्रुला तिथेच रोखून धरतील. 
 सिद्दी जौहरने शिवाजीं महाराज पन्हाळ्यावर असताना त्याला वेढा दिला व महाराजांची स्थिती बिकट केली. प्रचंड मोठ्या सेनेपुढे पन्हाळा किल्ला टिकवून धरणे अवघड होते. अतिशय बळकट वेढा उठवून लावण्याचे सर्व प्रयत्न फोल झाले व सरते शेवटी जौहरचा सामना करायचा असे ठरवले. परंतु जौहरच्या मोठ्या फ़ौजेचा सरळ सामना करण्याऎवजी त्यांनी जौहरला भूल देउन निसटून् जाण्याचा बेत बनवला व नव्या दमाने दुसर्‍या किल्ल्यावरुन (विशाळगडावरुन्) जौहरचा सामना करायचे ठरले.
जौहरची एकूण फौज १५,००० ची होती तर शिवाजींचे फ़क्त ३०० ते ६०० मावळे होते. लढाईच्या दिवशी रात्री शिवाजींनी पोर्णिमेच्या रात्री गडावरुन उतरून वेढा तोडला व विशाळगडाकडे कूच केली. एका आख्यायिकेप्रमाणे शिवाजींनी आपल्यासारख्याच दिसणार्‍या शिवा काशिद नावाच्या नाव्ह्याला शिवाजी म्हणून जौहरकडे बोलणींसाठी पाठवले होते. व या भेटी दरम्यानच्या काळातच शिवाजींनी पन्हाळ्यावरून पलायन केले. जेव्हा जौहरला शिवाजी महाराज विशाळगडाकडे पळाले आहेत असे सुगावा लागला तेव्हा सिद्दी मसूदला शिवाजींच्या मागावर पाठवले व त्यांचा पाठलाग चालू झाला. काही वेळाने शिवाजी व साथिदार घोडखिंडीत पोहोचले तेव्हा पाठलाग करणारे मसूदचे सैनिक जवळच आहेत याची जाणीव ज़ाली व काही वेळातच ते गाठतील व शिवाजींना व इतरांना पकडतील असा अंदाज होता. घोडखिंडीत अतिशय चिंचोळी वाट होती व एकावेळेस एक-दोन जणच रांगेतून जातील एवढी वाट होती. बाजीप्रभूने शिवाजींना स्थिती समजावून विशाळगडावर प्रस्थान करायचा विनंतीवजा आदेश दिला व जो पर्यंत शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचून तोफानी इशारा करत नाहीत तोवर ही खिंड लढवली जाईल असा विश्वास महाराजांना दिला. शिवाजी महाराजांनी पुढे विशाळगडावर प्रयाण केले.
खिंडीत मसूदचे सैनिक पोहोचल्यावर त्यांना मावळ्यांच्या आडव्या रांगेचा सामना करावा लागला. मावळ्यांच्या मागील रांगांनी तसेच आजूबाजूच्या कड्यांवर चढून दगड गोट्यांची बरसात चालू केली. अतिशय चिंचोळ्या वाटेमुळे केवळ एक दोनच सैनिक मराठ्यांच्या रांगेपर्यंत पोहोचत व मारले जात अश्या प्रकारे मराठ्यांनी मसूदच्या सैनिकांची कत्तल आरंभली. बाजीप्रभू, फ़ुलाजी, संभाजी जाधव, बांदल ह्यांनी आपपल्या कमानीतून मसूदच्या सैनिकांना परास्त केले. बाजीप्रभूच्या आवेशाने अनेकांची गाळण उडवली. मसूदने बंदूकधार्‍यांना कड्यावर चढून बाजीप्रभूवर गोळीबार करण्याचा आदेश दिला. तसे आदेश त्यांनी पार पाडले. बाजीप्रभू जखमी झाला तरी त्याने सैनिकांना कोणत्याही परिस्थितीत आपली जागा सोडू नका असा आदेश दिला. काही वेळातच शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचले व त्यांनी तोफांचा गजर दिला. इकडे घोडखिंडीत बाजीप्रभूने तोफांचा गजर ऎकल्यानंतरच त्याने कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने आपला जीव सोडला.मराठ्यांचे जवळपास सर्वच ३०० जण कामी आले पण मसूदचे प्रचंड नुकसान झाले जवळपास ३००० सैनिक मारले गेले.
इकडे शिवाजींनी पण विशाळगडाचा वेढा तोडला व गडावर प्रवेश केला. विशाळगडाचा किल्लेदार रंगो नारायण सरपोतदार याने मोठ्या शौर्याने किल्ला लढवला व जौहरला इथेही परास्त केले.

लढाईनंतर बाजीप्रभू व इतर मराठे सैनिकांचे बलिदानामुळे ही जागा पावन झाली म्हणून घोडखिंडीचे नाव पावनखिंड असे पडले असे म्हटले जाते. शिवाजींनी या लढाईत बलिदान देणार्‍यांचे यथोचित सत्कार केले. स्वता: बाजीप्रभूंच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांच्या मुलांना पालखीचा मान देण्यात आला. संभाजी जाधव यांचा मुलगा संताजी जाधव यांना मराठी सेनेत समावण्यात आले. 

||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥

॥जयोस्तू मराठा॥


नोट : वरील सर्व माहिती काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

!! छत्रपती शिवाजी महाराज आणि रायरेश्र्वर गड !!

वयाच्या केवळ १६ व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले. मूठभर मावळ्यांमध्ये धर्मप्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले आणि स्वराज्याची संकल्पना दिली. हिंदवी स्वराज्यासाठी मूठभर मावळ्यांनी जिवाची पर्वा न करता स्वतःला झोकून दिले. पाच मुसलमानी पातशाहींच्या विरोधात लढत एक एक प्रदेश जिंकला. केवळ ५० वर्षांच्या कालावधीत विजापूर आणि दिल्ली या राजसत्तांना पाणी पाजले. महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची घोषणा करून स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला आणि हिंदु धर्माला राजसिंहासन प्राप्त करून दिले. महाराजांना आपले भाग्यविधाते म्हणून स्वराज्याची जनता त्यांना पाहू लागली. काही जण, तर त्यांना हिंदूपती म्हणू लागले. शिवरायांनी वेदांचे, पुराणांचे, देवळांचे... रक्षण केले आणि जीभेवर रामनाम राखून धरले.


रायरेश्वर शिवमंदिर सुरेख शिवलिंग

सह्याद्रीच्या शिखरावर विराजमान असलेल्या भोर येथील श्री स्वयंभू रायरेश्वराच्या शिवालयात छ. शिवाजी महाराजांनी २६ एप्रिल १६४५ या दिवशी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची सवंगड्यांसह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. बारा मावळातील कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर ही मंडळी भोरच्या वातावरणात वावरणारी होती. सिंहाची छाती असणार्‍या या मावळ्यांना साथीला घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वयंभू रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्याची आण घेतली.

हिंदवी स्वराज्याचा साक्षीदार रायरेश्वरसह्याद्रीच्या कडेकपारी, शिवमंदिर एक ।
तिथे रायरेश्वर स्वयंभू शिवलिंग सुरेख ।।
आणाभाका झाल्या आमुच्या, त्याच्या साक्षीने ।
एकजुटीने राहून कोणा अंतर न देणे ।।
देशासाठी, धर्मासाठी झोकून देऊ उडी ।
मावळे आम्ही शिवबाचे सवंगडी ।।

सृष्टीच्या नानाविध रूपांचे प्रत्यंतर देणारा निसर्गरम्य रायरेश्वरगड पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आहे. तो समुद्रसपाटीपासून ४६९४ फूट उंचावर वसला आहे. येथून वैराटागड, केंजळगड, पांडवगड, कमळगड, पाचगणी, महाबळेश्वर, कोळेश्वर, रायगड, लिंगाणा, तिकोणा, राजगड, तोरणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, प्रतापगड, चंद्रगड इ. गड दिसतात. रायरेश्वर पठाराची लांबी ११.०४ कि.मी. असून, रुंदी १.०२ कि.मी. आहे. गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतलेले शिवमंदिर आणि जननी देवीचे मंदिर आहे. छ. शिवाजी महाराजांनी शिवा जंगम नावाचा पुजारी तेथे पूजेसाठी नेमला होता. सध्या येथे जंगम लोकांची ४० कुटुंबे रहातात.

||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

Saturday, 4 May 2013

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले अलंग ।।


किल्ल्याची उंची : ४५००  मी.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग.
डोंगररांगः कळसूबाई.
 श्रेणी : अत्यंत कठीण.
जिल्हा : नाशिक.

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी विभागातील सर्वात कठीण असे तीन किल्ले आहेत. हे किल्ले सर करण्यासाठी प्रस्तरारोण तंत्राची व साहित्याची माहिती असणे आवश्यक आहे. घोटीवरून भंडारदर्याला जातांना कळसूबाई शिख्रराच्या रांगेत अलंग, मदन आणि कुलंग असे तीन किल्ले लक्ष वेधून घेतात. घनदाट जंगल आणि विरळ वस्ती यामुळे हा परिसरातील भटकंती तशी कस पहाणारी आहे. गडावर जाण्याच्या अवघड वाटा ,भरपूर पाऊस यामुळे हे दुर्गत्रिकुट तसे उपेक्षितच आहे.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे. किल्ल्यावर राहण्यासाठी दोन गुहा आहेत. किल्ल्यावर इमारतीचे काही अवशेष आहेत. एक छोटेसे मंदिर आहे. किल्ल्यावरून आजुबाजूचा खूप मोठा परिसर दिसतो. पूर्वेला कळसूबाई, औंढाचा किल्ला,पट्टा ,बितनगड,उत्तरेला हरिहर ,त्र्यंबकगड,अंजनेरी तर दक्षिणेला हरिश्चंद्रगड, आजोबाचा गड, खुट्टा सुळका , रतनगड,कात्राबाई चा डोंगर हा परिसरदिसतो.पाण्याची ११ टाकी आहेत.
किल्ल्याचा माथा फिरण्यास ४ तास पुरतात.

गडावर जाण्याच्या वाटा :
१) आंबेवाडी मार्गे :-
अलंग किल्ल्यावर जाण्यासाठी इगतपुरी किंवा कसारा गाठावे इगतपुरी/कसारा-घोटी-पिंपळनेरमोर या मार्गे आंबेवाडी गाठावी. घोटी ते आंबेवाडी अशी एस.टी. सेवा देखील उपलब्ध आहे. घोटी ते आंबेवाडी हे साधारण ३२ किमी चे अंतर आहे. घोटीवरुन पहाटे आंबेवाडी ला ६.०० वाजताची बस आहे. आंबेवाडीतून समोरच अलंग, मदन
आणि कुलंग हे तीन किल्ले दिसतात. गावातूनच अलंग आणि मदन किल्ल्याच्या खिंडी पर्यंत जाण्यासाठी वाट आहे. वाट फारच दमछाक करणारी आहे. खिंड गाठण्यास ३ तास लागतात. खिंडीत पोहचल्यावर डावीकडचा अलंग किल्ला, तर उजवीकडचा मदन किल्ला. येथून अलंगवर जाण्यासाठी दोन वाटा आहेत.
 अ) एक वाट खिंडीतून समोरच्या दिशेने खाली उतरते. १ तासात आपण खालच्या पठारावर पोहोचतो. येथून अलंगचा कडा डावीकडे ठेवत १ तासात आपण किल्ल्यावरून येणार्या तिसर्या घळीपाशी पोहोचतो. या घळतीच एक लाकडी बेचका ठेवला आहे. या बेचक्यातून वर गेल्यावर थोडे सोपे प्रस्तरारोहण करावे लागते. पुढे थोडीशी सपाटी लागते.येथून डावीकडे कड्यालगत जाणारी वाट पकडावी. १० ते १५ मिनिटात आपण किल्ल्यावरील गुहेत पोहोचतो. आंबेवाडीतून येथपर्यंत पोहचण्यास ८ ते ९ तास उलटून गेलेले असतात.
ब) खिंडीतून डावीकडच्या वाटेने थोडे पुढे गेल्यावर सोपे प्रस्तरारोहण केल्यावर काही पायर्या लागतात. या पायर्या चढून गेल्यावर एक ८० ते ९० फूटाचा सरळसोट तुटलेला कडा लागतो. या कड्यावर प्रस्तरारोहणाचे साहित्य वापरून किल्ल्यावर प्रवेश करता येतो. प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असल्याशिवाय या वाटेने जाण्याचे धाडस करू नये. या वाटेने किल्ला गाठण्यास ६ तास लागतात.
२) घाटघर मार्गे :-
किल्ल्यावर जाण्यासाठीची दुसरी वाट घाटघरवरून आहे. घोटी - भंडारदरा मार्गे घाटघर गाठावे. घाटघरहून अडीचतसात किल्ल्याच्या तिसर्या घळीत ठेवलेल्या लाकडी बेचक्यापाशी पोहोचतो.
३) उदडवणे गावातून :-
किल्ल्यावर जाण्यासाठी आणखी एक वाट आहे. ती भंडारदरा मार्गे उदडवणे गावातून पठारावर येते. पुढे क्रं २ च्या वाटेला येऊन मिळते.

राहाण्याची सोय : किल्ल्यावर राहण्यासाठी २ गुहा आहेत. यात ३० ते ४० जणांची राहण्याची सोय होते.

जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वत:च करावी.

पाण्याची सोय : बारामही पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत.

जाण्यासाठी लागणारा वेळ : आंबेवाडीतून ७ ते ८ तास लागतात.


सूचना :
१) अलंगगडावर पावसाळ्यात जाणे टाळावे.
२) अलंग, मदन, कुलंगगड हा ट्रेक २-३ दिवसात करता येतो.
३) फक्त कुलंगगडावर पायी चालत जाता येते, तर अलंग, मदन गडावर जाण्यासाठी प्रस्तरारोणाचे तंत्र अवगत असणे व साहित्य असणे आवश्यक आहे.
४) कुलंग, मदन गडांची माहिती साईटवर दिलेली आहे.



 नोट : वरील सर्व माहिती "" वाघनखे "' या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .