सह्याद्री पर्वत रांग |
अनुभवावा गुहेतला मुक्कामघाटघरहून जीवधन किल्ल्याला बगल देणारा चार किलोमीटरचा अगदी नाणेघाटाच्या मुखाशी गाडी जाण्यायोग्य रस्ता आहे. मुखाशीच डाव्या बाजूला गणेशाची प्रतिमा असलेली गुहा आणि काही उपगुहा आहेत. उजव्या हाताला जकातीचा दगडी रांजण आहे. शंभर-दीडशे मीटरची खडकाळ उतरण उतरली की आपण नाणेघाटाच्या मुख्य गुहेशी येऊन पोचतो. तिच्या समोर आणि माथ्यावर आणखी चारपाच गुहा आहेत. तिच्यासमोरुन पुढे खोदलेली पाण्याची चार-पाच टाकी दिसून येतात. त्यातील सर्वात शेवटच्या टाक्यातले पाणी पिण्यायोग्या आहे. हे सर्व पाहून पुन्हा खिंडीच्या घाटावरील मुखाशी यावे आणि डावीकडे गणेशमूर्तीच्या बाजूने जाणार्या वाटेने थोडी चढण चढून वर जावे. हाच तो प्रसिद्ध ‘नानाचा अंगठा’. म्हणजे नाणेघाटाच्या सर्व गुहा ज्या डोंगरात खोदल्या आहेत तो डोंगर. माथ्यावरुन आसपासच्या परिसराचे विहंगन दृश्य दिसते. मागच्या बाजूला जीवधन किल्ला आणि...त्याचा चिरपरिचित, सगळ्या क्लाइंबर्सचे आव्हान असणारा वानरलिंगी ऊर्फ खडा पारशी. मग त्यापुढे क्रमाक्रमाने दार्या घाट, ढाकोबा, दुर्ग, अहुपे घाट अशी सह्याद्रीची सर्वांगसुंदर रांग आहे. राहण्याची सोय गुहेत होतेच. हवे असेल तर जेवणाची सोय तीन किलोमीटरवरील घाटघर गावात होऊ शकते. जुन्नरवरुन घाटघरला जाण्यासाठी दिवसातून दोन एसटी बस आहेत. खाजगी जीपने देखील घाटघरला पोचता येते. दोन दिवसांचा बेत करुन नाणेघाटाबरोबरच जीवधनचा ट्रेकही आखता येईल. आसपासच्या परिसरात जीवधन, चावंड, हडसर, ढाकोबा, दार्या घाट ट्रेकर्सची खास ठिकाणे आणि अंबोली (ता. जुन्नर) सारखे निसर्गरम्य ठिकाण आहेत. नानाच्या अंगठ्यावरुन पाहता पावसाळ्यात ढगांचा कापूस सह्यकड्यांशी मस्ती करत असतो तर इतर ऋतूमध्ये समोरचा सगळा कोकणचा परिसर आपण कवेत घेतल्याचा भास होतो. नानाच्या अंगठ्यावरुन पाहिलेला सूर्यास्त हा तर कुणीही उभ्या जन्मात विसरणे शक्य नाही. हाच सूर्यास्त पाहून पुन्हा मुख्य गुहेत मुक्कामाला यावे आणि मस्त शेकोटी पेटवून मित्रमंडळींसमवेत आयुष्याची शिदोरी सोडून सर्व ट्रेक्सच्या अनुभवाची उजळणी करावे, गप्पांचा फड जमवून तारे मोजत रात्र जागवावी, किंवा कोकणकड्यावर कोसळणार्या तुफानी पावसाची आणि साथीने कोसळणार्या जलप्रपातांची गाज कानात साठवून घ्यावी. निद्रादेवी कधी पाश टाकेल ते समजणारच नाही. दुसर्या दिवशी जाग येईल तेव्हा एक नवीन बेफाम अनुभव गाठीशी आला असेल. आपापला कचरा गोळा करावा आणि पुढल्या वीकेंडला कुठे याचा विचार सुरु करावा.
सह्याद्री पर्वत रांगा |
उपयुक्त माहिती:
जाण्याचे मार्ग:
१. पुणे-नारायणगाव-जुन्नर-आपटाळे-चावंडवाडी-घाटघर-नाणेघाट
२. मुंबई-कल्याण-वैशाखरे-नाणेघाट (ट्रेकचा मार्ग)
३. मुंबई-कल्याण-वैशाखरे-माळशेज घाट-जुन्नर-आपटाळे-चावंडवाडी-घाटघर-नाणेघाट
४. नाशिक-संगमनेर-आळेफाटा-नारायणगाव-जुन्नर-आपटाळे-चावंडवाडी-घाटघर-नाणेघाट.
आसपासचा परिसर:
१. शिवनेरी (जुन्नर)
२. जीवधन
३. दार्या घाट
४. दुर्ग-ढाकोबा जुळे किल्ले.
५. चावंड किल्ला.
६. हडसर किल्ला
टिप्स: मुक्कामाची सोय नाणेघाटाच्या मुख्य गुहेत स्वतः करावी. जेवणाची सोय घाटघर गावात होऊ शकते.घाटघर गावातून विजवाहक तारांच्या दिशेने जाणार्या रस्त्याने पुढे जावे, तो रस्ता बरोबर नाणेघाटात जातो.मोठा ट्रेक हवा असेल तर नाणेघाटात मुक्काम करुन पुढे जीवधन किल्ला करावा.
No comments:
Post a Comment