Monday 24 September 2012

शिवरायांचे शिलेदार - सरदार कान्होजीराजे नाईक जेधे.

सरदार कान्होजीराजे जेधे

एका हातात निखारा आणि दुसऱ्या हातात तुळशीपञ ठेवलेली जी माणसे महारांजाच्या भोवती होती त्यात प्रामुख्याने आणि अगदिच सुरूवातीपासून जे नाव होते त्यांपैकी एक "" सरदार कान्होजीराजे जेधे "" यांचा करावा लागतो.

कान्होजी यांचा जन्म कारीगावी झाला. त्यांच्या जन्म्यापुर्वी त्यांच्या वडिलांची हत्या नंतर मात्रोश्रीची, अगदी काही दिवसाच्या लहान मुलांला पोरका होण्याचा महाशाप मिळाला. यावेळी कान्होजी जेध्याचा जीवावर भेटलेल्या प्रसंगात; जेध्याचे इमानी स्वामीनिष्ठ चाकरीत असलेले देवजी महाल्याच्या साह्याने तान्ह्या कान्होजीचे प्राण बचावले. रानावनांत फिरत तेंही कान्होजीचा सांभाळ केला. पुढे पासलकर देशमुखांनी त्यांची दिखभाल करून योग्य मुत्सद्दी, राजकारणी योद्धा, युद्धतंत्राचेही परिपूर्ण शिक्षण दिले. कान्होजी जेधे कारी गावी येऊन आपल्या मातापितरे बलिदानाचा सुढ मिळवून कारी-अंबवडे गावासह रोहिड खोऱ्याची देशमुखी चालवली...संपूर्ण बारा मावळामध्ये कान्होजींनी आपल्या पराक्रमाने व सचोटीच्या वर्तनाने आपला दरारा बसविला होता. कितीही अवघड किल्ला असला तरी कान्होजीचे किल्ले सर करण्याचे खास तंत्र होते. ते म्हणजे शिडया व माळा लाऊन सैनिक गडावर चढविणे व गड सर करणे. तसेच मलिक अंबर या निजामशहाच्या वजीराशी त्यांचा संबंध आला होतो. त्यांच्या समवेत कान्होजीने अनेक लढायात आपली मर्दुमकी दाखून निजामशाही पासून कान्होजी नांवारुपास आले होते... सन इ.इ. १६१९ रोजी काही ऐतिहासिक निजामशहाच्या कागदपत्रा मध्ये ‘कान्होजी राजे जेधे’ असा उल्लेख दिसून येतो.
आदिलशाहचा सेनापती रणदुल्लाखाननी शहाजीराजांना कान्होजीचा परिचय करून दिला होतो. ही घटना साधारण इ.स. १६३५ च्या दरम्यानची आहे. नंतर इ.स. १६३६ च्या सुमारास अहमदनगरची निजामशाही नष्ट झाली त्यानंतर शहाजीराजे पूर्णपणे आदिलशाहीकडे चाकरीस राहिले, तेव्हा रणदुल्लाखानाकडून शहाजीराजांनी कान्होजीस आपणांकडे मागून घेतले. सन १६४८ साली शहाजीराजांसोबत कान्होजीना देखील नजर कैदेत जिंजीत राहिले...
कान्होजी जेधे हे शहाजीराजांचे समकालीन असल्यामुळे विश्वासू मित्र बनले होते. “कान्होजी ! तुम्ही आता माझ्या शिवबाची चाकरी करावी. स्वराज्याला तुमची गरज आहे. आपण शूर लढवय्ये आहात. अनुभवी आहत. बाजी पासालकारांच्या निधनाने बारा मावळ खोऱ्यात आता तुम्हीच वडीलधारे आपल्या मायेचे छत्र शिवबावर धरा.” असे म्हणत, शहाजीराजांनी कान्होजी जेधे यांना शेवटचा निरोप घेताना अश्रुपूर्ण नयनांनी मिठी मारली. शहाजीराजांचे बोल ऐकून कान्होजी जेधे शिवाजीराजांचेकडे येवून त्यांना म्हणाले, “महाराजांनी (शहाजी) शपथ घेऊन साहेबाचे सेवेशी पाठविले तो इमान आपला खरा आहे. खास व पाचजण लेक व आपला जमाव देखील साहेबापुढे खस्त होऊ” असे म्हणून स्वराज्याच्या कार्यात सामील झाले.
शिवाजी महारांजानी इ.स. १६५५ ते ५६ च्या दरम्यान जावळीचा मोर्यांना शासन करून जावळीचा सर्व मुलुख स्वराज्यात दाखल केला. कान्होजी जेधे व त्याचे समर्थक बांदल, शिळीमकर, वगैरे देशमुखानी या कामी छत्रपतींना सहाय्य केले. शिवाजीराजांनी रायगड या किल्याच कब्जा कान्होजी जेधे यांच्यामार्फत घेतला. जरी कान्होजी जेधे असे स्वराज्याच्या कामी छत्रपती शिवाजी महाराजांना सहाय्य करीत होते. तरीही ते आदिलशाहीच्या सेवेत होते. वतनवाडीचे देखील आदिलशहाने त्यांना अधिकार बहाल केलेले होते. वतनवाडीची कोणतीही लालसा ना ठेवता कान्होजी स्वराज्याच्या कार्यात मोठे सहाय्य इमानी करत होते. आदिलशाहीचा बराच मुलुख व काही किल्ले शिवाजीराजांनी स्वराज्यात दाखल केलेले होते. त्यामुळे आदिलशहा शिवाजीराजांवर चिडून होतो, शेवट आदिलशाहीतून अफजलखानाने शिवाजी महाराजांना धरून अथवा मारून आणण्याची घोर प्रतिज्ञा करून विडा उचलून मावळाकडे निघाला होतो.
१६ जून १६६५९ कान्हीजी जेधे यांना आदिलशहाने पाठविलेले फर्मान असे, “शिवाजी अविचारीने व अज्ञानाने निजामशाहीत. कोंकणातील मुसलमानांना त्रास देऊन लुट करून पातशाही मुलखातील कित्येक किल्ले हस्तगत केले आहेत. यास्तव त्याचे पराभवार्थ... शिवरायांना पराभव करून निर्मूळ फडशा करावा. शिवरायांचे निसवतीचे लोकास आश्रय न देता ठार मारून या दौलतीचे कल्याण इच्छिणे. खानच्या सांगण्यावरून.... तुमची योग्यता वाढविली जाईल. त्याचे सांगण्याप्रमाणे वागावे, तसे न केल्यास परिणाम चांगला होणार नाही.”
आदिलशहाचे हे फर्मान कान्होजीस मिळताच त्यांच्या जीवनातील सत्व परीक्षेचा प्रसंग निर्माण झाला... कान्होजी जेधे यांनी या फार्मांचा कोणताही मुलाहिजा दिला नाही. ते थेट आपल्या पुत्र व लष्करी जमाव घेऊन शिवाजीराजांकडे आले, “या पुढे खस्त होऊ ( मरण पत्करू ) तेव्हा आमचे वतन कोण खावे, आम्ही इमानानी अंतर करणार नाही असे म्हणून बेल भंडार उचलून शपथ घेतली. आपल्या वतनावर पाणी सोडले” हे दर्शविण्यासाठी पाण्याचा तांब्या उजव्या हातात घेवून डाव्या हाताने राजांच्या पायांवर पाणी सोडले व आपल्या निष्ठेची व प्रामाणिकपणाची राजांना जाणीव करून दिली. छत्रपति शिवाजी महाराज व दरबारातील सर्व मंडळी कान्होजींच्या या कृत्याने भारावून गेली यावेळी राजांनी कान्होजीस हुकूम केला की, “तुमचे व तुमच्या वंशाचे आम्ही चालवावे व आमच्या वंशाचे तुमच्या वंशाचे चालवावे.” असे म्हणून शपथ दिली. त्यानंतर शिवाजीराजांनी कान्होजीस हुमूम केला की, वरकड मावळचे देशमुख व तुम्ही येके जागा बैसोन त्यांचा मुद्दा मनास आणणे. तसेच तुमचा काबिल कारीस आहे, तो ढमढेऱ्यांचे तालेगावास पाठवा.”
कान्होजी जेधे पुढे महाराजांच्या मसलतीनुसार मावळातील देशमुखांना भेटून घडला सर्व वृतांत त्यांना कथन केला की, “स्वामींच्या पायासी इमान धरून वातनास देखील पाणी सोडीले आम्ही व आपले लोक देखील राजश्री स्वामीपुढे खस्त होतो ऐसा आमचा दृढ विचार आहे. मुसलमान (अफजलखान) बेईमान आहे. कार्य जालियावर नस्ते निमित्य ठेऊन नाश करील. हे ‘मऱ्हाष्ट्र राज्य’ आहे. अवधियांनी हिंमत धरून, जमाव घेवून, राजश्री स्वामीसंनिध राहोन, येक निष्ठेने सेवा करावी.” कान्होजी जेधे यांच्या बरोबर सर्व देशमुख मंडळी एकमुखाने संमती दिली. यावरून स्वराज्य कार्यामध्ये कान्होजी जेधे यांचा किती मोठा सहभाग होतो हे कळून येते.
अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी कान्होजी जेधे यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना सर्वोतपरी सहकार्य केल. आपल्या साही मुलांसह अफजलखानाच्या सैन्याचा फडशा पडला. कान्होजी जेधे यांनी नि:स्वार्थी बुद्धीने स्वराज्यासाठी केलेल्या सेवेबद्दल शिवाजी महाराजांनी त्यांना तलवारीचे मानाचे प्रथम दिले होते. स्वराज्यावर आलेले दुसऱ्या संकटात बांदलाच्या सैन्याच्या तुकडीतील तीनशेच्या दरम्यान सैनिक मारले गेले होते. यामुळे महाराज विशालगडावर सुखरूप पोचले होते. बांदलाच्या या कामावर प्रसन्न होऊन शिवाजी महाराजांनी त्यांना तलवारीचे मानाचे प्रथम देण्याचे ठरविले आहे. शिवाजी महाराजांनी कान्होजी जेधे यांना आपले मनोगत व्यक्त केले. “महाराज, केवळ बांदलाच्या पराक्रमामुळेच आज तुमचे पाय आम्हाला दिसत आहेत. तेव्हा आम्ही आनंदाने पहिल्या पानाचा मान सोडतो. आपल्या पुढे आमच्या मानाची काय पत्रास ?” कान्होजीनीही आपला मान कृष्णाजी यास देऊन आपल्यात असणारे औदार्य दाखवून दिले. याचा उल्लेख शाहीराने केलेलाच आहे.

       || जैसे हनुमंत अंगत रघुनाथाला | तैसे जेधे बांदल शिवाजीला ||

आजही ‘कारी’ त असलेली त्यांचा वाडा त्यांच्या पराक्रमाची साक्ष देते आहे. प्रत्येकाने त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यास अंबवडेस जरूर जावे. तेथे क्षणभर उभे राहिल्यावर देवमहालाचे कर्तुत्व, पासलकरांचे पितृत्व, कान्होजींचे नेतृत्व, त्याग वगैरे स्मृतींचा सुगंध दरवळलेला आपल्यास अनुभवास येईल.

स्वामीनिष्ठ " वीर कान्होजी नाईक जेधे " समाधी स्थळ , अंबवडे , ता. भोर , जि . पुणे . (उजवीकडील जीवा महाला यांची समाधी व डावीकड़े तुळजा भवानी देवी मदिर )

 नोट : वरील सर्व माहिती " गडवाट " या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट (Vivek Shedge) चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे.

|| शिवकालीन शस्त्रे आणि हत्यारे ||

१. चिलखत (आर्मर) :
चिलखत शरीरसंरक्षक कवच व एक युद्धोपयोगी साधन. चिलखताचा वापर शत्रूच्या वारापासून संरक्षण करण्याकरिता होई.चिलखत मुख्य:ता धातूपासून बनविले जाई.कित्येक वेळा प्राण्यांच्या कातडीचा चिलखत म्हणून वापर होई.चिलखत हे नेहमी वजनाने हलके परंतू मजबूत असे.



मनुष्येतर प्राण्यांना निसर्गतःच स्वसंरक्षणाची साधने, उदा., केस, जाड कातडी, नखे, रंग बदलणे वगैरे उपलब्ध असतात; परंतु मानवाला मात्र स्वसंरक्षणासाठी अशा तऱ्हेचे एकही नैसर्गिक साधन उपलब्ध नसते. म्हणून चिलखतांचा वापर करून मानवाने आघात-प्रत्याघातापासून आपल्या स्वसंरक्षणाचा प्रश्न सोडविला आहे. प्राचीन काळी तलवार, भाला, गदा, इ. शस्त्रांच्यां घातक वारांपासून अगर अर्वाचीन काळी बंदुकीची गोळी, वेगाने उडणारे तोफगोळ्यांचे तुकडे इ. अस्त्रांच्या घातक माऱ्यापासून शरीरसंरक्षणासाठी शरीरावर किंवा वाहनांवर चढविण्यात येणारे युद्धोपयोगी संरक्षक साधन म्हणून चिलखताचा वापर रूढ आहे. 

 २. ढाल :
ढालीचा वापर प्रामुख्याने शत्रूच्या तलवारीच्या वारापासून बचाव करण्यासाठी होतो.ढाल प्रामुख्याने वेगवेगळ्या धातूपासून बनविली जाते. त्यामुळे ती टिकाऊ राहते,कित्येक वेळा ढालीचा वापर शस्त्र म्हणून केल्याची इतिहासात नोंद आहे.धातूची ढाल वजनाने जाड असल्यामुळे,प्राण्याच्या कातडीपासून हलकी ढाल बनविली गेली आहे,यात प्रमुख्याने गेंडा, हत्ती व कासवाच्या पाठीपासून केलेल्या ढाली आढळतात.या ढाली मजबूत असल्या तरी तलवारीच्या वारात तुटल्याची इतिहासात उदाहरणे आहेत.नरवीर तानाजीने सिंहगडाच्या लढाईच्या प्रसंगी जेव्हा स्वत: ची ढाल तुटली तेव्हा हाताला कमरेचा शेला गुंडाळून त्यावर शत्रूचे वार झेलले.
 

३. भाला :
भाला हे भू सेनेतील पायदळ व घोडदळ सैनिकांचे एक शस्त्र आहे. भाल्याला दंडशस्त्र असेही म्हणतात. भल्ल (भाल्याचे पाते) या संस्कृत शब्दापासून भाला शब्द रूढ झाला. भाल्याच्या फाळाने शत्रूला भोसकून जायबंदी करता येते. भाल्याने झालेली जखम खोल असल्यामुळे ती लवकर बरी होत नाही. बाण हे भाल्याचे छोटे स्वरूप होय. हलके व आखूड भाले शत्रूवर फेकता येतात. द्वंद्वयुद्धात अंगाशी न भिडता भाल्याचा उपयोग केला जाई.


मराठ्यांना भाला व तलवार ही बंदुकीपेक्षा अधिक प्रिय वाटत.
मुख (हलमुख) किंवा डोके (फाळ), दंड आणि पार्श्व किंवा पादत्राण असे भाल्याचे मुख्य तीन भाग असतात. मुखाच्या अग्राने खुपसता येते. दंडाच्या एका टोकांवर मुख व विरूद्ध टोकांवर पादत्राण बसवितात. मुख ते पार्श्व धरून भाल्याची जास्तीत जास्त लांबी ७ मी. आढळते. डोक्याची लांबी ७५ सेंमी. पर्यंत असते. भाल्याचा फाळ दगडाचा, हाडाचा किंवा धातूचा असतो. दंड गोल असून लोखंडाचा किंवा बाबूंचा असतो. पादत्राण लोखंडी असते. भाल्याच्या पादत्राणाचे टोक जमिनीत खुपसून व भाला उभा किंवा तिरपा धरून भाला-तटबंदी उभी करण्यात मराठा राऊत पटाईत होते.फेकण्याचे, हातातले व मिश्र बहुकामी असे भाल्यांचे तीन वर्ग आहेत. भालाधारी सामान्यतः चिलखत व ढाल वापरत असे.

४ . पट्टा (दांडपट्टा) :
पट्टा ही वजनाने हलकी परंतू घातक अशी तलवार होती.एकापेक्षा जास्त शत्रूंशी झुंजण्यास याचा खुप चांगला वापर होई.पट्टा तलवार ही मुख्यत: धातूपासून बनविली जाई.तलवारीचे पाते लांब व हलके असल्यामुळे शत्रूवर हल्ला करण्यास सोयीचे जाई.


 ५.  कुलपे :
कुलपे कुलूपांचा वापर शत्रूपासून,चोरापासून किल्याचे तसेच घरांचे संरक्षण करण्याकरिता होतो.कुलूपे मुख्य:ता धातूपासून बनविली गेली असल्यामुळे अत्यंत मजबूत असतात.कुलूपे वेगवेगळ्या आकारात आढळतात,प्राचीन काळातील कित्येक कुलूपावर नक्षीकाम आढळून येते. 


६. तोफगोळा :
तोफगोळा तोफगोळ्याचा वापर हा तोफेसाठी होई.तोफेच्या तोंडातून तोफगोळा आत सरकवून वरून बत्ती देत.छत्रपति शिवप्रभूंनी तसेच छत्रपति संभाजीराजेनी स्वराज्यात ठिकठिकाणी तोफगोळे बनविण्याचे कारखाने उभे केले होते,जेणेकरून परकियावर तोफगोळ्यासाठी अवलंबून राहता येऊ नये.





||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

Saturday 22 September 2012

शिवकालातील सरनौबत सेनानी यांचा परिचय :


 सरनौबत ही शिवकालातील अत्यंत मोठी आसामी.घोडदळ आणि पायदळ या दोन्ही सैन्याप्रकारावरशिवकालात स्वतंत्र प्रमुखांची नियुक्ती होत असे.दोन्ही विभागांचा कारभार हा स्वतंत्रपणे अमलात येत आणि मग हे दोन्ही सरनौबत एकत्रितपणे येऊन मोहिमेची आखणी, खर्च, मांडणी आणि इतर मनसुबे रचत. 

सरनौबत सेनानी

हिशेब ताळेबंद आणि खर्च पत्रे यांच्या आधारे पागा व्यवस्था थोडक्यात अशी होत -
सरकारातून घोडा मिळणारा बारगीर -> २५ बारगिरास १ पखालजी १ नालबंद व १ हवालदार -> ५ हवालदारांचा मिळून १ जुमलेदार [पगार ५०० होन सालीना व पालखीचा मान ] -> १० जुमलेदारांच्या वर १ हजारी [सालीना पगार १००० होन] -> ५ हजारींच्या वर १ पंचहजारी आणि या पंचहजारींच्या वर असणारा सरनौबत अंदाजे या सैन्य सरनौबतास सालीना ४००० ते ५००० होन इतका पगार होता.

 शिवकालात सरनौबत नेमके कोण होते आणि कधी होते 
यांचा परिचय आपण थोडक्यात पाहूया -

१. तुकोजी चोर (१६४० -१६४१ दरम्यान) - ह्यांना सरनौबत केल्याचा उल्लेख फक्त सभासद बखरीत [पृ.९] आणि एका पत्रामध्ये आहे [राजवाडे खंड १७ लेखांक १०]. शिवाजीराजांचे जे मावळातील बालपणीचे मित्र त्यातील हे एक असावे ह्या व्यतिरिक्त ह्याचा उल्लेख सुभानमंगळ च्या लढाई संबंधी शिवभारतात येतो. तुकोजी सोबत एक भैरोजी चोर असेही नाव येते. तुकोजी नेमके पायदळाचे सेनापती होते की घोडदळचे हे मात्र माहितीच्या अभावे सांगता येत नाही. श्री शेजवलकर यांच्या अंदाजे तुकोजी यांचा मृत्यू ५७ च्या जुन्नर लुटीच्या झाला तोवर तुकोजी हे सरनौबत होते परंतु या विधानास त्यांनी कुठलाही आधार दिलेला नाही.

 २. नुरखान बेग (१६४३, पायदळ) – ह्याचे नाव पुण्यात १६५७ साली झालेल्या एका निवाडपत्रात पायदळाचा सरनौबत म्हणून येते.शाहजीराजांनी शिवाजीराजांसोबतजी माणसे पाठवली त्यात हा असावा. ह्या पत्राच्या आधी किंवा नंतर याचा काहीही सुगावा लागत नाही पण १६५७ नंतर मात्र लगेचच ह्याला सरनौबतीवरून दूर करून त्याजागी येसाजी कंक ह्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

 ३ . माणकोजी दहातोंडे (१६५४ घोडदळ) ह्यांचे नाव सभासद बखरीत तसेच ५७ च्या निवाडपत्रात आहे.हे देखील शाहजीराजांकडून आलेल्या मंडळींपैकी परंतु हे तर हुकुम मानीनासेच झाले तेव्हा शिवाजीराजांनी राजगडाच्या पायथ्याशी वसवलेल्या शिवपट्टण [आजचे पाल बुद्रुक] येथे त्यांना चौरंग [हात कोपरापासून व पाय घुडघ्यापासून छाटून टाकण्याची शिवकालीन शिक्षा ] करून मारले अशी माहिती १७४० सालच्या एका विश्वसनीय यादीतून मिळते.

४. येसाजी कंक (१६५८ पायदळ)  – राजगड नजीकच्या भुतोंडे गावचे सर पाटील असणारे येसाजी कंक म्हणजे शिवाजीराजांचे बाल सवंगडी.ह्या सवंगड्याने आपल्या जीवासर्शी वेळोवेळी अगदी अखेरपर्यंत स्वराज्याची साथ दिली, जवळ जवळ ३० वर्षे येसाजी पायदळाचे सरनौबत होते.अफजल प्रकरण, ७० चा वादळी पराक्रम, भागानगर भेट इत्यादी ठिकाणी ह्यांचे भरपूर उल्लेख आहेत. ह्यांचे पुत्र कृष्णाजी कंक हे शंभूकालात फोंड्याच्या लढाईत गोळा लागून पडले.ह्यांच्या सोबत एक कोंडाजी कंक असेही नाव येते परंतु त्याची अधिक माहिती मिळत नाही.

५. नेतोजी पालकर (१६५८ घोडदळ) - नेतोजी चा उल्लेख आजवर इतिहासात नेताजी असा लिहिला गेला पण ते चूक आहे.समकालीन साधानाप्रमाणे नेतोजी हवे.ह्यांना १६५७ च्या सुमारास माणकोजी नंतर पागेची सरनौबाती मिळाली.दिग्विजयी पराक्रम करीत त्यांनी प्रती शिवाजीचीच उपमा मिळवली.पण स्वराज्याच्या कडक नियमात न बसणाऱ्या हलगर्जीपणामुळे त्यांना शिवाजीराजांनी “समयास कैसे पावला नाहीत ?” असा कौल लावीत दूर केले.हे मग अगोदर आदिलशाहित व तेथून मिर्जा राजाशी संधान बांधून मोगलाईत गेले व परत येवून शिखर शिंगणापूरला शुद्ध झाले परंतु शिवाजीराजांच्यामृत्यू पश्चात शहजादा अकबर प्रकरणानंतर केव्हातरी पुन्हा हे मोगलाईत गेले.

६. कडतोजी ‘प्रतापराव’ गुजर (१६६६ घोडदळ) -ह्यांच्या नेमणुकीच्या बऱ्याच आख्यायिका आहेत.मिर्झा राजा जयसिंगावर छुपा हल्ला, मोगल सेनापतीची ह्यांनी व शिवाजीराजांनी केलेली एकाच वेळची लुट इत्यादी पण विश्वसनीय पुराव्या आधारे ह्यांना सरनौबाती आणि प्रतापराव किताब १६६६ मध्ये मिळाला तसेच दिग्विजयी पराक्रम करीत त्यांनी तो सार्थ ठरवला. बागलाण, औरंगाबाद स्वारी आणि इतर अनेक पराक्रम यांच्या वाटचे आहे.१६७४ मध्ये राजाभिशेकाच्या काही काल आधी बहलोल खान सोडल्या प्रकारणी शिवाजीराजांनी त्यांना “सला काय निमित्य केलात ?” असा करडा सवाल केला आणि “बहलोलखानास गर्दीस मेळवून मगच रायगडी आम्हास तोंड दाखवावे” असा कडक आदेश दिला आणि हाच राग मनी बाळगून महाशिवरात्री च्या दिवशी प्रतापराव आपल्या ६ सरदाराना सोबत घेवून बहलोल खानवर तुटून पडले आणि वीरगतीस प्राप्त झाले.

७. हंसाजी ‘हंबीरराव’ मोहिते (१६७४ घोडदळ) – हंबीरराव माणूस तसा रांगडा परंतु स्थिर बुद्धीचा.शंभूकालात जी मोगली वावटळ उठली त्यात सगळ्यात महत्वाची कामगिरी कुणी केली असेल तर ती हंबीरराव मोहित्यांनी. प्रतापरावांच्यानंतर कुणास सरनौबती द्यावी या विचाराने शिवाजी महाराज चिपळूणला असणाऱ्या आपल्या फौजेचा कौल घेऊन आले आणि त्यांनी हंबीरराव यांना सरनौबत केले.हे शिवाजीराजांच्याअखेरपर्यंत घोडदळचे सरनौबत होते.हंबीरराव पुढे शंभूकाळात शर्जाखानाच्या लढाईत वाई इथे गोळा लागून पडले.

संदर्भ -
- सभासद बखर
- महाराष्ट्रेतीहासाची साधने -खंड २
- श्रीशिवभारत
- संकल्पित शिवचरित्राची प्रस्तावना आराखडा व साधने – श्री त्र्यं शं शेजवलकर
- श्री शिवचरीत्रप्रदीप
- छत्रपती शिवाजी – श्री निनाद बेडेकर

नोट : वरील सर्व माहिती " अवतरली शिवशाही सात समुद्र ओलांडून |घडविण्या अखंड महाराष्ट्र| " या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट  चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे.

Friday 21 September 2012

शिवरायांचे शिलेदार - सुर्यराव काकडे

छत्रपती शिवरायांचे बालपणीचे मित्र : सुर्यराव काकडे

सुर्यराव हे छत्रपती शिवरायांचे बालपणीचे मित्र होते. रोहिडा व जावळी सर करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.शिवरायांनी 'सुरराव काकडे दोन हजार हासम जावळीवर रवाना केले.' असा मोर्‍याच्या बखरीमध्ये उल्लेख आहे.सुर्यराव यांनी गाजविलेली साल्हेरची लढाई इतिहासात प्रसिध्द आहे. शिवरायांनी १६७१ मध्ये बागलाण मोहिम काढली आणि साल्हेर जिंकून घेतला.त्या मोहिमेची वार्ता दिल्लीच्या पातशहाला मिळाली.ते एकून पातशहा कष्टी झाला, नि म्हणाला,' काय इलाज करावा,लाख लाख घोडाचे सुभे रवाना केले ते बुडवले नामोहरम होऊन आले.आता कोण पाठवावे 'तेव्हा पातशहाने 'शिवराय जोवर जिवंत तोवर दिल्ली आपण सोडीत नाही'असा विचार केला आणि इखलासखान व बहोलोलखान यांस बोलावून वीस हजार स्वारांनिशी सालेरीस रवाना केले. मग इखलासखानाने येऊन साल्हेरला वेढा घातला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा मोगलाईत पाठवलेले आपले सरनौबत प्रतापरावांना जासूदाकरवी कळविले 'तुम्ही लष्कर घेऊन सालेरीस जाऊन बेलोलखानास धारून चालविणे आण कोकणातून मोरोपंत पेशव्यांनाही हशमानिशी रवाना केले.' हे इकडून येतील तुम्हीही वरघाटी कोकणातून येणे असे दुतर्फा चालून येऊन गनिमास गर्दीस मिळवणे'अशी पत्रे पाठविली.
त्याप्रमाणे एकीकडून प्रतापराव,सुर्यराव तर दुसरीकडून पेशवे,उभयता सालेरीस आले,आणि मोठे युध्द झाले.सभासद बखरीत याचा उल्लेख् खालील प्रमाणे आढळतो ''चार प्रहर दिवस युध्द जाहले मोगल,पठाण,रजपूत,तोफांचे,हत्ती, उंट आराबा घालून युध्द जाहले.युध्द होताच पृथ्वीचा धुराळा असा उडालाकी,तीन कोश औरस चौरस,आपले व परके लोक माणूस दिसत नव्हते.हत्ती रणास आले दुतर्फा दहा हजार माणूस मुर्दा जाहले,पूर वहिले.रक्ताचे चिखल जाहले.मराठांनी इखलासखान आणि बेलोलखानाचा पाडाव केला.युध्दात प्रचंड प्रमाणावर हानी झाली.या युध्दात शिवरायांच्या एक लाख २० हजार सैन्याचा समावेश होता,पैकी १० हजार माणसे कामीस आले.सहा हजार घोडे,सहा हजार उंट,सव्वाशे हत्ती तसेच खजिना,जडजवाहीर,कापड अशी अफाट मालमत्ता शिवरायांच्या हाती आली.
या युध्दात मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली.मोरोपंत पेशवे आणि प्रतापराव सरनौबत यांनी आणीबाणी केली.सूर्यराव काकडे यांना पराक्रम गाजवतांना आपला देह ठेवावा लागला.ते तोफेचा गोळा लागून पडले. 'सूर्यराव काही सामान्य योध्दा नव्हे.भारती जैसा कर्ण योध्दा त्याचा प्रतिमेचा,असा शूर पडला.' विजयाची बातमी शिवरायांकडे गेली. राजे खूप खूश झाले.खबर घेऊन आलेल्या जासूदांना सोन्याची कडी आणि प्रतापराव सरनौबत,मोरोपंत पेशवे,आनंदराव, व्यंकोजी पंत यांना अपार बक्षीस आणि द्रव्य देण्यात आले. हा पराभव दिल्लीच्या बादशहाच्या जिव्हारी लागला की सभासद म्हणतो,पातशहा असे कष्टी जाले. 'खुदाने मुसलमानांची पातशाही दूर करून शिवरायांसच दिधली असे वाटते.
आता शिवराय अगोदर आपणास मृत्यु येईल तर बरे.आता शिवरायांची चिंता जीवी सोसवत नाही.'असे बोलिले.मोगलांच्या सैन्याशी समोरासमोर लढाई करून तोपर्यंत महाराजांना विजय प्राप्त झाला होता,त्यात साल्हेरचा विजय प्रथम मानावर होता.असा मोठा विजय यापूर्वी कधीही मिळाला नव्हता.या युध्दात महाराजांच्या लोकांनी दाखवलेल्या युध्दकौशल्याची व शौर्याची किर्ती चहुकडे पसरली आणि त्यांचा दरारा अधिकच वाढला.साल्हेर जिंकल्यावर त्यासमोरील मुल्हेर किल्ला मराठ्यांनी जिंकला आणि संपूर्ण बागलाण प्रांतावर त्यांनी आपला शह बसवला.त्यामुळे सुरत शहरास कायमची दहशत बसली.


विशेष सुर्यराव काकडे यांच्या समाधीवरील चंद्रसुर्य - त्याचा अर्थ "" हे चंद्रसूर्य असेपर्यंत तुमची किर्ती  राहील "" असा  आहे...

||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥


शिवरायांचे शिलेदार - गोदाजी जगताप


 पुरंदराचा पहिला रणसंग्राम गाजविणारे वीर गोदाजी जगताप

छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरूवात केली होती.शहाजीराजेंना पुणे जहागीर मिळाली होती.जिजाऊ आईसाहेब व शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखालीशिवबांनी मावळातील एक-एक किल्ला काबीज करावयास सुरूवात केली.तोरणा, सुभानमंगळ,रोहिडा असे किल्ले त्यांनी काबीज केले.विजापुरच्या अदिलशाही दरबारात शिवबांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या.शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी अदिलशाहने सन १६४८ साली फत्तेखानास धाडले.
फत्तेखानाने जेजूरीजवळील बेलसर येथे आपला तळ ठोकला होता.खानाच्या सैन्याने शिरवळजवळील सुभानमंगळ किल्ल्यावर हल्ला करून किल्ला काबीज केला.मराठ्यांचाहा पहिलाच पराभव होता.छत्रपतींनीकावजी मल्हार यास सुभानमंगळ भूईकोटावर चालून जाण्यास सांगितले.त्यांनी एका रात्रीत गड सर केला.तर फत्तेखानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर,कान्होजीजेधे,बाजी जेधे,गोदाजी जगताप बेलसरच्या छावणीवर गेले,अचानक हल्ला करून त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल केली व पुरंदरचा पायथा गाठला.
फत्तेखानचा सरदार मुसेखानाने पुरंदरावर हल्ला केला,पुरंदराला खानाच्या सैन्याचा वेढा पडला.गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्याचे व मराठ्यांचे तुंबळ युध्द झाले.बाजी पासलकर,कान्होजीजेधे,गोदाजी जगताप यांनी गनिमांची कत्तल केली.फत्तेखानचासरदार मुसेखान व गोदाजी जगताप एकमेकाला भिडले.दोघात तुंबळ युध्द झाले.अखेरीस गोदाजीच्या वाराने मुसेखानाच्या छाताडाचा वेध घेतला व खान कोसळला.मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला पण बाजी पासलकर सारखा वीर रणी पडला.

  
गोदाजी जगताप यांना मानाचा मुजरा .......!!!


शिवरायांचे शिलेदार - नेताजी पालकर

'प्रतिशिवाजी'

नेताजी पालकर हे दीर्घ काळ स्वराज्याचे सरनौबत होते. त्यांना 'प्रतिशिवाजी' म्हणजेच 'दूसरा शिवाजी' असेही म्हटले जायचे. नेताजी मूळचे पुणे जिल्ह्यातील शिरुर गावचे. त्यांनी अनेक युद्धे गाजवली होती. अफजलखान वधाच्या वेळी अफजल खानाच्या सैन्याला हुसकावून लावण्यात नेताजींनी सिंहाचा वाटा उचलला होता. पण पुरंदरच्या तहानंतर शिवाजी महाराजांशी झालेल्या काही वादामुले त्यांना स्वराज्यापासून दूर जावे लागले होते तेव्हा त्यांनी मुघलांची चाकरी केली.पण पच्छाताप झाल्यामुले तब्बल नऊ वर्षांनी नेताजी पुन्हा स्वराज्यात आले.मुघलान्नी त्यांना आणि त्यांच्या भावाला जिवाची धमकी देऊन मुसलमान होण्यास प्रवृत्त केले होते. पण स्वराज्यात पुन्हा आल्यावर शिवाजी महाराजांनी पुन्हा योग्य विधि पर पाडून त्यांना हिन्दू धर्मात प्रवेश दिला होता.शिवाजी महाराजांनंतर त्यांनी संभाजी महाराजांची ही चाकरी केली होती.
पुरंदर तहानंतर शिवाजी महाराज, मिर्झा राजे, नेताजी पालकर आणि दिलेरखान विजापूरवर चालून गेले। तेथे आदिलशाही सेनापति सर्जाखान याच्यासमोर ते चौघे अपयशी ठरत होते. आणि त्या अपयशाचे खापर दिलेरखान महाराजांवरच फोडू लागला. म्हणून विजापूरकरांचा पन्हाळगड जिंकण्या साठी महाराज विजापुरहून परत आले, महाराजांनी रात्रीच गडावर छापा घातला. आदिलशाही किल्लेदार बेसावध असेल अशी महाराजांची खात्री होती पण किल्लेदार सावध होता. त्यात नेताजी पालकर वेळेवर पोहोचून महाराजांना कुमक पोहोचवू शकले नाहीत. यात महाराजांचा पराभव झाला आणि सुमारे १००० माणसे मारली गेली.महाराज नेताजींवर चिडले आणि त्यांनी नेताजीला पत्राद्वारे "समयास कैसा पावला नाहीस" असे म्हणून बडतर्फ केले.मग नेताजी विजापूरकरांना जाऊन मिळाले. महाराज आग्र्याच्या भेटीस निघून गेल्यानंतर मिर्झाराजांनी नेताजी पालकरांना विजापूरकरांकडून मोगलांकडे वळवले.
शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यातुन औरंगजेबाच्या कैदेतून सूटण्यात यशस्वी झाले तेव्हा शिवाजी सुटला आत्ता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचे फर्मान दि।१९ ऑगस्ट १६६६ रोजी आग्रा येथून सोडले. नेताजी या वेळी मोगली छावणीत बीड नजीक धारुर येथे होते.दि.२४ ऑक्टोबर १६६६ रोजी मिर्झा राजे जयसिंह यांनी नेताजी अन् त्यांचे चुलते कोंडाजी यांना अटक केली. दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली. ४ दिवसांच्या अतोनात हालानंतर नेताजींनी धर्मांतरास मान्यता दिली. दि.२७ मार्च १६६७ रोजी नेताजी मुसलमान झाले व त्यांचे 'महम्मद कुलिखान' असे नामकरण करण्यात आले.जून १६६७. औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजी काबूल कंदाहाराच्या मोहिमेवर रवाना झाले.लाहोरजवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला. पुढे ९ वर्षे नेतोजी काबूल कंदाहार येथेच मोहिमेवर होते.
शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते त्यावेळी औरंगजेबाला 'प्रतिशिवाजीची' आठवण झाली। बाटून ९ वर्षे उलटल्यावर नेताजी पक्का पाक झाला असे औरंगजेबाला वाटले. मग त्याने या 'मुहंम्मद कुलीखानास', दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले.मे १६७६. रोजी पच्छाताप झालेले नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले.१९ जून १६७६ रोजी शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा विधीवत हिंदू धर्मामध्ये घेतले.
महाराज व नेताजी नातलग आहेत असे उल्लेख मोगली अखबारातून मिळतात. महाराजांची पत्नी पुतळाबाई राणी साहेब यांचे माहेर पालकर घराण्यातले आहे. महाराजांची एक राजकन्या कमलाबाई हिचे लग्न जानोजी पालकरांशी झाले. पण जानोजी अन् पुतळाबाई हे नेताजी नेमके कोण हे फार मोठे प्रश्णचिन्ह अजूनही आहे.'छावा' नुसार नेताजी पालकर शिवरायांच्या एक महाराणी सगुणाबाई यांचे सख्खे काका होते.

||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

मराठ्यांचा नाद खुळा….!!



Thursday 20 September 2012

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले कुलंगगड ।।


कुलंगगड किल्ला

गडा विषयी :

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग कसारा घाटातून जातो. या महामार्गावर इगतपुरी गाव आहे. इगतपुरी हे तालुक्याचे गाव असून ते मुंबई-नाशिक या रेल्वे मार्गावर आहे. इगतपूरीच्या दक्षिणेला सह्याद्रीची एक बेलाग रांग आहे. या पुर्व पश्चिम रांगेवर कळसूबाईचे शिखर आहे. कळसूबाई हे सह्याद्रीमधील सर्वोच्च शिखर आहे. त्यामुळे या रांगेला कळसूबाईची रांग म्हणून ओळखले जाते.या कळसूबाई शिखराच्या पश्चिमेला कुलंग किल्ला आहे. या रांगेची सुरुवात कुलंगगडापासून होते. कुलंगगडाच्या उत्तर पायथ्याला कुरंगवाडी नावाचे गाव आहे. इगतपुरीहून पिंपरी सद्रुधिन मार्गे येथे पोहोचता येते. तसेच कळसूबाईच्या पायथ्याच्या वारी घाटातून खाली उतरल्यावर इंदोरे मार्गे आंबेवाडीला पोहोचता येते. आंबेवाडीकडूनही कुलंगगडाचा पायथा गाठता येतो. कळसूबाईची रांग इतर रांगांपेक्षा तुलनेत उंच असून ती कातळकड्यांनी घेरलेली आहे. त्यामुळे या रांगेतील किल्ले दुर्गम असून यांची चढाई चढणार्‍याचा कस काढणारी आहे.
 स .स. पासून १४७० मीटर उंचीच्या कुलंगगडावर पोहोचण्यासाठी प्रथम खालच्या पदरात पोहोचावे लागते. पदरात पोहोचण्यासाठी कुरंगवाडीतून दोन तासांची वाटचाल करावी लागते. पदरात आल्यावर मदनगड व त्या शेजारील सुळके आणि कुलंगचा कातळकडा मनात धडकी भरवतो.समोर कुलंगचा कातळकडा ठेवल्यास डावीकडे मदनगड दिसतो. तेव्हा कुलंगच्या उजव्याबाजुने उतरणारा डोंगरदांड आपल्याला दिसतो. या डोंगरदांडावरुनच कुलंगची चढाई आहे.या दमछाक करणार्‍या वाटेने चढाई केल्यावर आपण कुलंगच्या कड्याला भिडतो. कड्याला कातळकोरीव पायर्‍या आहेत. या पायर्‍या चढून आपण दारातून गडप्रवेश करतो. गडाचा माथा अतिशय विस्तीर्ण आहे. कुलंगगडावर पाण्याची टाकी मुबलक असून त्यातले पाणी स्वच्छ व पिण्यायोग्य आहे. ओळीने असणारी पाण्याची टाकी पाहून आपण कुलंगच्या पुर्व कड्यावर येतो. या पाताळवेरी कड्यावरुन कळसूबाई रांगेचे अप्रतिम दृष्य दिसते. हाकेच्या अंतरावर असलेला बेलाग मदनगड आपल्याला खिळवून ठेवतो. त्याच्या उजवीकडे प्रचंड विस्ताराचा अलंगगड आपल्याला खुणावतो. दूरवर कळसूबाईचे शिखर दिसते. पाबरगड, रतनगड, कायाबाई, भैरवगड, हरिश्चंद्र, सिद्धगड तसेच स्वच्छ हवामानात माथेरान पेण चंदेरी, मलंगगडतसेच माहुलीची रांगही न्याहाळता येते. बळवंतगड, भिंगलवाडी तसेच कावनाई आड, पहा याचेही सुरेख दर्शन होते. कुलंगगडाचे भौगोलिक स्थान अतिशय मोक्यावर असल्यामुळे चेंढ्या घाट, मेंढ्या घाट तसेच कसारा घाट मार्गावर टेहाळणी करणे सोयीचे जाते. गडावर अनेक घरांची जोती पहायला मिळतात. निसर्गाचे भव्य रुप आणि सह्याद्रीचे रौद्रभिषण कडे मनाला भुरळ घालतात. दुर्ग भटक्यांना नेहमीच आकर्षित करणारा कुलंगगड पहाण्यासाठी एका पुर्ण दिवसाचे नियोजन आवश्यक आहे. आल्यावाटेने खाली पदरामध्ये उतरुन मदनगडाकडे जाता येते.


नोट : वरील सर्व माहिती "गडवाट" व "महाराष्ट्रातील किल्ले" या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट  (by Malhar Shelar) चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

Thursday 13 September 2012

छायाचित्रित : "गड-किल्ल्यांची अभेद्य तटबंदी"


हिंदवी स्वराज्याचे संस्थापक , महाराष्ट्राचे - || छत्रपती शिवाजी महाराज || म्हणजे महाराष्ट्राचे व तमाम मराठ्यांचे आराध्य दैवत तर गडकिल्ले आणि सह्याद्री महाराष्ट्राचा मूलाधार. 
 सुलतानांची गुलामगिरी हेच आयुष्याचे इति कर्तव्य समजणाऱ्या कणाहीन झालेल्या समाजाला महाराजांनी भानावर आणलं.एवढचं नाही तर जगाने कौतुक करावे आणि अखिल हिंदूस्थानाने अभिमान बाळगावा असं अखंड हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या साक्षीने उभे केले. बाराशेव्या शतकापासून भारतात प्रस्थापित झालेल्या आणि स्थिरावलेल्या सर्व सुलतानांच्या टोळधाडी छत्रपती शिवाजी महाराज यांनी  गडकिल्ले आणि सह्याद्री यांच्या मदतीने थोपवले. बंगाल पासून इराण-इराक पर्यंत अथांग पसरलेल्या मोंगलशाहीचा पातशहा औरंगजेबाचे सुद्धा दक्षिण विजयाचे स्वप्न स्वप्नच राहिले, ते फक्त आणि फक्त शिवराय, त्यांचे सर्व मावळे, गडकिल्ले आणि अनादी काळापूर्वी प्रगट झालेला सह्याद्री.  यां मुळेच हेच महारा­ष्ट्राचा इतिहास-वर्तमान आणि भविष्य. 


युगप्रवर्तक सर्वगुणसंपन्न छत्रपती शिवाजी महाराजांना, सर्व मावळे, गडकिल्ले आणि सह्याद्रीला त्रिवार मुजरा...........!!!!

किल्ले रायगड तटबंदी

किल्ले राजगड तटबंदी (सुवेळा माची)

किल्ले राजगड तटबंदी (पाली दरवाजा)

किल्ले राजमाची तटबंदी

किल्ले तोरणा तटबंदी

किल्ले वासोटा तटबंदी

किल्ले कोर्लई तटबंदी


नोट : वरील सर्व माहिती व छायाचित्र  " शिव-सह्याद्री मासिक- अंक चौथा-सप्टेंबर- २०१२"  चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. सर्व अप्रतिम छायाचित्र हे छायाचित्रकार : रवी पवार , भूषण पाटील , हर्षद पावले , आणि त्यांचा सहकार्यांनी काढली आहेत.

शिवकालीन तोफा ........



तोफ : लष्करातील एक महत्त्वाचे अस्र
तोफ म्हणजे अवजड बंदूक किंवा आत स्फोटक दारू भरून बार काढण्याचे यंत्र. तोफेतून अनेक प्रकारचे संहारक गोळे (क्षेप्य) उडविता येतात.. तोफ हे संहारक तसेच संरक्षक शस्त्रही आहे. ज्यांच्या कार्यासाठी विशिष्ट आधिपत्य व नियंत्रणपद्धती असते, असा विभाग म्हणजे तोफखाना होय. तोफखान्यात अनेक उपविभाग असतात. 
तटबंदीचा विध्वंस करण्यासाठी आणि तटबंदीच्या आतील लोकांवर मारा करण्यासाठी तोफांचा वापर केला जात असे .बैल किंवा हत्तीच्या गाड्यांतून तोफा वाहून नेल्या जात. लहानसहान तोफा उंटावर किंवा हत्तीवर बांधून त्यांचा फिरता तोफखाना बनवीत. त्यास सुतरनाल आणि गजनाल म्हणत. तोफगाडे ओढण्यास किमान २५० बैल लागत. दिवसाला ५ ते ६ किमी. चाल होई. तोफगोळे १५ ते ६० किग्रॅ. वजनाचे दगडी किंवा भरीव लोखंडी असत.
 

शिवकालीन तोफा :

१.लोखंडी तोफ-
२.पंचधातूची तोफ
३.अष्टधातूची तोफ
४.उखळी तोफ
५.गजनाल तोफ
६.शुतरनाल(सुतार नाळ)
७.दोजरब(दोन नळ्यांची तोफ)
८.पितळी तोफ
९.गार भांडी(तोफ)
१०.फटकडी तोफ
११.गरनाळा तोफ

याशिवाय जंबोरा(लांब नळीची तोफ) तोफा ,रेहकले (हलक्या लहान तोफा) व मंजनीक तोफ तसेच आज्ञापत्रात रामचांग्या,दुरान्या अशा तोफांचे प्रकार सांगितले आहेत.




छत्रपती शिवाजी महाराज पोर्तुगीज-इंग्रजांकडून तोफा विकत घेत असत . राजापूर (कोकण) येथे त्यांनी तोफांचा कारखाना काढला होता. संभाजी महाराजांनी देखील स्वतंत्रपणे तोफा बनवण्याचा प्रयत्न केला होता.

 "गावठी बॉम्ब" हे मराठी हुक्के  विरुद्ध तोफा ... 

महिना झाला, दीड महिने झाले, दोन महिने झाले, तीन महिने झाले, चार महिने झाले, पाच महिने झाले. सहाशे मावळे किल्ला अजिंक्य ठेवतायत. अरे! पुढं तसूभरं सरू देईनात. चार्र्फडला, वैतागला शहाबुद्दीन खान. शेवटी डोक्यातनं युक्ती निघाली तोफा मागे घेतल्या तर गोळे पोहोचत नाही ना...आदेश दिला सैन्याला, झाडं तोडा आजूबाजूची सगळ्या जंगलातली, सगळी लाकडं तोडली. दीड-दोन महिने काम चालू आहे. शहाबुद्दीननं अफ्लात्म किमया केली. किल्ल्याच्या उंचीचा प्रचंड मोठा लाकडी बुरुंजच त्यांनी उभा केला, लाकडी दमदमा...का? तर तोफा आता या लाकडी बुरुंजावर नेउन ठेवायच्यात. किल्ल्याच्या उंची इतक्या, अनतितनं मग! खाली डागायच्या बस्सं!!! साधी गोष्ट नाही, कौतुकं केलं पाहिजे शहाबुद्दीनचं कौतुकं!!! अरे! किल्ल्याच्या उंची इतका लाकडी बुरुंज आणि तोही केवढा पन्नास तोफा बसतील वरं आणि पाचशे सैनिक उभा राहतील वरं एवढा मोठा बुरुंज. सगळा बुरुंज बांधेपर्यंत मराठे शांत बघत राहिले. बुरुंज उभा राहिला, तोफाही वरंचढविल्या आता उद्या बुरुंजावरुन तोफमारी चालू करायची, किल्ल्यावरं किती दिवस लढतायत बघू? रात्री सगळे थकले, मोघल शांत पडले आणि मराठे नेमके मध्यरात्री बाहेरपडले. त्या बुरुंजाच्या पुढं आले, दारुगोळा त्या बुरुंजाच्या कडेनी ठासून भरला. पूर्वी हुक्के असायचे हुक्के हणजे "गावठी बॉम्ब" हे मराठी हुक्के एका बाजूनी मोघलांना पत्ता लागू नये, मोघल छावणीमध्ये हुक्के टाकत राहिले. मोघलांचा कल्लोळ उडाला आणि तेवढ्या वेळात बुरुंजाभोवती सगळी दारू ठासली. सुरुंग पेरले, वातानी पेटवल्या आणि बघता बघता पेटली..."थुई- थुई-थुई" करत वातान पेटत गेली आणि "धाड्म-धूम" अवघा बुरुंज ढासळला, तोफांसकट खाली. मराठ्यांच्या किल्ल्यावर गोळे पडायच्या आधीच मराठ्यांनी बुरुंजाचाच निकाल लावला.

 नोट : वरील सर्व माहिती "  दुर्ग-खंड पहिला"   पुस्तकातील आहे .

Friday 7 September 2012

हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या महाराणीसाहेब सईबाई यांचे समाधी स्थळ


महाराणी सईबाई साहेब यांची राजगड च्या पायथ्याशी असलेल्या समाधी


"" एक पावन पणती जिने छत्रपती शिवरायंच्या आयुष्यात असंख्य सुखाचे दीप उज्लवले.. 
एक हवेची सुखद झुळूक जिच्या पोटी छत्रपती शंभूराजे नावाचे तुफान जन्मले.. 
स्वराज्याच्या पहिल्या महाराणीसाहेब अखंड सौभाग्य अलंकृत सईबाईसाहेब शिवाजीराजे भोसले ""

कोण म्हणतो आज कालच्या नवीन पिढीचे काय खरे नाही ? हे पहा म्हणावं .... महाराणी सईबाईसाहेब यांच्या ३५३ व्या पुण्यतिथीला (६ sep ) "गडवाट" परिवार सोबत आदरांजली अर्पण करणारे आजचे शिवरायांचे मावळे .........!!!!!!!!! 

ऊगाच मनत नाहीत मराठ्यांचा नाद खुळा….!!!


आजचे छत्रपती शिवरायांचे मावळे

महाराणी सईबाई यांचे माहेर असलेल्या सातारा जिल्ह्यातील फलटण वरून ३५३ व्या पुण्यतिथीला भर पावसात आलेली  महिला मंडळी व लहान मुली  या सर्वांना मानाचा मुजरा ...!!!


                        ||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
                                       ॥जय जिजाऊ॥
                                       ॥जय शिवराय॥
                                       ॥जय शंभूराजे॥
                                     ॥जयोस्तू मराठा॥


जेजुरी गडावरील पितापुत्र :: शहाजीराजे आणि शिवरायांचे " मुखावलोकन (भेट) "


|| शहाजीराजे व शिवराय यांचा जेजुरी गडावरील भेटीचा प्रसंग ||

इ.स. १६६२ सालची घटना. छत्रपती शिवरायांनी जुलमी मोगल सत्तेशी कडवा प्रतिकार करित अल्पकाळातच हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. दिवसेंदिवस महाराज मोगलांच्या ताब्यातील एक एक गड सर करीत होते आणि त्या प्रत्येक गडावर शिवशाहीच्या वैभवाचा भगवा राजबिंडा ध्वज दिमाखाने फडकत होता. बघता बघता महाराजांच्या किर्तीने महाराष्ट्राच्या सीमा कधीच पार केल्या होत्या. त्यावेळेस शिवरायांचे वडील शहाजीराजे कर्नाटकमध्ये आदिलशहाच्या सेवेत होते. कार्यवाहूमुळे शहाजीराजांचा बराचसा काळ कर्नाटकातच व्यतीत होत होता. मात्र, त्यांच्याही कानावर पुत्र शिवबाच्या कीर्तीचा डंका निनादत होता. सर्वच कुटुंबियांना एकमेकांच्या भेटिची ओढ लागून राहिली होती. त्यामळे शहाजीराजांनी कुटुंबाच्या भेटिचे मनावर घेऊन बेँगळूर सोडले.  मजल दरमजल करीत, तीर्थक्षेत्रांना भेटी देत ते आपल्या घोडदळ-पायदळासह पुण्याकडे येत होते. त्यावेळी शिवरायांना पकडण्याच्या हेतुने शाहिस्तेखान पुण्याच्या लाल महालात तळ ठोकून बसला होता. त्यामुळे शहाजीराजे आणि शिवराय यांची भेट जेजुरीत होणे हिताचे होते.
बय्राच वर्षानंतर मुखावलोकन करायचे झाल्यास ते एखाद्या तीर्थक्षेत्री करावे, असा धार्मिक संकेत असल्यामुळे शिवरायांनीही जेजुरीतच वडिलांची भेट घ्यायचे ठरवले. शहाजीराजे जेजुरीला येताच त्यांनी गडावर जाऊन खंडोबाचे दर्शन घेतले. आज ज्या ठिकाणी ' अडिच पायय्रा ' आहेत, त्या ठिकाणी पितापुत्राने भेट घ्यायचे ठरले. प्रथम एकमेकांकडे न पहाता साजुक तुपाने भरलेल्या काशाच्या परातीत शहाजीराजे व शिवरायांनी पाहिले. आनंदित झालेले परस्परांचे चेहरे दोहांनाहि दिसले. नंतर, शिवरायांनी नम्रपणे आपले मस्तक शहाजीराजांच्या चरणावर टेकवले. पितापुत्राने एकमेकांना कडकडून मिठी मारली. शहाजीराजे व शिवराय यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले.. असे झाले शहाजीराजे आणि शिवरायांचे ' मुखावलोकन ' . 

मराठ्यांच्या इतिहासात अजरामर झालेली जेजुरीगडावरील हिच ती ' पितापुत्र भेट '


                                     ||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
                                       ॥जय जिजाऊ॥
                                       ॥जय शिवराय॥
                                       ॥जय शंभूराजे॥
                                      ॥जयोस्तू मराठा॥


Tuesday 4 September 2012

शिवरायांचे शिलेदार - मदारी मेह्त्तर.



आग्र्यास हिरोजी बरोबर आपला जीव धोक्यात घालून शिवरायांचे प्राण वाचवणारा एक मुस्लीम तरुण मदारी मेह्त्तर, राज्याभिषेकावेळ ी एका कोपऱ्यात उभारलेल्या मदारी ला महाराजांनी बोलावले आणि विचारले"मदारी बोल तुला काय देवू?
मदारी काही बोलला नाही महाराज म्हणाले "तू मागशील ते मी तुला देईन".........
मदारी नम्रपणे म्हणाला "मला काही नको फक्त आपल्या सिंहासनाची व्यवस्था ठेवण्याचे काम मला द्या" महाराज हसले आणि त्याची विनंती मान्य केली इतकेच नाही तर त्याला सोन्याचे कडे आणि वस्त्रे बहाल केली.....
तर असे होते शिवरायांचे काही स्वामिनिष्ठ शिलेदार त्यांना मानाचा मुजरा.....!!!!!!



||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||

                                    ॥जय जिजाऊ॥
                                    ॥जय शिवराय॥
                                    ॥जय शंभूराजे॥
                                   ॥जयोस्तू मराठा॥
                              मराठ्यांचा नाद खुळा….!!

प्रवास एका शिवभक्ताचा :- || किल्ले कनकदुर्ग-गोवागड ||

कनकदुर्ग-गोवागड किल्ला


हर्णे बंदर प्राचिन काळापासून प्रसिध्द आहे. सुवर्णदुर्ग या जलदुर्गामुळे हर्णे बंदराला ऐतिहासीक महत्वही प्राप्त झालेले आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हर्णेच्या सागरी किनार्‍यावर तीन किनारी किल्ल्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. ते तीन दुर्ग म्हणजे कनकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि गोवागड हे होय.

गडावर पहाण्यासारखी ठिकाणे :
हर्णे बंदर दापोली तालुक्यामधे असून तो रत्नागिरी जिल्ह्यामधे आहे. हर्णेच्या किनार्‍यावर दक्षिणेकडे टेकडीवजा एक भुशिर घुसलेले आहे. या लहानश्या टेकडीवजा भुशिरावर कनकदुर्गचा किल्ला उभा आहे. कनकदुर्गाच्या पुर्व बाजुला मच्छिमारांच्या असंख्य नौका दिसतात. या नौकांमधे जाण्यासाठी कनकदुर्गाला लागुनच धक्का बांधलेला आहे. या धक्क्यावर जाण्यासाठी पुलासारखा रस्ता केलेला आहे. या रस्त्यावर चालत गेल्यावर कनकदुर्गाच्यावर जाण्यासाठी केलेल्या पायर्‍यांचा मार्ग आहे. या पायर्‍यांच्या बाजुलाच भक्कम बांधणीचा बुरुज आहे. काळ्या पाषाणातील हा बुरुज म्हणजे कनकदुर्ग... हा पुर्वी किल्ला होता याचा साक्षीदार आहे. पायर्‍यांच्या मार्गाने आपण पाचच मिनिटांमधे कनकदुर्गावर पोहोचतो. गडाच्य माथ्यावरच्या इमारती आता नष्ट झाल्याअसून त्याभागात दिपगृह उभे असलेले दिसते. कनकदुर्गावरुन मुरुड दाभोळ तसेच गोपाळगडापर्यंतचा सागरकिनारा दिसतो. पश्चिमेकडे अथांग सागराची मधुन मधुन चमचमनारी किनार आणि सागराची गाज आपल्या मनाला धडकी भरवत रहाते. या पार्श्वभूमीवर दिमाखात उभा असलेला फुलपाखराच्या आकाराचा सुवर्णदुर्ग आपले लक्ष वेधून घेतो. उत्तरेकडै फत्तेदुर्गाची टेकडी मच्छिमारांच्या वस्तीने पुर्णपणे घेरलेली दिसते. कनकदुर्गावरील गडपणाचे अवशेष काळाच्या ओघात नष्ट झाल्यामुळे आपली गडफेरी १५ ते २० मिनिटांमधे आवरते.
कनकदुर्गाकडून परत फिरल्यावर डावीकडील टेकडी म्हणजे फत्तेदुर्ग असल्याची मनाची समजूत घालून पुढे निघावे लागते. मच्छिमारांच्या वस्तीने व्यापलेल्या फत्तेदुर्गावरचे अवशेष केव्हाच लुप्त झालेले आहे.
फत्तेदुर्गापासून फर्लांगभर गाडीरस्त्याने चालत आल्यावर समोर दिसतो तो तटबंदीने युक्त असलेला गोवागड. भक्कम तटबंदी आणि भक्कम दरवाजा असलेल्या या किल्ल्याचे नाव जरी गोवागड असले तरी गोव्याशी याचा काही संबंध नाही. रस्त्याच्या कडेलाच याचा दरवाजा दिसतो पण याचा मुख्यदरवाजा मात्र उत्तरेकडे तोंड करुन आहे. हे भव्य प्रवेशव्दार पहाण्यासाठी तटबंदीला वळून समोरुन आपल्याला जावे लागते. सागराच्या बाजुला थोडेसे उतरुन डावीकडे वळाल्यावर आतल्या बाजुला हे प्रवेशव्दार आहे. हे प्रवेशव्दार दगडाने चिणून बंद करण्यात आले आहे. प्रवेशव्दाराजवळ हनुमानाची मुर्ती आहे. तसेच येथे शरभ व महाराष्ट्रामधे किल्यांवर अभावानेच दिसणारे गंडभेरुडाचे शिल्प आहे. हे प्रवेशव्दार पाहून पुन्हा रस्त्यावर येवून नव्याने केलेल्या कमानीवजा दारातून गडामधे प्रवेश करावा लागतो. सध्या कोणा हॉटेल व्यवसायीकाने गडाचा ताबा घेतला आहे. त्याने दारावर चौकीही उभारली आहे. तेथील रखवालदाराची परवानगी घेवून किल्ल्यामधे जाता येते. गोवागड दक्षिणकडील भाग थोडय़ा चढाचा आहे. याचाच उपयोग करुन त्याला तटबंदी घालून बालेकिल्ला केलेला आहे. पश्चिमेकडील तटबंदी काहीशी ढासळलेली आहे. पश्चिमबाजुला सुवर्णदुर्गाचे दृष्य उत्तम दिसते. गडामधे पाण्याची विहीर आहे. तिचा वापर नसल्यामुळे पाणी वापरण्यायोग्य राहीले नाही. किल्ल्यात इंग्रजकालीन दोन इमारती पडलेल्या अवस्थमधे आहेत. त्यामधील एकात पुर्वी कलेक्टर राहात असे. गडामधे महत्त्वाचे असे बांधकाम फारसे शिल्लक नसल्यामुळे गड पहाण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो.

पोहोचण्याच्या वाटा :
कोकणामधील महाड, मंडणगड आणि खेड कडून गाडीमार्गाने दापोलीला पोहोचता येते. दापोलीपासून सोळा कि.मी. अंतरावर हर्णे आहे. हर्णेच्या सागरातील सुवर्णदुर्ग किल्ल्याबरोबर किनार्‍यावरील या तिन्ही किल्ल्यांनाही भेट देता येते.


नोट : वरील सर्व माहिती " गडवाट " या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट (-Posted by Tushar Bhujbal) चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

Monday 3 September 2012

प्रवास एका शिवभक्ताचा :- || किल्ले बहादूरगड ||

पेडगावचा बहादूरगड किल्ला


पेडगावचा किल्ला बहादूरगड म्हणून प्रसिध्द आहे. बहादूरगड किल्ला अहमदनगर जिल्ह्यामधील श्रीगोंदे तालुक्यामधे आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात श्रीगोंदे तालुका आहे. या तालुक्याच्या दक्षिणसीमेवर भीमा नदी वहाते. या भीमा नदीच्या उत्तरतीरावर बहादूरगड किल्ला आहे.

इतिहास:
साधारण आयताकृती आकाराच्या बहादूरगडाची निर्मिती मोगल सरदार बहादूरखान कोकलताश याने केली. या बहादूरखानाला शिवाजीराजांनी चांगलाच धडा शिकवला तोही तोनदा. हा बहादूरखान औरंगजेबाचा दूधभाऊ आहे. त्याला औरंगजेबाने सुभेदार म्हणून दक्षिणेत पाठवले. त्याला बहादूरखान कोकलताश अशी पदवी दिलेली होती. याने भीमेच्या काठावर किल्ला बांधला आणि त्याला आपलेच नाव देण्याची बहादूरी केली. बहादूरखानाच्या या बहादूरीबद्दल औरंगजेबाला काय वाटले ते औरंगजेबालाच माहीत. छत्रपती शिवाजी महाराजांना मात्र बहादूरखान याची बहादूरी माहिती होती. त्यांनी बहादूरखानाला मराठय़ांची बहादूरी दाखवायचे ठरवले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक नुकताच पार पडला होता. त्यासाठी अमाप खर्चही झाला होता. तो खर्च भरुन काढायला बहादूरखानाने आपण होवून शिवाजीराजांना संधी दिली. बहादूरखानाने बहादूरगडामधे एक कोटीचा शाही खजिना आणि दोनशे उत्तम प्रकारचे अरवी घोडे औरंगजेबाकडे पाठविण्यासाठी गोळा केले होते. महाराजांच्या हेरांनी सगळा तपशिल गोळा करुन आणला होता.
महाराजांनी आपल्या सरदाराबरोबर नऊ हजाराचे सैन्य बहादूरगडावर खजिना आणण्यासाठी पाठवले. या सददाराने आपल्या सैन्याने दोन भाग केले. एक दोन हजाराचे तर दुसरे सात हजाराचे भग केले. दोन हजाराच्या तुकडीने बहादूरगडावर जोरदार हल्ला केला. या तुकडीचा उद्येश गडबड उडवून देण्याचा होता तो सफल झाला. बहादूरखान लढाईसाठी तयारी करुन मराठय़ांच्या सैन्यावर धावून गेला. त्यामुळे मराठय़ांच्या तुकडीने माघार घेवून पळायला सुरवात केली. त्यामुळे बहादूरखानाला चेव चढला. त्याने मराठय़ांना गाठण्यासाठी त्यांचा जोरदार पाठलाग सुरु केला. मराठय़ांनी बहादूरखानाला हुलकावणी देत देत खूप लांबवर आणून सोडले. दरम्यान मराठय़ांच्या उरलेल्या सात हजारांच्या सैन्याने बहादूरगडावर हल्ला चढवला. गडामधे तुरळक सैन्य, नोकरचाकर आणि बाजारबुणगेच उरले होते. मराठय़ांनी खजिना आणि घोडे ताब्यात घेवून रायगडाकडे कूच केली.
बहादूरखान पाठलागावरुन परत आला तेव्हा त्याला मराठय़ांनी शाही खजिना लुटल्याची बातमी कळाली. तेव्हा त्याला मराठय़ांच्या बहादूरीची जाणीव झाली. खजिना घालवून आणि कशीबशी आपली इभ्रत वाचवून या पेडगावच्या शहाण्याला गप्प बसावे लागले.

गडावर पहाण्यासारखी ठिकाणे :
पेडगावचा बहादूरगड हा भीमेच्या काठावर आहे. याची दक्षिणेकडील तटबंदी भीमानदीला समांतर अशी आहे. साधारण आयताकृती आकाराच्या बहादूरगडा आहे. किल्ल्याला तीन चार प्रवेशव्दारे आहेत. मुख्य प्रवेशमार्ग गावाच्या बाजूला आहे. किल्ल्यामधे असलेल्या अनेक वास्तू आज ध्वस्त झालेले आहेत. याची तटबंदीमात्र कशीबशी उभी असून सर्वत्र काटेरी रान माजलेले आहे. नदीच्या बाजूच्या तटबंदीमधे असलेले बांधकाम पहाण्यासारखे आहे. या दुमजली इमारतीच्या खिडक्यांमधून भीमानदीचा देखावा सुंदर दिसतो. किल्ल्यामधे सुबक नक्षीकाम असलेली दोन मंदिर आहेत. या मंदिरापैकी लक्ष्मीनारायण मंदिर त्यातल्या त्यात बर्‍या अवस्थेमधे आहे. या मंदिरामधील अलंकृत स्तंभ तसेच बाहेरील मुर्ती पहाण्याजोग्या आहेत.

गडावर पोहोचण्याच्या वाटा :
पेडगावचा बहादूरगडाला जाण्यासाठी दोनतीन मार्ग आहेत. दौंड हे पुणे जिल्ह्यामधील तालुक्याचे गाव असून रेल्वे आणि गाडी रस्त्याने जोडले गेले आहे. दौंडकडून गाडीरस्त्याने देऊळगाव पर्यंत येवून पेडगाव गाठावे लागते. अलिकडील पेडगाव मधून नावेने पलीकडील पेडगावामधील बहादूरगडाला जावे लागते. 
दुसरा मार्ग म्हणजे अहमदनगर कडून अथवा पुण्यातून श्रीगोंदेला पोहोचावे व तेथून पेडगावला यावे. हा मार्ग सोयीचा आहे.


पाण्याची सोय:- आपण स्वतः करावी.

जेवण्याची सोय:- आपण स्वतः करावी.

 नोट : वरील सर्व माहिती " गडवाट " या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट (-Posted by Tushar Bhujbal) चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .