Tuesday 12 February 2013

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले हरिहरगड ।।


हरिहर किल्ला

किल्ल्याची उंची : -----
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांगः .....
जिल्हा : नाशिक
श्रेणी : मध्यम



नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरीच्या पश्चिमेस सुमारे २० कि.मी. अंतरावर वसलेला हरिहरगड ऊर्फ हर्षगड आहे. हा किल्ला प्राचीन काळात बांधला गेलेला आहे. 

इतिहास : 
अहमदनगरच्या निजामशाहाच्या ताब्यात हा गड होता. १६३६ साली शहाजीराजांनी शेजारचा त्र्यंबकगड घेताना हाही किल्ला जिंकून घेतला. मात्र नंतर याचा ताबा मोगलांकडे गेला. पुढे १६७० मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड जिंकून स्वराज्यात मोलाची भर घातली. ८ जानेवारी १६८९ रोजी मोगल सरदार मातब्बरखान याने हा किल्ला जिंकला. शेवटी १८१८ मध्ये हा गड मराठयांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला. इतकी मालकी अनुभवणारा हा किल्ला इतिहासकाळात शेजारच्या त्र्यंबकगडा पाठोपाठ या भागातील महत्त्वाचा दुसरा किल्ला आहे. कारण आजही या किल्ल्याच्या पायथ्याच्या वाडयांना टाकेहर्ष, आखली हर्ष अशा नावाने ओळखले जाते.
असा हा त्रिकोणी आकाराचा हरिहरगड त्याचा सरळसोट दगडी जिन्याचा मार्ग, पुढे लागणारा बोगदा व गडावरील सर्व दुर्ग अवशेष वैशिष्टयपूर्ण असेच आहेत. त्याच्यावर पोहोचण्यासाठी दगडात खोदलेल्या खडया जिन्याच्या मार्गामुळे दुर्गयात्रींच्या परिचयाचा आहे. समुद्रसपाटीपासून ११२० मीटर उंचीवर उभा असलेला हा त्रिकोणी आकाराचा किल्ला, त्याचा कातळ कोरीव पाय-यांचा मार्ग, त्याची बोगद्यातून करावी लागणारी अंतिम चढाई हे सारं सारं गिरिप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. १८१८ सालच्या मराठेशाही बुडविण्याच्या इंग्रजांच्या धडक कारवाईत कॅप्टन ब्रिग्ज हा इंग्रज अधिकारी हरिहरगड जिंकून घेतांना याच्या पाय-या बघून आश्चर्यचकित झाला व उद्गारला, "या किल्ल्याच्या पाय-यांचे वर्णन शब्दात करणे कठीणच. सुमारे २०० फूट सरळ व तीव्र चढाच्या या पाय-या अति उंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारखा वाटतात". खरेतर त्या वेळी इंग्रजांचे धोरण गिरीदुर्गाच्या वाटा व प्रवेशमार्ग तोफा लावून उद्ध्वस्त करण्याचे होते. त्या धोरणास अनुसरून त्यांनी अनेक गडांचे मार्ग उद्ध्वस्त केलेसुद्धा (उदा. अलंग-मदन- कुलंग, सिद्धगड, पदरगड, औंढा इ.) पण हरिहर किल्ल्याच्या अनोख्या पाय-यांनी आपल्या राकट सौंदर्याची मोहिनी अशी काय कॅप्टन ब्रिग्जवर घातली की त्याने हरिहरगड जिंकून घेतला पण त्याच्या सुंदर पाय-यांच्या मार्गाला मात्र हात लावला नाही. यावरूनच लक्षात येते की हरिहर त्याच्या पाय-यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.

किल्ल्यावर पाहण्यासारखे : 
हरिहर किल्ल्याच्या पायथ्यावरून किल्ल्याच्या पाय-यांच्या मार्गाकडे दृष्टी देताच हा अक्षरश: गगनाला भिडलेला मार्ग पुढे आपणास स्वर्गारोहणाचा अद्भुत अनुभव देईल, याबद्दल मनात तिळमात्र शंका उरत नाही. काळ्या कातळात एका पाठोपाठ एक पाय-या कोरलेला हा दगडी जिन्याचा मार्ग एका वेळी एकच व्यक्ती वर चढू शकेल इतका अरुंद आहे. म्हणून काळजीपूर्वक वाटचाल करावी. शेवटी साधारण नव्वद पाय-यांचा सोपान चढल्यावर आपण हरिहर किल्ल्याच्या पहिल्या छोटेखानी पण देखण्या प्रवेशद्वारात येऊन पोहोचतो. आपण येथे थोडा वेळ थांबून थंडगार वा-याचा आनंद घ्यायचा व पुढील चढाईस ताजेतवाने व्हायचे.
हरिहर किल्ल्याचे हे पहिले प्रवेशद्वार व त्याच्या दोन्ही बाजूस असणारे दोन लहान बुरूज कातळात खोदून काढलेल्या मार्गाची शोभा वाढवितात.
या  पुढे गेल्यानंतर आपण काही वेळातच किल्ल्याच्या अजस्र अशा काळ्या पहाडासमोर येतो. गडाच्या या प्रवेशद्वारा शेजारीच गणरायाची शेंदूर फासलेली एक छोटी मूर्ती दिसेल. गडावर ठिकाणी डोंगराच्या मध्यभागी शेंदूर फासून ठेवलेले अनगड देव आपणास दिसतील. त्यांच्या मध्यभागी एक त्रिशूळही रोवून ठेवलेला असून हा अनामिक देवतांचा दरबार येथून जाणा-या-येणा-यांचे लक्ष वेधून घेतो.या मार्गाने अंग चोरत पुढे गेल्यानंतर कातळातच खोदलेले दोन दरवाजे पार केल्यावर परत साधारण १३० पाय-यांचा दगडी जिना लागतो. या मार्गाच्या दोन्ही बाजूससुद्धा हाताचा पंजा रुतविण्यासाठी खोबणी असून त्यांची मदत घेत आपण धापा टाकत शेवटी अंतिम प्रवेशद्वारात येऊन पोहोचतो. हरिहर किल्ल्याचा हा शेवटचा छोटा दरवाजा पार करून थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताला खालच्या बाजूला एक गुहा आहे. पण तिथे उतरण्यासाठी दोराची मदत घेणे गरजेचे ठरते. त्यामुळे वरूनच ही गुहा पाहून पुढे गेल्यावर गडाच्या सदरेचे अवशेष आपणास दिसतात. ते पाहून पुढे गेल्यावर तीन पाण्याची टाकी व एक प्रशस्त तलाव लागेल. पश्चिम बाजूने दगडी भिंत बांधून पाणी अडविलेल्या या तलावाच्या काठावर हनुमंताचे छोटे देऊळ असून येथील बाजूच्या खडकावर उघडयावरच शिवलिंग व नंदी आपणास दिसेल.
पुढे पायवाटेच्या उजव्या हातास ५०-६० फूट उंचीची एक टेकडी आपणास दिसते. हरिहर किल्ल्याचा सर्वोच्च माथा असणारी ही टेकडी आपण शेवटचा कातळटप्पा चढून पार करायची. येथे माथ्यावर पोहोचताच अगदीच छोटया सपाटीवर देवांची दाटी दिसते. या टेकडीच्या माथ्यावरून सभोवारचे दृश्य मात्र फारच छान दिसते. उत्तरेला नजर फेकताच वाघेरा तर दक्षिणेला वैतरणा तलावाच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले कावनाई व त्रिंगलवाडी किल्ल्याचे डोंगर फारच आकर्षक दिसतात. पूर्वेला कापडया, ब्रह्मा व त्यांच्या मागे ब्रह्मगिरीचा किल्ला उर्फ त्र्यंबकगड दिसतो.
खाली उतरून समोरील घुमटाकार माथा असलेल्या दगडी ३० फूट लांब व १२ फूट रुंद अशा या दगडी कोठीत जावे. कोठीचा प्रवेशद्वार मात्र अगदी छोट्या खिडकीसारखे असून या कोठीत दिवसासुद्धा काळोख असतो. इतिहास काळातील ही दारूकोठाराची वास्तू गडावरील एकमेव छत शाबूत असलेली इमारत आहे. येथून समोर दिसणारा ब्रह्मा डोंगर फारच सुंदर दिसतो. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. संपूर्ण गडफेरी व्यवस्थितरीत्या पूर्ण करण्यास दोन तास लागतात. गड पाहून परत उतरताना मात्र आपणास काळजीपूर्वक उतरावे लागते.
 
गडावर कसे जाल :
हरिहरला भेट देण्यासाठी आपण नाशिकच्या बसस्थानकावरून घोटी किंवा खोडाळ्याला जाणारी बस पकडायची. त्या बसने आपण उतरायचे मात्र निरगुडपाडा गावात. बसमधून पायउतार होताच समोरच्या उजव्या हाताला हरिहर ऊर्फ हर्षगडचा वैशिष्टयपूर्ण डोंगर दिसतो. तेथून अगदी मळलेल्या वाटेने आपण तासाभरात हरिहर किल्ल्यासमोरील मोकळ्या पठारावर येऊन पोहोचतो. जे दुर्गप्रेमी त्र्यंबकेश्वरहून इकडे येणार आहेत त्यांना सोईचा असा एक दुसरा मार्गसुद्धा आहे. त्र्यंबकेश्वराहून मोखाडा किंवा जव्हारला जाणा-या बसने त्यांनी साधारण १५ कि.मी. चा प्रवास केल्यावर डाव्या हातास हर्षवाडी फाटयावर उतरावे. येथून कळमुस्ते मार्गे साधारण ४ कि.मी.ची पायपीट केल्यानंतर आपण हर्षवाडीजवळ येऊन पोहोचतो. येथून एका बंधा-याच्या काठाने पुढे साधारण पाऊण तासाची खडी चढाई केल्यानंतर आपण हरिहर किल्ल्यासमोरील मोकळ्या पठारावर येऊन पोहोचतो. या रम्य वाटेवर एक आश्रम, त्याच्या शेजारी प्राचीन दगडी पुष्करिणी व गणेश मंदिरही आपणास पाहता येते. निरगुडपाडयावरून काय किंवा हर्षवाडीकडून काय, दोन्ही वाटा आपणास साधारण तासाभराच्या पायपिटीनंतर हरिहर किल्ल्यासमोरील मोकळ्या पठारावर आणून सोडतात.

राहण्याची सोय : राहण्याची सोय नाही.

पाण्याची सोय : पाण्याची व जेवणाची सोय स्वतः करावी.

गड पाहण्यासाठी लागणारा वेळ : साधारणता २-३ तास लागतात.

नोट : वरील सर्व माहिती  "महाराष्ट्रातील किल्ले" या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट -by  (संकलन - फक़्त राजे) चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल . 

No comments:

Post a Comment