Monday 21 January 2013

राज्याभिषेक छाव्याचा...राज्याभिषेक रौद्राचा...राज्याभिषेक शंभुचा...

क्षत्रियकुलावतं सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री छत्रपती संभाजी महाराज की जय..!!!

१६ जानेवारी १६८१ रोजी छत्रपती शिवराय यांचे पुत्र, राजमाता जिजाऊसाहेब यांचे लाडके नातू, थोरल्या महाराणी सईबाईसाहेब यांचे चिरंजीव धर्मवीर संभाजीराजे भोसले हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले.

शके १६०२ रौद्र संवत्सरे श्रावण शुद्ध पंचमी (नागपंचमी) म्हणजेच २० जुलै १६८० संभाजी महाराजांचे मंचकारोहण झाले आणि त्यांनी 'राजा' झाल्याचे जाहीर केले .या संदर्भात डाग रजिस्टर मध्ये २४ ऑगस्ट १६८० ची नोंद आहे -
"जून-जुलै शिवाजीराजा मरून संभाजीला त्याचे सिंहासन मिळाले असावे असे सर्वत्र बोलले जाते,आपल्या बापाच्या तत्त्वांप्रमाणे संभाजी वागणारा आहे असे लोक म्हणतात."

संभाजी महाराजांचा कारभार सुरळीत सुरु झाला ,त्यांनी सर्व मंत्र्यांना सोडून त्यांना त्या त्या पदावर पुन्हा नियुक्त केले,परंतु मोरोपंत २९ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान वारले,आणि त्यांच्या पुत्राला पेशवाई दिली गेली.मंचकारोहण झाल्यावर त्यांनी रायगडावरून कारभार सुरु केला ,७ मे १६८० रोजी रुद्राप्पा देसाई याला लिहिलेल्या पत्रात महाराजांची राजमुद्रा दिसून येते.

अस्थिर वातावरणात झालेल्या मंचकरोहनात त्यांना व त्यांच्या सहकारी मंत्र्याधीकाऱ्यांना तितके समाधान व शास्त्रार्थाच्या दृष्टीने निर्दोषत्व वाटले नाही. त्यामुळे संभाजीराजांवर विधियुक्त राज्याभिषेक करवून राजसिहासानाची प्रतिष्ठा राखणे इष्ट वाटले,त्यामुळे राज्याभिषेक करण्याचा निर्णय शंभूराजांनी घेतला.इ.स.१६८१ साल उजाडले.रौद्रनाम संवत्सरातील माघ मास सुरु झाला , माघ शुद्ध ७ ,शके १६०२ रौद्रनाम संवत्सरे जानेवारी १४,१५,१६, सन १६८१ मध्ये संभाजी राजांचा विधियुक्त राज्याभिषेक झाला व ते महाराष्ट्राचे ,मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती झाले,युवराज शंभूराजे राज्याभिषेकाने अभिषिक्त छत्रपति झाले,या मराठा रियासतीचे दुसरे धाकले धनी झाले.

मल्हार रामराव चिटणीस बखरीमध्ये राज्याभिषेकाच्या प्रसंगाचे वर्णन करताना म्हणतो -
"संभाजीराजे सिंहासनारूढ झाले,माघ शुद्ध १० गुरुवार शके मजकुरी यांस राज्याभिषेक यथाविधी विनायकशांती व पुरंदरशांती,होम करून,नंतर अभिषेक होऊन सिंहासनरूढ झाले.तोफा करविल्या"

अनुपुरानकाराने राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन करताना म्हटले आहे -
"शम्भूराजांचा राज्याभिषेक सुरु झाला.रायगडावर मोठा उत्सव साजरा झाला.ग्रहमख,मातृकापूजन ,रक्षोहण,मंत्रपाठ हि धर्मकृत्ये झाली.देवपूजा,गोपूजा आचार्य,पिता-माता यांना नमस्कार ,कुलदेवता,महादेवाचे स्मरण करून आणि अलंकार धारण करून नांदीश्राद्ध,पुण्याहवाचन इ.विधी आटोपल्यावर पुरोहित व सुवासिनींनी ओवालालेल्या लोकांकडून आणि पूर्ण पात्र हातात घेतलेल्या आणि अलंकृत सुवासिनीकडून पहिल्या जाणार्या आणि निरीक्षणाने लोकांचा हेवा करणाऱ्या अशा शंभू महाराजांवर जमलेल्या ब्राम्हणादि सर्व लोकांनी अभिषेक केला .वनस्पती व नदीच्या जलाने न्हाऊ घातलेले त्यांचे शरीर शोभले.ब्रम्हदेवाने अभिषेक केलेल्या इंद्राप्रमाणे अभिषिक्त शंभूराजे त्या वेळी शोभले.अंत:पुरातील स्रियांच्या मनात भरले आणि त्यांचा मान वाढला ."

राज्याभिषेक प्रसंगी पूर्वीच्या कैद्यांना मुक्त करण्याचा रिवाज असल्याने महाराजांनी कैद्यांना मुक्त केले,प्रधान-मंडळातील अण्णाजी दत्तो,निलोपंत,बाळाजी आवजी,जनार्धनपंत आदींच्या समावेशाने प्रधान-मंडळ नेमून त्यांना कारभार सांगितला गेला.

पेशवे ------------------------------------------ निळो मोरेश्वर पिंगळे
मुजुमदार ------------------------------------------ अण्णाजी दत्तो
डबीर ------------------------------------------- जनार्दन पंत
चिटणीस ------------------------------------------- बाळाजी आवजी
सुरनीस ------------------------------------------- आबाजी सोनदेव
सरनौबत ------------------------------------------- हंबीरराव मोहिते
दानाध्याक्ष्य ---------------------------------------- मोरेश्वर पंडितराव
वाकेनवीस ----------------------------------------- दत्ताजीपंत

भोसले घराण्यातील संभाजी महाराजांची राजमुद्रा शिवाजी महाराजांच्या राज्मुद्रेपेक्षा आकाराने वेगळी आहे,तिचा आकार पिंपळ पाणी आहे

श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।
यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।।

अर्थ :- शिव पुत्र श्री शंभो याची राजमुद्रा आकाशा प्रमाणे अमर्याद आहे व ज्याच्या अंकाच्या आधारावर आश्वस्त अशी मुद्रा कोणाच्याही वर छत्र म्हणून राहील.

महापराक्रमी, धर्मवीर, शूरवीर योध्यास राज्याभिषेकदिनी त्रिवार मानाचा मुजरा...!!!

राज्याभिषेक १६ जानेवारी १६८१ ला झाला आणि लगेच १४ व्या दिवशी महाराजांनी बुऱ्हाणपूरवर छापा टाकला.रायगड ते बुऱ्हाणपूर हे १०००किमी पेक्षा जास्त अंतर आहे . परंतु फक्त ४ ते ५ दिवसा मध्ये संभाजी महाराज बुऱ्हाणपूर ला पोहोचले.आणि १ करोड होनांची दौलत स्वराज्यात आणली.

त्यानंतर मोगल, इंग्रज, पोर्तुगीज आणि सिद्दी या शत्रुंना नामोहरम करीत पुढील केवळ ८ च वर्षात छत्रपती शिवरायांनी उभारलेले हिंदवी स्वराज्य शंभूराजांनी दुप्पट केले......खजिना तिपटीपेक्षा अधिक वाढविला आणि सैन्य दुपटीपेक्षा अधिक वाढविले.
 

नोट : : सौजन्य :- इतिहासाच्या वाटेवर.

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले जंजिरा।।


जंजिरा किल्ला

किल्ल्याचा प्रकार - जलदुर्ग
श्रेणी - सोपी
डोंगररांग- रायगड
जिल्हा - रायगड


रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्‍यात चहुबाजूंनी सागरी पाण्याचा वेढा पडलेला, राजापुरीच्या खाडीच्या तोंडावर मोक्‍याच्या जागी जंजिरा हा अजेय जलदुर्ग उभा आहे.

इतिहास -
जंजिरा किल्ल्यालाच "किल्ले मेहरुब ऊर्फ किल्ले जंजिरा' अशी नावे होती. इ.स 1567 मध्ये हुसेन निजामशहाच्या हुकुमानुसार हा किल्ला बांधण्यास सुरुवात केली. हे काम इ.स 1571 पर्यंत पूर्ण झाले आणि हा दगडी कोट 'किल्ले मेहरुब' नावाने ओळखला जाऊ लागला. इ.स 1648 मध्ये शिवरायांनी तळेगड, घोसाळगड आणि रायगड परिसरातील मुलूख जिंकला. 1657 मध्ये जावळी जिंकली आणि त्यांनी आपली नजर उत्तर कोकणावर वळवली. किल्ले जंजिरा आपल्या ताब्यात आल्याशिवाय उत्तरकोकणावर आपण वर्चस्व गाजवू शकणारा नाही हे सत्य शिवरायांना उमगले होते.्न 1659 मध्ये शिवरायांनी शामराजपंत व त्या सोबत बाजी घोलपला जंजिरा घेण्यासाठी पाठवले पण,हा पहिला प्रयत्न फसला. पुन्हा 1659 मध्ये निळोजीपंत रघुनाथ मुजुमदार,मायाजी भाटकर यांनी जंजिराच्या सिध्दीची कोंडी केली पण पुन्हा हा प्रयत्न फसला. तिस-या स्वारीचेवेळी शिवाजी महाराजानी व्यंकोजी दत्तो यास फौजेनिशी रवाना केले. त्यानी प्रयत्नाची शिंकस्त फार केली. पण,हा प्रयत्न देखील फसला. 1678 च्या जुलै मध्ये शिवरायांनी जंजि-यावर स्वारी करण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला. सन 1682 मध्ये संभाजी राजांनी दादाजी रघुनाथालाजंजिरा घेण्यासाठी पाठवले पण त्याचवेळी औरंगजेब दक्षिणेत उतरल्याने त्याचा जंजिरा घेण्याचा प्रयत्न अपुराच राहीला.या संस्थानाचा शेवटचा अधिपती म्हणजे सिध्दी मुहंमदखान याच्याच कारकिर्दीत अजेय असे जंजिरा संस्थान 3 एप्रिल 1948 रोजी भारतीय संस्थानात विलीन झाले.
 
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे -
राजापुरी गावापासून येणारी होडी जंजिरा किल्ल्याच्या पायथ्यापाशी थांबते. प्रवेशद्वारावरील पांढ-या दगडातील पारशी लेख स्पष्ट दिसतो. दरवाजाच्या दोन्हीबाजूच्या भिंतींवर विशिष्ट प्रकारचे दगडात कोरलेलेशिल्प आढळते. हे गजान्त लक्ष्मीचे शिल्प म्हणून ओळखले जाते. दोन दरवाजांच्या मध्ये पहारेक-यांच्या देवड्या आहेत.जंजिरा किल्ल्याच्या महाद्वारावर नगारखाना आहे. किल्ल्याच्या तटावर जाणा-या पाय-यांनी वर गेल्यावर समोरच तटावर तोफा ठेवल्या आहेत, त्यापैकी सर्वात मोठ्या तोफेचे नाव "कलाडबांगडी ' असे आहे.
पीरपंचायतन - किल्ल्याच्या मुख्यद्वारातून आत गेल्यावर डाव्याबाजूला आणखी एक द्वार आहे. उजवीकडे खोली सारखे एक बांधकाम आहे. यालाच पीरपंचायतन असे म्हणतात. ह्या वास्तूत 5 पीर आहेत. या पंचायतनाच्या पटांगणातचकाही वास्तू आहेत. याच ठिकाणी जहाजाचे तीन नांगर गंजलेल्या अवस्थेत पडलेले आहेत.
घोड्याच्या पागा - पीर पंचायतनाच्या समोरच्या दिशेने तटावरून पुढे गेल्यावर घोड्याच्या पागा लागतात.
सुरुलखानाचा वाडा - येथून बाहेर पडल्यावर समोरच 3 मजली पडकी भक्कम बांधणीची इमारत दिसते यालाच सुरुलखानाचा वाडा असे म्हणतात. अनेक वर्षात या वाड्याची मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली आहे.
तलाव - या वाड्याच्या उत्तरेस सुंदर बांधकाम केलेला शोडषट्‌कोनी गोड्यापाण्याचा तलाव आहे. हा तलाव सुमारे 20 मी व्यासाचा आहे. चार कोप-यात चार हौद आहेत.
सदर - बालेकिल्ल्याच्या मागे चुनेगच्ची इमारत आहे. यालाच सदर असे म्हणतात.
बालेकिल्ला - तलावाच्या बाजूने बांधीव पाय-यांनी थोडे वर गेल्यावर बालेकिल्ला लागतो. आज तेथे एक झेंडा वंदनासाठी उभारलेला आहे.
पश्‍चिम दरवाजा - गडाच्या पश्‍चिमेला किंचित तटाखाली, तटातून बाहेर पडण्यासाठी छोटा दरवाजा आहे, यालाच दर्या दरवाजा असे म्हणतात. संकटकाळी बाहेर पडण्यास याचा उपयोग होत होता. दरवाजाच्या वरच्या भागातच तटबंदीच्या जवळ कैदखाना होता. किल्ल्याला स्वतंत्र असे 22 बुरुज आहेत. आजही ते सुस्थित आहेत.

सर्व किल्ला पाहण्यास तीन तास पुरतात.

गडावर कसे जाल :
अलिबागमार्गे- जंजिरा जलदुर्ग पाहायचा असेल तर पुणे मुंबई मार्गेअलिबाग गाठायचे. पुढे अलिबागवरुन रेवदंडामार्गेमुरुड गाठता येते. मुरुड गावातून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी बोटसेवा उपलब्ध आहे. किना-या पासून किल्ला गाठण्यास अर्धा तासपुरतो.
पाली- रोहा - नागोठणे - साळाव - नांदगाव मार्गे- अलिबाग मार्गेन जाता पाली- रोहा - नागोठणे - साळाव- नांदगाव मार्गेमुरुडला जातायेते.
दिघीमार्गे- कोकणातून यावयाचे झाल्यास महाड - गोरेगाव - म्हसळे -बोर्लिपचंतन दिघी गाठावे. दिघीहून किल्ला पाहण्यासाठी बोटसेवा उपलब्ध आहे.

राहण्याची सोय:  राहण्याची सोय नाही.

पाण्याची व जेवणाची सोय : स्वतःच करावी.

नोट : वरील सर्व माहिती "॥जय भवानी॥जय शिवराय॥ " या facebook वरील ग्रौप मधील एका पोस्टचा  संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .
 

Tuesday 15 January 2013

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले वासोटा (व्याघ्रगड) ।।


वासोटा (व्याघ्रगड) किल्ला


साहसाची अनुभूती देणारा वासोटा किल्ला अनेक दुर्गयात्रींचा आवडता किल्ला आहे. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखे दुर्गरत्न आहे.

इतिहास : 
 
या किल्ल्याचे ऐतिहासिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व होते. या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार वंशीय दुसऱ्या भोजराजाने केली असल्याचा उल्लेख आढळतो. १६५६ मध्ये शिवाजीराजांनी जावळी प्रांताबरोबरच या वासोटा किल्ल्याचाही स्वराज्यात समावेश केला. वासोट्याचे नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले. याच्या दुर्गमतेबद्दल पेशवाईत सुद्धा नोंद आहे.
वासोटा किल्ल्याच्या प्राचीनत्वाचा शोध घेता आपल्याला वसिष्ठ ऋषींच्या काळापर्यंत मागे जावे लागेल. असे मानले जाते की, वसिष्ठ ऋषींचा कोणी एक शिष्य, अगस्ती ऋषी यांनी विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेकडचा मार्ग शोधला, सह्याद्रीच्या कोयना काठच्या त्या शिखरावर राहण्यास आला व त्याने आपल्या निवासी डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले. कालांतराने या देशीच्या क्षत्रियांनी त्या डोंगराला तटाबुरूजाचे साज चढवून लष्करी ठाणे केले. त्या डोंगराचे परंपरागत 'वसिष्ठ' हे नाव अपभ्रंश होऊन 'वासोटा' झाले. प्रत्यक्ष उल्लेखित नसला तरीही, हा किल्ला शिलाहारकालीन असावा. शिलाहारांच्या किल्ल्यांच्या नामावलीत 'वसंतगड' या नावाने उल्लेखिलेला किल्ला हा वासोटा असावा. मराठी साम्राज्याच्या छोटा बखरीवरून शिवरायांनी जावळी
विजयानंतर वासोटा घेतला असे सांगितले जाते, पण ते खरे नाही. जावळी घेताना, जावळीतील तसेच कोकणातील इतर किल्ले शिवरायांनी घेतले पण वासोटा दूर असल्याने किल्लेदाराच्या हाती राहीला. अफझल वधानंतर काढलेल्या मोहिमेतही वासोटा किल्ला येत नव्हता. पुढे शिवराय पन्हाळगडावर अडकले असताना, आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला दि. ६ जून १६६० रोजी घेतला. सन १६६१ मध्ये पकडलेल्या इंग्रज कैांपैकी फॅरन व सॅम्युअल यांना वासोटावर कैदेत ठेवण्यात आले होते. पुढे १६७९ मध्ये वासोटा किल्ल्यावर २६,००० रुपये सापडले. पुढच्या काळात १७०६ मध्ये पंतप्रतिनिधींच्या उपपत्नी ताई तेलिणीने हा किल्ला आपल्या हातात घेतला. पुढीलवर्षी पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी ताई तेलिणी बरोबर लढाई केली. ताई तेलिणीने आठ-दहा महिने प्रखर झुंज देऊन किल्ला लढवला. १७३० मध्ये वासोटा किल्ला बापू गोखल्यांच्या हाती पडला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे:
सह्याद्रीची मुख्यरांग ही दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या रांगेला समांतर अशी धावणारी घेरा दातेगडाची रांग घाटमाथ्यावर आहे. ही रांग महाबळेश्वरपासून दातेगडापर्यंत जाते. या दोन रांगाच्या मधून कोयना नदी वाहते . या जावळी खोऱ्यामधून वाहणार्‍या कोयना नदीवर हेळवाक येथे धरण बांधलेले आहे. या जलाशयाला शिवसागर म्हणतात. या शिवसागराचे पाणी वासोटा किल्ल्याच्या पायथ्याला स्पर्श करते. शिवसागराचे पाणी तापोळापर्यंत पसरलेले आहे.
सह्याद्रीची मुख्य रांग आणि शिवसागराचे पाणी यामधील भागात घनदाट अरण्य आहे. पूर्वेला घनदाट अरण्य आणि पश्चिमेला कोकणात कोसळणारे बेलाग कडे यामुळे वासोट्याची दुर्गमता खूप वाढली आहे. या अवशेषांच्या जवळूनच गडावर जाणारा धोपट मार्ग आहे. या मार्गाने काही अंतर गेल्यावर आपण पायथ्याला पोहोचतो. पायथ्याला ओढ्याकाठी मारुतीची मूर्ती आहे. येथूनच किल्ल्याची चढण आणि जंगल सुरु होते. सोबतच्या पाण्याच्या बाटल्या ओढ्यातून भरुन घेणे गरजेचे आहे. हा चढाईचा मार्ग दुतर्फा असलेल्या घनदाट जंगलामधून जातो. यात वेगवेगळ्या प्रकारची झाडे व वनस्पती आपल्याला दिसतात. या जंगलात अनेक प्रकारची वन्य श्वापदे आहेत. श्वापदांत गवे आणि अस्वले प्रामुख्याने आहेत. त्यामुळे सावधगिरीने आणि गोंगाट न करता चढाई करावी लागते. कुठलाही प्राणी केव्हाही दर्शन देऊ शकतो. त्यातल्यात्यात गव्यापासून आणि अस्वलापासून अंतर राखणे सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.
अर्धाअधिक किल्ला चढल्यावर एक वाट उजवीकडे जाते. ही वाट केतकीच्या गाद्याजवळून पुढे नागेश्वराकडे जाते. सरळ वाटेने वर चढल्यावर जंगल विरळ होऊन कारवीचे रान लागते. कारवीच्या रानातून वर चढल्यावर किल्ल्याच्या पायऱ्या लागतात. त्या चढून भग्न प्रवेशद्वारातून आपण गडात प्रवेश करतो. या प्रवेशद्वाराजवळून डावीकडील तटबंदीच्या कडेने गेल्यावर आपण पूर्वेकडील बाजूस पोहोचतो. या बाजूने दिसणारा शिवसागर जलाशयाचा आणि अथांग पसरलेल्या जंगलाचा देखावा आपल्याला मुग्ध करतो. याच बाजूला पाण्याचे टाके आहे. हे टाके भिंतीमुळे दोन भागात विभागले गेले आहे. पिण्यायोग्य पाणी गडावर येथेच आहे. येथून झाडीतून दक्षिण टोकावर गेल्यावर समोरच जुना वासोट्याचा डोंगर दिसतो. जुन्या वासोट्याच्या बाबू कड्याचे तसेच पाताळवेरी गेलेल्या दरीचे दृश्य आपल्याला खिळवून ठेवते. येथून परत पाण्याच्या टाक्यांकडे येऊन उत्तर टोकाकडे निघायचे. गडावरही सर्वत्र झाडीझाडोरा वाढला असल्यामुळे गडावरच्या वास्तू त्यात लुप्त झाल्या आहेत. वाटेवर मारुती मंदिर, मोठ्या वाड्याचे अवशेष तसेच महादेव मंदिर आहे. तेथून पुढे उत्तरेकडील माची आहे. या माचीवर बांधकाम नाही. पण येथून दूरपर्यंतचा परिसर दिसतो. नागेश्वर सुळक्याचे दर्शन उत्तम होते. कोकणातील विस्तृत प्रदेशही येथून न्याहाळता येतो. वासोटा हा गिरिदुर्गाबरोबरच वनदुर्गसुद्धा आहे. म्हणून याला 'मिश्रदुर्ग' म्हटले जाते.
 
गडावर कसे जाल :
वासोट्याला जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. एक कोकणमधून आणि दुसरा घाटमाथ्यावरुन. कोकणातील 'चिपळूण'कडून वासोट्याच्या पश्चिम पायथ्याच्या चोरवणे या गावापर्यंत गाडीमार्ग असून या मार्गावर राज्य परिवहन मंडळाच्या (एस.टी.बस) गाड्या आहेत. चोरवणेपासून नागेश्वराच्या सुळक्याकडून वासोट्याकडे येता येते. दुसरा मार्ग हा जास्त सोयीचा आहे. सातारा-कास-बामणोली असा गाडीरस्ता असून यावर रा.प. च्या बसेस आहेत. बामणोली हे गाव शिवसागर जलाशयाच्या पूर्व काठावर आहे. येथून वासोट्याकडे जाण्यासाठी शिवसागर ओलांडावा लागतो. त्यासाठी बामणोलीमध्ये लॉचेस उपलब्ध होतात. येथून वनखात्याची परवानगी घेवून आपण वासोट्याकडे जाऊ शकतो.
लॉचमधून साधारण ४० ते ५० मिनिटांच्या प्रवासानंतर आपण वासोट्याच्या जवळ पोहोचतो. पाण्याच्या फुगवट्यानुसार हा कालावधी कमी जास्त होतो. पायथ्याजवळ मेट इंदवाली नावाचे गाव होते. ते फार पूर्वीच उठून गेलेले आहे. त्याचे अवशेष अजूनही दिसतात.

राहण्याची सोय:  राहण्याची सोय नाही.

पाण्याची व जेवणाची सोय : स्वतःच करावी.

जाण्यासाठी लागणारा वेळ: साधारण ४० ते ५० मिनिटांच्या प्रवासानंतर आपण वासोट्याच्या जवळ पोहोचतो.

 

नोट : वरील सर्व माहिती || महाराष्ट्र पर्यटन (Maharashtra Tourism) || या facebook मधील  पोस्टचा  संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .