Saturday 27 July 2013

प्रवास एका शिवभक्ताचा :- || किल्ले राजदेहेर ||


किल्ले राजदेहेर
 किल्ल्याची ऊंची : ४४१०  मी.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग.
 डोंगररांग : अजंठा सातमाळ.
 श्रेणी : मध्यम.
जिल्हा : जळगाव.

चाळीसगाव तालूक्याच्या दक्षिण टोकाला सातमाळ डोंगररांगेत ‘‘राजदेहेर‘‘ किल्ला आहे. हा दूर्गम गड दोन डोंगरावर वसलेला असून त्यामध्ये असलेल्या घळीतून किल्ल्याचा प्रवेश ठेऊन स्थापत्यकाराने किल्ल्यावर चालून येणारा शत्रू दोनही डोंगरावरुन मार्‍याच्या टप्प्यात राहिल अशी योजना केलेली आहे. या पूरातन किल्ल्यावर आजही पहाण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत.

इतिहास :
राजदेहेर हा किल्ला गवळीकालीन किंवा यादव पूर्वकालीन असावा. इ.स. १००० ते १२१६ पर्यंत निकुंभांची या भागावर सत्ता होती. पाटणे या राजधानी जवळच हा किल्ला असल्यामुळे लष्करीदृष्ट्या महत्वाचा असावा. इ.स. १२१६ - १७ च्या सुमारास यादवांनी हा किल्ला ताब्यात घेतला. यादवानंतर अल्लाऊद्दीन खिलजीकडे व त्यानंतर फारुकींकडे हा किल्ला होता. इ.स. १६०१ मध्ये खानदेश सुभा मुघलांकडे गेला; त्यावेळी भडगावच्या रामजीपंतांनी अशिरगडच्या वेढ्यात चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांना जहागिरी देण्यात आली, त्यात राजदेहेर किल्ल्याचा समावेश होता.
शिवकालीन पत्रात या किल्ल्याचा उल्लेख नाही, पण १०९ कलमी बखरीत शिवाजीमहाराजांच्या किल्ल्यांच्या यादीत या किल्ल्याचा समावेश केला आहे. पुढे १७५२ च्या भालकीच्या तहात निजामाकडून हा भाग पेशव्यांनी घेतला. इ.स. १७६२ मध्ये माधवराव पेशव्यांनी राजदेहेर किल्ला विठ्ठल शिवदेव यांच्याकडे सोपवून १० हजार रुपयांचा सरंजाम किल्ल्याला मंजूर केला.
इ.स. १७६४ मध्ये चाळीसगावचे जहागिरदार पवार बंधूंनी बंड केल्यावर दुसर्‍या बाजीरावाने विठ्ठलराव विंचूरकर यांना चाळीसगावावर पाठविले. त्यांनी पवारांचे बंड मोडून राजदेहेर ताब्यात घेतला.
१५ एप्रिल १८१८ रोजी कर्नल प्रॉथर याच्या नेतृत्वाखालील सैन्याने किल्ल्यावर हल्ला केला. त्यावेळी किल्ला निकम देशमुखांच्या ताब्यात होता. मराठा सैन्याने प्रतिकार केला, पण इंग्रजांनी किल्ला जिंकून घेतला.

गडावरील  पहाण्याची ठिकाणे :
दोन डोंगरामधील घळीतील पत्थरात पायर्‍यांचा अरुंद मार्ग खोदून भौगोलीक रचनेचा कौशल्याने संरक्षणासाठी उपयोग किल्ला बांधतांना केलेला आहे. या मार्गाने उध्वस्त प्रवेशद्वारातून आपला गडावर प्रवेश होतो. जवळच व्यालमुख असलेले दोन भग्न स्तंभ पडलेले दिसतात. प्रवेशद्वाराच्या थोड्या वरच्या अंगाला दगडात खोदलेले रिकामे लेणं आहे. त्याच्या बाजूस एक गुहा व पाण्याच टाक आहे. या ठिकाणाहून संपूर्ण किल्ला दृष्टीक्षेपात येतो. तेथून खाली उतरुन पुन्हा प्रवेशद्वारापाशी येऊन गडफेरी सुरु केल्यावर पाण्याचे दोन खांबी टाकं लागत. येथून पुढे गेल्यावर एक गुहा व ४ खांबी टाक आहे. गडाच्या माचीवर साचपाण्याचा तलाव असून त्याच्या बाजूलाच नंदी व पिंड उघड्यावर पडलेले आहेत. तलावावरुन पुढे गेल्यावर दगडात खोदलेल्या पादूका पहायला मिळतात. तेथून माचीवर निमूळत्या टोकापर्यंत गेल्यावर आजूबाजूचा विस्तृत प्रदेश व राजधेरवाडी गाव पहाता येते. माचीच्या टोकावरुन बालेकिल्ल्याकडे जाताना डाव्या हातास पाण्याच एक टाक आहे. बालेकिल्ल्यावर उध्वस्त वास्तूंचे अवशेष आहेत. गडाच्या दक्षिणेला थोडी तटबंदी शाबूत आहे बालेकिल्ल्यावरुन उतरुन ही तटबंदी ओलांडून गडाला वळसा घालूनही राजधेरवाडीत उतरता येते.

गडावर पोहोचण्याच्या वाटा :
१) मनमाड - भुसावळ रेल्वेमार्गावर नांदगाव स्थानकावर उतरुन राजदेहेरवाडीला (अंतर अंदाजे ५० किमी) जाण्यासाठी जीप मिळतात.
२) मनमाड - नांदगाव रेल्वेमार्गावर नायडोंगरी स्थानकावर उतरावे (येथे केवळ पॅसेंजर थांबतात). नायडोंगरी येथुन राजदेहेरवाडीला जाण्यासाठी बसेस मिळतात.
राजदेहेरवाडी पासून २ किमीवर महादेव मंदिर आहे. या मंदिरा जवळून किल्ल्यावर जाणारी पायवाट आहे.

राहाण्याची सोय : गडावर रहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय : गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.

गडावर जाण्यासाठी लागणारा वेळ : राजदेहेरवाडी पासून १ तास लागतो.


नोट : वरील सर्व माहिती "  शिवकालीन महाराष्ट्र' "  या facebook  वरील पेज मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल . 

प्रवास एका शिवभक्ताचा :- || किल्ले राजमाची ||

किल्ले  राजमाची
 किल्ल्याची ऊंची : ३६००  मी.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग.
 डोंगररांग : लोणावळा.
 श्रेणी : मध्यम.
जिल्हा : पुणे .

सह्याद्रीच्या लोणावळा खंडाळा पासून निघणार्‍या डोंगररांगेमुळे निर्माण झालेला परिसर ‘उल्हास नदीचे खोरे’ म्हणून ओळखला जातो. याच परिसरातून उल्हास नदी उगम पावते. याच ‘उल्हास नदीच्या खोर्‍याच्या प्रदेशात लोणावळ्याच्या वायव्येस १५ किमी अंतरावर राजमाची किल्ला वसलेला आहे. कल्याण - नालासोपारा ही प्राचीन काळातील मोठी व्यापारी बंदरे होती. या बंदरापासून बोरघाट हा पुण्याकडे जाणारा हा पुरातन व्यापारी मार्ग होता. त्यामुळे या मार्गावरूनही मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. या व्यापारी मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी शिवाय जकात वसूलीसाठी कोकण आणि घाटाच्या वेशीवर असणार्‍या किल्ल्यांचा उपयोग केला जात असे. यापैकी सर्वात प्रमुख किल्ला म्हणजे राजमाची. किल्ल्याचा भौगोलिक दृष्ट्या विचार केल्यास आपल्या असे लक्षात येईल की राजमाचीच्या एका बाजूस पवन मावळ प्रांतातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर किल्ले, तर दुसर्‍या बाजूस पेठ, भीमाशंकर, ढाकचा किल्ला, गोरखगड, सिध्दगड, चंदेरी असा सर्व परिसर नजरेत पडतो. त्यामळे हा किल्ला म्हणजे लष्करी दृष्टया एक प्रमुख ठाणं असले पाहिजे. किल्ल्याला दोन बालेकिल्ले आहेत. हे दोन बालेकिल्ले म्हणजे दोन स्वतंत्र असे किल्लेच होय.

इतिहास :
राजमाची किल्ल्याच्या पोटात एक लेणं आहे यालाच ‘कोंडाणे लेणी’ असे म्हणतात. ही लेणी कोंडाणा गावापासून आग्नेयेस २ किमी अंतरावर आहेत. ही लेणी ख्रिस्तपूर्व दुसया शतकात म्हणजे सातवाहनकालाच्या सुरवातीला खोदलेली आहेत.अखंड दगडात कोरलेल्या वास्तुशिल्पाचा हा उत्कृष्ठ नमुना आहे. या लेणी समुहात एक चैत्यगृह आणि सात विहारांचा समावेश आहे. या लेण्यांची निर्मीती राजमाचीवर असणार्‍या सत्तेखाली झाली. यावरुनच असे अनुमान निघते की हा किल्ला साधारण २५०० वर्षापूर्वीचा असावा. राजमाची किल्ल्यास पूर्वी ‘कोंकणचा दरवाजा’संबोधण्यात येत असे.
कल्याणच्या १६५७ च्या स्वारी नंतर त्याचवर्षी शिवाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटावरील राजमाची ,लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले. यामुळे पुण्यापासून ते ठाण्यापर्यंतचा सर्व प्रदेशावर शिवशाहीचे वर्चस्व प्रस्थापित झाले. पुढे संभाजी महाराज जिवंत असे पर्यंत म्हणजेच सन १६८९ पर्यंत हे सर्व किल्ले मराठयांच्या ताब्यात होते. यानंतर १७१३ मध्ये शाहुमहाराजांनी कान्होजी आंग्रे यांना हा किल्ला दिला. सन १७३० मध्ये हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांच्याकडे आला. १७७६ मध्ये सदाशिवररावांच्या तोतया संपूर्ण कोकण प्रांत काबीज करीत बोरघाटा पर्यंत पोहचला. त्याने राजमाची किल्ला घेतला. यानंतर या तोतयाचे वर्चस्व वाढले मात्र पेशव्यांनी त्याच्यावर हल्ला करून राजमाची किल्ला आणि आजुबाजुचा परिसर आपल्या ताब्यात घेतला. पुढे १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांकडे गेला.
उल्हास नदीच्या या पात्रात कोंदीवडे आणि कोंढाणा जवळ एका मोठ्या दगडात २१ हंडे पाणी मावेल एवढा पाळणा कोरला असून त्यामध्ये एका बालकाची मूर्ती कोरली आहे. पूर्वी स्थनिक लोक मुलं होण्यासाठी येथे नवस करत असा संदर्भ महाराष्ट्र गॅझेटिअर रायगड जिल्हा सन १९९३ पृष्ठ क्रं ७२१ वर दिला आहे. या परिसरात याला ‘जिजाऊ कुंड ’म्हणतात या कुंडात लोक मोठ्या श्रध्देने स्नान करतात.

गडावरील पहाण्याची ठिकाणे :
लोणवळ्याहून तुंगार्लीमार्गे राजमाचीला येतांना वाटेतच गावाच्या वेशीजवळ एक योध्द्याचे स्मारक ,अर्धवट तुटलेली तटबंदी, दरवाजाचे अवशेष,गणपती आणि मारुतीरायाची मूर्ती आहे. किल्ल्यावरून आजुबाजूचा दिसणारा परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. किल्ल्याच्या माचीवर वस्ती आहे तिला ‘उधेवाडी’ असे म्हणतात.
राजमाचीला पूर्व आणि दक्षिण दिशांना जी खोल दरी आहे ती ‘कातळदरा’ या नावाने ओळखली जाते. या दरीतूनच उल्हास नदी उगम पावते. या नदीच्या पश्चिमेकडील डोंगराला ‘भैरव डोंगर’ म्हणतात. अशा निसर्गसौंदर्याने नटलेल्या राजमाची किल्ल्याचे खरे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याचे दोन बालेकिल्ले श्रीवर्धन आणि मनरंजन, बालेकिल्ल्याकडे जातांना वाटेत खडकात खोदलेल्या गुहा लागतात. श्रीवर्धन आणि मनरंजन बालेकिल्ल्यांच्या मध्ये एक सखलपट्टी आहे, यावरच भैरवनाथाचे एक मंदिर आहे. मंदिरासमोरच ३ दिपमाळा आणि लक्ष्मीची मूर्ती आहे. येथून डावीकडे जाणारी वाट मनरंजन आणि उजवीकडची वाट श्रीवर्धन या बालेकिल्ल्यांवर जाणारी आहे.
१) उदयसागर तलाव :-
पावसाळयात हा तलाव ओसंडून वाहतो. तलावाच्या समोरील टेकाडं खाली उतरून गेल्यावर समोरच एक मोठे पठार लागते. पावसाळयात दरीतून पडणार्‍या धबधब्यांचे सुंदर दृष्य दिसते. हिरवीगार वनश्री अगणित धबधबे आणि सतत कोसळणारा पाऊस या अल्हाददायक वातावर.
२) मनरंजन:-
उंचीने श्रीवर्धनपेक्षा लहान असणार्‍या या बालेकिल्ल्यावर जाणरी वाट सोपी आहे. साधारण अर्ध्या तासात आपण बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारात पोहोचतो. या बालेकिल्ल्याचा दरवाजा हा गोमुखी आहे. बालेकिल्ल्यावर गेल्यावर उजवीकडच्या वाटेवर जुन्या काळातील किल्लेदारांच्या वाड्यांचे अवशेष दिसतात. त्यासमोरच छप्पर उडालेले उत्तम दगडीबांधकामाचे मंदिर आहे. या मंदिराच्या दरवाज्यावर गणेशाचे शिल्प कोरलेले आहे. दोन - चार पाण्याची टाकी आहेत. किल्ल्याची तटबंदी आजही काही प्रमाणात शाबूत आहे. येथून कर्नाळा, प्रबळगड, ईशाळगड, ढाकबहिरी, नागफणीचे टोक हा सर्व परिसर दिसतो.
३) श्रीवर्धन:-
राजमाचीच्या असणार्‍या दोन बालेकिल्ल्यांपैकी सर्वात उंच असा हा बालेकिल्ला आहे. श्रीवर्धनची तटबंदी आणि बुरुज आजही बर्‍यापैकी सुस्थितीत आहे. किल्ल्याला अनेक ठिकाणी दुहेरी तटबंदी असावी असे अवशेषांवरून दिसते. दरवाजाची कमान बर्‍यापैकी शाबूत आहे. दरवाजाच्याच बाजुला पहारेकर्‍यांच्या देवड्या आहेत. किल्ल्यावर जाण्याच्या वाटेवरच एक गुहा आणि पाण्याची दोन टाकी आहेत. या गुहा म्हणजे दारुगोळ्याचे कोठार आहे. बालेकिल्ल्याच्या माथ्यावर एक ध्वजस्तंभ आहे. समोरच ढाकबहिरीचा चित्तथरारक सुळका तर त्याच्या उजव्या हातास असणारा शिरोट्याचा नयनरम्य तलाव हा सर्व परिसर दिसतो.
४) शंकराचे मंदिर:-
तलावाच्या पश्चिमेला एक सुंदर कळशीदार शंकराचे मंदिर आहे. या मंदिरासमोरच गोमुख असून त्यातले पाणी समोरच्या टाक्यामध्ये पडते.

गडावर  पोहोचण्याच्या वाटा :
१) लोणावळ्याहून तुगांर्ली मार्गे:-
लोणावळ्याहून तुगांर्ली मार्गे राजमाची गावात यावे. ही वाट एकदंर १९ किमी ची आहे. वाटेने किल्ल्यावर जाण्यास ५ तास लागतात.
२) कर्जतहून कोंदीवडे मार्गे:-
कर्जतहून कोंदीवडे या गावात बसने यावे. इथून गडावर जाण्यास सुमारे ३ ते ४ तास लागतात.

राहाण्याची सोय :
१) उधेवाडी गावात राहण्याची उत्तम सोय होते. भैरवनाथाच्या मंदिरातही आणि बालेकिल्ल्यावर जातांना लागणार्‍या गुहेतही रहाता येते.
२) राजमाची रुलर एड एन्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम या संस्थेने बांधलेल्या खोल्यांमध्येही रहाण्याची व्यवस्था होते.
जेवणाची सोय : राजमाची गावात जेवणाची उत्तम सोय होते.
पाण्याची सोय : राजमाची गावात पाण्याची सोय होते.

गडावर जाण्यासाठी लागणारा वेळ : तुंगार्ली मार्गे ५ तास, कर्जत - कोंदिवडे मार्गे ४ तास लागतात.


नोट : वरील सर्व माहिती "  शिवकालीन महाराष्ट्र' "  या facebook  वरील पेज मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

प्रवास एका शिवभक्ताचा :- || किल्ले सागरगड ||

  

किल्ले सागरगड (खेडदूर्ग)




 किल्ल्याची ऊंची : १३५७  मी.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
 डोंगररांग : डोंगररांग नाही
 श्रेणी : मध्यम
जिल्हा :  रायगड 

मुंबईहून कोणत्याही ऋतूत एका दिवसात करण्यासारखा किल्ला म्हणजे सागरगड उर्फ खेडदूर्ग. अलिबागच्या समुद्र किनार्‍यावर आणि धरमतरच्या खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला. छ. शिवाजी महाराजांसारख्या दुरदृष्टीच्या राजाने सागरी किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी खांदेरी, कुलाबा, सर्जेकोट या किल्ल्यांची निर्मिती करेपर्यंत सागरगडावरच अलिबाग पट्यातील समुद्र किनार्‍याच्या रक्षणाची भिस्त होती. या किल्ल्याचे नाव सागरगड असले तरी समुद्रकिनार्‍यापासून हा किल्ला ५ मैल दूर आहे.

इतिहास :
सागरगड कोणी व केव्हा बांधला हे अज्ञात आहे. इ.स १६६० शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. त्यावेळी महाराजांनी गडावरुन खांदेरी - उंदेरी ही बेटे पाहिली व इंग्रज व सिध्दी यांच्यावर वचक बसविण्यासाठी खांदेरी बेटावर किल्ला बांधण्याची योजना आखली. इ.स. १६६५ मध्ये शिवाजी राजांनी मोगलांबरोबर केलेल्या पुरंदरच्या तहात जे २३ किल्ले मोगलांना दिले त्यात सागरगडचा (खेडदूर्ग) समावेश होता. आग्र्‍याहून सुटका झाल्यावर महाराजांनी सागरगड पुन्हा स्वराज्यात आणला.
संभाजीच्या मृत्यूनंतर माजलेल्या अंदाधुंदीत सागरगड सिध्दीने ताब्यात घेतला. पण कान्होजी आंग्रे, कुलाब्याचे भिवाजी गुजर, आरमार प्रमुख सिधोजी यांनी १६९८ साली सिध्दीकडून किल्ला जिंकून घेतला.
छत्रपती शाहू महाराज व ताराराणी यांच्या वादात कान्होजी आंग्रे ताराराणीच्या बाजूस होते. पण १७१३ मध्ये बाळजी विश्वनाथ पेशवे यांनी मुसद्देगिरीने छ. शाहू व कान्होजी आंग्रे यांच्यात समेट घडवून आणला. त्यावेळी १६ किल्ले कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यात सागरगडचा समावेश होता. कान्होजी आंग्रे यांच्या मृत्यूनंतर सागरगडचा ताबा येसाजीकडे गेला. मानाजी आंग्रे व यसाजी आंग्रे या भावांच्या भांडणात पोर्तुगिजांनी मानाजीची बाजू घेतली, मानाजीने येसाजीचा पराभव केला. त्यावेळी सागरगडाचा ताबा त्यांच्याकडे आला. इ.स. १७३८ मध्ये संभाजी आंग्रेने सागरगड मानाजी कडून जिंकून घेतला. इ.स. १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. इथला रम्य निसर्ग व अल्हाददायक वातावरण पाहून जनरल फूलर व काही इंग्रज अधिकार्‍यांनी येथे विश्रामधामे बांधली होती.

गडावरील पहाण्याची ठिकाणे :
सागरगडवर जाण्यासाठी आपल्याला एक डोंगर व पठार पार करुन जावे लागते. खंडाळे गावातून डोंगराकडे जाताना पावसाळ्यात दोन टप्प्यात पडणारा ‘‘धोंदाणे’’ धबधबा आपल्याला प्रथमदर्शनी दिसतो. या धबधब्याच्यावर सिध्देश्वर मंदिर व मठ आहे.
सागरगडाचे प्रवेशद्वार उध्वस्त झालेले आहे. सागरगडाचा आकार इंग्रजी ‘वाय’ अक्षरासारखा आहे. याच्या दोन सोंडापैकी डाव्या हाताच्या सोंडेपुढे काही अंतर सोडून वर आलेला एक उत्तुंग सुळका दिसतो. या सुळक्याला ‘वानरटोक’ म्हणतात.
किल्ल्यावरील उंचवट्याला ४ मीटर उंचीची तटबंदी व ५ बुरुज बांधून बालेकिल्ला बनवण्यात आला आहे. बालेकिल्ल्याच्या पुर्वेकडील तटबंदी समोर खोदलेला खंदक आता बुजलेला आहे. येथेच बालेकिल्ल्याचा चोर दरवाजा व ढासळलेली तटबंदी आहे. या ढासळलेल्या तटबंदीवर चढाई करुन बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो. बालेकिल्ल्यात उंचवट्यावर पत्र्याचे देऊळ आहे. त्यात महिषासूरमर्दिनी, गणपती व शिवलींग यांच्या दगडात कोरलेल्या मुर्त्या आहेत. मंदिराच्या खालच्या बाजूला कड्याच्या टोकाला पाण्याचे कुंड आहे. या कुंडातील गोमुखातून नितळ पाण्याची संततधार पडत असते.
कुंडाच्या पुढे किल्ल्याच्या दोन सोंडा दोन बाजूला जातात. उजव्याबाजूच्या सोंडेवर एक समाधी आहे. त्याला सतीचा माळ म्हणतात. डाव्या बाजूच्या सोंडेवर इंग्रजांनी बांधलेल्या विश्रामधामाचे अवशेष आहेत. किल्ल्यावरुन खांदेरी- उंदेरी हे किल्ले, अलिबागथळचा समुद्रकिनारा, धरमतरची खाडी, माथेरान, प्रबळगड हे किल्ले, चौलची खाडी असा मोठा परिसर दृष्टीक्षेपात येतो.

गडावर पोहोचण्याच्या वाटा :
गडावर जाण्याची मुख्य वाट मुंबई - अलिबाग रस्त्यावरील खंडाळे गावातून आहे. मुंबईहून अलिबागला जाताना कार्ला खिंड ओलांडल्यावर अलिबागच्या अलिकडे ४ किमी अंतरावर खंडाळे गाव लागते. या गावात (अलिबाग कडे जाताना डाव्या हाताला) जाणारा रस्ता एका डोंगराच्या पायथ्याशी जातो. या डोंगरामागे सागरगड लपलेला आहे. या डोंगराच्या पायथ्याशी जाणारी सडक अर्धी कच्ची आहे, त्यामुळे पावसाळा सोडल्यास गाडी पायथ्यापर्यंत नेते येते, डोंगराच्या पायथ्याशी ओढा आहे. ओढा ओलांडल्यावर बांधीव पायर्‍यांची वाट डोंगरावर जाते. उभ्या चढणाची ही वाट अर्धा तास चढल्यावर आपल्याला २ वाटा लागतात. त्यातील उजव्या हाताच्या वाटेने आपण २ मिनीटात एका टेपावर येतो. तेथून समोरच दोन टप्प्यात पडणार्‍या धबधब्याचे विहंगम दृश्य दिसते. परत मुळ वाटेवर आल्यावर अर्ध्या तासात आपण सिध्देश्वर मंदिरात येतो.
सिध्देश्वर मंदिराच्या अलिकडे असलेली वाट डोंगर पठारावरील सागरगड माची गावात अर्ध्यातासात नेते. याच वाटेने गावातून पुढे गेल्यावर व डोंगराला वळसा घातल्यावर सागरगडाची तटबंदी दिसू लागते. अजून अर्ध्यातासात आपण कोसळलेली तटबंदी चढून बाले किल्ल्यात प्रवेश करतो.
सागरगड माची गावातून सागरगडाकडे जाताना ठिकठिकाणी दगडावर बाणांच्या खुणा केल्या आहेत, त्या पाहूनच पुढे जाणे. विशेषत: पावसाळ्यात धुक्यामुळे वाट चुकण्याचा संभव असतो. याशिवाय गडावर पोयनाडहून वाघोली मार्गे जाता येते. तसेच वडवली गावातून गडावर जाता येते.

गडावर राहाण्याची सोय : गडावर रहाण्याची सोय नाही, सिध्देश्वर मंदिरात किंवा सागरगडमाचीवरील शाळेत रहाण्याची सोय होऊ शकेल. खंडाळे गावातील समाजमंदिरात रात्री पथारी पसरता येईल.
जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही, परंतू सिध्देश्वर मठात चहा मिळू शकतो.
पाण्याची सोय : गडावर पाण्याची सोय आहे.

गडावर जाण्यासाठी लागणारा वेळ : खंडाळे गावातून २ तास लागतात.

   नोट : वरील सर्व माहिती "  शिवकालीन महाराष्ट्र' "  या facebook  वरील पेज मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल . 

Saturday 20 July 2013

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले मुल्हेरगड।।


मुल्हेर किल्ला

किल्ल्याची ऊंची : ४२९० मी.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
 डोंगररांग: सह्याद्री - बागलाण
 श्रेणी : मध्यम
जिल्हा : नाशिक

सह्याद्री पर्वताच्या उत्तरदक्षिण रांगेची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील बागलाणातून होते. उत्तरेकडून सुरू होणार्‍या या सह्याद्रीच्या रांगेला सेलबारी आणि डोलबारी रांग असे म्हणतात. सेलबारी रांगेवर मांगीतुंगी सुळके, न्हावीगड, तांबोळ्या असे गड आहेत. तर दुसर्‍या डोलबारी रांगेवर मुल्हेर, मोरागड, साल्हेर, हरगड, सालोटा हे गडकिल्ले आहेत. पश्चिमेकडील गुजरात मधील घनदाट जंगल असलेला डांगचा प्रदेश आणि महाराष्ट्रातील बागलाण विभाग यांच्या सीमेवर हे किल्ले वसलेले आहेत.
 मुल्हेरचा किल्ला हा नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यात आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी मुल्हेर नावाचे गाव आहे.

इतिहास :
हा किल्ला तसा प्राचीन आहे. पूर्वी किल्ल्यातच गाव वसलेले होते. मात्र कालांतराने गाव खाली उतरले आणि पायथ्यापासून सुमारे २ किमी अंतरावर वसले आहे. हे मुल्हेर गाव महाभारतकालीन आहे, याचे नाव होते. रत्नपूर या भागात मयूरध्वज नावाचा राजा होऊन गेला आणि गावाला मयूरपूर नाव पडले. तर किल्ल्याला मयूरगड हे नाव पडले. औरंगजेबाने किल्ला जिंकला तेव्हा याचे नाव औरंगगड असे ठेवण्यात आले.
पुराणात मुल्हेरचा उल्लेख येतो. मात्र खात्रीलायक माहिती चौदाव्या शतकाच्या पहिल्या दशकात मिळते. मुल्हेरचा किल्ला बागुल राजांनी बांधला. इ.स १३०८ ते १६१९ पर्यंत बागुलांनी येथे राज्य केले. या घराण्याच्या नावावरूनच परिसराला बागुलगेड व त्याचा अपभ्रंश बागलाण हे नाव पडले. बागुल राजे हे मुळचे कनोजचे या बागुल घराण्याच्या काळातच जगप्रसिद्ध मुल्हेरी मूठ बनवण्यात आली. या घराण्यात एकूण ११ राजे झाले. या राजांना बहिर्जी ही पदवी होती. विजयनगरमध्ये हिंदू सत्ता प्रस्थापित होण्यापूर्वी कितीतरी अगोदर बागलाण मध्ये हिंदूसत्ता प्रस्थापित होती.

गडावरील पहाण्याची ठिकाणे :
मुल्हेरगडाचे प्रामुख्याने २ भाग पडतात. एक म्हणजे मुल्हेर माची आणि मुल्हेर बालेकिल्ला. गणेशमंदिरा पासून २ वाटा फुटतात. एक वाट वर चढत जाते व दुसर्‍या वाटेला येऊन मिळते. या वाटेने डावीकडे गेल्यावर १० मिनिटांतच सोमेश्वर मंदिर लागते. तर उजवीककडे जाणारी वाट आणि गणेशमंदिरा पासून निघणारी उजवीकडची वाट एकत्र येऊन मिळतात. याच वाटेने थोडे पुढे गेल्यावर एक पठार लागते. पठारापासून दोन वाटा लागतात वर जाणारी वाट मोती तलावापाशी जाते. या टाक्यातील पाणी पिण्यास योग्य आहे. पठारापासून समोर जाणारी वाट राजवाड्यांच्या भग्न अवशेषांपाशी घेऊन जाते. येथेच एक गुप्त दरवाजादेखील आहे. राजवाड्यांच्या थोडे खाली आल्यावर रामलक्ष्मण मंदिर लागते. राजवाड्यांच्या वाटेने थोडे अंतर चालून गेल्यावर मुल्हेर व हरगड यांमधील खिंड लागते. सोमेश्वर मंदिराकडे जात असताना वाटेतच डावीकडे ३ मजली चंदनबाव लागते. सध्या येथे प्रचंड झाडी झुडूपे आहेत. सोमेश्वर मंदिर राहण्यासाठी उत्तम जागा आहे. मोती टाक्यांच्या उजवीकडे वर चढत जाणार्‍या वाटेने अर्धा तास चालल्यावर आपण बालेकिल्ल्याच्या महाद्वारापाशी येऊन पोहोचतो. आत गेल्यावर डावीकडे गुहा आहेत, तर समोरच पाण्याचं टाकं आहे. मुल्हेरगडाचा बालेकिल्ला म्हणजे मोठे पठार आहे. बालेकिल्ल्यावर पोहोचल्यावर समोरच पाण्याची ९ - १० टाकी आहेत. राजवाड्याचे भग्नावशेष, भडंगनाथांचे मंदिर या सर्व गोष्टी आहेत. भडंगनाथांच्या मंदिराच्या वर असणार्‍या टेकडीवरून खाली उतरलो की मोरागडाकडे जाणारी वाट दिसते. समोरच असणारी मांगीतुंगीची शिखरे, न्हावीगड, तांबोळ्या, हनुमानगड लक्ष वेधून घेतात.

गडावर पोहोचण्याच्या वाटा :
मुल्हेर किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा अस्तित्वात आहेत. या दोन्ही वाटा मुल्हेर गावातूनच जातात. मुल्हेर गाव ते किल्ल्याचा पायथा यात २ किमीचे अंतर आहे. गावातून २५ मिनिटे चालत पुढे गेल्यावर डावीकडे एक घर लागते, आणि समोरच वडाचे एक झाड दिसते. झाडापासून सरळ पुढे जावे. दहा मिनिटांतच धनगरवाडी लागते. धनगरवाडी वरून जाणारी वाट पकडावी. साधारण ४५ मिनिटांनी २ वाटा फुटतात एक वाट सरळ तर दुसरी उजवीकडे वळते.
१. सरळ वाट : सरळ जाणार्‍या वाटेने २० मिनिटांत मुल्हेर माचीवरील गणेश मंदिरापाशी पोहचतो. या वाटेने गडावर प्रवेश करताना ३ दरवाजे लागतात. ते सर्व ढासळलेल्या अवस्थेत आहेत. वाट साधी व सोपी आहे. या वाटेने गडावर पोहोचण्यास दीड तास लागतो.
२. उजवीकडची वाट : उजवीकडच्या वाटेने गेल्यावर दोन तासांनी आपण मुल्हेरमाची वरील गणेश मंदिरात पोहचतो. या वाटेनेही गडावर प्रवेश करताना ३ दरवाजे लागतात. ही वाट जरा दूरची आहे ही वाट हरगड व मुल्हेर किल्ला यांच्या खिंडीतून वर चढते. या खिंडीतून डावीकडे मुल्हेर, तर उजवीकडे हरगड लागतो. या वाटेने गडावर पोहचण्यास ३ तास लागतात.

गडावर राहाण्याची सोय : मुल्हेरमाची वरील सोमेश्वर आणि गणेश मंदिरात आणि बालेकिल्ल्यावर असणार्‍या गुहेत राहता येते.
गडावर जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वत: करावी.
गडावर पाण्याची सोय : गडावरील मोती टाक्यातील पाणी पिण्यास योग्य आहे. मात्र हे पाणी फेब्रुवारी पर्यंतच उपलब्ध असते.
गडावर जाण्यासाठी लागणारा वेळ : मुल्हेर गावातूनच साधारण २ तास लागतात .खिंडीतल्या वाटेने ३ तास लागतात.
 
 ||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

  नोट : वरील सर्व माहिती " महाराष्ट्रातील किल्ले "  या facebook  वरील पेज मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल . 

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले मोरागड।।

 मोरागड किल्ला
किल्ल्याची उंची : ४५००  मी.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग.
डोंगररांगः बागलाण.
 श्रेणी : मध्यम.
जिल्हा :  नाशिक.

इतिहास :
 भौगोलिक दृष्टया पाहिले तर मोरागड हा मुल्हेर किल्ल्याचाच एक भाग आहे. मोरागड म्हणजे मुल्हेर किल्ल्याचा दुसरा बालेकिल्लाच होय. इतिहासात या गडाचा स्वतंत्र असा उल्लेख करणारे एकही कागदपत्र उपलब्ध नाही.

गडावरील पहाण्याची ठिकाणे :
गडमाथ्यावर जाताना दुसर्‍या दरवाजाच्याजवळ एक गुहा आहे. गडमाथा म्हणजे एक पठारच होय. माथ्यावर दोन ते तीन पाण्याची टाकी आहेत. एक सुंदर बांधीव तलाव आहे. दोन तीन वाड्यांचे अवशेष आपले अस्तित्व टिकवून आहेत. बाकी गडावर काही नाही. गडावरून मुल्हेरचे पठार व माची, हरगड, मांगीतुंगी, न्हावीगड, तांबोळ्या, हनुमान टेकडी यांचे विहंगम दृश्य दिसते.

गडावर पोहोचण्याच्या वाटा :
मोरागडावर जाणारी एकच वाट आहे. ती मुल्हेरगडाच्या बालेकिल्ल्यावरून जाते. मुल्हेरगडाच्या बालेकिल्ल्यावर भडंगनाथाच्या मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यावर उजवीकडे वर जाणारी वाट पकडावी. या वाटेने थोडे वर गेल्यावर समोरच खाली मोरागडाकडे जाणारी वाट दिसते. येथून मोरागडावर जाण्यास अर्धा तास पुरतो. मुल्हेरमाचीवर असणार्‍या सोमेश्वर मंदिरापासून वर जाणारी वाटसुद्धा मोरागडावर जाते. पुढे या दोन्ही वाटा एकमेकांना मिळतात. गडावर जातांना तीन दरवाजे लागतात.

गडावर राहाण्याची सोय : मोरागडावर राहण्याची सोय नाही. मात्र मुल्हेर किल्ल्यावर आपण राहू शकतो.

गडावर जेवणाची सोय : जेवणाची सोय आपणं स्वत: करावी.

गडावर पाण्याची सोय : पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत, मात्र गडावर उन्ह्याळ्यात पाणी नसते.

गडावर जाण्यासाठी लागणारा वेळ : मुल्हेरगडावरून ४५ मिनिटे लागतात.

सूचना  :
साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरागड, हरगड हे आसपासचे किल्ले ३ दिवसात पाहाता येतात.

  ||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

 नोट : वरील सर्व माहिती ""   महाराष्ट्रातील किल्ले "  या facebook  वरील पेज मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

Tuesday 16 July 2013

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले रांगणा ।।

किल्ले रांगणा
  किल्ल्याची उंची : ----- मी.
किल्ल्याचा प्रकार : वनदुर्ग.
डोंगर रांगा : सहयाद्री.
 श्रेणी : मध्यम .
जिल्हा : कोल्हापूर .

किल्ले रांगणा उर्फ प्रसिध्दगड सहयाद्रीच्या धारेतून दक्षिणेस पसरलेल्या, पण घाटमाथ्यापासून अलग झालेल्या डोंगरावर तसेच देश, कोकण व गोवा यापासून जवळ मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे. छत्रपतींच्या आवडत्या किल्ल्यामध्ये याचा समावेश होता, म्हणूनच १७८१ च्या एका ऐतिहासिक कागदपत्रात, ‘येक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित नाहीतर सकल सावंत बारदेशावर उतरेल’ असा उल्लेख आलेला आहे. गडाच्या रांगडेपणाच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हयात असलेल्या १३ किल्ल्यांमध्ये रांगण्याचा पहिला क्रमांक लागतो.
रांगणा किल्ल्यावर जाण्यापूर्वी पाटगांव येथील श्री मौनी महाराजांच्या मठाला भेट देणे आवश्यक आहे. याच ठिकाणी छत्रपतींनी दक्षिण दिग्विजयास जाताना ,१६७६ मध्ये मौनी महाराजांचे आशीर्वाद घेतले होते, या मठास छत्रपती शिवाजी, संभाजी, राजाराम, राणी ताराबाई व राजर्षी छत्रपती शाहू यांनी सनदा दिलेल्या आहेत. मठाच्या मागील पायवाटेने पुढे चालत गेल्यावर भद्रकालीचे यादवकालीन मंदिर लागते. ओवर्‍या, दिपमाळा अशा जुन्या वास्तुंनी मंदिराचा परिसर सजलेला आहे.

इतिहास :
रांगणा किल्ला बांधण्याचे श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा याच्याकडे जाते. १४७० मध्ये तो महंमद गवानने जिंकला. त्यावेळी महंमद गवानने काढलेले उद्गार होते, ‘अल्लाच्या कृपेने रांगणा ताब्यात आला. त्यात मर्दमुकीबरोबर संपत्तीही खर्च करावी लागली’.
बहामनी साम्राज्य लयाला गेल्यानंतर हा किल्ला अदिलशाहीत आला. शिवकाळात अदिलशाही सरदार सावंतवाडीचे सावंतांकडे हा गड होता. सन १६५८ मध्ये विजापूरचा सरदार रुस्तम जमानने हा गड सावंताकडून घेतला. शिवरायांचे कोकणातील अधिकारी राहुजी पंडित यांनी रुस्तम जमानकडून हा किल्ला घेतला. पुढे अदिलशहाने रांगण्याविरुध्द मोहिम उघडली. त्यावेळी छत्रपती आग्य्राला कैदेत होते. स्वराज्याच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. अशा बिकट प्रसंगी स्वत:… जिजाबाईंनी खास मोहिम काढून दि १५/०८/१६६६ रोजी रांगणा जिंकला. ही एक अद्‌भूत घटना रांगण्याचे स्वराज्यातील महत्व अधोरेखीत करते. दि १७/०८/ १६६६ रोजी महाराजांनी आग्य्राच्या कैदेतून पलायन केले. १४ एप्रिल ते १२ मे १६६७ या काळात रांगण्याला बहलोलखान व व्यंकोजी भोसले यांनी वेढा दिला होता. परंतु शिवरायांनी जातीने येऊन हा वेढा मोडून काढला. शिवरायांनी या गडाच्या मजबुतीकरणासाठी ६००० होन खर्च केल्याचा पुरावा सापडतो.
औरंगजेबाला दख्खन मोहिमेत हा किल्ला जिंकता आला नाही. वारणेच्या तहानुसार रांगण्याचा ताबा करवीरकर छत्रपतींकडे आला. शाहू - ताराबाई संघर्षात पन्हाळयावरुन निघून ताराबाई या गडावर वास्तव्यास आल्या होत्या. सन १७०८ मध्ये सातारकरांनी गडास वेढा दिला, त्यावेळी ताराबाईला सिंधुदुर्गावर पाठवून रामचंद्र पंत अमात्यानी व पिराजी घोरपडे यांनी किल्ला ३ महिने लढविला. पावसाळा सुरु झाल्यामुळे छत्रपती शाहूनी वेढा आटोपता घेतला.
सावंतवाडीकरांवर कायम दबाव ठेवण्यासाठी करवीरकराच्या दृष्टीने रांगण्याला विशेष महत्व होते. सावंतवाडीकरांच्या वतीने जिव्हाजी विश्राम यांनी फितुरीने रांगणा हस्तगत केला होता. परंतु करवीरकरांचा निधडया छातीचा वीर सुभान यशवंतराव शिंदे यांनी अडीच महिने झुंज देऊन गड हस्तगत केला. करवीरकरांचे महास्थल म्हणून या गडाचा उल्लेख त्यावेळच्या कागदपत्रात वारंवार येतो. पुढे सावंतवाडीकरांनी करवीरकरांशी एकनिष्ठ राहाण्याचे ठरविले व रांगणा इंग्रजाचे राज्य येई पर्यंत करवीरकरांकडे राहिला.

गडावरील पहाण्याची ठिकाणे :
सहयाद्रीतील प्रत्येक गडात प्रवेश करण्यासाठी डोंगरावर चढाई करावे लागते. परंतु रांगण्यात प्रवेश करण्यासाठी चक्क उतार उतरुन गडात प्रवेश करावा लागतो. गडाच्या भव्य बुरुजाच्या डाव्या बाजूने दरीच्या माथ्यावरुन जाणार्‍या छोटया वाटेने पुढे गेल्यावर गडाचा पहिला भग्न दरवाजा लागतो. प्रवेशद्वार परिसराची रचना युध्दशास्त्रातील ‘रणमंडळ’ या संज्ञेप्रमाणे आहे. ती घटकाभर थांबून समजून घ्यावी अशी आहे.
पहिल्या प्रवेशाद्वारातून पुढे गेल्यावर बुरुजाचे संरक्षण देऊन लपविलेला गडाचा दुसरा दरवाजा लागतो. याच्या आत पहारेकर्‍यांच्या देवडया आहेत. या दरवाज्याच्या उजव्या अंगाने जाणार्‍या पायवाटेने गेल्यावर एक कोरडा तलाव लागतो. येथून पुढे जांभ्या दगडात बांधलेली जोती दिसतात. गडाच्या या भागात दोन्ही बाजूने भक्कम तट असून त्यावर चढण्यासाठी जिने आहेत. शेवटी भव्य बुरुजात एक हनुमंताचे शिल्प कोरलेला चोर दरवाजा आहे. परंतु तो दगडांनी चिणलेला आहे. येथून पुन्हा माघारी दुसर्‍या दरवाज्याजवळ यायचे. समोरच उजव्या हातास वाडयाची चौकट दिसते. चौकटीतून आत गेल्यावर विहिर लागते. वाडयाच्या भिंतीजवळ फारसी शिलालेख आहे. वाडा पाहून पुढे गेल्यावर समोरच गडाचा तिसरा भक्कम दरवाजा लागतो. त्याला चार कमानी आहेत. दरवाज्यातून आत गेल्यावर सरळ पायवाटेने पुढे गेल्यास बारमाही भरलेला तलाव लागतो. तलावाच्या दुसर्‍या बाजूस अनेक समाध्या दिसतात. एका कोपर्‍यात भग्न शिवमंदिर दिसते. यानंतर ओढा पार करुन आपण रांगणाई मंदिराजवळ येतो.
रांगणाई देवीचे मंदिर प्रशस्त असून, मुक्कामास योग्य आहे. मंदिरात रांगणाई देवीची ढाल, तलवार, त्रिशूळ इत्यादी आयुधे घेतलेली मुर्ती आहे. रांगणाईच्या उजव्या हाताला विष्णूची मुर्ती व डाव्या हाताला भैरवाची मुर्ती आहे. या ठिकाणी एक फारसी शिलालेखाचा दगड आहे. मंदिरासमोरच दिपमाळ आहे. रांगणाई मंदिराच्या उजव्या बाजूला मारुतीचे मंदिर आहे. जवळच कोरडी विहिर आहे.
यापुढे दाट जंगल असल्याने आपण पुन्हा तिसर्‍या दरवाज्यापर्यंत माघारी यायचे. तलावाकडे तोंड उभे राहिल्यास डाव्या हाताने जाणार्‍या पायवाटेने चालू लागायचे. वाटेत छोटेसे गणेशमंदिर लागते. तटबंदीच्या बाजूने चालू लागल्यावर एक तलाव लागतो. या तलावाच्या काठावर देवळीमध्ये शिवलिंग आहे. पिंडीस दोन लिंगे आहेत. हे पाहून तटाच्या बाजून पुढे चालू लागल्यावर काही पायर्‍या उतरल्यावर एक दरवाजा लागतो. या दरवाजाच्या डाव्या बाजूस तटबंदीमध्ये गोल तोंडाची विहिर आहे. पुढे चालून गेल्यावर आपण गडाच्या हत्तीसोंड माचीवर पोहोचतो. ही संपूर्ण माची राजगडाच्या संजिवनी माचीप्रमाणे तटबंदीने संरक्षित केलेली आहे. तटबंदीला पायर्‍याही आहेत. तटाच्या उजव्या हाताच्या उतारावर चिलखती बुरुज आहे. हा बुरुज पाहून आपण वर यायचे व सोंडेच्या टोकावर असलेल्या चोर दरवाज्यात उतरायचे. माथ्यावर बारा कमानी असलेला दगडात खोदून काढलेला हा दरवाजा आहे. या दरवाज्यातून उतरण्यासाठी पायर्‍या असून त्या उतरल्यावर आपण दरीच्या तोंडावर येतो, तेव्हा सावधपणा बाळगावा. तटाकडेने पुढे चालत राहिल्यावर आपणास आणखी एक भव्य दरवाजा लागतो. या दरवाज्यातून उतरणारी वाट केरवडे गावात जाते. हा दरवाजा गोमुखी बांधणीचा आहे.
तटाकडेने पुढे चालत राहिल्यावर आपण पश्चिमेकडील कोकण दरवाजाच्या माथ्यावर येऊन पोहोचतो. या दरवाज्यावर गोल बुरुज आहे. या दरवाज्यातून उतरणारी वाट कोकणातील नारुर गावास जाते. कोकण दरवाजा रांगणाई देवी मंदिराच्या बरोबर मागे असल्याने आपण पायवाटेने १५ मिनिटात मंदिरात येऊन पोहोचतो. आपल्याकडे पुरेसा वेळ असल्यास भटवाडीत मुक्काम करुन आपणांस सिध्दाच्या गुहा पाहता येतात.

गडावर जाण्याच्या वाटा :
१) कोल्हापूरहून गारगोटी - कडगाव मार्गे पारगाव गाठायचे. पाटगाव पासून तांब्याचीवाडी मार्गे भटवाडी गाठायची. पाटगाव ते भटवाडी १० - १२ किमीचे अंतर असावे. भटवाडी पासून पुढे ४५ किमी वर चिक्केवाडी आहे. मोठी गाडी तांब्याच्या वाडी पर्यंत जाते, पण छोटी गाडी असेल तर ती चिक्केवाडी पर्यंत जाऊ शकते. अन्यथा तांब्याची वाडी ते चिकेवाडी अंतर पायीच कापावे लागते.
भटवाडीत पोहोचल्यावर गावाच्या मधून जाणार्‍या रस्त्याने आपण धरणाच्या भिंतीजवळ पोहोचतो. येथून उजव्या हाताने लाल मातीचा गाडी रस्ता सुरु होतो. या रस्त्याने आपण तळीवाडी मार्गे चिक्केवाडीला पोहोचायचे. चिक्केवाडीतून एक ठळक पायवाट रांगण्यास जाते. वाटेत एक दगडी उंबरठा व चौकीचे अवशेष दिसतात. यापुढे येणारी खिंड पार करुन उतरल्यावर आपण रांगण्यासमोरील पठारावर येतो. या पठाराच्या मागच्या झाडीत उजव्या हाताला बांदेश्वराचे मंदिर आहे. येथे विष्णू व गणेशाची भान हरपवणारी मूर्ती आहे. मंदिरासमोर एक जुनी समाधी आहे.
२) याशिवाय रांगण्यावर जाण्यासाठी कोकणातील कुडाळजवळील नारुर आणि केखडे गावातून सुद्धा वाट आहे.

गडावर जाण्यासाठी लागणारा वेळ : गड पाहाण्यासाठी लागणारा कालावधी अंदाजे ३ ते ४ तास.
 
गडावर राहाण्याची सोय : रांगणाई देवीचे मंदिर प्रशस्त असून, मुक्कामास योग्य आहे.

गडावर जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय आपण स्वत: करावी.

गडावर पाण्याची सोय : गडावरील तलावात पिण्यायोग्य पाणी आहे.


नोट : वरील सर्व माहिती facebook  वरील "  महाराष्ट्रातील किल्ले "  ग्रौप मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

Saturday 6 July 2013

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले भैरवगड ।।

भैरवगड
 किल्ल्याची उंची : २०००  मी.
किल्ल्याचा प्रकार : वनदुर्ग.
डोंगर रांगा : महाबळेश्र्वर
 श्रेणी : मध्यम .
जिल्हा : सातारा .

भैरवगड कोयनानगरच्या विभागात मोडणारा किल्ला आहे. येथील किल्ल्यांचे वैशिष्ट म्हणजे सर्व किल्ले घाटमाथ्याच्या सलग रांगेपासून दुरावलेले आहेत. त्यामुळे दुरून हे किल्ले दिसत नाही. घनदाट जंगल हे येथील मुख्य आकर्षण. हे अरण्य अभयारण्य म्हणून धोषित करण्यात आल्याने येथील सर्व गावांचे स्थलांतर करून ती अरण्याबाहेर बसवण्यात आली आहेत. त्यामुळे माणसांचा वावर तसा कमीच. पायथ्याची गावं गाठण्यासाठी एस. टी. ची चांगली सोय आहे.

 इतिहास : इतिहासात या गडाचा उल्लेख कोठेही आढळत नाही. मात्र या गडाचा वापर केवळ टेहळणी साठी असावा असे येथील बांधकामावरून दिसते.

 गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : भैरवगडावर पाहण्यासारखे फार काहीच नाही. गडावर एक मंदिर आहे. मंदिर फारच प्रशस्त आहे. मंदिर मजबूत आणि कौलांनी शाकारलेले आहे. मंदिरात भेरी देवी, श्री तुळा देवी, श्री वाघजाई देवी यांच्या २-३ फुटी मूर्ती आहेत. या लाकडी मंदिरावर बरेसचे कोरीव काम आढळते. मंदिरासमोरच्या प्राकारात तुळशीवृंदावन, शंकराच्या पिंडीचा चबुतरा दिसतो. तसेच समोर दोन तीन खांब देखील दिसतात. समोरच शंकराचे मंदिर सुद्धा आहे. मंदिरासमोरच खाली उतरणार्‍या वाटेने थोडे पुढे गेल्यावर दोन तीन बुरूज लागतात. येथून थोडे पुढे गेल्यावर एक ढासळलेल्या अवस्थेतील दरवाजा आहे. या दरवाजातून पुढे गेल्यावर डावीकडे वळावे. समोर असणार्‍या टेकाडाला वळसा मारून गडाच्या मागील बाजूस यावे. येथे पाण्याची दोन टाकी आहेत. यातील पाणी पिण्यास उपयुक्त असून ते बारमाही टिकते. याच्यापुढे पाहण्यासारखे काहीच नाही. लांबवर पसरलेलं कोयनेचं दाट जंगल दिसते. गडमाथा तसा अरुंदच आहे. त्यामुळे २ तासात गड फिरून होतो. मंदिराच्या दिशेने तोंड करून उभे राहिल्यास उजवीकडे दरीत उतरणार्‍या वाटेने ५ मिनिटे खाली उतरावे. येथे सुद्धा पाण्याचं एक टाकं आहे. मात्र हे पाणी मार्चपर्यंतच असते.

गडावर जाण्याच्या वाटा : भैरवगडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत. एक थेट कोकणातून वर चढते तर दुसरी हेळवाकच्या रामघळीत पासून गडावर जाते. तिसरी गव्हारे गावातून आहे. १. दुर्गवाडी मार्गेः या मार्गेभैरवगडावर येण्यासाठी प्रथम चिपळूण गाठावे. चिपळूण वरून दुर्गवाडी हे पायथ्याचे गाव गाठावे. चिपळूण ते दुर्गवाडी अशी ८ः०० वाजताची बस आहे. दुर्गवाडी पर्यंत येण्यास साधारणतः १ तास लागतो. दुर्गवाडी गावाच्या वर असणार्‍या जंगलातून वाट थेट गडावर जाते. या वाटेने गड गाठण्यास ३ तास लागतात. वाट तशी सरळच असली तरी दमछाक करणारी आहे. गव्हारे गावातून येणारी वाटसुद्धा या वाटेलाच येऊन मिळते. वाटेत कुठेही पाणी नाही. २. हेळवाकची रामघळ मार्गेः हेळवाकच्या रामघळीत जाण्यासाठी चिपळूण किंवा कराड गाठावे. चिपळूण - कराड रस्त्यावर कुभांर्ली घाट पार केल्यावर हेळवाक नावाचा फाटा लागतो. तेथे उतरून २ तासांत रामघळ गाठावी. रामघळीतूनच वर जाणारा रस्ता पकडावा. पाथरपुंज जुना वाघोना मार्गावरून आपण भैरवगडावर जाऊ शकतो. मात्र हा पल्ला फारच लांबचा असल्याने गड गाठण्यास ६ तास लागतात. वाटेत खूप घनदाट जंगल लागते. वाट तशी मळलेली नसल्याने हरवण्याचा संभव खूपच आहे. या वाटेने जायचे असल्यास वाटाडया घेऊन जाणे आवश्यक आहे. ३. गव्हारे मार्गेः गडावर जाण्यासाठी गव्हारे गावातूनही वाट आहे. दुर्गवाडी गावाच्या अगोदर गव्हारे गावाकडे जाणारा गाडीरस्ता लागतो. या गाडीरस्त्याने गव्हारे गावात पोहचावे. गावातून गडावर जाण्यास तीन तास पुरतात. ही वाट मध्येच दुर्गवाडी गावातून येणार्‍या वाटेस मिळते.

गडावर राहण्याची सोय : गडावरील मंदिरात २० जणांना राहता येते.
गडावर जेवणाची सोय : आपण स्वतः करावी.
गडावर पाण्याची सोय : बारमाही पिण्याच्या पाण्याची सोय आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ : ३ तास - दुर्गवाडी मार्गे. ७ तास - रामघळी मार्गे.

सूचना : पावसाळ्यात जळवांचा त्रास फार मोठा प्रमाणात होतो. यापासून बचाव करण्यासाठी मीठ सोबत घेऊन जाणे.

 ||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

 नोट : वरील सर्व माहिती facebook  वरील "  महाराष्ट्रातील किल्ले "  ग्रौप मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .