Thursday, 22 November 2012

मराठ्यांचे आराध्ये दैवत || छत्रपती शिवाजी महाराज ||

जन्म स्थान :  किल्ले शिवनेरी  जि. पुणे  
समाधीस्थान : किल्ले रायगड जि. रायगड
 
कर्तबगार शहाजीराजांचे पुत्र शिवरायांचा जन्म जुन्नरमधील शिवनेरी किल्ल्यावर राजमाता जिजाऊ यांच्या पोटी झाला. शहाजी राजांचा निजामशाही वाचविण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर ते आदिलशहाच्या पदरी राहून कर्नाटकात आदिलशाहीचा विस्तार करू लागले. दहाव्या वर्षी शिवरायांचा निंबाळकर घराण्यातील सईबाई यांच्याशी विवाह झाला. आपल्या वडिलोपार्जित जहागीरीची म्हणजे पुणे, सुपे भागाची देखभाल करण्यास शहाजी राजांनी जिजाउंसह शिवरायांना पुणे येथे ठेवले.कारभारी दादोजी कोंडदेव यांच्या मृत्यूनंतर शिवराय स्वतंत्रपणे जहागिरीचा कारभार पाहू लागले.
परकीय आणि अत्याचारी सुलतानशाह्या यांच्या विरुद्ध लढून स्वत: चे राज्य स्थापण्याचा उद्योग शिवरायांनी पुणे भागातील किल्ले ताब्यात घेऊन सुरु केला. रोहिदा, तोरणा,सिंहगड आणि पुरंदर या बळकट किल्ल्यांच्या आधाराने आणि मावळातील देशमुखांबरोबर सर्व सामान्य मावळ्यांच्या मदतीने सैन्य उभे करून शिवरायांनी आपली शक्ती वाढवायला सुरवात केली.

विजापूरच्या आदिलशहाने या उद्योगाने चिडून जाऊन शहाजी राजांना कैद केले आणि शिवराय यांच्याविरुद्ध फौज पाठविली. या सैन्याला पराभूत करून आणि मोगलांकडून दबाव आणून शहाजी राजांची सुटका करण्यास आदिलशहाला भाग पाडले आणि हि सलामीची लढाई शिवाजी महाराजांनी जिंकली.

जावळीच्या मोऱ्यांचा नायनाट करून श्री शिवरायांनी स्वराज्याच्या सीमा समुद्र पर्यंत भिडवल्या. आदिलशहाने प्रचंड फौजेसह पाठविलेल्या अफझल खानास ठार मारून विजापुरी सैन्य शिवरायांनी प्रतापगडाखाली बुडविले. या प्रचंड विजयाने शिवरायांचे नाव भारतभर प्रसिद्ध झाले.अफझल वधानंतर झपाट्याने आदिलशाही मुलखावर आक्रमण करून शिवरायांनी अनेक किल्ले व बराच मुलूख ताब्यात घेतला. आदिलशहाने पुन्हा तयारी करून सिद्दी जौहर याला शिवराय यांच्या विरुद्ध पाठविले. पन्हाळा किल्ल्यावर शिवराय असताना सिद्दी जौहरने पन्हाळ्यास वेध घातला. या वेढ्यातून आपल्या जीवास जीव देणाऱ्या सहकाऱ्यांच्या मदतीने शिवराय अलगद पाने सुटले. विजापुरी फौजांविरुद्ध लढताना शिवा काशीद, बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभू देशपांडे धारातीर्थी पडले.

यानंतर कोकण काबीज करून शिवरायांनी समुद्र किनाऱ्यावर आपले पाय रोवले. औरंगजेबाने शिवराय यांच्या विरुद्ध शायिस्तेखानला महाराष्ट्रात पाठविले. पुण्यात तळ ठोकून बसलेल्या शायिस्तेखानावर दोन लाख फौजेच्या गराड्यात शिरून शिवरायांनी हल्ला केला. शायिस्तेखानास परत बोलावून औरंगजेबाने पाठविलेल्या मिर्झा राजा जयसिंग याने महाराष्ट्रात जाळपोळ, लुटालूट करून प्रचंड सैन्यशक्तीच्या जोरावर शिवरायांना तह करण्यास भाग पाडले.तहाप्रमाणे आपले अनेक किल्ले मोगलांना देऊन आग्रा येथे भेटीस आलेल्या शिवरायांना औरंगजेबाने कैद केले. या कैदेतून आपल्या विलक्षण चतुराईच्या जोरावर शिवराय निसटून सुखरूप महाराष्ट्रात परत आले. तहात दिलेले किल्ले श्री शिवरायांनी तत्काळ परत घेण्यास सुरवात केली.आणि हि कामगिरी पार पाडताना तानाजी मालुसरे कामी आले.

शायीस्तेखानावरील हल्ल्यानंतर लुटलेले औरंगजेबाचे धनसंपन्न शहर सुरत शिवरायांनी पुन्हा लुटले. नाशिक जवळचा साल्हेर किल्ला ताब्यात घेऊन शिवरायांनी स्वराज्याची सीमा उत्तरेत बागलाण पर्यंत वाढविली.

महाराष्ट्रातील शत्रूंना नेस्तनाबूत करून श्री शिवरायांनी ६ जून १६७४ रोजी रायगडावर विधीपूर्वक राज्याभिषेक करून घेऊन मराठ्यांच्या स्वतंत्र राजसत्तेची स्वतंत्र सिंहासनाची स्थापना केली. शिवराय छत्रपती झाले. या समारंभानंतर केवळ बारा दिवसांनी राजमाता जिजाऊ यांचा मृत्यू झाला.

महाराष्ट्रातील राज्य स्थिरस्थावर करून शिवरायांनी आपले लक्ष दक्षिणेकडे वळविले. गोवलकोंडा येथील कुतुबशहा याच्याशी मैत्रीचा तह करून साठ हजारांच्या सैन्यासह शिवरायांनी दक्षिणेत मुसंडी मारली. कोप्पळ, बहादूरबंडा, जिंजी, वेलोर हे महत्वाचे किल्ले जिंकून घेतले.स्थानिक राजवाटी यांच्याकडून खंडण्या घेत, विरोधकांना भुई सपाट करीत शिवराय तंजावर पर्यंत पोहोचले. तंजावरचे छत्रपती एकोजीराजे हे शिवरायांचे सावत्र बंधू होते. त्यांची भेट घेऊन शिवराय महाराष्ट्रात आले.

आग्रा भेटीपूर्वीच शिवरायांनी कोकणात व समुद्रात किल्ले बांधून सागरी सत्ता आपल्या हाती ठेवण्यास सुरवात केली होती. विरोधक सिद्दी आणि इंग्रज यांना न जुमानता मुंबईपासून वेंगुर्ल्यापर्यंत किल्ल्यांची साखळी निर्माण केली.

खांदेरी उंदेरी या सागरी दुर्गांच्या लढाईत इंग्रजांचा पराभव करून शिवराय रायगडावर आले. नेसरीच्या लढाईत धारातीर्थी पडलेल्या सेनापती प्रतापराव गुजर यांच्या कन्येशी राजाराम महाराज यांचा शिवराय यांनी करून दिला. त्यानंतर तीन आठवड्यांनी रायगडावरच त्यांचे निधन झाले. 
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥
 
 नोट : वरील सर्व माहिती  मला अल्याल्या एका email चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

No comments:

Post a Comment