Saturday 22 December 2012

शिवरायांचे शिलेदार - गुप्तहेर बहिर्जी नाईक


गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक

स्वराज्य स्थापनेच्या कार्यात श्री शिवरायांच्या पराक्रमी अनुयायांबरोबरच त्यांच्या गुप्तहेर खात्याचा सुद्धा अत्यंत उपयुक्त सहभाग होता. स्वकीय विरोधक व उघड शत्रू यांच्या हालचाली, दूरवरच्या प्रदेशातील परिस्थिती इ. माहिती वेळच्या वेळी मिळण्यावर राजकीय आणि सैनिकी यश अवलंबून आहे हे ओळखून शिवराय गुप्तहेर खात्यावर भरपूर पैसा खर्च करत. शत्रूच्या हालचाली आणि गुप्त कारवाया तसेच शत्रुप्रदेशातील संपन्न शहरे, खजिन्याच्या जागा,हल्ल्यासाठी जाण्याचा आणि परत येण्याचा मार्ग इत्यादी गोष्टींची गुप्तहेरांमार्फत खडानखडा माहिती मिळवून श्री शिवरायांनी अनेक धाडसी हल्ले करून शत्रूंची शहरे लुटली.

छत्रपती शिवरायांचे गुप्तहेर खाते अतिशय कार्यक्षम होते. या गुप्तहेरांपैकी एक नाव प्रसिद्धीस आले ते म्हणजे बहिर्जी नाईक यांचे. बहिर्जी नाईक हे मराठ्यांच्या इतिहासातील एका महानायकाचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेतली त्या स्वराज्याचा सुरुवातीपासुन ते महाराजांच्या निधनापर्यंतचा चा साक्षीदार म्हणजेच बहिर्जी नाईक होते.

दिवसभर बहुरुप्याचे खेळ करुन पोट भरवणारे बहिर्जी एकदा राजे मोहिमेवरती असताना त्यांना भेटले. महाराजांनी त्यांच्यातील कसब ओळखली, नाईक स्वराज्यनिर्मीतीच्या कामाला हिरा आहेत हे राज्यांनी ओळखेले आणि तात्काळ त्यांना त्या कामात रुजु करुन घेतले. महाराज नेहमी आपल्या माणसांतील गुण ओळखुन त्यांना कामे वाटत असत. बहिर्जी नाईक कुणाच्याहि नकला, वेशांतर करायला अगदी पटाईत होते. तसेच ते बोलण्यातही हुशार होते. त्यामुळे राज्यांनी त्यांना गुप्तहेर खात्यात रुजु करुन घेतले.

बहिर्जी नाईक यांचे गुण सांगायचे ठरले तर अंगात स्फ़ुरण आल्याशिवाय राहणार नाही. नाईक हे महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. फ़किर, वासुदेव, कोळि, भिकारी, संत, अगदी कुठलेही वेशांतर करण्यात ते पटाईत होते. पण फ़क्त वेशांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातुन शब्द चोरण्याचं चातुर्य त्यांच्याकडे होतं. ह्यातं सर्वात मोठं आश्चर्य हे कि विजापुरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा ह्यांच्या महालात वेशांतर करुन जात व स्व:त अदिलशहा व बादशहा कडुन ते पक्कि माहिती घेऊन येत. हेर असल्याचा संशय जरी आला तरी कत्तल करणारे हे दोन्ही बादशहा नाईकांना एकदा देखील पकडू शकले नाहीत यातच त्यांची बुद्धीमत्ता व चातुर्य दिसुन येतं.
महाराजांच्या गुप्तहेर खात्यात जवळजवळ तिन ते चार हजार गुप्तहेर असायचे. ह्या सर्वांच नेतृत्व नाईकांकडे होतं. हे सर्व गुप्तहेर नाईकांनी विजापुर, दिल्ली, कर्नाटक, पुणे इत्यादी शहरांत अगदी हुशारीने पसरवले होते. चुकिची माहिती देणार्यास कडॆलोट हा पर्याय नाईकांनी ठेवला होता. त्यांनी गुप्तहेर खात्याची जणुकाही एक भाषाच तयार केली होती. ती भाषा फ़क्त नाईकांच्या गुप्तहेरांना कळे. त्यात पक्षांचे, वार्याचे आवाज असे. कुठलाही संदेश द्यायचा असल्यास त्या भाषेत दिला जाई. महाराज आज कुठल्या मोहिमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी नाईकांना माहित असायचं. त्याठिकाणची खडानखडा माहिती नाईक काढत व महाराजांपर्यंत लवकरात लवकर पोहचवीत.  असं म्हटलं जात कि, महाराजांच्या दरबारात नाईक जर वेशांतर करुन आलेले असले तर ते फ़क्त महराजांनाच ओळखायचे-थोडक्यात दरबारात बहिर्जी नाईक नावाचा इसम नाहिच अशी सर्वांची समजुत असायची. ते फ़क्त गुप्तहेरच नाही तर लढवय्ये देखील होते. तलवारबाजीत-दांडपट्यात ते माहिर होते. कारण गुप्त हेरांना कधीही कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागेल हे त्यांना माहित होते. कुठल्याही घटणेचा ते खुप बारकाईने विचार करी. शत्रुचे गुप्तहेर कोण? ते काय करतात? ह्यांची देखील माहिती ते ठेवत. तसेच त्यांच्याकडे एखादी अफ़वा पसरवायची असल्यास किंवा शत्रुला चुकिची माहिती पुरवायची असल्यास ते काम ते चतुराईने करीत. फ़क्त शत्रुच्याच प्रदेशाची नाही तर महाराजांच्या स्वराज्याची देखील पुर्ण माहीती ते ठेवत.
शिवाजी राजे व शंभु राजे जेव्हा दिल्लीच्या बादशहाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला भेटायला गेले असताना त्याआधीच दिल्लीत नाईकांचे गुप्तहेर दाखल झाले होते कारण महाराजांना काहि दगा फ़टका होऊ नये ह्याची त्यांनी पुर्ण काळजी त्यांनी घेतली होती. त्यासाठी त्यांनी आपले साडे चारशे गुप्तहेर वेगवेगळ्या वेशात दिल्लीच्या कानाकोपर्यात लपवले होते आणि तेही महाराजांच्या येण्याच्या महिनाभर अगोदर केले. हा एकच प्रसंग परंतु महारांजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणुन त्यांचा सहभाग असायचा. त्यात अफ़जलखानाचा वध, पन्हाळ्यावरुन सुटका, शाईस्ताखाणाची बोटे तोडणे, पुरंदरचा वेढा, किंवा सुरतेची लुट असो प्रत्येक प्रसंगात बहिर्जी नाईक महाराजांचे अर्धे काम पुर्ण करत असत. ह्या प्रत्येक घटनेत नाईकांनी शत्रुची इत्यंभुत माहिती महाराजांना दिली होती.बर्याच वेळा महाराज बहिर्जींनी दिलेल्या सल्यांचा विचार करुन पाऊल टाके. राज्याभिषेक करताना महाराजांनी ज्या अष्ट मंडळाची निर्मीती केली होती त्यात गुप्तहेर खातं तयार करण्यात आलं होतं. तेव्हा देखील नाईक त्या खात्याचे प्रमुख होते.

राजगडापासून जवळपास ५०० कि.मी. अंतरावर असणारी सुरत हि व्यापारी पेठ लुटण्याचे ठरताच सुरतेची संपूर्ण माहिती, एवढेच नव्हे तर कुठे निश्चितपणे भरपूर धन हाती लागेल अशा सुरतेमधील ठिकाणांची तपशीलवार माहिती आणण्याच्या कामी महाराजांनी बहिर्जी यांना पाठविले. अचूक योजनेसाठी लागणारी अचूक माहिती बहिर्जी नाईकांनी किती कसोशीने मिळविली हे सुरतेची केवळ पाचच दिवसात लुटलेली कोट्यावधींची संपत्ती सांगते. या माहितीसाठी बहिर्जींनी कुठली सोंगे घेतली, गुप्त जागी ठेवलेल्या धनाचा पत्ता कसा लावला हे आजही आपल्यासून गुप्त आहे.

१६७९ साली जालानापूर लुटून महाराज येत असताना ती बातमी लागून संगमनेराजवळ मोगली सैन्याने मराठ्यांना गाठून कोंडीत पकडण्याची वेळ आणली होती. या भागातील डोंगरातील गुप्त वाटांची माहिती असणाऱ्या बहिर्जी नाईकांनी महाराजांना लुटीसह सुरक्षितपणे पट्टा उर्फ विश्रामगड या किल्ल्यावर पोहचविले.
हेर हे राजाचे डोळे आणि कान असतात हि म्हण सार्थ करणारे बहिर्जी नाईक महाराजांच्या अनेक यशस्वी मोहिमांमागे,धाडसी हल्ल्यांमागे, दूरवरच्या प्रदेशात अचानक जाउन केलेल्या लुटीमागे आणि सुखरूप परत येण्यामागे असणारी कल्पक, चतुर, प्रसंगावधानी आणि हरहुन्नरी व्यक्ती.  

अश्या ह्या बहिर्जी नाईकांपासुन व त्यांच्या हुशारी पासुन आपण शिकण्यासारखं बरच काहि आहे. हे शक्य झालं नाही तरी नाईकांचे स्वराज्यासाठीचे लाखमोलाचे योगदान विसरु नका.

संभाव्य समाधीस्थान - बाणूरगड (भूपाळगड), ता. खानापूर, जि. सांगली.

 ||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥


Friday 14 December 2012

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले हातगड ।।

हातगड किल्ला

सुरगणा नाशिक मधील एक तालुका सह्याद्रीच्या पूर्व भागातील एका रांगेची सुरवात याच तालुक्यापासून होते यालाच सातमाळ रांग असे म्हणतात या सातमाळ रांगेतील किल्ले म्हणजे जणु काय एक तटबंदीच याच रांगेच्या उपशाखेवर एक छोटासा किल्ला आहे त्याचे नाव हातगङ या भागातील जनजीवन मात्र सामान्यच थोडा फार आधुनिक सुविधा इथपर्यंत देखील पोहचल्या आहेत.
 
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
गडावर प्रवेश करण्यापूर्वी चार दरवाजे लागतात पहिल्या दरवाज्याच्या अगोदरच उजवीकडे कातळात वरच्या भागात कोरलेले पाण्याचे टाके लागते येथेच कातळात कोरलेली हनुमानाची मूर्ती आहे गडाच्या पहिल्या दरवाज्याचे फक्त खांब शिल्लक आहेत या दरवाज्याजवळच दोन शिलालेख कोरलेले आहेत या दरवाज्यातून थोडे वर चढल्यावर आपण दुस-या संपूर्ण कातळातून खोदलेल्या बोगा सारख्या दरवाज्यातून आत शिरतो या दरवाज्याला पाहून हरीहर किल्ल्याची आठवण येते या दरवाज्याच्या बाजूला एक गुहासुध्दा कोरलेली आहे यात पाण्याची तीन टाकी आहेत या दरवाज्यातून थोडे वर गेल्यावर गडाचा तिसरा आणि चौथा दरवाजा लागतो गडमाथा खूप विस्तीर्ण आहे संपूर्ण गडमाथा फिरण्यास १ तास लागतो दरवाज्यातून वर आल्यावर पाय-यांची एक वाट डावीकडे खाली उतरते येथे मोठा प्रमाणावर तटबंदी आहे ती आजही ब-यापैकी शाबूत आहे समोरच एक पीर सुध्दा आहे उजव्याबाजूच्या तटात एक कमान कोरलेली आहे ,पाण्याचे एक टाके सुध्दा आहे हे सर्व पाहून आल्या वाटेने परतावे आता दरावाज्याच्या उजवीकडची वाट धरावी येथून थोडे वर गेल्यावर पाण्याचे टाके लागते थोडे अजून वर गेल्यावर पडक्या इमारतींचे अवशेष लागतात येथे एक बुरुज वजा इमारतही आहे थोडे खाली उरल्यावर पाण्याचा एक तलाव सुध्दा आहे यामधील पाणी पिण्यास अयोग्य आहे तलावाच्या समोरच किल्ल्याचे मोठे पठार देखील आहे किल्ल्याच्या या भागाची तटबंदी अजूनही शाबूत आहे तलावाच्या वरच्या बाजूस एक ध्वजस्तंभ आहे ध्वजस्तंभाच्या पुढे एक वाट गडाच्या दुस-या टोकाला जाते वाटेत पाण्याची अनेक टाकी लागात गडाच्या दुस-या टोकाला एक बुरुज आहे.
संपूर्ण गडफेरीस एक तास पुरतो.

गडावर जाण्याच्या वाटा :
हातगडाला जाण्यासाठी नाशिक गाठावे नाशिक सापुतारा मार्गावर बोरगाव नावाचा फाटा आहे येथून एक रस्ता सुरगण्याला जातो तर दुसरा सापुता-याला जातो सापुता-याला जाणा-या रस्त्यावर बोरगावपासून ४ कि मी अंतरावर हातगडवाडी नावाचे गाव आहे हेच गडाच्या पायथ्याचे गाव आहे गावातन एक डांबरी सडक कळवणला जाते या सडकेवरून पुढे जायचे ,हातगडवाडी डाव्या हाताला ठेवायची पुढे डावीकडे एक बुजलेली विहीर लागते या विहीरी नंतर ५ मिनिटांनी डांबरी सडक सोडायची आणि डावीकडची डोंगरधारेवर चढत जाणारी वाट धरायची या वाटेन १५ मिनिटात आपण एका आंब्याच्या छाडाखाली पोहचतो कागदावर जशी आपण तिरकी रेघ मारतो तशी या झाडापासून डोंगराच्या माथ्यापर्यंत तिरघी रेघ मारावी ही तिरकी रेघ म्हणजे गडावर जाणारी वाट पायथ्यापासून गडमाथा गाठण्यास पाऊण तास लागतो. 
हातगड नाशिक पासून १०० कि मी वर आहे नाशिकवरून एका दिवसात सहज पाहून होतो.

पाण्याची सोय : किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याचे टाकी आहे.

जेवणाची सोय : स्वतःच करावी.

नोट :
वरील सर्व माहिती संकलन || महाराष्ट्रातील किल्ले || या facebook मधील  ( -by संकलन: कुमार भवार, सह्याद्री प्रतिष्ठान ) यांच्या  पोस्टचा  संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .
माहिती

महाराजांचे निष्ठावंत मुस्लिम सरदार

॥कितीक झाले आणि होतील | राजे असंख्य जगती || परी न शिवबा समान होईल | या अवनीवरती ॥

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात धर्माला स्थान नव्हते. त्यांच्या राज्यात जीवाला जीव देणारे मुस्लिम सरदार होते आणि त्यांना कायमच मानाचे स्थान मिळाले. महराजांच्या निष्ठावंत मुस्लिम सरदारांची ही ऐतिहासिक कामगिरी...

सिद्दी हिलाल
- घोडदळातील सेनापती सहाय्यक
- पन्हाळगडाच्या वेढ्यात (२ मार्च १६६०) शिवरायांच्या सुटकेसाठी युद्ध केले.
- उमराणीजवळ बहलोल खानाशी लढून (१५ एप्रिल १६७३) त्याला शरण येण्यास भाग पाडले.

सिद्दी वाहवाह (सिद्दी हिलालचा पुत्र)
- घोडदळातील सरदार
- सिद्दी जोहरशी झालेल्या लढाईत जखमी (२ मार्च १६६०) आणि कैद.

सिद्दी इब्राहिम
- शिवाजी महाराजांचा अंगरक्षक, लष्कराचा हजारी, फोंड्याचा किल्लेदार
- अफजलखानाच्या भेटीच्या वेळी शिवाजी महाराजांचा अंगरक्षक म्हणून त्याने कामगिरी (१९ नोव्हेंबर १६५९) चोख पार पाडली.
- सुरुंग लावून फोंड्याचा किल्ला घेतला (एप्रिल १६७५) आणि त्यावर स्वराज्याचे निशाण फडकावले.

नूरखान बेग
- स्वराज्याचा पहिला सरनोबत
- २१ मार्च १६५७ रोजी स्वराज्याचा पहिला सरनोबत होण्याचा मान पटकावला. दिड लाखाच्या सैन्याचे नेतृत्व करण्याची कामगिरी चोख पार पाडली.

मदारी मेहतर
- विश्वासू सेवक
- आग्रा येथील बंदीवासातून पळण्यासाठी (१७ ऑगस्ट १६६६) शिवरायांना सर्वतोपरी मदत.

काझी हैदर
- शिवाजी महाराजांचा वकील आणि सचिव
- १६७० पासून १६७३ पर्यंत शिवाजी महाराजांचा वकील म्हणून काम पाहिले. खास सचिव आणि फारसी पत्रलेखक म्हणून काम पाहिले.

शमाखान
- सरदार
- कोंढाणा किल्ला स्वराज्यात येताच (फेब्रुवारी १६७०) आसपासचे मोगलांचे किल्ले आणि ठाणी जिंकून घेतली.

सिद्दी अंबर वहाब
- हवालदार
- जुलै १६४७ मध्ये कोंढाणा सर करताना मोठा पराक्रम गाजवला

हुसेनखान मियाना
- लष्करातील अधिकारी
- मसौदखानाच्या अदोनी प्रांत हल्ला करुन उध्वस्त केला.
- बिळगी, जामखिंड, धारवाड (मार्च १६७९) जिंकले.

रुस्तमेजनमा
- शिवाजी महाराजांचा खास मित्र
- विजापूर येथील गुप्त बातम्या पाठवण्याचे काम चोख पार पाडले.
- हुबळीच्या लुटीत कामगिरी (६ जानेवारी १६६५) चोख पार पाडली.
- नेताजी पालकर यांना मदत (१८ मार्च १६६३) केली.
- सिद्दी मसऊद चालून येत असल्याचे पाहून शिवाजी महाराजांना सावध केले.

दर्यासारंग
- आरमाराचा पहिला सुभेदार
- खांदेरीवर १६७९ मध्ये विजय मिळवला.
- बसनूर ७ जानेवारी ते ५ फेब्रुवारी १६८५ या काळात लुटले.

इब्राहीम खान
- आरमारातील अधिकारी
- खांदेरी (१६७९) आणि बसनूरच्या ७ जानेवारी ते ५ फेब्रुवारी १६८५ या काळात झालेल्या लढाईत परक्राम केला.

दौलतखान
- आरमाराचा प्रमुख (सुभेदार)
- उंदेरीवर हल्ला (२६ जानेवारी १६८०)
- खांदेरीच्या लढाईत पराक्रम (१६७८)
- सिद्दी संबुळचा पराभव (४ एप्रिल १६७४)

सिद्दी मिस्त्री
- आरमारातील अधिकारी
- खांदेरी (१६७९), उंदेरी (१६८०), सिद्दी संबुळविरुद्धच्या लढाईत (१६७४) पराक्रम गाजवला.

सुलतान खान
- आरमाराचा सुभेदार
- शिवाजी महाराजांच्या काळात अधिकारी आणि १६८१ मध्ये सुभेदार.

दाऊतखान
- आरमाराचा सुभेदार
- अनेक आरमारी लढायांमध्ये पराक्रम गाजवला.
- सुलतान खान नंतर सुभेदार झाला.
- पोर्तुगीजांकडून दारुगोळा मिळवण्यात यशस्वी झाला.

इब्राहिम खान
- तोफखान्याचा प्रमुख
- स्वराज्यातील तोफखान्याचा प्रमुख.
- डोंगरी किल्ल्याच्या लढाईमध्ये तोफखान्याची जबाबदारी चोखपणे पार पाडली.

विजापूर आणि गोवळकोंड्यावरुन स्वराज्यात आलेले ७०० पठाण, पायदळ आणि घोडदळ १६५८ पासून स्वराज्याची निष्ठापूर्वक सेवा केली. अखेरपर्यंत बेईमानी केली नाही.

नोट : वरील सर्व माहिती प्रेम हनवते यांच्या 'शिवरायांच्या निष्ठावंत मुस्लिम सैनिक' या पुस्तकामधून...संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

Friday 7 December 2012

शिवरायांचे शिलेदार - वीर बाजी पासलकर



वीर बाजी पासलकरांच्या शेवटच्या समयीचा, काळजाचा ठाव घेणारा, त्यांचा आणि महाराजांचा संवाद माझ्या वाचनात आला... तो तुमच्या सगळ्यांच्या वाचनासाठी...  || गडवाट !! या facebook वरील ग्रौप मधील  एका पोस्टचा  (-by Vishal Pednekar) संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे.

बाजी लढताना एक घाव त्यांच्या पाठून त्यांच्या फिरंग समशेरधारी उजव्या हातावर झाला.वेदनेने कळवळलेले बाजी त्या भ्याडाचा प्रतिकार करण्यासाठी त्याही परिश्तितीत वळले आणि तोच क्षण साधत गनिमाची तलवार त्यांच्या छातीवर उतरली.पासष्ठ वर्षांचा तरणाबांड योध्दा-बाजी पडले ! आपल्या मागे वळण्याची इतिकर्तव्यता झाली हे लक्षात येताच फत्तेखान आपल्या सैन्यासह परत वळून पळून गेला.
कावजी मल्हारला हे समजताच तो तीरासारखा सासवडला धावला.आपल्या धन्याचं जखमी शरीर पाठीवर लादून वाहून नेणारी बाजींची यशवंती घोडी आणि कावजी मल्हार यांच्या दु:खाची जात एकच होती !
पुरंदर येईतो बाजींनी शरीरातली धुगधुगी फक्त आपल्या विजयी राजाला - शिवरायांना पहाण्यासाठी व दोन अखेरचे शब्द बोलण्यासाठी शिल्लक ठेवली होती.गडाच्या पायथ्यापासून बाजींची पालखी वर आली आणि वाट चुकलेलं कोकरू आपल्या आईला-गोमातेला बघताच धावत सुटतं तसे राजे पालखीकडे धावले ! 
पालखी उतरुन त्यांनी बाजींचं जखमांनी छिन्नविच्छिन्न झालेलं शरीर तोललं आणि त्यांची मान आपल्या मांडीवर घेत टाहो फोडला,"बाजी,आम्हाला असं पोरकं करून कुठे चाललात?" राजांचे अश्रू बाजींच्या जखमांवर पडले.खारट पाण्याने जखमा चुरचुरल्या पण आपलं बलिदान जणू राजाने अभिषेकाने पावन केलं या जाणिवेनं मरणाच्या दारात असलेल्या बाजींच्या गलमिश्या थरथरल्या! क्षीण पण करारी आवाजात ते बोलले,"आरं मांज्या राजा,तुला भेटलो,औक्षाचं सोनं जालं रं मांज्या ल्येकरा ! मला ल्योक न्हाई पर मरताना तुंजी मांडी गावली.त्या फत्याचं मुंडकं आननार व्हतो रं , पर डांव चुकला आन् त्यो पळाला.थोरल्या रांजास्नी पकडून नेणाऱ्या त्या नामर्द बाजी घोरपड्याला नागवनार व्हतो पर त्ये बी र्‍हाईलं ! पर तू नगं चिंता करू!, ह्यो मांजा नातु सर्जेराव बाजी जेधे आन् त्येचा बा कान्होजी जेधे हाईती तुंज्या सांगाती.येक डाव माफी कर राजा, म्होरला जलम घिऊन यी न पुन्यांदा सवराज्यासाटी लडाया!तुज्यासाटी द्याया येकलाच जीव गावला ह्ये वंगाळ बंग ! म्या चाललू रांजा, आपलं सवताचं सवराज्य व्हनार, जय काळकाई !....." राजांच्या मांडीवर प्राण सोडलेल्या बाजींचे डोळे उघडेच होते, ते शिवबांनी मिटले आणि दाबून ठेवलेल्या हुंदक्यांना वाट करून दिली.....
 
त्यांच्या पवित्र स्मृतीला माझे शतश: नमन !!
 
 ||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥
 

Thursday 6 December 2012

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले चंदेरी ।।


चंदेरी किल्ला
किल्ल्याची उंची: २३०० फूट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांगः माथेरान
जिल्हा: ठाणे
श्रेणी: कठीण
मुंबई-पुणे लोहमार्गावरून कल्याणहून कर्जतकडे जाताना एक डोंगररांग आहे. त्यातून आपला भलाथोरला माथा उंचावलेला एक प्रचंड सुळका दिसतो, त्याचे नाव चंदेरी. बदलापूर-वांगणी स्थानकादरम्यान बदलापूर-कर्जत रस्त्यावर गोरेगाव नावाचे गाव आहे. येथूनच चंदेरीची वाट आहे. नाखिंड,चंदेरी,म्हसमाळ नवरी बायको या डोंगररांगेतील एक व पनवेलच्या प्रभामंडळाचे मानकरी असणार्यां कर्नाळा, प्रबळगड, इरशाळगड, माणिकगड, पेब, माथेरान आणि अशा कितीतरी गडांपैकी एक म्हणजे चंदेरी होय. चंदेरीच्या पायथ्याशी असलेली घनदाट वृक्षराजी, गवताळ घसरडी वाट अन्‌ मुरमाड निसरडा कातळमाथा म्हणजे सह्याद्रीतील एक बेजोड आव्हान आहे. तामसाई गावाच्या हद्दीत असणारा असा हा दुर्ग प्रस्तरारोहण कलेची आवड असणार्याथ गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहे.

इतिहास:
खरे तर रायगड जिल्ह्याचे दुर्गभूषण शोभणारा हा किल्ला असूनही तसे नाव घेण्याजोगे इथ काही घडले नाही. किल्ल्यावरील गुहेच्या अलीकडे एक पडक्या अवस्थेतील शेष तटबंदी दिसते. किल्लेपणाची हीच काय ती खूण. मे १६५६ मध्ये शिवरायांनी कल्याणभिवंडी-रायरी पर्यंतचा सारा मुलूख घेतला, तेव्हा त्यात हा गडही मराठांच्या ताब्यात आला असावा. अल्प विस्तार,पाण्याची कमी साठवणूक, बांधकामाचा अभाव, मर्यादित लोकांची मुक्कामाची सोय, अतिशय अवघड वाट हे सारे पाहून हा किल्ला नसून, एक लष्करी चौकी असावी असेच वाटते. काही जणांच्या मते ७ ऑक्टोबर १९५७ रोजी चंदेरी किल्ल्याच्या सुळक्यावर संघटित प्रस्तरारोहणाचा प्रारंभ झाला

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे:
गुहेत पूर्वी एक शिवलिंग व नंदी होता. शिवपिंडी भंगलेल्या अवस्थेत आहे. तर नंदीचे अपहरण झाले आहे. गुहेच्या अलीकडेच एक सुमधुर पाण्याचे टाके आहे. ऑक्टोबर शेवट पर्यंतच त्यात पाणी असते ८ ते १० जणांच्या मुक्कामासाठी गुहा उत्तम आहे. गुहेच्या थोडे पुढे सुळक्याच्या पायथ्याशी देखील एक टाके आहे. कातळमाथ्याचा विस्तार फक्त लांबी पुरताच आहे. रुंदी जवळजवळ नाहीच. दरड कोसळल्यामुळे सुळक्याचा माथा गाठणे फारच कठीण झाले आहे. सुळक्यावरून उगवतीला माथेरान पेब, प्रबळची डोंगररांग इ. दिसते. तर मावळतीला भीमाशंकरचे पठार ,सिध्दगड, गोरक्षगड, पेठचा किल्ला इ. दिसतात. गडाच्या
पायथ्याचा परिसर पावसाळ्यात फारच रमणीय व विलोभनीय असतो. धबधब्याचा आस्वाद घ्यायला अनेक पर्यटक येथे येतात.

गडावर जाण्याच्या वाटा:
मुंबई-कर्जत लोहमार्गावरील 'वांगणी' या रेल्वे स्थानकावर उतरावे. तेथून लोहमार्गाच्या कडेकडेने (बदलापूरच्या दिशेस) जाणार्या. वाटेने गोरेगाव गाठावे. मुख्य रस्त्यावरून डावीकडे जाणारी वाट (कधी सडक) चिंचोली या पायथ्याच्या गावी घेऊन जाते. बदलापूर स्थानकात उतरून चिंचोलीस साधारण पाऊण तासाची पायपीट करूनही पोहचता येते. (वांगणी स्थानकातून गोरेगाव पर्यंत जाण्यास भाडाची वहानेही मिळतात.) चिंचोली गावास उजवीकडे ठेऊन वर जाणार्यास दोन वाटा आहेत. एका लहानश्या टेकाडाच्या दोन बाजूंनी ह्या वाटा जातात. टेकडीच्या उजवीकडून जाणारी वाट दगडधोंडांमधून जाणारी खडकाळ आहे. तर टेकडीच्या डावीकडून जाणारी वाट घसरडया लाल मातीवरील झाडांझुडपांतून जाणारी आहे. ह्या दोन्हीही वाटा मध्यभागी असणार्याए एका लहानशा पठारावर घेऊन जातात. तेथून दोन डोंगराना सामाईक असणारी, इंगजी 'त' अक्षराच्या आकाराची खाच दिसते. त्या दिशेने चालत राहावे. ह्या खाचेच्या उजवीकडचा डोंगर म्हसमाळचा तर डावीकडचा उंच सुळका असणारा डोंगर चंदेरी होय. पठारावरून थोडे पुढे गेल्यावर पाण्याचे काही ओहोळ लागतात. त्याच्याचवर धबधब्याचा मार्ग आहे. धबधब्याचे पात्र ओलांडून धबधब्याच्या डावीकडे असणार्या पाय वाटेने गड चढण्यास सुरवात करावी. साधारणतः तासाभराच्या चढणीनंतर आपण एका चिंचोळ्या माथ्यावर पोहोचतो. त्याच्या दोन्ही बाजूस दरी आहे. तेथून डावीकडे जाणारी वाट थेट गुहेपाशी घेऊन जाते. नवीनच गिर्यारोहण करणार्यांानी सोबत वाटाडा नेणे उत्तम.
गडावरून दिसणारा आजूबाजूचा प्रदेश:
नाखिंड
म्हसमाळ
नवरा बायको डोंगर
माथेरान
पेब
प्रबळगड
भीमाशंकरचे पठार
सिध्दगड
गोरक्षगड
पेठचा किल्ला
राजमाची
कर्नाळा
माणिकगड
इरशाळगड
भिवगड
ढाक बहिरी ई.
राहण्याची सोय: गुहेत ८ ते १० जणांची राहण्याची सोय होऊ शकते.

जेवणाची सोय: स्वतःच करावी.

पाण्याची सोय: ऑक्टोबर शेवट पर्यंत (पावसावर अवलंबून आहे.) टाक्यात पाणी असते.

जाण्यासाठी लागणारा वेळ: चिंचोली गावातून दीड तास.

सूचना: गडमाथा गाठण्यास अवघड असे प्रस्तरारोहण करणे आवश्यक आहे.
नोट : वरील सर्व माहिती || महाराष्ट्रातील किल्ले || या facebook मधील  ( -by संकलन: कुमार भवार, सह्याद्री प्रतिष्ठान
   )
यांच्या  पोस्टचा  संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

Monday 3 December 2012

शिवरायांचे शिलेदार - तानाजी मालुसरे


छत्रपती शिवाजी राज्यांचे बालपणीचे सवंगडी - तानाजी मालुसरे
" आधी लगीन कोंढाण्याचे मग
माझ्या रायबाचे "

कामगिरी :
तानाजी मालुसरे
हे छत्रपती शिवाजी राज्यांचे बालपणीचे सवंगडी, म्हणूनच महाराजांच्या आत्यंतिक विश्वासातले. सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडोली गावचे तानाजी मालुसरे. तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत महाराजांबरोबर होते. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती.महाराजांनीकोकण स्वारीत संगमेश्वर काबीज करून तानाजी व पिलाजी ह्यांना तेथे ठेवले होते. सुर्व्यांनी अचानकपणे रात्री हल्ला केल्याने पिलाजी पळत होते. परंतु तानाजीने अतिशय शौर्याने सुर्व्यांचा हल्ला मोडून काढून मर्दानीपणा काय असतो ते दाखवून दिले.स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणार्‍या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजीवर सोपविली होती. त्यासाठीच या भागातील उमरठे ह्या गावात येऊन ते राहिले. आपलेपणाने वागून ह्या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्यांनी सहभागी करून घेतले.
कोंढाणा किल्ला स्वराज्यासाठी, आऊसाहेबांच्या(जिजाबाई) इच्छेखातर; कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी शिवाजी महाराजानी तानाजी मालुसरेला दिली होती. जेंव्हा तानाजीला ह्या जबाबदारी समजली तेंव्हा ते स्वतःच्या मुलाच्या लग्नात होते. त्यानी ते लग्न अर्धे सोडले आणि जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा तानाजींनी उचलला. ते कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाले. निघण्यापूर्वी त्यानी जे शब्द बोलले ते मराठ्यांसाठी बोधवाक्य आहे, " आधी लगीन कोंढाण्याचे मग 
माझ्या लगीन रायबाचे ".
गडावर किल्लेदार उदयभान राठोड एक शूर माणूस होता, आणि त्याच्या हाताखाली सुमारे १५०० हशमांची फौज होती होते. ४ फेब्रुवारीच्या (माघ वद्य नवमी) रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरुन निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येउन पोचले. ती भयाण काळोखी रात्र होती. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानी मनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा. रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. कोंढाणा किल्यावरच्या तुकडीला कळू न देता चढणे दिवसासुध्दा अशक्य होते. तानजींनी गडाच्या मागच्या बाजूने आपल्या घोरपडीला वर पाठवले. तिच्या शेपटीला दोर बांधला होता. मावळे त्या दोरीला पकडून वर चढून गेले. अचानक हल्ला करुन त्यानी तेथील सैन्याला कात्रीत पकडले. आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्न केले. शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वत:चे प्राण तानाजींनी सोडले. मात्र त्यांच्यामागुन 'सूर्याजी मालुसरे' आणि 'शेलारमामा' यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला. गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता. ही घटना ४ फेब्रुवारी, १६७०, रोजी घडली.
 तिथे झालेल्या अतीतटीच्या लढाईत तानाजींना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. हे दुसऱ्या दिवशी राजे सिंहगडावर पोचले तेंव्हा त्यांना ही बातमी समजल्यावर महाराजांना खूप दुःख झाले. महाराज म्हणाले "गड आला पण सिह गेला". तानाजीच्या स्मृतीप्रित्यर्थ कोंढाणा गडाचे नाव बदलून सिंहगड ठेवण्यात आले. अत्यंत दुःखी अश्या राजांनी आपल्या तानाजीचे शव त्यांच्या 'उमरठ' (पोलादपुरजवळ) या गावी पाठवले. ज्यामार्गाने तानाजी मालुसरे यांची प्रेतयात्रा गेली तो आता 'मढेघाट' या नावाने ओळखला जातो. तानाजी गेले त्या जागेवर त्यांचा 'विरगळ' स्थापन केला गेला आहे. शिवाय एक सुंदर स्मारक सुद्धा उभे केले गेले आहे.

मृत्यू: फेब्रुवारी ४ , १६७०,
सिंहगड, पुणे, महाराष्ट्र, भारत


शिवरायांचे शिलेदार - शिवा काशीद


शिवरायांचा स्वराज्य स्थापनेचा उद्योग प्रामुख्याने विजापूरच्या आदिलशहाच्या अमलातील प्रदेशात चालू होता. शिवराय आणि आदिलशहा यांच्या पहिल्या उघड संघर्षात पुरंदरावर विजापुरी सेना पराभूत झाली. आदिलशाहीच्या सामर्थ्याला न जुमानता शिवरायांनी जावळीच्या मोऱ्यांचा नायनाट करून जावळी बळकावली. स्वराज्याच्या सीमा वाढू लागताच उरात धडकी भरलेल्या आदिलशाहीने प्रचंड फौज फाटा देऊन स्वराज्यावर पाठविलेला अफझलखान शिवरायांनी प्रतापगडाजवळ ससैन्य संपविला. हा प्रचंड पराभव आदिलशहाला अतिशय झोंबला. अफझल वधानंतर स्वराज्याच्या सीमा विजापूरच्या दिशेने वाढवत शिवरायांनी पन्हाळा हा बलाढ्य आणि मोक्याचा किल्ला जिंकला.
आदिलशहाने पुन्हा फौज देऊन सिद्दी जौहर या चिवट लढवय्या सरदारास शिवरायांवर पाठविले. सिद्दीने पन्हाळ्यास वेध घातला. या परिसरातील प्रचंड पावसाळ्यात वेढा चालविणे विजापुरी फौजेला अशक्य होईल हा पन्हाळ्यावर असलेल्या महाराजांचा अंदाज चिवट सिद्दी जौहरने खोटा ठरविला. वेध अधिकच कडेकोट करून सिद्दी गडाखाली ठाण मांडून बसला. मराठ्यांनी वेढ्याबाहेरून केलेल्या हल्ल्यांना मोडून काढीत सिद्दी गडावर मारा करू लागला. वेढ्यात अडकून चार महिने झाले आणि शिवरायांनी यापुढे पन्हाळ्यात रहाणे स्वत:ला आणि राज्याला अपायकारक ठरणार हे ओळखून वेढ्यातून निसटून जायचे ठरवले. तहाची बोलणी चालू करून काही प्रमाणात शिवरायांनी सिद्धीचे सैन्य गाफील बनविले. पन्हाळ्यातून बाहेर पडण्याचा दिवस निश्चित करण्यात आला.
निवडक एक हजार मावळे बरोबर घेऊन दुर्गम मार्गाने विशाळगडाकडे भर पावसात रात्रीच्या अंधारात गुपचूप निसटण्याच्या या योजनेत चाहूल लागून शत्रू पाठीवर आलाच तर त्याला हूल देण्यासाठी शिवा काशीद यांची एक वेगळ्या कामावर योजना करण्यात आली. पन्हाळ्या शेजारच्या नेबापूर गावच्या नाभिक समाजाच्या शिवा काशीद या वीराने महाराजांच्या पेहरावात दुसऱ्या पालखीत बसून नेहमीच्या मार्गाने प्रयाण केले तर महाराज आडवाटेने विशाळगडाकडे निघाले. विजापुरी सैन्याला चकवा देऊन महाराज वेढ्याबाहेर पडले पण सिद्दीच्या गस्ती पथकांना त्यांची चाहूल लागली आणि विजापुरी सैन्य पाठलागावर निघाले. घोड्यावरून पाठलाग करणाऱ्या सिद्दीच्या सेनेच्या तावडीत शिवा काशीद सापडले. महाराज सापडले या आनंदात त्यांना सिद्दीसमोर आणण्यात आले. पण महाराजांना ओळखणाऱ्या फाजलखानाने हे महाराज नाहीत असे सांगताच सिद्दी हाधरला.
ते महाराज नसून शिवा काशिद आहे.
सिध्दीने त्यास विचारले , " मरणाचे भय वाटत नाही का? ".
त्यावर शिवा काशिद म्हणाला, " शिवाजी राजेसाठी मी हजार वेळा मरावयास तयार आहे, शिवाजी राजे कोणास सापडणार नाहीत ". 
हे उत्तर ऐकून रागाने  चिडून सिद्दीने  भाल्याने भोसकून शिवा काशिदचे शीर कलम केले. पण या सर्व घटनांनी शिवरायांना विशाळगड गाठण्यास लागणारा बहुमोल जादा वेळ मिळवून दिला.

महाराजांचे रूप घेऊन विजापुरी सैन्याला फसविण्याचे पर्यवसान आपल्या मृत्यूमध्ये होणार हि पूर्व कल्पना असूनही मृत्यूला सामोरे जाण्याचे साहस दाखविणारे हे शिवा काशीद .इतिहास ही त्याचा पराक्रम विसरु शकणार नाही,कारण शिवा काशिद सारख्या मावळ्याच्यामुळेच व त्याच्या बलिदानामुळेच स्वराज्याचे देखणे स्वप्न शिवाजीराजे साकार करु शकले. यांना मनाचा मुजरा..........!!!

मृत्यू - १३ जुलै १६६०
समाधीस्थान - पन्हाळा, जि. कोल्हापूर 

||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

Sunday 2 December 2012

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले लोहगड ।।

लोहगड किल्ला
  किल्ल्याची ऊंची : ----
किल्ल्याचा प्रकार :
गिरिदुर्ग
डोंगररांग :
सह्याद्री डोंगररांगा
जिल्हा : पुणे
श्रेणी : मध्यम

शिवछत्रपतींनी निर्मिलेल्या स्वराज्याचा एक पोलादी आधारस्तंभ; ऐन मावळात असला तरी पुणे मुंबई हम रस्त्यावर आणि लोहमार्गाचे जवळ. परंतु पर्यटकांचे दृष्टीने कठीणच. फारतर कार्ला, भाजे किंवा अतीच झाले तर बेडसा यांना भेट देणारे प्रवासी मोठ्या अचंब्याने लोहगड - विसापूरच्या बुलंद अशा जोडगोळीकडे निरखून पाहतात आणि तिथेच तांच्य गीरीदुर्गाची कवतिक संपते. पुण्याकडून मुंबईकडे जाताना मळवलीच्या बाजूस डाव्या हाताशी लोहगड विसापूर हे आवळेजावळे दुर्ग वसलेले आहे. पैकी लोहगडाचा माथा आहे सुमारे ४ कि.मी. चालीवर. फार फार प्राचीन काळापासून सिंधुसागराच्या तटावर वसलेली अन वाढलेली कल्याण सोपारा आदी बंदरे, पण त्यांचा व्यापार टिकवून धरला होता, तो देशावरील संपन्न बाजारपेठांनी. त्यांना साधणारे दुवे होते नाणेघाट व बोरघाट. जीवधन व भैरवगड हे नाणेघाटाची राखण करीत होते. अन राजमाची आणि लोहगड हे बुलंद पहारेकरी हीच कामगिरी इमानेइतबारे पार पाडीत होते बोरघाटात.

इतिहास :
इ.स. १६६४ साली मोगल बादशहाची शान असणारी सुरात लुटून मिळवलेली संपत्ती नेताजीच्या नेतृत्वाखाली लोहागाद्वार पाठविली आन राजे स्वत: राजगडावर अगदी घाईघाईने निघून गेले. त्याला कारणही तसच होत: शहाजी महाराजांचा मृत्यू झाला होता आणि शिवरायांच्या परम प्रिय व पूज्य अशा मासाहेब यांचा कुंकुमतिलक पुसला गेला होता. आता त्या सती जाऊ इच्छित होत्या आणि ते थांबवणे अगत्याचे होते. ऐतिहासिक साधनांच्या अभावी ह्या प्राचीन दुर्गाचा सलग इतिहास ज्ञात नाही. परंतु हे बलदंड स्थान सातवाहन कालात अस्तित्वात होते या बद्दल शंका नाही. पुढे बहामनी राजांचा अंमल या प्रदेशावर होता. बहमनी राज्याचे तुकडे झाल्यावर इ.स. १४९१ मध्ये निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमद याने याचा ताबा घेतला.निजामशाहीचा डोलारा कोसळल्यावर लोहागाडाचा ताबा इ.स.१६३७ मध्ये आदिलशाहीकडे गेला. इ.स. १६४८ च्या आसपास शिवाजी महाराजांनी कळ्यांची लूट केली आणि त्या धामधुमीतच तुंग उर्फ कठीणगड, तिकोना उर्फ वितंडगड, राजमाची आणि लोहगड या दुर्गम दुर्गांचाही ताबा घेतला. पुढे सुरतेची लुट सुरक्षित ठेवायला ह्याच बुलंद आणि बलदंड लोहगडाची निवड केली. पुढे केवळ राजकीय तडजोड म्हणून मिर्झाराजे जयसिंगाशी केलेल्या तहात जे २३ किल्ले शिवाजी महाराजांनी मोगलांच्या हवाली केले त्यात हा एक किल्ला होता. परंतु अवघ्या पाच वर्षात म्हणजे इ.स. १६७० मध्ये महाराजांनी पुन्हा जिंकून घेतला. शिवरायांच्या मृत्यू नंतरच्या आलमगिरी वावटळीत हा परत मोगलांकडे गेला.इ.स. १७१३ च्या सुमारास सरखेल कान्होजी आंग्रे यांनी पुन्हा तो स्वराज्यात आणला.
थोरले माधवराव निजामावर स्वारी करण्यास गेले असताना निजामाने पुण्यावर हल्ला चढविला. त्यावेळी पुण्याहून प्रचंड संपत्ती लोहगडावर ठेवली होती. परंतु घर फिरले कि वसे पण फिरतात या न्यायाने येथील संपत्ती (अंदाजे २० लक्ष रुपये) निजामाने लुटून फस्त केली. पुढे जावजी बोंबले याच्या मदतीने नाना फडणविसांनी आपली पकड या किल्ल्यावर बसविली. त्यांनी निजसुरे यांची नियुक्ती येथे केली. नानांच्या मृत्युनंतर त्यांची नववी पत्नी जिऊबाई हि इथेच होती. दुसरा बाजीराव व निजसुरे यांच्या भांडणात जनरल वेलस्लीने हस्तक्षेप केला. त्यातच जिऊबी मेणवली येथे जाऊन राहिली.१८१८ च्या अखेरच्या इंग्रज आणि मराठे युद्धात ४ मार्च रोजी विसापूर जिंकून घेतला आणि एकही गोळी न झाडता लगेचच लोहगड हि कर्नल प्रोथर याच्या ताब्यात आला.

गडावर पहाण्याची ठिकाणे : 
मौजे लोहगडवाडी हे केंबळी घरांचे छोटेखानी गाव गडाच्या ऐन पायथ्याशी आहे. या गावातून गडावर प्रवेश करावा लागतो, पाठोपाठच्या चार दरवाज्यातून आणि तोही सर्पाकार मार्गावर उभारून अधिक मजबूत केलेल्या. पहिल्या दरवाजाचे नाव आहे गणेश दरवाजा.याच्याच डाव्या आणि उजव्या बुरुजाखाली सावळे नावाच्या जोडप्याचा नरबळी दिला आहे. या गणेश दरवाज्यातील गणपती जरी तुम्हाला विघ्नहर्ता वाटत असला तरी या जोडप्याला तो विघ्नकर्ताच वाटला असेल. अर्थात तय्च्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटीलकी दिली. त्यानंतर आहेत नारायण आणि हनुमान दरवाजे. पैकी हनुमान दरवाजा हा मुळचा सर्वात प्राचीन. बाकीचे नाना फडणविसांनी बांधलेले. या दोन दरवाज्यामध्ये भुयारे आहेत. एकात भात आणि दुसऱ्यात नाचणी साठवून ठेवीत. भाताचे कोठार आहे ५ मीटर लांब ४ मीटर रुंद आणि ३ मीटर उंच. तर नाचणीचे आहे १० मीटर लांब १० मीटर रुंद आणि ४ मीटर उंच. शेवटचा दरवाजा महादरवाजा या नावाने ओळखला जातो. महादरवाज्यातून आत येताच एक माशिदवजा ईमारत आहे आणि त्यातील थडगे हे औरंगजेबाच्या मुलीचे आहे असे सांगण्यात येते. मात्र तिचे नाव, गाव,जन्म, माता इ. बद्दलची माहिती मिळत नाही. याच इमारतीशेजारी सदर व लोहारखाण्याचे भग्नावशेष आढळतात.
या मशिदी शेजारीच एक टेकडीवजा उंचवट्याचा भाग आहे. तेथे मोठी सादर आहे व एक खाली आणि एक वर अशा कोठ्या आहे.एकीला खजिनदाराची कोठी म्हणून ओळखतात. ती आहे एकवीस मीटर लांब, अन पंधरा मीटर रुंद, दुसरी ओळंबलेल्या खडकाखाली असून तिला लक्ष्मी कोठी म्हणतात. लोमेश ऋषींचा निवास येथेच होता.या टेकडीवर एक मोठी तळे आहे त्यात लाल रंगाचे खेकडे मिळतात. पूर्वी या तळ्याच्या काठावर एक शिलालेख होता. त्यात लिहिल्याप्रमाणे हे तळे इ.स.१७८९ मध्ये नाना फडणविसांनी बंडले आहे असा उल्लेख होता. आज मितीस हा शिलालेख दृष्टीस पडत नाही.इंग्रजांच्या ताब्यात हा किल्ला आला तेंव्हा नानांचा खजिना त्यांनी या तळ्यात ठेवला असावा अशी शंका येऊन काद्याखाळून त्यातील पाण्याला मोकळी वाट करून दिली व हे तळे रिते झाले. आजही त्यात फारसे पाणी साचून राहत नाही. तो खजिना त्यांना मिळाला कि नाही कोण जाने पण हा तलाव मात्र रिकामाच राहिला. जवळच त्र्यंबकेश्वर महादेवाचे मंदिर आहे. याच्या पश्चिमेस आहे विंचू काटा. पंधराशे मीटर लांब अन तीस मीटर रुंद अशी हि डोंगराची सोंड निसर्गाच्या लहरीने निर्माण झालेली एक दगडी भिंतच आहे. अर्थात मुळ डोंगरापेक्षा किंचित खालच्या पातळीवर, तेंव्हा तिथे जायचे म्हणजे एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते. गडावरून पहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो म्हणून विंचू काटा. गडाच्या या भागावर देखील चवदार पाण्याची उत्तम सोय केलेली आढळतेच. गडाच्या घेऱ्यावर लक्ष ठेवण्यास आणि आणीबाणीच्या प्रसंगी हि नांगीच उपयोगी पडावयाची .
लोहागाद्च्या डोंगर परिसरात आहेत बाजे व बेडसे लेणी. हीनयान बौद्ध यांची भाजे येथील लेणी मोठी देखणी आहेत. थेट इसवी सन पूर्व दुसर्या शतकातील सातवाहन राजांच्या काळातील. या बौद्ध लेन्यांशेजारीच एका जलप्रपाताजवळ एक सूर्य गुंफा आहे. ऐरावतावर आरूढ झालेला इंद्र आणि सातवाहनांना विशेष पूज्य असणारा भगवान सुर्यनारायण आपल्या संज्ञा व छाया या दोन पत्नीबरोबर चार घोड्यांच्या दोनचाकी रथात आरूढ झालेला. या मूर्ती सुर्यागुंफेचे वैशिष्ट्य.

गडावर पोहोचण्याच्या वाटा : पुण्याहून लोणावळा लोकलने मळवलीस उतरावे व भाजे गावातून जाणाऱ्या रस्त्याने भाजे लेणी जवळ करावीत. लोहगडवाडी या गावातून गडावर प्रवेश करावा लागतो. तेथून लोहागडाचे सुरम्य दर्शन घडते. गायमुख खिंडीची दिशा पकडून चालत राहावे किंवा विसापूरच्या पायथ्यापायथ्याने टेकड्यामागून टेकड्या ओलांडीत गायमुख खिंडीकडे यावे. 

 जेवणाची सोय व  पाण्याची सोय :  आपण स्वत: करावी.

 राहाण्याची सोय : गडावर राहण्याची सोयनाही .

 ||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

  नोट : वरील सर्व माहिती || महाराष्ट्रातील किल्ले !! या facebook वरील ग्रौप मधील  एका पोस्टचा  (-by Dilip Ringane) संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .