हेर म्हणजे महाराजांचा तिसरा डोळा |
महाराजांचं हेर खातं अत्यंत सावध आणि कुशल होतं. त्यात एकूण किती माणसं काम करीत होती हे तपशीलवार मिळत नाही. बहिर्जी नाईक जाधव , वल्लभदास गुजराथी , सुंदरजी परभुजी गुजराथी , विश्वासराव दिघे एवढीच नावे सापडतात. पण गुप्तरितीनं वावरणाऱ्या या गुप्तहेर खात्यात बरीच माणसे असली पाहिजेत असे वाटते. परदरबारात राजकीय बोलणी करण्यासाठी जाणारे स्वराज्याचे सारे वकील एकप्रकारे गुप्तहेरच होते. मुल्ला हैदर , सखोजी लोहोकरे , कर्माजी , रघुनाथ बल्लाळ कोरडे आदी मंडळी महाराजांच्या वतीने परराज्यांत वकील म्हणून जात होती. पण तेवढीच हेरागिरीही करताना ती दिसतात. पण आणखीन एक उदाहरण या शाहिस्तेखान प्रकरणात ओझरते दिसते. लाल महालात असलेल्या छोट्याशा बागेचे काम करणारा माळी महाराजांचा गुप्तहेर असावा. लाल महालांत घडणाऱ्या अनेक घटना अगदी तपशीलाने महाराजांना समजत होत्या , हे आपल्या सहज लक्षात येते. शाहिस्तेखानाच्या ज्या ज्या सरदारांनी कोकण भागात स्वाऱ्या केल्या , त्या प्रत्येक स्वारीत शिवाजीराजांनी अत्यंत त्वरेने आणि तडफेने त्या स्वाऱ्या पार उधळून लावल्या. हे या मराठी हेरागिरीचेही यश आहे. अफाट समुदावर तर हेरागिरी करणं किती अवघड , मराठ्यांनी सागरी हेरागिरीही फत्ते केली आहे.
आता तर महाराज प्रत्यक्ष लाल महालांवरच एका मध्यरात्री छापा घालणार होते. सव्वा लाख फौजेच्या गराड्यात असलेला लालमहाल पूर्ण बंदोबस्तात होता. खानाने या महालांच्या दालनांत काही काही फरक केले होते. म्हणजे बांधकामे केली होती. कुठे भिंती घातल्या होत्या , कुठे दरवाजे बांधकामाने चिणून बुजवून टाकले होते. जनान्याचे भाग , मुदपाकखाना , पुरुषांच्या खोल्या इतर खोल्या , त्यांवरील पहाऱ्यांच्या व्यवस्था इत्यादी अनेक गोष्टी लाल महालाबाहेर कोणाला तपशीलवार समजणे सोपे नव्हते. पण महाराजांनी जो लाल महालावर छापा घालण्याचा बेत केला , तो अगदी माहितगारी असलेल्या कोणा मराठी हेराच्या गुप्त मदतीनेच. जर अधिक माहिती ऐतिहासिक नव्या संशोधनाने उपलब्ध होईल , तर हे मराठी हेरखात्याच्या कर्तबगारीवर छान प्रकाश पडेल. आज मराठ्यांना मिळालेल्या यशांचा तपशील लक्षात घेऊन हेरांचे कर्तृत्त्व मापावे लागते आहे.
हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा. तो अखंड उघडा आणि सावधच असावा लागतो. शिवकाळातील हेरखाते हे निविर्वाद अप्रतिम होते. हेर पक्का स्वराज्यनिष्ठ असावाच लागतो. तो जर परकीयांशी ‘ देवाणघेवाण ‘ करू लागला , तर नाश ठरलेलाच असतो. हेर अत्यंत चाणाक्ष , बुद्धीवान आणि हरहुन्नरी असावा लागतो. पुढच्या एका घटनेचा आत्ता नुसता उल्लेख करतो. कारवारच्या मोहिमेत मराठी हेरांनी उत्तम कामगिरी केली. पण एका हेराकडून कुचराई आणि चुका झाल्या. महाराजांनी त्याला जरब दाखविलीच.
आता महाराज प्रत्यक्ष लाल महालावरच झडप घालून शाहिस्तेखानाला ठार मारण्याचा विचार करीत होते. ही कल्पनाच अफाट होती. सव्वा लाखाची छावणी. त्यात बंदिस्त लाल महाल. त्यात एका बंदिस्त दालनात खान. अन् त्याला गाठून छापा घालायचा. हे कवितेतच शक्य होते. पण असं अचाट धाडस महाराजांनी आखले. हल्लीच्या युद्धतंत्रात ‘ कमांडोज ‘ नावाचा एक प्रकार सर्वांना ऐकून माहिती आहे. महाराजांचे सारेच सैनिक कमांडोज होते. पण त्यात पुन्हा अधिक पटाईत असे जवान महाराजांपाशी होते. त्याचे प्रत्यंतर लाल महालाच्या छाप्यात येते. ‘ ऑपरेशन लाल महाल ‘ असेच या छाप्याला नाव देता येईल. ही संपूर्ण मोहिम मुख्यत: हेरांच्या करामतीवर अवलंबून होती. सारा तपशील एखाद्या स्वतंत्र प्रबंधातच. मांडावा लागेल. पण या ऑपरेशन लाल महालचा अभ्यास महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांनिशी इतका बारकाईने केला आहे की , आपले मन या एकविसाव्या शतकाच्या वेशीत थक्क होऊन जाते. या गनिमी छाप्यासाठी महाराजांनी वेळ निवडली मध्यरात्रीची. मराठ्यांचे बहुसंख्य छापे रात्रीच्या अंधारातलेच आहेत. लाल महालावरच्या छाप्यासाठी महाराजांनी चैत्र शुद्ध अष्टमीची मध्यरात्र निवडली. पुढच्या उजाडत्या चैत्र शुद्ध नवमीस प्रभू राम जन्मास येणार होते! रामनवमी.
याच महिन्यात मोगलांचे पवित्र रोज्याचे उपवास सुरू झाले होते. छाप्याच्या रात्री सहावा रोजा होता. आकाशातला चंद छाप्याच्या सुमारास पूर्ण मावळणार होता. पण याचा इथं कुठं संबंध आला ? आला ना! मोगली सैन्य रोजाच्या उपवासामुळे रात्र झाल्यावर भरपूर जेवण करून सुस्तावणार हा अंदाज खरा ठरणार होता. खुद्द शाहिस्तेखानाच्या कुटुंबात हीच स्थिती असणार. शिवाय दिवस उन्हाळ्याचे. शेजारीच असलेल्या मुठा नदीला पाणी जेमतेमच असणार. छापा घालून झटकन ही नदी ओलांडून भांबुडर््याच्या (सध्याचे शिवाजीनगर) भागात आपल्याला पसार होता येणार आणि अगदी जवळ असलेल्या सिंहगडावर पोहोचता येणार हे लक्षात घेऊन महाराजांनी हे ऑपरेशन आखले होते.
छाप्यातल्या कमांडोजनी कसेकसे , कुठेकुठे , कायकाय करायचे ते अगदी निश्चित केलेले होते. संपूर्ण तपशीलच इतका रेखीव आहे की , या ऑपरेशन लाल महालची आठदहावेळा महाराजांनी राजगडावर ‘ रिहर्सल ‘ केली असावी की काय असा दाट तर्क-तर्कच नव्हे खात्री होते. कारण जे घडले ते इतके बिनचूक घडले की , असे घडणे कधीही ऐत्यावेळेला होत नसते. आपण तपशील पाहूच.
||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥
मराठ्यांचा नाद खुळा….!!
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥
मराठ्यांचा नाद खुळा….!!
नोट : वरील सर्व माहिती "गडवाट" या facebook वरील ग्रौप मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .
No comments:
Post a Comment