Tuesday, 30 April 2013

शिवरायांचे शिलेदार - मोरोपंत त्र्यंबक पिंगळे.


मोरोपंत त्र्यंबक पिंगळे (जीवनकाळ: इ.स.चे १७ वे शतक) हे छत्रपती शिवाजीराजांच्या काळातील मराठा दौलतीचे पंतप्रधान, अर्थात पेशवा होते. मोरोपंत त्र्यंबक पिंगळे हे शिवाजीराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री होते. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर यांना देखरेख ठेवावी लागत असे. महाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी या नात्याने राज्यकारभार पंतप्रधानालाच सांभाळावा लागत असे यावरुन या पदाचे महत्त्व लक्षात येते. पंतप्रधानाला वार्षिक १५ हजार होन, पगार मिळत असे.

इ.स. १६५९च्या प्रतापगडाच्या लढाईत अफजलखानास मारल्यावर विजापुरी सैन्यावर मराठा फौजांनी हल्ला चढवला, तेव्हा मोरोपंत त्र्यंबक पिंगळ्यांनी सैन्याच्या एका तुकडीचे नेतृत्व केले. फेब्रुवारी, इ.स. १६७१च्या सुमारास त्यांच्या सेनापतित्वाखालील मराठा फौजांनी मुघलांच्या ताब्यातील पश्चिम खानदेश व बागलाण या प्रदेशांत चढाया केल्या.

इ.स. १६७२मधील उत्तर कोकणातील कोळी राज्यांविरुद्धच्या मराठा मोहिमेचे नेतृत्व पिंगळ्यांनी केले[१]. या मोहिमेत ५ जून, इ.स. १६७२ रोजी मराठ्यांनी कोळ्यांचा राजा विक्रमशाहाच्या सैन्याचा पराभव करत जव्हाराचा पाडाव केला. त्यानंतर मराठा सैन्याने उत्तरेस रामनगराकडे कूच केले. मराठा आक्रमणामुळे रामनगराचा कोळी राजा सोमशाह परागंदा झाला. मात्र पावसाळा सुरू झाल्यामुळे व मुघल सेनापती दिलेरखानाच्या सैन्याची जुळवाजुळव सुरू झाल्याने पिंगळ्यांनी रामनगरातून माघार घेतली. सैन्याची पुन्हा जुळवाजुळव करून जुलै, इ.स. १६७२च्या सुमारास पिगळ्यांच्या सेनापतित्वाखाली मराठ्यांनी रामनगराचा मुलूख जिंकून घेतला.

संदर्भ :  जदुनाथ सरकार. शिवाजी अँड हिज टाइम्स, इ.स. १९५२ (इ.स. २०१०चे पुनर्मुद्रण), ओरिएंट ब्लॅक स्वान. आय.एस.बी.एन. ९७८-८१-२५०-४०२६-२. (इंग्लिश मजकूर).

  ||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

Monday, 29 April 2013

शिवरायांचे शिलेदार - बांधकाम प्रमुख हिरोजी इंदलकर.


मराठयानी इतिहास घडविला. शिवाजिनी स्वराज्य उभे केले ते नेमके याच्याच बलावर . विश्वास दिला राज्यानी "आपल राज्य उभा करायचा, मला छत्रपती व्हायच म्हणून नाही"….तमाम मराठयांच राज्य निर्माण करायच, रयतेच राज्य गरीबांच राज्य तयार करायच आहे".. ही काळजी इथल्या माणसा -माणसा मध्ये होती.
निष्ठावंत माणसे महाराजान कडे होती. हिरोजी इंदलकर नावाचा बांधकाम प्रमुख शिवाजी महाराज्यान कडे होता. महाराजांनी रायगड किल्ला बांधायची जबाबदारी राज्यानी त्याच्यावर सोपावली. शिवाजी महाराज स्वारी वर गेले. हिरोजीने किल्ला निम्यावर बांधत आणला आणि पैसा संपला हिरोजिला समजेणा काय करावे ..शिवाजीने तर जबाबदारी टाकली आहे. किल्ला तर पूर्ण केला पाहिजे.. तर पैसा शिल्लक नाही त्या हिरोजिने अपूर्ण काम केले. आपला राहता वाडा , आपली जमिन विकली.बायकोसह रायगडावर आला..पैशासह जोपड़ी घेऊन राहू लागला आणि मराठयांची राजधानी बांधून काढली.
 शिवाजी महाराजांना आल्यावर कळल हिरोजिने काय केले . राज्याभिषे काच्या वेळी त्या शिवाजिना वाटल या हिरोजिंचा सत्कार करावा.
राज्याभिषे काच्या वेळी शिवाजी म्हणाले,"हिरोजी राजधानीचा गड तुम्ही बांधला , बोला तुम्हाला काय हवय.” त्यावेळी हिरोजी नम्रपणे मान जुकवून म्हणाला ,"महाराज , उभ स्वराज्य तुम्ही पदरात टाकल .. आम्हाला  आणखी काय हवय….” 
महाराज म्हणाले, "नाही काही तरी मागितलेच पाहिजे"
त्यावेळी हिरोजी म्हणाला, "महाराज एक विनंती आहे ..रायगडावर आम्ही जगदिशवराचे मंदिर उभारल आहे .त्या जगदिशवराच् या एका पायरीवर आमच नाव कोरायची अनुमति आम्हाला दया". 
महाराजानाकळेना हे कसल मागण.. पगार वाढ नाही मागितली, देशमुखी नाही मागितली, पाटीलकी नाही मागितली , वतन नाही मागितल …मागुन मागितले तर काय दगडावर नाव कोरयची परवानगी महाराजानी विचारल हिरोंजी अस का …????
 आणि हिरोंजी उत्तर देतात, "राजे.. ज्या-ज्या वेळी रायगडावर असाल, त्या- त्या वेळी जगदिशवराच्या दर्शनाला तुम्ही याल… ज्या-ज्या वेळी दर्शनाला जाल ..त्या-त्या वेळी तुमची पाऊल त्या पायारीवर पडत जातील …आणि महाराज त्यातल्याच  जर एका पायरी वर माजे नाव कोरले असेल ..तर त्या- त्या वेळी तुमच्या पाऊलाची पायधूळ म्हणजे माज्या मस्तकावर  सतत अभिषेक करत राहिल..”.

एका पायरीवर बांधकाम प्रमुख हिरोजी इंदलकर यांचे नाव.
  ||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

शिवरायांचे शिलेदार - हिरोजी फर्जंद .


स्वताच्या जीवावर खेळून पर मुलखातुन आपल्या धन्याला सुखरूप राजगडी न्हेणारे असे हे हिरोजी फर्जंद .

लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजेल ह्या काळजीमुळे प्रत्येक रयत रयतेतील प्रत्येक जण महाराजांवर जीव ओवाळून टाकीत होता त्यातीलच एक म्हणजे हिरोजी फर्जंद.

मिर्झा राजे जयसिंग यांबरोबर झालेल्या कराराच्या ओझ्यामुळे महाराजांना पातशहाच्या भेटीसाठी आग्र्यास जाणे भाग पडले औरंगजेबाचा पन्नासाव्या वाढदिवसाला महाराज त्या औरंग्याच्या दरबारात हजर होते येथे मात्र महाराजांचा अपमान करण्यात आला आणी नंतर महाराजांना डांबून ठेवण्यात आले हफ्सी मुराज खान, फौलाद्खन जातीने पहारा देत. नंतर हे पहारे ढील्ले पढले. युक्ती लढवली गेली तसेच झाले. महाराज दि. १७ ऑगस्टला संध्याकाळी पसार झाले. त्यावेळी त्यांच्या शामियान्यात हिरोजी फर्जंद स्वतः हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत पांघरून घेऊन झोपला झोपला.

दुसरा दिवस उजाडला आणि बोभाटा झाला.एकच कल्लोळ उसळला. फौलादखानाला तंबूत चिटपाखरूही दिसले नाही. पलंगावर एक गाठोडे , एक लोड आणि दोन जोडे शालीखाली गाढ झोपलेले आढळले. ते पाहून फुलादखानाची काय अवस्था झाली असेल ? तो विरघळला की गोठला ? त्याला शिवाजीराजांचा आणि औरंगजेबाचाही चेहरा आलटून पालटून दिसू लागला असेल का ? आपण जिवंत असूनही ठार झालेलो आहोत याचा साक्षात्कार झाला असेल का ? केवढी फजिती! एवढ्या प्रचंड पहाऱ्यातून अखेर तो सीवा आपली थट्टा करून पसार झाला तेही साऱ्या मावळ्यांना सुरक्षित घेऊन . आता त्या औरंगजेबापुढे जायचे तरी कसे ? त्याला सांगायचे तरी काय ? काय अवस्था झाली असेल फुलादखानची ?

केवढी ही स्वामीनिष्ठा केवढा हा त्याग स्वताच्या जीवावर खेळून पर मुलखातुन आपल्या धन्याला सुखरूप राजगडी न्हेणारे असे हे हिरोजी फर्जंद
. त्यांना मानाचा मुजरा...!!!

  ||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

Saturday, 27 April 2013

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले रोहीडा ।।

रोहीडा किल्ला
  किल्ल्याची उंची : ३३६० मी.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग.
डोंगररांगः महाबळेश्वर.
 श्रेणी : मध्यम.
जिल्हा : सातारा.

सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. या डोंगररांगेत ३ ते ४ किल्ले आहेत. यापैकी एक रोहीड खोऱ्यात वसलेला किल्ला म्हणजेच ‘किल्ले रोहीड खोरे हे नीरा नदीच्या खोऱ्यात काही भागात वसलेले आहे. या खोऱ्यात ४२ गावे होती. त्यापैकी ४१ गावे सध्याच्या पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात मोडतात. रोहीड किल्ला हे रोहीडा खोऱ्याचे प्रमुख ठिकाण होते. पुणे सातारा जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने, सहकारी दुधयोजना यामुळे येथील परिसरातील बहुतेक सर्व गावापर्यंत बस, वीज आदी सुविधा पोहचल्या आहेत. त्यामुळे येथील जीवन सुखी झालेले आहे. रोहीडा किल्ला भोरच्या दक्षिणेस सुमारे ६ मैलांवर आहे. रोहीडा किल्ल्याला विचित्रगड किंवा बिनीचा किल्ला असे देखील संबोधले जाते.

इतिहास :
 या किल्ल्याची निर्मिती ही यादवकालीन आहे. या किल्ल्यावरील तीसऱ्या दरवाजावर असणाऱ्या शिलालेखावरून मुहम्मद आदिलशहाने ह्या गडाची दुरुस्ती केली असे अनुमान निघते. या शिलालेखावरून मे १६५६ नंतर हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांदल देशमुखांकडून घेतला असे समजते. किल्ला घेण्यासाठी राजांना बांदल देशमुखांशी हातघाईची लढाई करावी लागली. यात कृष्णाजी बांदल मारला गेला. बाजीप्रभू देशपांडे बांदलाचे मुख्य कारभारी होते. लढाईतर बाजीप्रभू देशपांडे व इतर सहकाऱ्यांना स्वराज्यात सामील करून घेतले गेले. इ.स. १६६६ च्या पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोघलांच्या स्वाधीन केला गेला. २४ जून१६७० रोजी शिवरायांनी किल्ला परत घेतला. कान्होजी यांच्याकडे भोरची पूर्ण तर रोहीडा किल्ल्याची निम्मी देशमुखी व जमिनीचे काही तुकडे इनाम होते. रोहीड्याचे गडकरी त्यांचेकडून ३० होन घेत होते. शिवाजी महाराजांच्या अधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांकडे विचारणा केली की ३० च होन का, शिवाजी महाराजांनी निर्णय दिला की, जेथे आपले चाकर असल्यामुळे पूर्वापार चालत आलेले द्रव्यच घ्यावे. पुढे किल्ला मोघलांनी जिंकला, मात्र भोरच्या पंत सचिवांनी औरंगजेबाशी झुंजून किल्ला स्वराज्यात पुन्हा दाखल केला. संस्थाने विलीन होईपर्यंत राजगड, तोरणा, तुंग आणि तिकोना किल्ल्याप्रमाणे हाही किल्ला भोरकरांकडे होता.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
 पहिल्या दरवाज्याच्या चौकटीवर गणेशपट्टी आणि वर मिहराब आहे. पुढे १५ ते २० पायऱ्या पार केल्यावर दुसरा दरवाजा लागतो. येथून आत गेल्यावर समोरच पाण्याचे भुयारी टाके आहे. याचे पाणी बाराही महिने पुरते. येथून ५-७ पायऱ्या चढून गेल्यावर तिसरा दरवाजा लागतो. हा दरवाजा अतिशय भक्कम आहे. यावर बऱ्याच प्रमाणात कोरीव काम आढळते. दोनही बाजूंस हत्तीचे शिर कोरण्यात आले आहे. तसेच डाव्या बाजूला मराठी उजव्या बाजूला फारसी शिलालेख आहे. आजुबाजूच्या तटबंदीची पडझड झाली आहे. ह्या सर्व दरवाजांची रचना एकमेकांना काटकोनात आहे. येथून आत शिरल्यावर समोरच २ वास्तू दिसतात. एक गडावरील सदर असावी तर दुसरे किल्लेदाराचे घर असावे. डाव्या बाजूला थोडे अंतर चालून गेल्यावर रोहिडमल्ल उर्फ भैराबाचे मंदिर लागते. मंदिरासमोर लहानसे टाके, दीपमाळ व चौकोनी थडगी आहेत. देवळात गणपती, भैरव व भैरवी यांच्या मूर्ती आहेत. रोहीड्याचा घेर तसा लहानच आहे. किल्ल्याच्या आग्नेयस शिरवले बुरूज, पश्चिमेस पाटणे बुरूज व दामगुडे बुरूज, उत्तरेस वाघजाईचा बुरूज व पूर्वेस फत्ते बुरूज व सदरेचा बुरूज असे एकूण ६ बुरूज आहेत. गडाची तटबंदी व बुरुजांचे बांधकाम अजूनही मजबूत आहेत. गडाच्या उत्तरेकडील भागात टाक्यांची सलग रांग आहे. येथेच एक भूमिगत पाण्याचे टाके आहे. तेथेच मानवी मूर्ती व शिवपिंडी आहे. संपूर्ण गड फिरण्यास दीड तास पुरतो.

गडावर जाण्याच्या वाटा :
बाजारवाडी मार्गे : दक्षिणेस ८-१० किमी अंतरावर बाजारवाडी नावाचे गाव आहे. बाजारवाडीपर्यंत जाण्यासाठी एसटी सेवा उपलब्ध आहे. बाजारवाडीपासून वळलेली वाट गडाच्या पहिल्या दरवाजापाशी घेऊन जाते. वाट अत्यंत सोपी असून दरवाजापर्यंत पोहचण्यास एक तास लागतो. अंबवडे मार्गे भोर ते अंबवडे अशी एसटी सेवा उपलब्ध आहे. पुणे-भोर-पानवळ-अंबवडे अशी बससेवा देखील उपलब्ध आहे. या गाडीने अंबवडे गावी उतरून गावाच्या पूर्वेकडील दांडावरून गड चढण्यास सुरुवात करावी. ही वाट लांबची आणि निसरडी आहे. या वाटेने गड गाठण्यास सुमारे अडीच तास पुरतात. शक्यतो गडावर जाताना बाजारवाडी मार्गे जावे आणि उतरताना नाझरे किंवा अंबवडे मार्गे उतरावे. म्हणजे रायरेश्वराकडे जाण्यास सोपे जाते.

रोहीडा ते रायरेश्वर वाटा : १. भोर -कारी बसने कारी गावात उतरावे. तिथून लोहदरा मार्गे २ तासांत रायरेश्वर पठाराकडे पोहचतो व पठारावरील वस्ती पर्यंत जाण्यास दीड तास लागतो. २. वडतुंबी मार्गे – दुपारची (२.४५) भोर-टिटेघर गाडी आंबवण्यास येते. तिने वडातुंबी फाट्यावर उतरावे. तिथून १५ मिनिटांत वडातुंबी गाव गाठणे. येथून साधारणतः २ तासात गणेशदरा मार्गे रायरेश्वर पठारावर पोहचता येते. ३. भोर- कोर्लेगाडीने कोर्लेगावात उतरावे. रात्री उशीर झाल्यास गावात मुक्काम करून पहाटे गायदरा मार्गाने ३ तासात रायरेश्वर पठारावरील देवळात जाता येते. ४. भोर-दाबेकेघर बसने दाबेकेघरला उतरायचं व तिथून धानवली पर्यंत चालत जायंच. पुढे वाघदरामार्गे ३ तासात रायरेश्वर गाठायचं.

गडावर राहाण्याची सोय: रोहीडमल्लच्या मंदिरात ५ ते ७ जणांची रहाण्याची सोय होते. पावसाळ्यात मात्र मंदिरात रहाता येत नाही.

जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वतःच करावी. 

पाण्याची सोय : गडावर पिण्याचे पाणी बारमाही उपलब्ध आहे.

गडावर जाण्यासाठी लागणारा वेळ : बाजारवाडी मार्गे – १ तास लागतो. 


नोट : वरील सर्व माहिती "गडवाट" व "महाराष्ट्र माझा" या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

Thursday, 25 April 2013

शिवरायांचे शिलेदार - दर्यावीर आणि आरमार प्रमुख .

शिवरायांना कोकणात अनेक नररत्ने मिळाली.लायजी पाटील कोळी हे त्यापैकीच एक होत. अनेक कोळी बांधव शिवरायांच्या सैन्यात होते.  आगरी, भंडारी, गावित, कोळी आदि कोकणातील मंडळी गलबते बांधण्यात पटाईत होती.संगमिरी हा गलबतातील नवीन युध्दप्रकार याच मावळ्यांनी आणला.

 दर्यावीर

१. दर्यावीर लायजी पाटील ::
  • जंजिरा किल्ला हा कोकणातील सिध्दीचा गड,अनेक प्रयत्न करूनसुध्दा हा किल्ला मराठ्यांच्या हातात लागत नव्हता.छत्रपतींनी मोरोपंत पिंगळे वर या मोहिमेची जबाबदारी सोपविली.मोरोपंत घाटातील हशम (मावळे) घेऊन मुरूडला दाखल झाले.जंजिरावर हल्ला कसा करावयाचा याचा आराखडा आखत असताना लायजी पाटीलने जंजिरा किल्ल्याच्या तटाला समुद्रातून शिड्या लावण्याचा विचार सांगितला व स्वत:ही जबाबदारी अंगावर घेतली.मध्यरात्री छोट्या होड्यातून मावळ्यांना गडाच्या तटापर्यंत पोहोचवावे आणि मग शिड्यांच्या साह्याने गडावर चढून आतील हबश्यांचा बंदोबस्त करावा असे ठरले. किल्ल्यावरील हबशांना थोडी जरी चाहूल लागली तरी सर्व मराठी मावळे मारले जाणार होते.लायजीने मोरोपंतास सांगितले आम्ही शिड्या लावतो,तुम्ही पाठोपाठ येणे.मध्यरात्री अंधारात वल्ह्यांचा आवाज न करता लायजीच्या होड्या जंजिराच्या तटाकडे निघाल्या. तटाजवळ पोहचल्यानंतर लायजीने व साथीदारांनी शिड्या तटावर लावल्या व ते मोरोपंताची वाट पाहू लागले. बराच वेळ निघून गेला प्रभात होण्याची वेळ आली तरी मोरोपंताच्या होड्या दिसेनात.शेवटी सिध्दीला आपला डाव कळेल म्हणून लायजीने हताश होऊन शिड्या काढण्याचा निर्णय घेतला व तो माघारी परतला. लायजी कोळ्याचा पराक्रम वाया गेला व जंजिरा जिंकण्याची एक सुवर्णसंधी मराठ्यांनी गमावली. पुढे संभाजीराजेंनी राजापुरीच्या खाडीत भराव टाकून किल्ल्यावर हल्ला केला.पण त्याच सुमारास औरंगजेबने दक्षिणेस आघाडी उघडल्याने हाती आलेला विजय संभाजीराजेंनी सोडून द्यावा लागला व किल्ला शेवटपर्यंत अजिंक्य राहिला. 
  • जंजिरा किल्ला हा दर्यावीर लायजी पाटील कोळीच्या पराक्रमाचा साक्षीदार आहे.

  २ . दर्यावीर मायनाक भंडारी ::
  • दर्यावीर मायनाक भंडारी हे मराठी आरमाराचे सुभेदार होते. इ.स.१६७९ च्या ऑगस्ट महिन्यात छत्रपतींनी मायनाक भंडारीला मुंबईच्या जवळ असलेल्या खांदेरी-उंदेरी बेटांवर धाडून किल्ला बांधण्याचे ठरविले.कारण या किल्ल्यामुळे इंग्रजांना कोकणात हालचाल करणे दुरापास्त होणार होते.त्याकाळी राजेंनी इंग्रजाचा धोका ओळखला होता.मायनाक भंडारी किल्ला बांधत असताना इंग्रजानी त्यास अटकाव करण्याचा प्रयत्न केला.कॅप्टन विल्यम मिन्चीन,रिचर्ड केग्वीन,जॉन ब्रान्डबरी आदी नामांकीत सागरी सेनानींना पाठवून खांदेरी-उंदेरीला हल्ला केला.मायनाक भंडारीनी व मावळ्यांनी दिवसा युध्द व रात्री गडाची बांधणी असे दिवसरात्र काम करून मोठ्या पराक्रमाने,चिवटपणे लढून इंग्रजांचा पराभव केला व गडाची उभारणी केली.
  • सिद्दी आणि मुंबईकर इंग्रज यांच्या बरोबर मध्ये उभारल्या गेलेल्या या जलदुर्गामुळे सिद्दी आणि इंग्रज या दोघांचीही कोंडी झाली.सिद्दीला मुंबईकर इंग्रजांच्या आश्रयाला जाण्यापासून रोखले गेले,तर मुंबईकर इंग्रजांवर मराठ्यांची टांगती तलवार राहिली.दर्यावीर मायनाक भंडारी यांचे नाव इतिहासात कायमचे अजरामर झाले.
  • उंदेरी किल्ला हा दर्यावीर मायनाक भंडारीच्या पराक्रमाचा साक्षीदार आहे. 
 
||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥


नोट : वरील सर्व माहिती काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल . 

Monday, 22 April 2013

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले घनगड ।।

घनगड किल्ला

  किल्ल्याची उंची: 3000
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांगः  सह्याद्री 
श्रेणी: मध्यम 
जिल्हा: पुणे 

मुळशी धरणाच्या पश्चिमेला असलेल्या मावळाला ‘कोरसबारस’ मावळ म्हणतात. याच मावळात येणारा हा घनगड हा आड बाजूला असलेला छोटेखानी किल्ला आहे.लोणावळ्याच्या परीसरात असल्यामुळे मुंबई - पुण्याहून एका दिवसात हा किल्ला पाहून परत येता येते. प्राचीन काळापासून कोकणातल्या बंदरांमध्ये उतरणारा माल घाटावरील बाजारपेठांमध्ये आणला जात असे. या मार्गांचे रक्षण करण्यासाठी बंदरापासून बाजारपेठे पर्यंत किल्ल्यांची साखळी बनवलेली असे. कोकणातील पाली गावातून घाटमाथ्यावरील लोणावळा - खंडाळा परीसरात येण्यासाठी प्राचिन काळापासून दोन घाटमार्ग आहेत.
१) पाली - सरसगड - ठाणाळे लेणी - वाघजाई घाट - तैलबैला - कोरीगड.
२) पाली - सरसगड - सुधागड - सवाष्णीचा घाट - घनगड - तैलबैला - कोरीगड.
घनगड किल्ल्याबद्दल इतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही. याचा उपयोग टेहळणीसाठी व कैदी ठेवण्यासाठी केला जात होता.

गडावर पहाण्याची ठिकाणे :
एकोले गावातून मळलेली पायवाट किल्ल्यावर जाते. या पायवाटेने १० मिनिटे चढून गेल्यावर उजव्या बाजूला एक वाट झाडीत जाते. येथे पूरातन शंकर मंदिराचे अवशेष आहेत.त्याबरोबर शिवपिंड, नंदी ,वीरगळ व काही तोफगोळे पहायला मिळतात. हे मंदिराचे अवशेष पाहून पुन्हा मुळ पायवाटेवर येऊन वर चढून गेल्यावर ५ मिनिटात आपण गारजाई देवी मंदिरापाशी पोहोचतो. या मंदिराच्या दरवाजाच्या डाव्या बाजूच्या भिंतीत शिलालेख कोरलेला आहे. मंदिरात गारजाई देवीची मूर्ती व इतर मुर्त्या आहेत. मंदिराच्या समोर दिपमाळ आहे बाजूला काही वीरगळ पडलेले आहेत. मंदिरापासून वर चढून गेल्यावर ५ मिनिटात आपण पूर्वाभिमुख प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रवेश करतो.
प्रवेशव्दारासमोर कातळात कोरलेली गुहा आहे. यात ४-५ जणांना रहाता येईल. प्रवेशव्दारातून आत आल्यावर डाव्या बाजूस एक प्रचंड मोठा खडक वरच्या कातळातून निसटून खाली आलेला आहे. हा दगड कातळाला रेलून उभा राहील्यामुळे येथे नैसर्गिक कमान तयार झालेली आहे. या कमानीतून पुढे गेल्यावर वरच्या बाजूस कातळात कोरलेली छोटी गुहा आहे. गुहेच्या खालून पुढे गेल्यावर एक अरूंद निसरडी पायवाट कातळकड्याला वळसा घालून पुढे जाते. या वाटेच्या शेवटी कातळात कोरलेले टाक पहायला मिळते. ते पाहून परत प्रवेशव्दारापाशी यावे. प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूला १५ फुटाच्या कडा आहे. या ठिकाणी पूर्वी पायर्‍या होत्या. त्या इग्रजांनी सुरुंग लावून उध्वस्त केल्या आहेत. येथे आता लोखंडी शिडी बसवलेली आहे. शिडीच्या शेवटच्या पायरी समोरच कातळात कोरलेले टाक आहे. यातील पाणी गार व चवदार असून बारमाही उपलब्ध असते.
शिडी चढून गेल्यावर कड्याला लागून कातळात कोरलेल्या पायर्‍यांची पायावाट लागते. या वाटेने पुढे गेल्यावर आपण घनगड व बाजूचा डोंगर यामधील खिंडीच्या वरच्या भागात पोहोचतो. या ठिकाणी कातळात कोरलेली एक गुहा आहे. हीचा उपयोग टेहळ्यांना बसण्यासाठी होत असे. ही गुहा पाहून परत पायवाटेवर येऊन १०-१२ पायर्‍या चढून गेल्यावर उजव्या बाजूला कातळात कोरलेली गुहा दिसते. गुहेच्या पुढे पाण्याची ४ कोरलेली टाक आहेत. त्यातील पहीली २ टाकं खांब टाकी आहेत. तिसर टाक जोड टाक आहे. चौथ टाक छोट असून त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.
टाकी पाहून परत पायवाटेवर येऊन १०-१२ पायर्‍या चढून गेल्यावर डाव्या बाजूला पायवाटेच्या वरच्या बाजूस कातळात कोरलेली गुहा दिसते. हीचा उपयोग टेहळ्यांना बसण्यासाठी होत असे. येथून १५ पायर्‍या चढून गेल्यावर आपण पूर्वाभिमुख प्रवेशव्दारातून किल्ल्याच्या माथ्यावर प्रवेश करतो. किल्ल्याचा माथा छोटा आहे. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला असलेल्या पायवाटेने थोड पुढे गेल्यावर कोरड पडलेल पाण्याच टाक आहे. त्याच्या वरच्या बाजूला पायर्‍या असलेल पाण्याच टाक आहे. यातील पाणी पिण्यायोग्य आहे. पुढे डोंगराच्या टोकाला वास्तूचे अवशेष आहेत. गडमाथ्यावर झेंड्याच्या आजूबाजूला वास्तुंचे अवशेष आहेत. प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूला प्रचंड मोठा बुरुज आहे. त्यात तोफेसाठी झरोके आहेत. हा बुरुज पाहून प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते.
किल्ल्यावरून सुधागड, सरसगड आणि तैलबैलाची भिंत हा परिसर दिसतो. तसेच नाणदांड घाट ,सवाष्णीचा घाट ,भोरप्याची नाळ या कोकणातील घाटवाटा दिसतात.

किल्ल्यावर "शिवाजी ट्रेल" या संस्थेने अवघड ठिकाणी शिडी व लोखंडाच्या तारा बसवलेल्या आहेत. तसेच किल्ल्याची डागडुजी करून माहीती फलक लावलेले आहेत.

गडावर जाण्याच्या वाटा :   
किल्ल्यावर जाण्यासाठी एकच वाट आहे अणि ती एकोले या किल्ल्याच्या पायथ्याच्य गावातूनच वर जाते. एकोले गावात जाण्यासाठी मुंबई आणि पुण्याहून लोणावळा गाठावे. लोणावळ्याहून भांबुर्डेकडे जाणारी एस. टी पकडावी. लोणावळा ते भांबुर्डे हे अंतर ३२ कि.मी चे आहे. भांबुर्डे गावातून चालत १५ मिनिटात एकोले गावात पोहोचता येते. एकोले गावातूनच किल्ल्यावर जाण्याचा रस्ता आहे. गावातील हनुमान मंदिराच्या विरुध्द बाजूस (रस्त्याच्या डाव्या बाजूला) गडावर जाणारी पायवाट आहे. ही वाट थेट किल्ल्यावर जाते.

खाजगी वहानाने घनगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणार्‍या एकोले गावात जाण्यासाठी प्रथम लोणावळा गाठावे. लोणावळ्याहून भूशी डॅम, आय.एन.एस.शिवाजी मार्गे ऑम्बी व्हॅलीच्या दिशेने जावे. लोणावळ्यापासून २० किमीवर असलेल्या पेठशिवापूर गावातून (हे कोरीगडाच्या पायथ्याचे गाव आहे.) एक फाटा उजव्या बाजूस वळतो. येथून खडबडीत डांबरी रस्ता १२ किमीवरील भांबुर्डे गावात जातो. भांबुर्डे गावात मुख्य रस्ता सोडून उजव्या बाजूचा रस्ता पकडावा, हा रस्ता ३ किमीवरील एकोले गावात जातो.
 एकोले गावातून घनगडावर जाण्यासाठी पाऊण तास लागतो.  
सूचना :) मुंबई - पुण्याहून पहाटे खाजगी वहानाने निघाल्यास घनगड व कोरीगड हे दोनही किल्ले एका दिवसात पहाता येतात.
2) पावसाळ्यात निसरड्या वाटेमुळे घनगडावर जाणे टाळावे.
 


पाण्याची सोय : पाण्याची सोय आपण स्वत: करावी.

जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वत: करावी.
 
राहाण्याची सोय : किल्ल्यावर गुहेत ४-५ जणांची, गारजाई मंदिरात १० लोकांची राहण्याची सोय होते. गडावर जेवणाची सोय नाही, आपण स्वत: करावी. किल्ल्यावर पिण्याचे पाणी शिडी जवळील टाक्यात आहे.

नोट : वरील सर्व माहिती काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

Monday, 15 April 2013

शिवरायांचे शिलेदार - येसाजी कंक


येसाजी वेलवंड खोर्‍याचे प्रतिष्ठित देशमुख होते.शिवाजीराजें तसेच शंभूराजेंचे जवळचे सहकारी होते.शिवाजीराजेंच्या दक्षिण दिग्विजयच्या मोहिमेत ते राजेंसोबत होते.छत्रपतीच्या आदेशानुसार येसाजीने गोवळकोंड्याचा बादशाह अबुलहसन कुतुबशाह याच्या मदमस्त हत्तीला आपल्या अतुल्य पराक्रमाने लोळवले होते.अनेक विजयी मोहिमेचे नेतृत्व येसाजींनी केले होते.

शिवाजीराजेंनंतर शंभूराजेंसोबत त्यांनी फोंड्याला पोतुर्गीजाना पाणी पाजले या युध्दाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे.गोवा जिंकल्यावर शंभूराजेंनी पोर्तुगीजशी तह केला होता.पण औरंगजेबने,कुडाळच्या सावंतने तसेच वेंगुर्ल्याच्या देसाईने,पोर्तुगीजांना फितवून फोंडा किल्यावर आक्रमण करावयास लावले.त्यावेळी फोंडा किल्याचा किल्लेदार येसाजी कंक हा होता.पोर्तुगीजांनी जोरदार आक्रमण करून फोंडा किल्यास भगदाड पाडले.यावेळी किल्यात फक्त आठशे मावळे होते.

पोर्तुगीजांनी किल्याच्या भगदाडातून आत प्रवेश केल्यानंतर येसाजी त्याचा पुत्र कृ्णाजी व मावळ्यांनी असा पराक्रम केला की पोर्तुगीजांची दाणादाण उडाली.पण पोर्तुगीजांची संख्या मोठी असल्यामुळे मराठ्यांचा टिकाव लागेना.याचवेळी शंभूराजें येसाजीच्या मदतीस एक हजार घोडदळ व तितकेच पायदळ घेऊन आले.त्यामुळे मराठ्यांना अधिक चेव चढला.मराठ्यांपुढे पोर्तुगीजांचा टिकाव लागला नाही त्यांचा पराभव झाला.या युध्दात येसाजी कायमचे जायबंदी झाले तर त्यांचा पुत्र कृष्णाजी युध्दात मारला गेला.या युध्दात पराक्रम गाजविल्याबद्दल शंभूराजेंनी येसाजीस एक हजार होन नेमणूक देऊन त्यांचा सन्मान केला.

 ||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

Saturday, 6 April 2013

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले माणिकगड ।।


 किल्ल्याची उंची: ----
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांगः कर्जत
 श्रेणी: मध्यम  
जिल्हा: रायगड

मुंबई - पुणे हमरस्त्यावरुन जातांना अनेक किल्ले आपल्याला दिसतात. प्रबळगड, ईरशाळ, चंदेरी, माथेरान, कर्नाळा, लोहगड, विसापूर आणि यांच्या संगतीतच एक किल्ला आहे, त्याचे नावं माणिकगङ. कर्नाळा, सांकशी, माणिकगड हे या रांगेतील तीन भाऊ. माणिकगडाच्या आजुबाजुचा सर्व प्रदेश सधन असला तरी येथील लोकांचे राहणीमान मात्र साधेच आहे. शेती हा येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे. 

 गडावर पहाण्याची ठिकाणे :  
 किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच तटबंदी दिसते. ही तटबंदी अनेक ठिकाणी तुटलेली आहे. तटबंदीमधन आत शिरल्यावर समोरच देऊळ दिसते आणि पुढे दोन कोठ्या दिसतात. कोठ्यांची दारे अजूनही शाबूत आहेत. तटबंदीतून पहिल्या सपाटीवर उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. येथून थोडे पुढे गेल्यावर पाण्याची टाकी आढळतात. त्याच्या समोरच जोत्याचे अवशेष दिसतात. येथून डावीकडे फुटणार्‍या वाटेने पुढे गेल्यावर आणखी ४ टाक्या दिसतात. यात मे महिन्य़ापर्यंत पाणी असते. टाक्यांच्या समोरच शंकराची पिंड आहे, पुढे गेल्यावर दोन चांगले बाधलेले बुरुज आढळतात. येथून पुन्हा गड जिथून पाहयाला सुरवात केली त्या जागेपाशी येऊन पोहचतो. किल्ल्यावरून प्रबळगड, इरशाळगड, कर्नाळा आणि सांकशीच किल्ला हा परिसर दिसतो. संपूर्ण गडफेरीस अर्धा तास पुरतो. 

गडावर जाण्याच्या वाटा :   
पनवेल किंवा खोपोली मार्गे यायचे झाल्यास आपटे फाट्यामार्गे रसायनीकडे वळावे - रसायनीमधून वाशिवली गावात यावे. वाशिवली गावातून वडगाव गावात यावे. वडगाव किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. पनवेलहून वडगाव पर्यंत येण्यास दीड तास लागतो. वडगाव हे बर्‍यापैकी मोठे गाव आहे. माणिकगडाची एक सोंड गावातच उतरलेली आहे. या सोंडेच्या साह्याने समोरच्या डोंगरधारेवर चढत जावे. वडगाव पासून डोंगराच्या माथ्यावर जाण्यास अर्धा तास पुरतो. या डोंगराच्या माथ्याचर कातरवाडी वसलेली आहे. या वाडीतून गड समोरच दिसतो. गडाच्या दिशेने चालत निघाल्यावर अर्ध्या तासातच आपण एका जंगलात शिरतो. येथून पुढे जाण्यासाठी दोन वाटा फुटतात.


पाण्याची सोय : किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याचे टाके आहे. 

जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वत: करावी. 

राहाण्याची सोय : किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.

जाण्यासाठी लागणारा वेळ : वडगावमार्गे ३ तास लागतात.


नोट : वरील सर्व माहिती काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

Friday, 5 April 2013

शाहिस्तेखान प्रकरण....



५ एप्रिल १६६३ ......
 
मुघल साम्राज्याचा नर्मदा नदी पलीकडे विस्तार तसेच शिवाजी महाराजांच्या राज्यविस्ताराला वेसण घालणे या दोन हेतूंसाठी औरंगझेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठविले. प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आणि फौजफाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत असणाऱ्या प्रत्येक राज्यात, गावात त्याने दहशत पसरवीत जमेल तेवढा जमेल तेथे विध्वंस केला. शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजीराजांच्या लाल महालातच तळ ठोकला. शिवाजीराजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपविण्याचा. लाल महालात आणि अवतीभोवती खडा पहारा असे आणि महालात शिरणे अतिशय जोखमीचे काम होते. एके रात्री लाल महालाजवळून जाणाऱ्या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन काही मोजक्या माणसांसह स्वतः शिवाजी महाराज लाल महालात शिरले. महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष शाहिस्तेखानच्या खोलीत शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. तोपर्यंत महालात कोठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानला जाग आली आणि तेवढ्यातच शिवाजीराजांना समोर पाहून खानाने जीव वाचविण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याची तीन बोटे कापली गेली. या प्रकरणामुळे मुघल साम्राज्याची जी नाचक्की झाली ती स्वराज्यासाठी अधिकच फायद्याची ठरली. जे राजे मुघल आश्रयामुळे शिवाजी महाराजांना जुमानत नसत ते आता शिवाजीराजांच्या पराक्रमामुळे त्यांच्या बाजूने झुकले. आणखी एक वेगळा परिणाम या प्रकरणामुळे झाला तो म्हणजे शिवाजीराजांना मिळालेला मानवी क्षमतेपेक्षा मोठा दर्जा आणि त्यामुळे जोडलेल्या दंतकथा. अनेकदा या गोष्टीचा अप्रत्यक्ष फायदा शिवाजी महाराज किंवा त्यांच्या सैन्याला मिळाला. शत्रुसैन्यामध्ये शिवाजी महाराज घुसल्याच्या केवळ अफवा पसरवून संख्येने किरकोळ असलेल्या मावळ्यांनी संख्येने अनेक पटींनी मोठ्या सैन्याची उडविलेली दाणादाण ही याच गोष्टीची साक्ष देऊ शकते. इ.स. १६६३ सालचे शाहिस्तेखान प्रकरण शिवाजीराजांच्या जीवनात आणखी एका नाट्यमय प्रसंगाची भर घालून गेले.



Monday, 1 April 2013

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले चावंड ।।

 चावंड किल्ला

किल्ल्याची उंची: 3400 फूट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांगः सह्याद्री नाणेघाटा  
जिल्हा: जुन्नर, पुणे
 श्रेणी: मध्यम 

 जुन्नर तालुक्यामध्ये नाणेघाटाचे पहारेकरी म्हणून नावलौकिक मिळवलेले किल्ले म्हणजे जीवधन, चावंड, हडसर आणि शिवनेरी. यांपैकी चावंड जुन्नर शहरापासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या आपटाळे गावानजीक आहे. गडाच्या पायथ्याशी चावंड गाव वसलेले आहे. नाणेघाटापासून जुन्नरच्या दिशेने १५ कि.मी च्या आसपास चावंड वसलेला आहे. चावंड गावात आणि आजुबाजूच्या गावांमध्ये महादेवकोळ्यांची वस्ती आहे.

 इतिहास :
१) सन १४८५ मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना करणार्‍या मलिक अहमदला पुणे प्रांतातले जे किल्ले मिळाले, त्यामधे चावंडचे नाव आहे. बहमनी साम्राज्याचे जे तुकडे झाले, त्यात त्याला उत्तर कोकण व पुणे प्रांत मिळाले.
२) दुसरा बुह्राण निजामशाह (इस १५९०-१५९४) हा सातव्या निजामाचा नातू . बहादुरशाह १५९४ साली चावंडला कैदेत होता.
३) १६३६ मध्ये निजामशाहीचा आदिलशाह आणि मोगलांपासून बचाव करण्यासाठी शहाजीराजांनी जो तह केला, त्यानुसार चावंड मोगलांना मिळाला.
४) मे १६७२ पर्णाल पर्वत ग्रहणाख्यानात कवी जयराम पिंडे म्हणतो की,. त्याचप्रमाणे चामुंडगड, हरिश्चंद्रगड, महिषगड आणि अडसरगड हे किल्ले महाराजांच्या मावळ्यांनी जिकिरीने लढून घेतले. महाराजांनी याचे नाव प्रसन्नगड असे ठेवले.
५) या गडाची अनेक नावे अशाप्रकारे आहेत; चामुंड, चाऊंड, चावंड ही नावे चामुंडा या शब्दाचा अपभ्रंश आहेततर प्रसन्नगड हे शिवाजी महाराजांनी ठेवलेले नाव  आहे.
मलिक अहमदने शिवनेरी जिंकल्यावर आपल्या एका सरदाराच्या हाती हा किल्ला दिला. या किल्ल्यातही भरपूर लूट त्याच्या हाती आली. जोंड किल्ल्याचीही व्यवस्था आपल्या एका सरदाराच्या हाती सोपवून त्याने लोहगडाकडे आपला मोर्चा वळवला.

गडावर पहाण्याची ठिकाणे : 
गडमाथा गाठण्यासाठी गडाच्या पश्चिमेकडूनच वाट आहे. चावंडवाडीतील आश्रमशाळेपासून गड चढण्यास चांगली मळलेली पायवाट आहे. या वाटेने साधारण अर्धातास चढल्यानंतर आपण खडकात खोदलेल्या पायर्‍यांच्या समांतर रेषेत चालतो. ( प्रचलित दंतकथेनुसार ते गडावर पोहोचवणारे गुप्त भुयार असावे.) साधारण १५ पायर्‍या चढून गेल्यावर आपणास एक मन खिन्न करणारी गोष्ट जाणवते. पूर्वी कोणा अनामिकाने या पायर्‍या चढण्यासाठी आधार म्हणून एका छोट्या तोफेची नळी जमिनीत पुरली आहे. साधारण २ इंच अंतर्गत व्यास असलेली ही तोफ २ ते २.५ फूट लांबीची आहे.जमिनीच्या वर असलेला हा भाग साधारण दोन तृतियांश आहे. या तोफेची लांबी साधारण ३ ते ३.५ फूट असावी. या तोफेला जंबुरका म्हणतात.
या पायर्‍या अगदीच छोट्या आहेत. इंग्रजांनी १ मे १८१८ रोजी चावंडवर हल्ला करून येथील पायर्‍या उद्‌ध्वस्त करून टाकण्याचा प्रयत्न केला. तशा सुरुंग लावल्याच्या खुणाही आपल्याला पायर्‍या चढताना दिसतात. यानंतर २०-२५ पायर्‍या चढून गेल्यावर आपल्याला प्रवेशद्वाराची तटबंदी पूर्णपणे सामोरी येते. येथे ३ मी. लांबीच्या प्रशस्त पायर्‍या आहेत, ज्यावर आज रानगवत माजलेले आहे. वर चढून गेल्यावर प्रथमदर्शनी नजरेस पडते ती कातळकोरीव गणेशप्रतिमा, आणि नैऋत्यमुखी प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारावरही एक गणपती कोरलेला आहे. यावरून असे कळते की पेशवे काळातही या गडावर बराच राबता असावा. दरवाजाची उजवी बाजू म्हणजे एक अखंड कातळ आहे. उजवा स्तंभही याच कातळातून कोरलेला आहे. गडावरची हीच वास्तू अबाधित राहिली आहे. दरवाजाजवळच एक उखळ पडले आहे. दरवाजातून आत जाताच, दहा पायर्‍या चढून गेल्यावर दोन वाटा लागतात. वरची उजवीकडची वाट उद्‌ध्वस्त अवशेषांकडे घेऊन जाते, तर डावीकडे तटबंदीच्या बाजूने जाणारी वाट आहे. उजव्या बाजूस कातळात कोरलेल्या १५ - २० पायर्‍या चढून गेल्यावर, काही वास्तू नजरेत येतात. एका वास्तूचा चौथरा अजून व्यवस्थित आहे. इथे आपल्याला अशा बर्‍याच वास्तू दिसतातजवळ (जवळ १५ ते २० वास्तूंचे अवषेश इथे आहेत) , म्हणून असा निष्कर्ष काढता येइल की इथे मोठी वस्ती असावी.आजुबाजुच्या परीसराचा मुलकी कारभार या गडावरुन चालत असावा.जेथे चौथरा शिल्लक आहे, तेथेच मोठे गोल उखळ आहे. मात्र त्यास खालच्या बाजूला एक छिद्र आहे. बाजूलाच २ संलग्न अशी टाकी आहेत. येथून उत्तरेस थोडे पुढे गेलो की एक खचत चाललेली वास्तू नजरेस पडते. हिच्या बांधकामावरून असे प्रतीत होते की हे एक मंदिर असावे. पण बरीच खचल्यामुळे जास्त काही अंदाज बांधता येत नाही.येथून आजूलाबाजूला साधारण ३०० मी. च्या परिसरात १० -१५ उद्‌ध्वस्त बांधकामे तशीच ७-८ टाकी आढळून येतात. गडाच्या वायव्य भागात एकमेकांना लागून अशी सात टाकी आहेत, ही टाकी सप्त मातृकांशी निगडित आहेत. गडाच्या याच भागात बर्‍यापैकी तटबंदी असून, आग्नेय भाग कड्यांनी व्यापला आहे. ज्या भागात तटबंदी आहे, त्या भागात या तटबंदीच्या बाजूने फिरण्यास जागा आहे ही बहुदा गस्त घालण्यासाठी असावी. या ठिकाणी बराच उतार असून काही ठिकाणी हौद आहेत. थोडे पुढे उजवीकडे गेल्यावर एका मंदिराचे अवशेष आढळतात. येथेही बरेच शिल्पकाम आढळते. ज्या ठिकाणी तटबंदी ढासळलेली आहे, तिथे चिर्‍याचे दगड गडग्यासारखे रचून ठेवले आहेत. हे कोणाचे काम असावे हे कळत नाही. इशान्य भागात ज्या ठिकाणी तटबंदी संपते, त्या ठिकाणी कातळकोरीव गुहा आहेत. या पहारेकर्‍यांच्या चौक्या असाव्यात. एक गुहा अगदी सुस्थितीत आहे. गुहेत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला हौद सदृश साधारण ५ फूट खोलीचे बांधकाम आढळते. या गुहेलगत असलेल्या तटबंदीच्या खाली भुयारी मार्गाचे प्रवेशद्वार आहे असे ग्रामस्त सांगतात, येथे रॅपलिंग करून जाता येते.
यापुढे आपण गडाच्या पूर्वेस येतो. या भागात कोणतेही अवशेष नाहीत. बेलाग कड्यांनी हा भाग व्यापला असल्यामुळे इथे तटबंदी नाही. हा भाग बराच विस्तीर्ण असूनही निर्जन आणि ओसाड आहे. जवळ जवळ अर्ध्या किमीच्या परिसरात एकही बांधकाम आढळत नाही. गडाच्या दक्षिण बाजूला आणि नैऋत्येस आपल्याला तुरळक अशी तटबंदी आढळते. इथेच पाण्याची दोन टाकी आहेत. इथून पुन्हा पश्चिमेकडे निघाल्यावर आपल्याला मजबूत अशा तटबंदीचे दर्शन घडते. दोन बुरूजही आढळतात इथून आपण टेकडी कडे निघतो, मंदिर पाहायला.
गडाच्या सर्वात उंच भागात चामुंडा देवीचे मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती प्राचीन असून बांधकाम मात्र नवीन आहे. आजुबाजूला जुन्या मंदिराचे अवशेष विखुरलेले दिसतात. एक तुटलेली मूर्ती आढळते, जी एखाद्या ऋषीचे प्रतीक असावी. तसेच एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या चामुंडा देवीच्या मंदिरासमोर आढळणारा नंदी . जुन्या अवशेषांमध्येही नंदीची मूर्ती आढळते. याचा अर्थ हा होतो की जवळच कुठेतरी शिवलिंग असावे आणि काळाच्या ओघात हरवले असावे. ग्रामस्थांनी श्रमदानाने जसे नवीन देऊळ बांधले तशी शेजारी असलेली दीपमाळही बांधण्याचा प्रयत्न केला आहे. ही दीपमाळ असे सुचवते की इथे एक शिवमंदिर असावे.
एकंदरीत पाहता, गडाचा घेरा विस्तीर्ण आहे. साधारण ५ - ६ किमीचा परीघ असावा. गडाच्या इशान्येस असणार्‍या गुहांचा अभ्यास होणे महत्त्वाचे आहे. या वास्तूंविषयी बर्‍याच दंतकथा प्रचलित आहेत. गडावर सातवाहन संस्कृतीचा प्रभाव आहे. या किल्ल्यांचा इंग्रजांनी पूर्ण नायनाट करण्याचा प्रयत्न केला, पण ते सफल झाले नाहीत.

गडावर जाण्याच्या वाटा:  
 नाणेघाटापासून जुन्नरच्या दिशेने १५ कि.मी च्या आसपास चावंड वसलेला आहे. गडावर  जाण्यासाठी चावंड गावापासून १ तास लागतो.

 राहण्याची सोय :  गडावरील कोठारांमध्ये १५ ते २० जण राहू शकतात, तर चामुंडा मातेच्या मंदिरात २ जणांना राहाता येइल, इथे उंदीर त्रास देऊ शकतात. चावंडवाडीत रहाण्याची उत्तम सोय होते.

 पाण्याची व जेवणाची व्यवस्था : गडावर जेवणाची सोय नाही ,मात्र चावंड गावात जेवणाची सोय होऊ शकते. गडावर अनेक टाकी आहेत ज्यामध्ये बारामही पिण्याचे पाणी आहे.


 नोट : वरील सर्व माहिती काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .