Wednesday 29 August 2012

प्रवास एका शिवभक्ताचा :- || किल्ले मृगगड ||


मृगगड किल्ला

किल्ल्याची ऊंची : 1750
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: लोणावळा
जिल्हा : रायगड 
श्रेणी : मध्यम

खंडाळा - लोणावळा घाट परिसर प्रसिध्द आहे तेथील वातावरणामुळे, पावसाळ्यात येथे पर्यटकांची झुंबड उडालेली असते. भुशी डॅम हा येथील सर्वात प्रसिध्द स्थळ. या भुशी धरणाकडे जातांना उजवीकडे एक दरी लागते, याला ‘टायगर व्हॅली’ असे म्हणतात. या ‘टायगर व्हॅली’ मध्ये एक अनोखे दुर्गरत्न आहे. त्याचे नाव ‘मृगगड.’

पहाण्याची ठिकाणे :
किल्ल्यावर जातांना खोबण्यांच्या बाजूला एक छोटीशी गुहा आहे. तिथ पर्यंत जरा सांभाळून जावे लागते. मृगगडाचा माथा फारच लहान आहे. चढून गेल्यावर समोरच सपाटी सारखा भाग आहे. यावर पाण्याची टाकी आहेत. एक छोटेसे तळे ही आहे. एक दोन टाकी मातीच्या ढिगार्‍यामुळे गाडली गेलेली आहेत. समोरच टेकाडासारखा भाग दिसतो. यावर चढून गेल्यावर पाण्याची टाकी दिसतात. काही वाड्यांचे अवशेष दिसतात. या गडाचा उपयोग केवळ चौकी पहार्‍यासाठी होत असावा. स्थान एकदम मोक्याचे याच्या एका बाजूला उंबरखिंड तर एका बाजूला वाघदरी, असा सर्व परिसर येथून दिसतो. संपूर्ण किल्ला फिरायला १ तास लागतो.

पोहोचण्याच्या वाटा :
मृगगडावर जाण्यासाठी खोपोलीला जायचे. पाली - खोपोली रस्त्यावर खोपोली पासून २० किमी वर परळी नावाचे गाव आहे. या ‘परळी’ गावातून सहा आसनी रिक्षेने ‘भेलिव’ नावाच्या गावात जायचे. भेलीव हेच पायथ्याचे गाव आहे. स्थानिक लोक या किल्ल्याला ‘भेलिवचा किल्ला’ असेही म्हणतात. भेलीव गावाच्याच मागे तीन सुळक्यांसारखे डोंगर दिसतात. त्यापैकी मधला डोंगर म्हणजे मृगगड. गावाच्या मागून एक वाट किल्ल्यावर जाते. जाण्याची वाट जंगला मधून असल्याने उन्हाचा त्रास बिलकूल होत नाही. किल्ला आणि त्याच्या पुढे असणारा तिसरा डोंगर यांच्या मध्ये एक खिंड आहे. त्या खिंडी मधूनच वाट किल्ल्यावर जाते. वरती थोडी कातळचढाई असल्यामुळे जरा जपूनच चढावे लागते. भेलिवमधून किल्ल्यावर जाण्यास १ तास पुरतो.

राहाण्याची सोय : मृगगडावर राहण्याची सोय नाही.

जेवणाची सोय : जेवणाची सोय आपणं स्वत: करावी.

पाण्याची सोय : पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत, मात्र गडावर उन्ह्याळ्यात पाणी नसते.

जाण्यासाठी लागणारा वेळ : भेलिवमार्गे १ तास लागतो.



नोट : वरील सर्व माहिती " गडवाट " या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट (-by Tushar Bhujbal) चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .
 


Saturday 25 August 2012

प्रवास एका शिवभक्ताचा :- || किल्ले पद्मदुर्ग ||


कासा किल्ला उर्फ पद्मदुर्ग

 किल्ल्याचा प्रकार : जलदुर्ग
जिल्हा :
रायगड
श्रेणी :  मध्यम

कासा उर्फ पद्मदुर्ग हा जलदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला कासा किल्ला मुरुड गावाजवळील समुद्रात आहे. मुरुड हे गावतालुक्याचे असून ते रायगड जिल्ह्यामध्ये आहे. मुरुड हे जंजिरा या जलदुर्गामुळे प्रसिध्दच आहे. या मुरुड गावाजवळ जंजिरा, सामराजगड आणि कासा उर्फ पद्मदुर्ग असे किल्ले आहेत.

इतिहास:
जवळ असलेल्या जंजिरा किल्ल्याच्या सहाय्याने सिद्दी अतिशय प्रबळ झाला होता. त्याच्या आरमारी सामर्थ्याने त्याने किनारपट्टीवर धाक जमवला होता. सामान्य रयतेची पिळवणूक होत होती. त्यामुळे सिद्दीच्या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठीशिवा जी राजांनी मुरुडच्या सागरात असलेल्या कासवाच्या आकाराच्या बेटावर किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार कासा उर्फ पद्मदुर्ग हा जलदुर्ग बांधला. त्याबद्दल महाराजांनी उद्गार काढले, पद्मदुर्ग वसवून राजापुरीच्या (जंजिरा) उरावरी दुसरी राजापुरी उभी केली आहे. कासा किल्ल्यामुळे जंजिर्‍याच्या सिद्दीला चांगलाचपायबंद बसला.

गडावर पहाण्यासारखी ठिकाणे :
 कासा किल्ल्याचे दोन भाग आहेत. एकमुख्य किल्ला आणि त्यासमोरील पडकोट. पडकोट मोठय़ा प्रमाणावर नामशेष होत आला आहे परंतु मुख्य किल्ल्याची तटबंदी मात्र अजूनही उत्तमपैकी शाबूत आहे. मुख्य दारासमोरील मोठा बुरुज तग धरुन उभा आहे. या बुरुजाच्या चर्चा कमळाच्या पाकळ्याप्रमाणे फुललेल्या आकाराच्या आहेत. म्हणूनच याला पद्मदुर्ग असे नाव दिले गेले असावे.

कासा उर्फ पद्मदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाचे एक वैशिष्ठ येथे पहावयाला मिळते. तटबंदीच्या दोन दगडांमधे सिमेंटिंग म्हणून चुना वापरलेला आह. गेल्या साडेतीनशे वर्षामधे सागराच्या लाटांच्या तडाख्याने आणि खार्‍या पाण्यामुळे तटबंदीचा दगड झिजून गेला आहे. या दगडाची झीज पाच ते दहा से.मी.एवढी झाली आहे. तरीही दोन दगडांमधला चुना अजूनही शाबूत आहे. शिवकालीन बांधकामाचे हे वैशिष्ट्य आपल्याला चकित करते. पडकोटामधील चौकोनी विहीर, तोफा, इमारतींचे अवशेष असे पाहून आपण मुख्य किल्ल्याकडे निघायचे पडकोट आणि मुख्य किल्ला या मधील खडकावर समुद्रामधून वाहून आलेल्या शंख शिंपल्यांचा ढीग साचलेला आहे.

कासा किल्ल्याच्या महाद्वारामध्ये प्रवेश करण्यासाठी चार पाच पायर्‍या चढाव्या लागतात. दाराच्या आतल्याबाजूला पहारेकर्‍याच्या साठी केलेल्या देवडय़ा आहेत. किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी पायर्‍यांचा मार्गही आहे. मधल्याभागामधे नव्या जुन्या वास्तूंचे अवशेष पहायला मिळतात. काही काळ भारतातील कस्टम ऑफिसचे एक कार्यालय येथे थाटलेले होते. हे चौकीवजा कार्यालय येथून हलल्यावर या सगळ्या वास्तूचा ताबा निसर्गाकडे आला त्यामुळे सगळ्या वास्तूंची रयाच गेलेली दिसते. चारही बाजुंनी खारे पाणी असताना आतमधे गोडय़ा पाण्याची चारटाकी केलेली दिसतात.
किल्ल्याचा दर्या दरवाजा आणि त्याचे स्थापत्य पाहून परत फिरायचे. तटबंदीवरुन जंजिरा आणि सामराजगड किल्ले दिसतात. मुरुडचाकिनाराही उत्तम दिसतो.

गडावर पोहोचण्याच्या वाटा :
मुरुडला जाण्यासाठी अलिबाग रेवदंडा मुरुड असा एक गाडी मार्ग आहे. मुंबई-पणजी महामार्गावरील नागोठणे अथवा कोलाड येथून रोहे गाठावे रोह-चणेरे बिरवाडी मार्गेमुरुडला जाता येते. तसेच मुंबई-पणजी महामार्गावरील इंदापूर येथून तळा-भालगाव मार्गेही मुरुडगाठता येते. मुरुड गावातून राजपुरीकडे जाणारा गाडी रस्ता आहे. या रस्त्यावरच्या खाडीलगत एकदरा गाव आहे. याच्या किनार्‍यावर अनेक मच्छीमारी नावा उभ्या असतात. या मच्छीमारी नौकावाल्याकडे चौकशी केल्यास यातील एखादी नौका आपल्याला कासा किल्ल्याकडे घेवून जावू शकते आपणसंख्येने जास्त असल्यास फारसा आर्थिक भार पडत नाही. 

सूचना : सागराची आणि हवामानाची परिस्थिती पाहूनच हे मच्छीमार कासाकडे येण्यासाठी तयार होतात. आपण आगावू चौकशी करुनकिंवा आदल्या दिवशी जर नौका ठरवली तर वेळेची बचत होऊन गैरसोय टळू शकते.


 पाण्याची व जेवण्याची सोय:- आपण स्वतः करावी. 


नोट : वरील सर्व माहिती " गडवाट " या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट (-by Vishal Dhumal) चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

Saturday 18 August 2012

प्रवास एका शिवभक्ताचा :- || किल्ले काळा ||


काळाकिल्ला

किल्ल्याची ऊंची : -
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले
डोंगररांग: डोंगररांग नाही
श्रेणी : सोपी
जिल्हा : मुंबई


आजची एकसंध दिसणारी मुंबई ही पूर्वी सात बेटांचा समुह होती. ही बेटे ब्रिटीशांच्या ताब्यात आल्यावर त्यांनी आपले पारंपारीक शत्रु सिध्दी, मराठे, पोर्तुगिज ह्यांच्या पासून मुंबईचे रक्षण करण्यासाठी मोक्याच्या जागी किल्ले बांधले. त्यापैकी मिठी नदीवर धारावी येथे बांधलेल्या किल्ल्याला स्थानिक लोक ‘‘काळ किल्ला‘‘ म्हणून ओळखतात.

इतिहास : 
इ.स १७३७ मध्ये मुंबईचे गव्हर्नर गेराल्ड ऑन्जीअर () ह्याने मिठी नदी काठी किल्ला बांधला. या किल्ल्याचा उपयोग मुख्यत्वे पोर्तुगिजांच्या ‘‘सालशेत बेटावर‘‘ आणि मिठी नदीवर नजर ठेवण्यासाठी केला गेला. हा किल्ला काळ्या दगडात बांधला गेला असल्यामुळे स्थानिक लोकांमध्ये "काळा किल्ला" ह्या नावाने ओळखला जातो. माहीम किल्ला, काळा किल्ला, रिवा किल्ला, सायनचा किल्ला या चार एका रांगेत असलेल्या किल्ल्यांमुळे मुंबी बेटाची उत्तर बाजू संरक्षणाच्या दृष्टीने मजबूत झाली होती.

पहाण्याची ठिकाणे : 
सदर किल्ला जगप्रसिध्द धारावी झोपडपट्टीत असल्यामुळे सर्व बाजूंनी अतिक्रमणाने वेढलेला आहे. आता अस्तित्वात असलेल्या अवशेषात प्रथम दर्शनी काळ्या दगडात बांधलेली किल्ल्याची भिंत व त्यावरील किल्ला १७३७ साली बांधल्याची दगडात कोरलेला शिलालेख दिसतो. किल्ल्याच्या आत जाण्यासाठी ८ फुट भिंत चढून जावी लागते. किल्ल्याचा आतील भाग कचर्याने भरलेला आहे. त्यातून प्रवेशद्वार, जीना व फांजी यांचे अवशेष दिसतात.

पोहोचण्याच्या वाटा :
 काळा किल्ला मध्य रेल्वेच्या सायन स्टेशनच्या पश्चिमेस आहे. सायन स्टेशनच्या पश्चिमेस सायन-बांद्रा लिंक रोडवरुन साधारण १० मिनीटे चालल्यावर, ओ.एन.जी.सी.बिल्डींगच्या अलिकडे उजव्या हातास काळाकिल्ला गल्ली लागते. या गल्लीच्या टोकाला किल्ला आहे. किल्ल्यात जाण्यासाठी वाट नाही. ८ फुट भिंत चढून जावी लागते.

सूचना : काळा किल्ला, रिवा किल्ला, सायनचा किल्ला हे तीनही किल्ले सायन मध्ये आहेत.हे तीनही किल्ले अर्ध्या दिवसात पाहून होतात. स्व:तचे वाहान असल्यास एका दिवसात.





नोट : वरील सर्व माहिती " गडवाट " या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट (-by स्वप्नांची दुनिया) चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .