Wednesday, 8 May 2013

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले कुंजरगड।।

किल्ले  कुंजरगड
 
किल्ल्याची उंची : ४५००  मी.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग.
डोंगररांगः हरिश्चंद्राची रांग.
 श्रेणी : सोपी.
जिल्हा : अहमदनगर.

अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुका हा दुर्ग संपन्न तालुका आहे. कुंजरगड हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यातील एक गाव आहे. तेथे एक अपरिचित दुर्गरत्न म्हणजे कुंजरगड हे होय. कुंजरगडावर शिवाजी राजांनी मुक्काम केल्याची इ.स.१६७० मधील नोंद आहे.
माळशेज घाटापासून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. ही भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची असलेली ही डोंगररांग बालाघाट म्हणून ओळखली जाते. हरिश्चंद्रगडापासून सुरू होणारी ही रांग पूर्वेकडे बीड जिल्ह्यापर्यंत जाते. हीच रांग माळशेज घाट परिसरात पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांची सीमा विभागते. या रांगेमध्ये हरिश्चंद्रगडाच्या पूर्वेला कुंजरगड किल्ला दिमाखात उभा आहे.
कुंजरगड हा कोंबडा किल्ला या नावानेही ओळखला जातो. कुंजरगडाला जाण्यासाठी दोन तीन मार्ग आहेत. कुंजरगडाच्या जवळ फोफसंडी नावाचे लहानसे गाव आहे. हे गाव डोंगररांगेच्या माथ्यावर असलेल्या पठारी भागात वसलेले आहे.कुंजरगड समोर ठेवल्यास डावीकडे खिंड आहे. या खिंडीमधून विहीर गावाकडे जाणारी पायवाट आहे. कुंजरगडाच्या उजवीकडून गडावर जाणारा पायऱ्यांचा मार्ग आहे.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
 गडाची तटबंदी, वाड्याचे अवशेष, पाण्याची टाकी, घरांची जोती असे गडपणाचे अवशेष पहायला मिळतात. गडाच्या माथ्यावरून मुळा नदीचे खोरे विस्तृत दिसते. हरिश्चंद्रगड, कलाड, आजोबा, घनचक्कर, भैरवगड तसेच कळसूबाई रांगही दिसते.पायऱ्या उतरल्यावर तसेच थोडे पुढे गेल्यावर कातळात कोरलेली गुहा लागते. गुहेच्या आतल्या कोपऱ्यात एक सापट तयार झाली आहे. विजेऱ्यांच्या उजेडात सावधगिरीने या सापटीत शिरावे लागते. सुरवातीला काही अंतर रांगत जाऊन नंतर झोपून डावीकडे वळावे लागते. जमिनीलगत असलेल्या लहान भोकातून डोके आत घालून सर्व शरीर आत ओढून घ्यावे लागते. येथून आत शिरल्यावर पुढे हे भोक मोठे होत जाते. भोकाच्या टोकाला चार पाच जण उभे राहू शकतात. हे भोक कुंजरगडाच्या कड्यावर उघडत असल्याने येथून खालची दरी आणि निसर्ग उत्तम दिसतो.

गडावर जाण्याच्या वाटा :
गडावर जाण्यासाठी दोन प्रमुख वाटा आहे.
• फोफसंडी हे एक दुर्गम गाव आहे. तिथे पुणे-आळेफाटा-ओतूर मार्गे जाता येते. किंवा अकोले- कोतुळ मार्गे जाता येते. या गावापासून उत्तर दिशेला किल्ला आहे. पाऊलवाटेचा उपयोग करून किल्ल्यावर जाता येते.
• अकोले तालुक्यातील कोतुळमार्गे विहीर गावात पोहचून येथील पाऊलवाटेने जाता येते.

गडावर राहायची सोय : गडावर राहण्याची सोय नाही, परंतु तंबू किंवा तत्सम साहित्य नेल्यास मुक्काम करता येतो.

गडावर पाण्याची सोय : गडावर पाण्याची टाकी असून हिवाळ्याच्या शेवटपर्यंत पाणी उपलब्ध असते.

गडावर जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वत:च करावी.


 नोट : वरील सर्व माहिती "" वाघनखे "' या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

No comments:

Post a Comment