Saturday 27 July 2013

प्रवास एका शिवभक्ताचा :- || किल्ले राजदेहेर ||


किल्ले राजदेहेर
 किल्ल्याची ऊंची : ४४१०  मी.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग.
 डोंगररांग : अजंठा सातमाळ.
 श्रेणी : मध्यम.
जिल्हा : जळगाव.

चाळीसगाव तालूक्याच्या दक्षिण टोकाला सातमाळ डोंगररांगेत ‘‘राजदेहेर‘‘ किल्ला आहे. हा दूर्गम गड दोन डोंगरावर वसलेला असून त्यामध्ये असलेल्या घळीतून किल्ल्याचा प्रवेश ठेऊन स्थापत्यकाराने किल्ल्यावर चालून येणारा शत्रू दोनही डोंगरावरुन मार्‍याच्या टप्प्यात राहिल अशी योजना केलेली आहे. या पूरातन किल्ल्यावर आजही पहाण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत.

इतिहास :
राजदेहेर हा किल्ला गवळीकालीन किंवा यादव पूर्वकालीन असावा. इ.स. १००० ते १२१६ पर्यंत निकुंभांची या भागावर सत्ता होती. पाटणे या राजधानी जवळच हा किल्ला असल्यामुळे लष्करीदृष्ट्या महत्वाचा असावा. इ.स. १२१६ - १७ च्या सुमारास यादवांनी हा किल्ला ताब्यात घेतला. यादवानंतर अल्लाऊद्दीन खिलजीकडे व त्यानंतर फारुकींकडे हा किल्ला होता. इ.स. १६०१ मध्ये खानदेश सुभा मुघलांकडे गेला; त्यावेळी भडगावच्या रामजीपंतांनी अशिरगडच्या वेढ्यात चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांना जहागिरी देण्यात आली, त्यात राजदेहेर किल्ल्याचा समावेश होता.
शिवकालीन पत्रात या किल्ल्याचा उल्लेख नाही, पण १०९ कलमी बखरीत शिवाजीमहाराजांच्या किल्ल्यांच्या यादीत या किल्ल्याचा समावेश केला आहे. पुढे १७५२ च्या भालकीच्या तहात निजामाकडून हा भाग पेशव्यांनी घेतला. इ.स. १७६२ मध्ये माधवराव पेशव्यांनी राजदेहेर किल्ला विठ्ठल शिवदेव यांच्याकडे सोपवून १० हजार रुपयांचा सरंजाम किल्ल्याला मंजूर केला.
इ.स. १७६४ मध्ये चाळीसगावचे जहागिरदार पवार बंधूंनी बंड केल्यावर दुसर्‍या बाजीरावाने विठ्ठलराव विंचूरकर यांना चाळीसगावावर पाठविले. त्यांनी पवारांचे बंड मोडून राजदेहेर ताब्यात घेतला.
१५ एप्रिल १८१८ रोजी कर्नल प्रॉथर याच्या नेतृत्वाखालील सैन्याने किल्ल्यावर हल्ला केला. त्यावेळी किल्ला निकम देशमुखांच्या ताब्यात होता. मराठा सैन्याने प्रतिकार केला, पण इंग्रजांनी किल्ला जिंकून घेतला.

गडावरील  पहाण्याची ठिकाणे :
दोन डोंगरामधील घळीतील पत्थरात पायर्‍यांचा अरुंद मार्ग खोदून भौगोलीक रचनेचा कौशल्याने संरक्षणासाठी उपयोग किल्ला बांधतांना केलेला आहे. या मार्गाने उध्वस्त प्रवेशद्वारातून आपला गडावर प्रवेश होतो. जवळच व्यालमुख असलेले दोन भग्न स्तंभ पडलेले दिसतात. प्रवेशद्वाराच्या थोड्या वरच्या अंगाला दगडात खोदलेले रिकामे लेणं आहे. त्याच्या बाजूस एक गुहा व पाण्याच टाक आहे. या ठिकाणाहून संपूर्ण किल्ला दृष्टीक्षेपात येतो. तेथून खाली उतरुन पुन्हा प्रवेशद्वारापाशी येऊन गडफेरी सुरु केल्यावर पाण्याचे दोन खांबी टाकं लागत. येथून पुढे गेल्यावर एक गुहा व ४ खांबी टाक आहे. गडाच्या माचीवर साचपाण्याचा तलाव असून त्याच्या बाजूलाच नंदी व पिंड उघड्यावर पडलेले आहेत. तलावावरुन पुढे गेल्यावर दगडात खोदलेल्या पादूका पहायला मिळतात. तेथून माचीवर निमूळत्या टोकापर्यंत गेल्यावर आजूबाजूचा विस्तृत प्रदेश व राजधेरवाडी गाव पहाता येते. माचीच्या टोकावरुन बालेकिल्ल्याकडे जाताना डाव्या हातास पाण्याच एक टाक आहे. बालेकिल्ल्यावर उध्वस्त वास्तूंचे अवशेष आहेत. गडाच्या दक्षिणेला थोडी तटबंदी शाबूत आहे बालेकिल्ल्यावरुन उतरुन ही तटबंदी ओलांडून गडाला वळसा घालूनही राजधेरवाडीत उतरता येते.

गडावर पोहोचण्याच्या वाटा :
१) मनमाड - भुसावळ रेल्वेमार्गावर नांदगाव स्थानकावर उतरुन राजदेहेरवाडीला (अंतर अंदाजे ५० किमी) जाण्यासाठी जीप मिळतात.
२) मनमाड - नांदगाव रेल्वेमार्गावर नायडोंगरी स्थानकावर उतरावे (येथे केवळ पॅसेंजर थांबतात). नायडोंगरी येथुन राजदेहेरवाडीला जाण्यासाठी बसेस मिळतात.
राजदेहेरवाडी पासून २ किमीवर महादेव मंदिर आहे. या मंदिरा जवळून किल्ल्यावर जाणारी पायवाट आहे.

राहाण्याची सोय : गडावर रहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय : गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.

गडावर जाण्यासाठी लागणारा वेळ : राजदेहेरवाडी पासून १ तास लागतो.


नोट : वरील सर्व माहिती "  शिवकालीन महाराष्ट्र' "  या facebook  वरील पेज मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल . 

No comments:

Post a Comment