Saturday 23 June 2012

|| शिवकालीन नौका ||


छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमाराविषयीचे धोरण आज्ञापत्रात स्पष्ट दिसते.‘ज्याचे आरमार त्याचा समुद्र’ हे त्यांनी पुरेपूर ओळखले होते.आरमाराला साथ देण्याकरीता त्यांनी जलदुर्गांची एक शृंखलाच कोकण किनारपट्टीवर उभी केली.


छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमाराविषयीचे धोरण " ज्याचे आरमार त्याचा समुद्र "


शिवकालीन नौका :

१. संदेश वाहक होडी- हा होडीचा सर्वात लहान प्रकार असून तो केवळ वल्हवता येत असे.यावर डोलकाठी नसत क्वचितच एखादे शिड असे. होड्या केवळ संदेश आणि पिण्याचे पाणी ने आण करण्याकरिता वापरल्या जात.


. मचवा – मचवा हे एक छोटे जहाज असून ते वल्हवता येत असे.त्यावर सुमार २५-४० सैनिक असत.हे जहाज त्वरेने हालचाल करत असे.ह्यावर शक्यतो तोफा नसत व केवळ छर्रे व ठासणीची बंदुके असणारी शिपायांची तुकडी असे. असलीच तर लहान पल्ल्याची व छोटे गोळे फेकणारी एक तोफ मचव्यावर असत व तोफ असताना सैनिकांची संख्या कमी असे.


. शिबाड – शिबाड हा मालवाहू जहाजाचा प्रकार आहे त्यावर तोफा बसवून ते युद्धासाठीही वापरता येत असे.यावर एक डोलकाठी व शिड असून हे जहाज वल्हवता येत नसे. ते केवळ वारयाच्या आधारे एकाच दिशेने चालत असे.


 ४ .गुराब – हे जहाज शिबाडापेक्षा मोठे असून त्यावर किमान २ व क्वचित ३ डोलकाठ्या असत व प्रत्येक डोलकाठीवर २ चौकोनी शिड असत व बऱ्याचदा एक लहान त्रिकोणी शिडही असे.ह्यामुळे ते विविध दिशांच्या वाऱ्याच उपयोग करून विविध दिशांना चालवता येत असे.गुराबेवर जहाजाच्या लाम्बीशी काटकोनात प्रत्येक बाजूने ५-७ तसेच नाळेवर समोरून व पिछाडीस एक तोफ असे.या तोफा माध्यम पल्ल्याच्या असून त्या ५-६ पौंड वजनाचे गोळे फेकू शकत. ह्यावर सुमार १००-१५० सैनिक असत .


||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||


॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥


Monday 18 June 2012

प्रवास एका शिवभक्ताचा :: " शिवतीर्थ : किल्ले रायगड "


  हिंदवी स्वराज्याची  राजधानी हिंदवी स्वराज्यातील सर्व छत्रपती शिवभक्ताची पंढरी :: " शिवतीर्थ : किल्ले रायगड "  ला भेट दिल्यावर सर्व शिवभक्तांनी पहावयाची ठिकाणे याची थोडक्यात माहिती .



. पाचाडचा जिजाउंचा वाडा : उतारवयात  जिजाउंना गडावरची थंड हवा, वारा मानवत नसे, म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाडाची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायऱ्यांची एक उत्तम विहीर, तसेच जिजाउंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास ‘तक्क्याची विहीर’ असेही म्हणतात.

२. खुबलढा बुरूज : गड चढू लागले म्हणजे एक बुरुजाचे ठिकाण दिसते, तोच हा सुप्रसिद्ध खुबलढा बुरूज. बुरुजाशेजारी एक दरवाजा होता, त्यास ‘चित्‌ दरवाजा’ म्हणत पण हा दरवाजा आता पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.

३.नाणे दरवाजा :  नाणे  दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा. इ.स. १६७४ च्या मे महिन्यात राज्याभिषेकाच्या निमित्ताने इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झेंडन याच दरवाजाने आला होता. या दरवाज्यास दोन कमानी आहेत. दरवाज्याच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी दोन लहान खोल्या आहेत. त्यांस ‘देवडा’ म्हणतात. दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी दिसतात.

४. मदारमोर्चा किंवा मशीदमोर्चा : चित्‌ दरवाज्याने गेल्यावर नागमोडी वळणे घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी लागते. या मोकळ्या जागेत टोकाशी दोन पडक्या इमारती दिसतात. त्यापैकी एक पहारेकऱ्यांची जागा असून दुसरे धान्याचे कोठार आहे.  एक प्रचंड तोफही दिसते. येथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा दिसतात.

५. महादरवाजा : महादरवाज्याच्या बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत. महादरवाज्याला दोन भव्य बुरूज असून एक ७५ फूट तर दुसरा ६५ फूट उंच आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवलेली असतात त्यास ‘जंग्या’ म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. बुरुजांमधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाज्यातून आत आल्यावर पहारेकऱ्यांच्या देवडा दिसतात तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याच्या खोल्या दिसतात. महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे.

६. चोरदिंडी : महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते, त्यावरून चालत गेल्यास जिथे ही तटबंदी संपते, त्याच्या थोडे अलीकडे बुरुजात ही चोरदिंडी बांधलेली आहे. बुरुजाच्या आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायऱ्या आहेत.

७. हत्ती तलाव : महादरवाज्यातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव. गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता.

८. गंगासागर तलाव : हत्तीतलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेच्या इमारती दिसतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे ५० -६० पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव. महाराज्यांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानांची आणलेली तीर्थेयाच तलावात टाकली गेली. म्हणूनच याचे गंगासागर असे नाव पडले. शिवकाळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येई.

९. स्तंभ : गंगासागराच्या दक्षिणेस दोन उंच मनोरे दिसतात. त्यासच स्तंभ म्हणतात. जगदीश्र्वराच्या शिलालेखामध्ये ज्या स्तंभांचा उल्लेख केला आहे, ते हेच असावेत. ते पूर्वी पाच मजले होते असे म्हणतात. ते द्वादश कोनी असून बांधकामात नक्षीकाम आढळते.

१०. पालखी दरवाजा : स्तंभांच्या पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून ३१ पायऱ्या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाज्यातून आपल्याला बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो.

११. मेणा दरवाजा : पालखी दरवाज्याने वर प्रवेश केला की, चढ – उतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास जे सात अवशेष दिसतात ते आहेत राण्यांचे महाल. मेणा दरवाज्यातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो.

१२. राजभवन : राणीवशाच्या समोर डाव्या हातास दासदासींच्या मकानांचे अवशेष दिसतात. या अवशेषांच्या मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंतीच्या मध्यभागी जो दरवाजा आहे तेथून बालेकिल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच हे महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौथारा ८६ फूट लांब व ३३ फूट रुंद आहे. १३. रत्नशाळा : राजप्रासादाजवळील स्तंभांच्या पूर्वेकडे असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे, तीच ही रत्नशाळा. हा खलबतखाना म्हणजेच गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात.

१४. राजसभा : महाराजांचा राज्याभिषेक जेथे झाला, तीच ही राजसभा. राजसभा २२० फूट लांब व १२४ फूट रुंद आहे. येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे. येथे बत्तीस मणांचे सोन्याचे सिंहासन होते. सभासद बखर म्हणते, ‘तख्त सुवर्णाचे बत्तीस मणांचे सिद्ध करवले. नवरत्ने अमोलिक जितकी कोशात होती, त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने जडाव केली.’

१५. नगारखाना : सिंहासनाच्या समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगारखाना. हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून पायऱ्या चढून वर गेले की आपण किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो.

१६. बाजारपेठ : नगारखान्याकडून आपण डावीकडे उतरुन आलो की, समोर जी मोकळी जागा दिसते तो ‘होळीचा माळ’. तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवकाळातील बाजारपेठ. पेठेच्या दोन रांगात प्रत्येकी २२ दुकाने आहेत. मधून जवळजवळ चाळीस फूट रुंद रस्ता आहे.

१७. शिर्काई देऊळ : महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस जे छोटे देऊळ दिसते ते शिर्काईचे देऊळ. शिर्काई ही गडावरील मुख्य देवता.

१८. जगदीश्र्वर मंदिर : बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्र्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे. पण सध्या ही मूर्ती भग्रावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांच्या खाली एक लहानसा शिलालेख दिसतो. तो पुढीलप्रमाणे, ‘सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इटळकर’ या दरवाजाच्या उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख दिसतो तो पुढीलप्रमाणे - श्री गणपतये नमः। प्रासादो जगदीश्र्वरस्य जगतामानंददोनुज्ञया श्रीमच्छत्रपतेः शिवस्यनृपतेः सिंहासने तिष्ठतः। शाके षण्णवबाणभूमिगणनादानन्दसंवत्सरे ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लेशसापै तिथौ ॥१॥ वापीकूपडागराजिरुचिरं रम्यं वनं वीतिकौ स्तभेः कुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रंलिहे मीहिते । श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजिना निर्मितो यावधन्द्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते ॥२॥ याचा थोडक्यात अर्थ पुढीलप्रमाणे -’सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्र्वराचा प्रासाद श्रीमद् छत्रपती शिवाजी राजा यांच्या आज्ञेने शके १५९६ मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहुर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे आशांची उभारणी केली आहे. ती चंद्रसूर्य असेतोवर खुशाल नांदो.’

१९. महाराजांची समाधी : मंदिराच्या पूर्वदरवाजापासून थोडा अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची समाधी. सभासद बखर म्हणते, ‘क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराजाधिराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शके १६०२ चैत्र शुद्ध १५ या दिवशी रायगड येथे झाला. देहाचे सार्थक त्याणी बांधिलेला जगदीश्र्वराचा जो प्रासाद त्याच्या महाद्वाराच्या बाहेर दक्षणभागी केले. तेथे काळ्या दगडाच्या चिर्‍याचे जोते अष्टकोनी सुमारे छातीभर उंचीचे बांधिले असून वरून फरसबंदी केलेली आहे. फरसबंदीच्या खाली पोकळी आहे, तीत महाराजांचा अवशिष्टांश रक्षामिश्र मृत्तिकारुपाने सापडतो.’ दहनभूमी पलीकडे भग्र इमारतींच्या अवशेषांची एक रांग आहे, ते शिबंदीचे निवासस्थान असावे. त्याच्या पलीकडे सदर वस्तीपासून विलग असा एक घराचा चौथरा दिसतो. हे घर इ.स. १६७४ मध्ये इंग्रज वकील हेन्री ऑक्झेंडन यास राहावयास दिले होते. महाराजांच्या समाधीच्या पूर्वेकडे भवानी टोक आहे तर उजवीकडे दारूची कोठारे, बारा टाकी दिसतात.

२०. कुशावर्त तलाव : होळीचा माळ डाव्या हातास सोडून उजवीकडील वाट कुशावर्त तलावाकडे जाते. तलावाजवळ महादेवाचे छोटेसे देऊळ दिसते. देवळासमोर फुटलेल्या अवस्थेत नंदी दिसतो.

२१. वाघदरवाजा : कुशावर्त तलावाजवळून घळीने उतरत वाघ दरवाजाकडे जाता येते. आज्ञापत्रात लिहिले आहे की, ‘किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब आहे, यांकरीता गड पाहून एक दोन – तीन दरवाजे, तशाच चोरदिंडा करून ठेवाव्या. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंडा चिणून टाकाव्या.’ हे दूरदर्शीपणाचे धोरण ठेऊनच महाराजांनी महादरवाजाशिवाय हा दरवाजा बांधून घेतला. या दरवाज्याने वर येणे जवळजवळ अशक्यच असले तरी दोर लावून खाली उतरू शकतो. पुढे राजाराम महाराज व त्यांची मंडळी झुल्फिरखानाचा वेढा फोडून याच दरवाज्याने निसटली होती.

२२. टकमक टोक : बाजारपेठेच्या समोरील टेपावरून खाली उतरुन टकमक टोकाकडे जाता येते. तेथेच एका दारूच्या कोठाराचे अवशेष दिसतात. जसजसे आपण टोकाकडे जातो तसतसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला २६०० फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगावी

२३. हिरकणी टोक : गंगासागराच्या उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोळी वाट जाते ती हिरकणी टोकाकडे जाते. हिरकणी टोकाशी संबंधित हिरकणी गवळणीची एक कथा सांगितली जाते. या बुरुजावर काही तोफाही ठेवलेल्या दिसतात. बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे दिसते. तसेच इथून पाचाड, खुबलढा बुरूज, मशीद मोर्चा ही ठिकाणे तोफेच्या मार्‍यात आहेत. त्यामुळे युद्धशास्त्राच्या तसेच लढाऊ दृष्टीने ही खूप महत्त्वाची आणि मोक्याची जागा आहे.


Monday 4 June 2012

|| शिवराजाभिषेक सोहळा "शिवतीर्थ" किल्ले रायगड: दर वर्षी ६जुन ||

तमाम मराठी माणसाच्या जीवनातील सुवर्ण आनंदाचा क्षण म्हणजे..........." छञपती शिवरायांचा राजाभिषेक सोहळा "
राजाभिषेक सोहळा याची निम्मित रायगडावर होणारे कार्यक्रम .... याची देहि याची डोळा  किल्ले रायगडावर ....... दर वर्षी ५ व  जुन...!!!


दि. ५ जून
गड देवता शिरकाई देवी व तुळजाभवानी देवीच्या गोंधळाचा पारंपारिक कार्यक्रम. (स्थळ: शिरकाई मंदिर)
दि. ५ जून
युद्धकलेची प्रात्यक्षिके. (स्थळ: नगारखाना, राजसभा.)

दि. ५ जून
गडपूजन
(स्थळ: नगारखाना, राजसभा.)
दि. ६ जून
गडावरील नगारखान्यासमोरील ध्वजस्तंभावर स्वराज्याचा भगव्या ध्वजाचे आरोहण

दि. ६ जूनचला शिवतीर्थ किल्ले रायगड.... तमाम मराठी माणसाच्या जीवनातील सुवर्ण आनंदाचा क्षण ...


दि. ६ जून :  शिवअश्व
दि. ६ जून : मानवंदना
दि. ६ जून :  याची देहि याची डोळा
दि. ६ जून
शिवरायांच्या उत्सव मूर्तीवर छत्रपती घराण्याच्या राजपुरोहितांच्या मंत्रोपाच्चारात छत्रपती संभाजीराजे आणि सर्व प्रमुख पाहुण्यांचे यांचे हस्ते अभिषेक.
दि. ६ जून
मेघडंबरीतील सिंहासनाधीष्ठीत शिवरायांच्या मूर्तीस छत्रपती संभाजीराजे यांचे हस्ते सुवर्ण नाण्यांचा अभिषेक व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण सोहळा
दि. ६ जून
युद्धकलेची प्रात्यक्षिके (स्थळ: नगारखाना, राजसभा.)
दि. ६ जूनआल्याल्या सर्व शिव भक्ताला अन्नदान
दि. ६ जून
छत्रपती संभाजीराजे यांचे उपस्थित शिवभक्तांना  मार्गदर्शन
दि. ५ जून
शिव छत्रपतींच्या जीवनावरील विविध पुस्तकांचा प्रकाशन सोहळा
दि. ६ जून
पालखी मिरवणूक (राजसदरेवरून जगदिश्वर मंदिराकडे)
दि. ६ जून
दुपारी १२:०० वा. कार्यक्रमाची सांगता (जगदिश्वर मंदिर, शिवछत्रपती समाधी येथे)


मावळ्यानोँ झाली का मंग दर वर्षी ५ व ६ जुनला शिवतीर्थ किल्ले रायगडवर यायची तयारी.....छञपती शिवरायांचा शिवराजाभिषेक सोहळा याची देहि याची डोळा पाहण्यची ......चला शिवतीर्थ किल्ले रायगड.....

छञपती शिवरायांचा राजाभिषेक सोहळा दर वर्षी 6 जुन रोजी शिवतीर्थ किल्ले रायगड येथे सर्व मावळ्यानां शिव निमंञण..


||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥
 

|| हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडचा इतिहास ||


|| हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड ||

काळ आणि गांधारी नादयानी वेढलेल्या रायगडचे उत्तर अक्षांश १८*-१४' आणि पूर्व रेखांश ७३*-२०' आहे समुद्र सपाटीपासून २८५१ फुट उंच असणारा शिवरायांचा रायगड.

           शिवकाळापुर्वी तणस,रासिवठा,नंदादीप,रायरी या नावाने ओळखला जात असे. इ.स. १६५६ मध्ये शिवरायांनी हा रायरीचा किल्ला जावळीचा चंद्रराव मोऱ्याकडून जिंकून घेतला. त्यावेळी स्वराज्याजा कारभार राजगडावरून चालत असे पुढे स्वराज्याचा विस्तार वाढला तसा राजगडासारखा अवघड व माथ्यावर कमी जागा असणारा किल्ला स्वराज्याचा व्यापाच्या दृष्टीने कमी पडू लागले त्यामुळे शिवरायांनी आपला मुक्काम विस्तीर्ण माथा असणाऱ्या रायगडावर हलवला स्वराज्याचे सूत्रसंचालन रायगडावरून होवू लागले यासाठी रायगडावर अनेक नवीन बांधकामे करावी लागले.

           इ.स.१६७१-७२ मध्ये शिवरायांनी स्वराज्यातील किल्ले बांधणीसाठी खर्च करावयाच्या रकमेचा जाबता ( बजेट ) केला. त्यामध्ये पन्नास हजार होण रायगडासाठी राखून ठेवले आहेत एवढेच नव्हे तर त्यातील घरे,तळी,गच्ची,तट यासाठी किती खर्च करावेत हेही ठरवून दिला आहे.

           एवढी प्रचंड रक्कम खर्च करून शिवरायांनी रायगडाची उभारणी केली ती स्वत:ची राजधानीसाठी म्हणूनच ज्यावेळी शिवरायांनी हा गड पहिल्यांदा चोहुबजुने हा गड चहुबाजूने निरखून पहिला त्यावेळचे त्यांचे उदगार सभासदाने नोंदवून ठेवले आहेत तो आपल्या बखरीत लिहतो -"राजा खासा जाऊन पाहंता गड बहुत चखोट,चौतर्फा गडाचेकडे तासाल्याप्रमाणे दीड गांव उंच, पर्जन्यकाळी कडीयावरी गवत उगवत नाही आणि आणि धोंडा तासीव एकच आहे दौलताबादही पृथ्वीवर चाखोटा गड खरा परंतु तो उंचीने थोडका,दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोने बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले ,तख्तास जागा गड हाच करावा" , आणि खरोखरच शिवरायांनी आपली राजधानी याच रायगडावर वसवली या गडाचे जुने नाव रायरी होते ते त्यांनी बदलून रायगड ठेवले रायगडावर उंच राजवाडे, उपवने, तलाव, विहिरी, बाजारपेठेची रांग, घरे, गजशाळा, धान्यकोठारे यांची बांधणी करून घेतली आज जरी रायगडावर या सर्व गोष्टी अवशेषरूपाने दिसत असल्या तरी शिवकाळात त्या सर्व वास्तू डौलाने उभ्या होत्या याची साक्ष जगदीश्वर मंदिराच्या नगरखाण्यावरील रायगडच्या स्थापत्य विशारद हिरोजी इंदुळकर कोरलेला शिलालेखच देतो.तसेच रायगडावर शिवकाळात वेगवेगळी येवून गेलेली परकीय इंग्रज व्यक्तींनीही शिवकालीन रायगडचे वर्णन करून ठेवले आहे त्यातील इ.स.१६७३ मध्ये रायगडावर आलेला इंग्रज वकील टौमस निकल्स हा रायगड पाहिल्यानंतर लिहितो.




शिवरायांची कीर्ती ऐकून उत्तरेकडून रायगडावर आलेल्या कवी भुषण रायगडचे काव्यमय वर्णन केले आहे तो लिहतो -

"शिवरायांनी सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्ल्यास आपले वस्ती स्थान केले या किल्ल्यावरील शिव दरबार व तेथील ऐश्वर्य पाहून कुबेर लाजू लागला हा किल्ला एवढा प्रचंड विशाल आहे कि त्यात तीनीही लोकीचे वैभव साठविलेले आहे किल्ल्याखाली भूभाग जलमय पाताळाप्रमाणे ,माची म्हणजे पायथ्याच्या उंचवट्याचा भाग पुर्थ्वीप्रमाणे व वरील प्रदेश इंद्रपुरी प्रमाणे शोभतो रायगडावर शिवरायांचे रत्नखचित महाल शोभत आहेत गडावर विहीर सरोवरे व कूप विराजत आहेत".

           अशा या वैभवशाली रायगडावर हा पहिला राजा शिवरायांनी स्वत:स " दिनांक ६जुन १६७४ रोजी राज्याभिषेक करून घेतला  " हिंदुस्तानच्या इतिहासात हजारो वर्षात स्वत:चे सार्वभौम सिंहासन निर्माण केले त्याच दिवसापासून राज्याभिषेक शकाची निर्मिती करून छत्रपती शिवराय शकककर्तेहि झाले.शालीवाहनानंतर स्वत:चा शक नर्माण करणारा भारताच्या हजारो वर्षाच्या इतिहासातील पहिलाच राजा.

राज्याभिषेकानंतर लवकरच शिवरायांनी इ.स १६७७ मध्ये दक्षिणे मध्ये प्रच्चंड मोहीम काढली अवघ्या दीड वर्षात आजच्या तामिळनाडूतील आणि तत्कालीन कर्नाटकमध्ये प्रचंड भूप्रदेश व त्यामधील किल्ले जिंकून त्यांनी आपली हि मोहीम यशस्वी केली,आणि आवाका व झपाटा प्रचंड होता कि इतिहासकारांना त्या मोहिमेस दक्षिण दिग्विजय असे संबोदावे लागले.

दक्षिण दिग्विजय करून आल्यानंतर शिवरायांनी आपला पुत्र राजाराम याचे लग्न रायगडावर मोठ्ठ्या थाटात केले त्यानंतर ३एप्रिल १६८० मध्ये रायगडावर शिवरायांचे निधन झाले.
 
|| छत्रपती शिवरायांची रायगडा वरील समाधी ||
 
||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥
 

नोट : वरील सर्व माहिती "शिवराज्याभिषेक सोहळा " या site चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

Friday 1 June 2012

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले तिकोना उर्फ वितंडगड ।।


तिकोना किल्ला

 किल्ल्याची उंची :- समुद्रसपाटीपासून सुमारे ३,५०० फूट
किल्ल्याचा प्रकार :- गिरीदुर्ग
डोंगररांग :- पुणे
जिल्हा :- पुणे
श्रेणी :- मध्यम

पवना नदीवरील धरणाजवळ पुण्याच्या साधारण ६० कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३,५०० फूट उंच आहे. तुंग किल्ला ३-४ कि.मी अंतरावर दिसतो. किल्ल्याच्या त्रिकोनी आकारामुळे याला तिकोना असे नाव पडले.

इतिहास:
इ.स. १५८५ मध्ये मलीक अहमद निजामशाहने हा किल्ला जिंकुन निजामशाहीत आणला. इ.स. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकुन परत स्वराज्यात आणला. पुढे ११ जून १६६५ साली झालेल्या इतिहास प्रसिद्ध 'पुरंदरचा तहात' शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या २३ किल्ल्यांपैकी तिकोना हा एक किल्ला. नेताजी पालकर कडे काही दिवस किल्ल्याची जबाबदारी होती.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे:

गडमाथ्यावर त्रिंबकेश्वर महादेवाचे छोटेखानी मंदिर, एक तलाव, २ तळि व धान्य कोठाराचे पडीक अवशेष आढळतात. बालेकिल्ल्याच्या खालील भागात श्री तुळजाईचे मंदिर आहे. मंदिर असलेले लेणे सातवाहनोत्तरकालीन असावे. या दक्षिणाभिमुखी लेण्यात एक टाके खोदलेले आहे. लेण्यासमोरच एक तळेही आहे. लेण्यासमोर एका कोरीव दगडावर दोन भागात काम केले आहे. वरच्या बाजुस एक पुरुषाकृती असून त्याच्या पायाखाली बाई दाखविलेली आहे. खालच्या भागात दोन स्त्रिया असून त्यांच्या हातात फुलांच्या माळा आहेत.बालेकिल्ल्यावर बघण्यासारखे जास्त काहि आता शिल्लक नाहि, पण काहि ठिकाणी तटबंदी अजुनहि शाबुत आहे. वरती शंकराचे एक छोटेसे मंदिर असुन समोरच नंदी आणि पिंडीचे पुरातन अवशेष आहे. मंदिर जरी साधे असले तरी त्यातील शिवलिंग आणि त्यावरचा नाग अप्रतिम आहे.

गडावर जाण्याच्या वाटा :

१)पुणे -पुणे ते कोळवण या बसने गडाच्या पायथ्या्च्या थोडे जवळ जाता येते.

२)मुंबई- मुंबईहुन तिकोन्याला जाण्यासाठी २ मार्ग आहे. पहिला लोणावळ्याच्या पुढे दोन स्टेशनवर कामशेत, तेथुन पवनानगर (पूर्वीचे काळे कॉलनी) व पुढे तिकोनापेठ गाव. तिकोनापेठ गावातुनच किल्याची पायवाट सुरु होते. दुसरा मार्ग म्हणजे लोणावळ्यावरून पौड रोडने पवनानगर आणि तेथुन पुढे तिकोनापेठ गाव. दुधिवरे खिंडीच्या आधीचा रस्ता हा लोहगडला जातो आणि पुढचा रस्ता पवनानगर.

राहण्याची सोय :  महादेवाच्या मंदिरात ५ ते ६ जणांची राहण्याची सोय होते.

जेवणाची सोय : आपण स्वतः करावी लागते

पाण्याची सोय : पाण्याची सोय स्वतः करावी लागते

जाण्यासाठी लागणारा वेळ : साधारणतः पायथ्यापसून ४५ मिनिटे  ते १ तास लागतो .


नोट : वरील सर्व माहिती "महाराष्ट्र पर्यटन (Maharashtra Tourism)" या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .