Monday 1 October 2012

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले रामगड ।।

रामगड किल्ला

किल्ल्याची  उंची  : १६५
 किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांगः मालवण, सिंधुदुर्ग
जिल्हा : सिंधुदुर्ग
श्रेणी : मध्यम

रांगणा गडाजवळ उगम पावणारी गड नदी ८० किमी अंतर कापून समुद्राला मिळते. या गडनदी मार्गे होणार्‍या व्यापारावर, जलवहातूकीवर लक्ष ठेवण्यासाठी ‘रामगड’ किल्ला बांधण्यात आला. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटावलेल्या एका डोंगरावर हा किल्ला बांधण्यात आला. आजही किल्ल्याचे प्रवेशद्वार, तटबंदी, बुरुज शाबूत आहेत. 

इतिहास :
रामगडची उभारणी शिवाजी महाराजांनी केली. गडाचा इतिहास ज्ञात नाही. १८ व्या शतकात पेशवे व तुळाजी आंग्रे यांच्यामध्ये लढाई चालू होती. त्यावेळी तुळाजीने रामगड जिंकून घेतला होता. तेव्हा पेशव्यांचे सरदार कृष्णाजी महादेव व सावंतवाडीकर यांचा जमाव खंडाजी मानकर यांनी एकत्र होउन फेब्रुवारी १७९६ मध्ये रामगड जिंकला.
६ एप्रिल १८१८ ला रामगड किल्ला ब्रिटीशांनी जिंकून घेतला. त्यावेळी गडावर २१ तोफा व १०६ तोफगोळे असल्याचा उल्लेख मिळतो.

गडावरील पहाण्याची ठिकाणे :
गडाच्या पश्चिमाभिमुख प्रवेशद्वारातून आपण गडावर प्रवेश करतो. गडाचे प्रवेशद्वार ८ फुट उंच आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला १८ फूट उंच बुरुज आहेत. प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला पहारेकर्‍यांसाठी देवड्यांची योजना केलेली आहे. या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस थोड्या अंतरावर अजून एक (चोर) दरवाजा आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या हाताला तटबंदी ठेऊन सरळ चालत गेल्यावर आपल्याला होळींच्या माळावर पोहोचतो. तेथे ७ तोफा रांगेत उलट्या पुरुन ठेवलेल्या दिसतात. त्यातील सर्वात मोठी तोफ ७ फूट लांबीची आहे. या तोफांसमोरच किल्ल्याचे दुसरे प्रवेशद्वार आहे. हे उत्तराभिमुख प्रवेशद्वार गोमुखी बांधणीचे आहे. प्रवेशद्वाराच्या आत देवड्या आहेत. परंतू प्रवेशद्वारा बाजूच्या बुरुजांचे चिरे ढासळल्यामुळे प्रवेशद्वारातून रामगड गावातील होळीवाडीत जाणारा मार्ग बंद झाला आहे. या प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताच्या तटबंदीवरुन गड नदीचा प्रवाह दिसतो.
गडाच्या मधोमध बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार ढासळलेले आहे. बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोरील तटावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. या तटावर काळ्या पाषाणातील गणपतीची अत्यंत सुबक मुर्ती आहे. बाजूलाच काही शाळूंका आहेत. या तटावरुन दुसर्‍या बाजूला पायर्‍यांनी उतरल्यावर आपण किल्ल्याच्या सध्याच्या प्रवेशद्वारापाशी येतो व आपली गडफेरी पूर्ण होते. गडाला १८ फूट उंचीचे १५ बुरुज आहेत. प्रत्येक बुरुजाला ३ दिशांना खिडक्या आहेत. बुरुजांच्यामध्ये १८ फूटी तटबंदी असून तीने पूर्ण किल्ल्याला वेढलेले आहे. तटबंदीची लांबी अंदाजे ६४० मीटर आहे. गडावर किल्लेदाराच्या वाड्याचा चौथरा आहे, पण पाण्याची विहीर अथवा तलाव आढळत नाही.

गडावर पोहोचण्याच्या वाटा :
रामगड गाव सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात आहे. कणकवली व मालवण दोन्ही कडून रामगडला जाण्यासाठी एसटी बसेस उपलब्ध आहेत.
१) रामगड कणकवलीहून १२ किमी वर आहे. कणकवलीहून मसूरे, आचरा मार्गे मालवण, देवगडला जाणार्‍या बसेसनी रामगडला जाता येते.
२) रामगड मालवणहून २९ किमी वर आहे. मालवणहून आचरामार्गे कणकवलीला जाणार्‍या बसेसनी रामगडला जाता येते. खाजगी गाडीने मालवण -चौके - बागायत - मसदे - बेळणा - रामगड यामार्गेही जाता येते.

राहाण्याची सोय : गडावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही, पण रामगड गावात आहे.
पाण्याची सोय : गडावर पाण्याची सोय नाही, पण रामगड गावात आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ : गडावर जाण्यासाठी लागणारा वेळ: रामगड बाजारपेठेतून १५ मिनीटे लागतात.
 
सूचना : मालवणहून सकाळी निघून (१२ किमी) मसूरे जवळील भरतगड व भगवंतगड पाहून (१७ किमी) रामगडला जाता येते. तसेच रामगडहून ओवळीये गावातील (१० किमी) सिध्दगड पाहून कसाल मार्गे (३६ किमी) मालवणला येता येते. या मार्गाने हे ४ किल्ले एका दिवसात पाहून होतात.
यातील मालवण ते मसूरे व मसूरे - रामगड बसेस आहेत. परंतू रामगड ते ओवळीये व ओवळीये ते कसाल जाण्यासाठी रामगडहून रिक्षा करावी लागते. कसाल - मालवण बसेस आहेत.


नोट : वरील सर्व माहिती "गडवाट" या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट ( by - Amit Mhadeshwar) चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

No comments:

Post a Comment