Wednesday, 9 October 2013

|| 350 वर्षांपासून जपलेली ललितापंचमीची परंपरा ||


|| किल्ले प्रतापगड ||

पश्चिम घाटातल्या जावळीच्या खोऱ्यातला किल्ले प्रतापगड हा शिवप्रतापाचं एक महत्वाचं स्थान. अफझलखानाचा कोथळा शिवाजी महाराजांनी इथेच बाहेर काढला आणि प्रतापगड इतिहासात अजरामर झाला.  तो शिवप्रताप हा गड आजही अभिमानाने मिरवतो. या प्रतापगडाने काही शिवकालीन परंपराही आज साडेतीनशे वर्षांनंतरही जोपासल्या आहेत, वृद्धिंगत केल्या आहेत.

 त्यातील एक परंपरा म्हणजेच, नवरात्राच्या परंपरेमध्येच मिसळलेला एक अनोखा उत्सव शिवकालापासून महाराष्ट्रात आहे तो म्हणजे प्रतापगडावरचा ललितापंचमीचा उत्सव. रात्री या उत्सवात जावळी खोऱ्यातील महाराजांचा हा गड शेकडो मशालींनी दर वर्षी आजपण उजळून निघतो.   नवरात्रातल्या या गडावरच्या उत्सवाच्या परंपरेला शिवकालापासून, म्हणजे मंदिराच्या स्थापनेपासूनचा इतिहास आहे.

म्हणूनच आजचा दिवस त्याच्यासाठी महत्वाचा आहे आणि म्हणूनच आजपण राज्यभरातून  शेकडो शिवभक्त  ही रात्र जागवायला गडावर येतात., कारण नवरात्रातल्या या पंचमीला ज्या भवानीदेवीची स्थापना शिवरायांनी इथं केली तिची पालखी निघते. त्या उत्सवाइतकीच भव्य असते या पंचमीच्या आधीची रात्र. ही संपूर्ण रात्र जागरण गोंधळाने जागून काढली जाते आणि शेकडो मशालींनी हा गड उजळून निघतो. जावळीचं खोरं जसं अंधारात बुडून जातं, तसं या रात्री प्रतापगडावरच्या भवानीच्या मंदिरातून संबळीचा आवाज यायला सुरु होतो.
 देवीची पूजा होते. देवीचा गोंधळ सुरु होतो.आणि मग प्रत्येक जण या संबळीच्या तालावर ठेका धरतो. प्रत्येक जण देवीचा भुत्या बनतो.  गोंधळ संपतो आणि मग जे या रात्रीचं आकर्षण असतं त्याला सुरुवात होते.


प्रतापगडाच्या शरीराचं वैशिष्ट्य असणाऱ्या आकाशात घुसलेल्या टेहळणी बुरुजाच्या चिलखती तटबंदीने एकेक मशाल पेटत जाते. हळूहळू रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात या बुरूजाचा आकार पेटून उठतो. त्याच्या प्रकाशात गड उजळून निघतो.  पाहता पाहता हजारो मशाली पेट घेतात. जावळीच्या खोऱ्याच्या कोणत्याही दिशेने पाहिलत तर जमिनीच्या पोटातून लाव्हा उसळावा तसा अंधारात उजळलेला प्रतापगड दिसायला लागतो.  काही हौशी तरूण विस्तवाला खेळवत धाडसी खेळ करतात.   असा हा गड रात्रभर उजळत राहतो.



या रात्रभराच्या जागरणानंतर,  देवीची पालखी गडावरून निघते. नाचत नाचत खोऱ्यात फ़िरते.राजघराण्यातले सारे कुटुंबीय उपस्थित असतात आणि शेकडो वर्षं चाललेल्या या शिवकालीन परंपरेला मोठ्या उत्साहात अजून एक वर्षं जोडलं जातं. 

सूर्यस्य तेजोमय शिवगंध सजला या भाळी,

डोंगर-कपार्यातून हर हर महादेव गर्जे हि आरोळी,

मराठा मुलुखाची एकच डरकाळी

!!! जय भवानी || जय जिजाऊ || जय शिवराय || जय शंभूराजे  !!!
 
 - शिवभक्त

No comments:

Post a Comment