Monday 6 May 2013

!! छत्रपती शिवाजी महाराज आणि रायरेश्र्वर गड !!

वयाच्या केवळ १६ व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले. मूठभर मावळ्यांमध्ये धर्मप्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले आणि स्वराज्याची संकल्पना दिली. हिंदवी स्वराज्यासाठी मूठभर मावळ्यांनी जिवाची पर्वा न करता स्वतःला झोकून दिले. पाच मुसलमानी पातशाहींच्या विरोधात लढत एक एक प्रदेश जिंकला. केवळ ५० वर्षांच्या कालावधीत विजापूर आणि दिल्ली या राजसत्तांना पाणी पाजले. महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची घोषणा करून स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला आणि हिंदु धर्माला राजसिंहासन प्राप्त करून दिले. महाराजांना आपले भाग्यविधाते म्हणून स्वराज्याची जनता त्यांना पाहू लागली. काही जण, तर त्यांना हिंदूपती म्हणू लागले. शिवरायांनी वेदांचे, पुराणांचे, देवळांचे... रक्षण केले आणि जीभेवर रामनाम राखून धरले.


रायरेश्वर शिवमंदिर सुरेख शिवलिंग

सह्याद्रीच्या शिखरावर विराजमान असलेल्या भोर येथील श्री स्वयंभू रायरेश्वराच्या शिवालयात छ. शिवाजी महाराजांनी २६ एप्रिल १६४५ या दिवशी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची सवंगड्यांसह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. बारा मावळातील कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर ही मंडळी भोरच्या वातावरणात वावरणारी होती. सिंहाची छाती असणार्‍या या मावळ्यांना साथीला घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वयंभू रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्याची आण घेतली.

हिंदवी स्वराज्याचा साक्षीदार रायरेश्वरसह्याद्रीच्या कडेकपारी, शिवमंदिर एक ।
तिथे रायरेश्वर स्वयंभू शिवलिंग सुरेख ।।
आणाभाका झाल्या आमुच्या, त्याच्या साक्षीने ।
एकजुटीने राहून कोणा अंतर न देणे ।।
देशासाठी, धर्मासाठी झोकून देऊ उडी ।
मावळे आम्ही शिवबाचे सवंगडी ।।

सृष्टीच्या नानाविध रूपांचे प्रत्यंतर देणारा निसर्गरम्य रायरेश्वरगड पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आहे. तो समुद्रसपाटीपासून ४६९४ फूट उंचावर वसला आहे. येथून वैराटागड, केंजळगड, पांडवगड, कमळगड, पाचगणी, महाबळेश्वर, कोळेश्वर, रायगड, लिंगाणा, तिकोणा, राजगड, तोरणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, प्रतापगड, चंद्रगड इ. गड दिसतात. रायरेश्वर पठाराची लांबी ११.०४ कि.मी. असून, रुंदी १.०२ कि.मी. आहे. गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतलेले शिवमंदिर आणि जननी देवीचे मंदिर आहे. छ. शिवाजी महाराजांनी शिवा जंगम नावाचा पुजारी तेथे पूजेसाठी नेमला होता. सध्या येथे जंगम लोकांची ४० कुटुंबे रहातात.

||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

No comments:

Post a Comment